जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 300/2015.
तक्रार दाखल दिनांक : 10/08/2015.
तक्रार आदेश दिनांक : 30/9/2016. निकाल कालावधी: 01 वर्षे 01 महिने 10 दिवस
रामचंद्र विश्वनाथ पाटील, वय 62 वर्षे,
व्यवसाय : शेती, रा. काजळा, ता. व जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
श्री. आनंद निंबाळकर, कार्यकारी व्यवस्थापक,
मिनाक्षी मोटर्स / टी.व्ही.एस. मोटर्स, मध्यवर्ती प्रशासकीय
इमारतीसमोर, उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य श्री. मुकूंद बी. सस्ते, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : एस.जी. देशपांडे
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : एस.एच. मिनियार
न्यायनिर्णय
श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. तक्रारकर्ता यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्यात असा आहे की, त्यांना शेती कामाकरिता मोटार सायकलची आवश्यकता असल्यामुळे विरुध्द पक्ष यांच्याकडून टी.व्ही.एस. स्टार सिटी मोटार सायकल खरेदी केली असून त्या गाडीचा रजि. क्र. एम.एच.25/ए.ए.6402 आहे. मोटार सायकल खरेदी केल्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये व पहिल्या सर्व्हीसिंगच्या पूर्वीच गाडीचे वायझर हेड लाईटवरच्या भागावरील फायबर खराब होऊ लागले आणि त्याचा रंग निघू लागला. तसेच गाडीच्या हेड व साईटवरील कलर पट्टया निघू लागल्या व त्यांचा रंग जाऊ लागला. त्यामुळे गाडी पुर्णपणे जुनी असल्यासारखी दिसू लागली. सदर बाब तक्रारकर्त्याने प्रथम सर्व्हीसिंगच्यावेळी विरुध्द पक्ष यांना सांगितली असता त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच पार्ट बदलून पाहिजे असल्यास रु.2,200/- लागतील, असे विरुध्द पक्ष यांनी सांगितले. गाडीची वॉरंटी दिल्याची बाब निदर्शनास आणून दिली असता कंपनीस कळवू असे विरुध्द पक्ष यांनी सांगितले. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांना विधिज्ञांमार्फत नोटीस पाठवली असता दखल घेण्यात आली नाही. विरुध्द पक्ष यांनी सेवेमध्ये त्रुटी निर्माण केल्याचा वादविषय उपस्थित करुन तक्रारकर्त्याने गाडीचे दोषयुक्त भाग बदलून मिळावेत आणि रु.50,000/- नुकसान भरपाई, रु.20,000/- मानसिक त्रासाकरिता व रु.10,000/- तक्रार खर्चाकरिता देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
2. विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर लेखी उत्तर दाखल केले असून तक्रारीतील विधाने व मजकूर अमान्य केला आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे टी.व्ही.एस. कंपनीने गाडीचे फायबर पार्टचे रंगाबाबत कधीही वॉरंटी दिलेली नाही. सर्व्हीस मॅन्युअल बुकमध्ये तशाप्रकारे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. तक्रारकर्ता यांनी प्रथम सर्व्हीसिंगच्या वेळी त्या दोषाबाबत कळवल्याचे त्यांनी अमान्य केले आहे. कारण तसे असते तर सर्व्हीसिंगच्या वेळी भरुन देण्यात आलेल्या जॉब कार्डमध्ये सदरील बाब लिहिली असती. परंतु त्यावेळी गाडीचा रंग गेलाही नव्हता. तसेच रंगाबाबत कंपनी कधीही वॉरंटी किंवा गॅरंटी देत नसल्याने हा पार्ट बदलून देण्याची जबाबदारी विरुध्द पक्षावर येत नाही. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
3. तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी उत्तर व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ उपस्थित होणा-या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला दोषयुक्त मोटार सायकल
दिली काय ? होय.
2. तक्रारकर्ता नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
4. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून टी.व्ही.एस. स्टार सिटी मोटार सायकल खरेदी घेतली, याबद्दल दोन्ही पक्षकारात वाद नाही. मात्र ही मोटार सायकल केव्हा घेतली, याबद्दल तक्रारकर्त्याने मौन बाळगलेले आहे. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे गाडी घेतल्यापासून 8 ते 10 दिवसात गाडीच्या वायझर हेड लाईटवरच्या भागातील फायबर खराब होऊ लागले व त्याचा रंग निघू लागला. गाडीच्या हेड व साईड कलर पट्टया निघू लागल्या व त्यांचा रंग जाऊ लागला. गाडी पूर्णपणे जुनी असल्यासारखी दिसू लागली. या गोष्टी पहिल्या सर्व्हीसिंगच्या पूर्वी घडल्या. सर्व्हीसिंगच्या वेळी तक्रारकत्याने विरुध्द पक्षाला याबद्दल सांगितले. तेव्हा विरुध्द पक्षाने पुढच्या वेळच्या सर्व्हीसिंगच्या वेळेस बघू म्हणून तक्रारीकडे दुर्लक्ष केले. मात्र दुस-या सर्व्हीसिंगच्या वेळेस सदर पार्ट बदलावयाचा असल्यास रु.2,200/- लागतील, असे सांगितले. तसेच गॅरंटी पिरियड असल्यामुळे त्याबाबत कंपनीला कळवू, असे सांगितले. मात्र तसे केलेले नाही.
5. गाडीच्या रजिस्ट्रशनची तारीख रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटप्रमाणे 3/4/2014 अशी आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला दि.19/3//015 रोजी नोटीस दिल्याचे दिसून येते. तक्रारकर्त्याने मॅन्युअल हजर केलेले आहे. त्यामध्ये पहिल्या सर्व्हीसिंगची तारीख दिसून येत नाही. किलोमीटर 1017 असल्याचे दिसते. दुसरी सर्व्हीसिंगची सुध्दा तारीख दिसून येत नाही. मात्र किलोमीटर 3742 असल्याचे दिसून येते. सर्वसाधारपणे पहिली सर्व्हीस 1 महिन्याने तर दुसरी सर्व्हीसिंग 3 महिन्याने अगर विवक्षीत किलोमीटर झाल्यावर करुन घेतली जाते. पुढील तिसरी व चवथी फ्री सर्व्हीस तक्रारकर्त्याने करुन न घेतल्यामुळे त्याचे कुपन तसेच दिसून येते. तक्रारकर्त्याचे म्हणणे ग्राह्य धरले तर त्याने प्रथम विरुध्द पक्षाकडे तक्रार मे 2014 मध्ये केलेली असावी. तसेच विरुध्द पक्षाने जुलै 2014 मध्ये तक्रारकर्त्याकडे रु.2,200/- ची मागणी केली असावी.
6. विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे की, गाडीचे फायबर पार्टच्या रंगाबाबत कधीही वॉरंटी दिलेली नाही. सर्व्हीस मॅन्युअल बुकमध्ये तशाप्रकारे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. तक्रारकर्त्याने तक्रार केली असती तर सर्व्हीसिंगच्या वेळी जॉब कार्डमध्ये तशी नोंद केली गेली असती. वास्तविक पाहता जॉब कार्ड हे विरुध्द पक्षाच्याच ताब्यात असते. तक्रारकर्त्याकडे त्याची कार्बन कॉपी दिलेली असू शकते. मात्र जॉब कार्ड हजर करणे विरुध्द पक्षाला शक्य होते. मॅन्युअलमध्ये वॉरंटीबाबतची माहिती पाहिली असता पहिल्या 24 महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व पार्टची वॉरंटी असून मॅन्यूफॅक्चरिंग डिफेक्ट असल्यास कंपनीच्या वतीने तो दूर करण्याची हमी दिलेली आहे. त्यामुळे विरुध्द पक्षाच्या म्हणण्यात काहीही तथ्य आढळून येत नाही.
7. वर म्हटल्याप्रमाणे तक्रारकर्त्याने जवळजवळ 1 वर्षाने म्हणजेच दि.19/3/2015 रोजी विरुध्द पक्षाला नोटीस पाठवल्याचे दिसते. पोस्टाची परत पावती सुध्दा तक्रारकर्त्याने हजर केलेली आहे. मात्र तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे रंग जाण्याची क्रिया गाडी घेतल्यापासून 8 ते 10 दिवसातच घडली व त्यामुळे गाडी जुनी असल्यासारखी दिसू लागली. पहिल्या सर्व्हीसिंगच्या वेळेला तसेच दुस-या सर्व्हीसिंगच्या वेळेला पण तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे त्याबद्दल तक्रार केली, असे म्हणणे आहे. जर विरुध्द पक्षाने जॉब कार्ड हजर केले असते तर अशी तक्रार होती किंवा नाही, याबद्दल प्रकाश पडला असता. क्षणभर जर मानले की, दुस-या सर्व्हीसिंगपर्यंत सुध्दा तक्रारकर्त्याने अशी तक्रार केली नाही तरी सुध्दा त्यानंतर जर दोष उत्पन्न झाला असेल तरी सुध्दा त्याची जबाबदारी उत्पादक कंपनी व त्याचे एजंट यांच्यावर जाते. विरुध्द पक्षाने जॉब कार्ड हजर केले नाही. तसेच तक्रारकर्त्याने नंतर विरुध्द पक्षाला नोटीसही दिली. त्याला विरुध्द पक्षाने उत्तर दिलेले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार ग्राह्य धरावी लागेल. विरुध्द पक्ष हे उत्पादक कंपनीचे एजंट असल्यामुळे मालातील दोषास विरुध्द पक्ष सुध्दा जबाबदार आहेत. विरुध्द पक्षाला आपली जबाबदारी झटकता येणार नाही. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष याने तक्रारकर्त्याच्या गाडीमधील वायझर हेडलाईटच्या वरच्या भागावरील फायबर, तसेच हेड व साईडमधील कलर पट्टया बदलून नव्या पट्टया घालाव्यात. जर तसे करण्यास विरुध्द पक्ष असमर्थ असेल तर विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास रु.2,200/- व त्यावर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. 9 दराने व्याज द्यावे.
(3) विरुध्द पक्ष याने तक्रारकर्त्यास या तक्रारीचा खर्च म्हणून रु.5,000/- द्यावेत.
(4) उभय पक्षकारांना या आदेशाची प्रथम साक्षांकीत प्रत नि:शुल्क देण्यात यावी.
(श्री. मुकूंद बी. सस्ते) (सौ. व्ही.जे. दलभंजन) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
-00-
(संविक/स्व/श्रु/30916)