जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – २९२/२०१०
तक्रार दाखल दिनांक – १०/१०/२०१०
तक्रार निकाली दिनांक – ११/०७/२०१३
घनश्याम पंढरीनाथ पवार
उ.व. – ३२, धंदा – शेती
रा. पाटण ता.शिंदखेडा, जि.धुळे. ................ तक्रारदार
विरुध्द
१. श्री. अमिनभाई ईलियासभाई शमशी
मे.प्रोप्रा. राज अॅग्रो अॅण्ड कंन्सल्टेशन
स्टेशन रोड, शिंदखेडा
ता. शिंदखेडा, जि. धुळे.
२. मे.प्रोप्रा. निर्मल सीडस प्रा.लि.
भडगांव रोड, पाचोरा ता.पाचोरा
जि. जळगांव ............ सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.बी.पी. पवार)
(विरुध्दपक्ष तर्फे – अॅड.एल.पी. ठाकुर)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
सामनेवाला नं.१ व २ यांनी तक्रारदार यांना सदोष बियाण्याची विक्री करून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करून नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे.
१. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांची मौजे वरसुल ता.शिंदखेडा येथे भुमाप क्र. २३८, हेक्टर ५ आर ४० अशी शेतजमीन आहे. त्यांना सदर शेतीत महिन्यात मूग पेरणी करावयाची होती. त्यामुळे तक्रारदारने सामनेवाला नं.१ यांच्या दुकानातून सामनेवाला नं.२ कंपनीने निर्माण केलेले मूग बियाणे लॉट नं.१२०७८ चे दि.१६/०६/२०१० रोजी ९ बॅगा रक्कम रू.६,४८०/- ला विकत घेतले. शेतीची योग्य ती मशागत करून सदर मूग बियाणांची संपूर्ण शेतात पेरणी केली. त्यांनतर पुन्हा मशागत करून कृत्रिम खते लावून सर्व ती काळजी घेतली. मात्र मूग बियाण्याची उगवण क्षमता अत्यंत कमी निघाली. त्यामुळे तक्रारदारने जिल्हा स्तरीय बियाणे तक्रार निवारण समिती यांचेकडे तक्रार केली. त्यानुसार दि.२७/०७/२०१० रोजी दु.३.३० वाजता तक्रारदारचे शेतात येवून त्यांनी पिकांची पाहणी केली व पिक परिस्थितीचा पंचनामा केला. सदर पंचनाम्यात सदर बियाण्याची उगवण क्षमता अत्यंत कमी म्हणजे ३२.९४% असल्याचे निष्पन्न झाले.
२ तक्रारदारचे पुढे असे म्हणणे आहे की, सदर मूग पिकावर मोठया प्रमाणात आळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतात प्रत्यक्ष १०% मुगाचे पिक शिल्लक राहिले. वास्तविक सदर पिकावर रोग पडणार नाही, तसेच पाकिटावरील दाव्यानुसार उगवण क्षमता ७५% राहिल असे सामनेवाला नं.२ कंपनीच्या पाकिटावर नमूद होते. तक्रारदारने दि.०९/०९/२०१० रोजी दोन्ही सामनेवाला यांना रजिस्टर नोटीस पाठवून झालेल्या नुकसानीबाबत मागणी केली असता सामनेवाला यांनी काहीएक उत्तर दिलेले नाही. सबब सामनेवाला यांच्याकडून तक्रारदारास नुकसान भरपाई रक्कम रू.३,२४,०००/- मिळावी. मानसिक त्रासाबददल रू.१०,०००/- मिळावे व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रू.५०००/- मिळावे. तसेच नुकसान भरपाई रक्कमेवर द.सा.द.शे. १२% प्रमाणे व्याज मिळावे अशी विनंती केली आहे.
३. अर्जदार यांनी आपले म्हणण्याच्या पृष्टयार्थ नि.६ सोबत नि.६/१ वर बियाणे घेतल्याची पावती, नि.६/२ वर कृषी अधिकारी यांचेकडे केलेल्या तक्रारीची प्रत, नि.६/३ वर ७/१२ उतारा, नि.६/४ वर पिक पाहणी अहवालाची माहिती व पिक परिस्थिती पंचनामा, नि.६/५ वर सामनेवाला नं.१ व २ यांना पाठविलेली नोटीसीची प्रत, नि.६/६ वर नोटीस रजिस्टर पावत्या, नि.६/७ वर सामनेवाला नं.२ यांना मिळालेल्या नोटीसीची पोहच पावती, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेले आहेत.
४. सामनेवाला नं.१ हे मे. मंचाची नोटीस स्विकारूनही मुदतीत हजर न झालेने त्यांचे विरूध्द एकतर्फा आदेश परित करण्यात आलेला आहे.
५. सामनेवाला नं.२ यांनी नि.८ वर लेखी म्हणणे दाखल करून तक्रारीतील कथन नाकारलेले आहे. तक्रारदारची तक्रार खोटी आहे. तक्रारदार सामनेवाला यांचा ग्राहक नाही. तक्रारदारने सदर केस दाखल करणेबाबात उता-यावरील नमूद इतर लोकांची संमती पत्र दाखल केलेले नाही. सामनेवाला नं.१ हे कंपनीचे अधिकृत विक्रेते नाहीत. बियाणे खरेदी केल्याचा पुरावा म्हणून बियाण्याच्या बॅगा तक्रारीसोबत जोडल्या नाहीत. शेतीत मशागत करून कृत्रिम खत लावले व सर्वप्रकारची काळजी घेतली त्याबददल अधिकृत पुरावा सोबत जोडलेला नाही. बियाण्याची उगवण फारच कमी आढळून आल्याचे नेमके कारण पंचनाम्यात दिलेले नाही. तक्रारदारने पेरणी ९० से.मी. अंतरावर केल्याचे पंचनाम्यात नमूद आहे. यावरून सदर मुग बियाण्याची पेरणी विरळ स्वरूपात केल्याचे दिसून येते. कंपनीचे प्रतिनिधी हेमंत शिंदे यांच्या पंचनाम्याच्या वेळेच्या साक्षीची जिल्हा तक्रार निवारण समितीने योग्य ती दखल घेतलेली नाही. सदर मूग पिकावर पाने खाणा-या आळीचा प्रार्दुभाव झाल्याचे तक्रारदारचे तक्रारीत नमूद आहे. यावरून तक्रारदारने सदर पिकाचे संरक्षणासाठी किटक नाशकाच्या फवारण्या केल्याचे दिसून येत नाही. विपरीत हवामान, कमी-अतिवृष्टी, किडीचा प्रार्दुभाव व आर्द्रतेचे कमी जास्त प्रमाण, स्थानिक परिस्थिती हया गोष्टींवरही बियाणांची उगवण अवलंबून असते. तसेच पिकांचे व्यवस्थापन, कंपनीच्या माहीती पत्रकाप्रमाणे न झाल्यास सदर मूग पिकाचे उत्पादन कमी येवु शकते.
६. सामनेवाला यांचे पुढे असे म्हणणे आहे की, सामनेवाला यांनी तक्रारदारचे नोटासीस दि.०६/१०/१० रोजी उत्तर दिलेले आहे. सदर नोटीस उत्तर तक्रारदार यास दि.११/१०/१० रोजी मिळाले आहे. सदर लॉट नं.१२०७८ च्या बियाण्याची एकूण ३२४ पाकिटे विक्रीसाठी धुळे येथील अधिकृत विक्रेत्याला पाठविले आहेत. या लॉटच्या मुगाच्या बियाणा बाबत त्या भागातील इतर शेतक-यांची कोणतीच तक्रार नाही. सदर बियाणे कंपनीच्या गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेत उगवण शक्ती बाबत व शुध्दतेबाबत चाचणी घेवूनच ते पास झाल्यानंतरच विक्रीसाठी पाठविले जाते. सदर बियाणे प्रती एकरी ५ ते ६ किलो वापरावयास पाहिजे. पेरणीचे अंतर ४५ x ४५ से.मी. पाहीजे. खते प्रती किलो/ हेक्टरी नत्रः२०, स्फुरदः४०, पालाशः४० या प्रमाणात दयावयास पाहिजे. सदर तक्रारदारने पेरणीपूर्वी निर्मल भुपरीस अंतर ४५ x४५ से.मी. ठेवल्याचे पंचनाम्यावरून दिसून येत नाही. तसेच किटकनाशक एन्डोसल्फान ३५ ई.सी. ची फवारणी केल्याचे दिसून येत नाही. या कारणांमुळे कियाण्याची उगवण शक्ती कमी होवू शकते. वरील सर्व बाबींची पुर्तता तक्रारदारने केली नसल्याने सदर बियाणे कमी उगविले आहे. प्रत्यक्ष लावणीचे अंतर पाहता उगवण क्षमता योग्यच आहे. बियाणे पाहणी समितीने परिपत्रकानुसार पाहणी व पंचनामा केलेला नाही. त्यामुळे सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम २६ अन्वये रदद होण्यास पात्र आहे. सबब सामनेवाला यांना खर्चात व त्रासात टाकले म्हणून तक्रारदारने रू.१०,०००/- दयावे असा आदेश करण्याची विनंती केली आहे.
७. सामनेवाला नं.२ यांनी आपले म्हणण्याचे पृष्टयार्थ नि.१० सोबत नि.१०/१ व १०/२ वर कंपनीचे मूग लागवडी संदर्भातील माहीती पत्रक, नि.१०/३ व १०/४ वर बियाणे पाठविलेल्या अधिकृत विक्रेत्यांचा तक्ता, नि.१०/५ वर नोटीस रजिस्टर पावती, नि.१०/६ वर पोहच पावती, नि.१०/७ वर नोटीस उत्तर, नि.१०/८ वर पिक परिस्थिती पंचनामा, नि.१०/९ वर बियाणे कंपनीच्या प्रतिनिधीची साक्ष, नि.१०/१ वर पिक पाहणी अहवाल माहीती, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
८. तक्रारदार यांची तक्रार, प्रतिज्ञापत्र, सामनेवाला यांचा खुलासा, प्रतिज्ञापत्र व दाखल केलेली कागदपत्रे पाहता तसेच दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुददे निष्कर्ष
१. तक्रारदार हे ग्राहक आहेत काय ? होय
२. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या
सेवेत त्रृटी केली आहे काय ? नाही
३. आदेश काय ? खालीलप्रमाणे
९. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी नि.६/१ वर बियाणे खरेदीची पावती दाखल केलेली आहे. या पावतीवर सामनेवला नं.२ यांचे नावाचा उल्लेख आहे. यावरून तक्रारदार हे सामनेवाला नं.१ व २ यांचे ग्राहक आहेत असे आम्हांस वाटते. म्हणून मुददा क्रं.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
१०. मुद्दा क्र.२- तक्रारदार यांची मुख्य तक्रार अशी आहे की, त्यांनी सामनेवाला नं.२ कंपनीचे लॉट नं.१२०७८ चे मूग बियाणे पेरणीसाठी विकत घेतले होते. परंतु मशागत करून तसेच कृत्रिम खते लावूनही सदर मूग बियाण्याची उगवण क्षमता अत्यंत कमी निघाली. तक्रारदारला सामनेवाला यांनी सदोष बियाणे विकले आहे हे सिध्द करण्यासाठी नि.६/४ वर जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने केलेल्या पंचनाम्याची प्रत दाखल केलेली आहे. सदर पंचनाम्याचे आम्ही बारकाईने अवलोकन केलेले आहे. सदर पंचनाम्यात बियाणे पेरणी ९० से.मी. अंतरावर केल्याचे नमुद आहे. तसेच बियाण्याची उगवण फारच कमी आढळून आल्याचे निदर्शनास येते असेही नमुद आहे. परंतु सदरची उगवण कमी कोणत्या कारणास्तव झाली आहे याचा उल्लेख या पंचनाम्यात नाही. वास्तविक सदर समितीने पिक पाहणी केल्यानंतर पंचनाम्यात दर्शविल्याप्रमाणे परिस्थिती का उदभवली ? बियाण्याची उगवण कमी का झाली ? यात बियाणाचा काही दोष होता काय ? या बददल अभिप्राय नोंदविणे आवश्यक होते. त्यामुळे सदर अहवालावरून सामनेवाला यांनी उत्पादित केलेले बियाणे सदोष होते असा निष्कर्ष काढता येत नाही. याशिवाय बियाणे सदोष आहे या बाबत तक्रारदार यांनी पंचनाम्या व्यतिरिक्त अन्य कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. बियाणांची पुन्हा तपासणी होवून मिळणे बाबत तक्रारदार यांनी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. तसेच मंचामार्फत बियाणे योग्य त्या प्रयोगशाळेतून तपासणी करून मिळावेत यासाठी अर्ज केलेला नाही.
११. याउलट सामनेवाला यांनी नि.१०/८ वर पंचनाम्याच्या वेळी घेण्यात आलेल्या बियाणे कंपनीच्या प्रतिनिधिच्या साक्षीची प्रत जोडलेली आहे. सदर साक्षीत कंपनीच्या प्रतिनिधीने तक्रारदारने मूग पेरणीवेळी पेरणीतीलअंतर ४५ से.मी. प्रमाणे न पेरता ९० से.मी. ठेवल्यामुळे पिक विरळ दिसत आहे. पिकांमध्ये तणांचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणावर आढळून आला, पिकाला पाऊस पुरेश्या प्रमाणात मिळालेला नाही, इत्यादी बाबी नमुद केलेल्या आहेत. तसेच तक्रारदारने मशागतीचे वेळी पिक नियोजन व संरक्षणासाठी कोणत्या किटक नाशकांचा वापर केला, खते कोणती वापरली याबाबत कोणताही पुरावा मे. मंचात दाखल केलेला नाही. यावरून कंपनीच्या लागवडी बाबतच्या कोणत्याही शिफारसींचे पालन तक्रारदारने केलेले नाही असे दिसुन येत आहे व पिकांची पेरणी विरळ केल्याने पिकही विरळ आलेले आहे हे स्पष्ट होत आहे. तसेच विपरीत हवामान, कमी – अतिवृष्टी, किडीचा प्रार्दुभाव, स्थानिक परिस्थिती, आर्द्रतेचे प्रमाण कमी-जास्त झाल्यास पिकाचे उत्पादन कमी येवू शकते. असे आम्हांस वाटते.
१२. या संदर्भात आम्ही पुढीलप्रमाणे वरिष्ठ कोर्टांच्या न्यायनिवाडयांचा आधार घेत आहोत.
१) ३(२००६) सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग पान २६९ खामगाव तालुका बागायतदार शेतकरी विक्री संस्था विरूध्द बाबु कुटी डॅनियल.
२) २(२००५) सी.पी.जे. सर्वोच्च न्यायालय पान १३ हरीयाणा सिडस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. विरूध्द साधु व इतर.
३) २(२००५) सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग पान ९४ सोनेकिरण ग्लॅडिओली ग्रोवर्स विरूध्द बाबुराम.
यामध्ये असे मत व्यक्त केले आहे की, No reason disclosed for poor germination – Panchanama silent on quality of seeds – No evidence regarding sub – standard or adulteratedqualityof seeds – Failure of germination may be due to agroclimatic factors – No deficiency in service proved.
तसेच बियाणे सदोष आहे हे सिध्द करण्याची जबाबदारी ही तक्रारदाराची आहे हे मा. राष्ट्रीय आयोग व मा. राज्य आयोग यांनी अनेक निवाडयांत स्प्ष्ट केलेले आहे. या संदर्भात आम्ही – ४(२००७)सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग पान १९२ कंझुमर प्रोटेक्शन सोसायटी विरूध्द नॅशनल सिडस कॉर्पोरेशन या मधील निवाडयाचा आधार घेत आहोत. त्यामध्ये असे मत व्यक्त केले आहे की, `Onus of proof lies with farmers, seeds not tested from “Seeds Testing Laboratory” Expert evidence not produced. Provision of section 13 not complied’.
१३. वरील विवेचनावरून व सर्व कारणांचा विचार करता. तसेच प्रयोगशाळेचा अहवाल नसल्यामुळे बियाणे सदोष आहेत ही बाब स्पष्टपणे शाबित होत नाही असे आम्हांस वाटते. म्हणून मुददा क्रं.२ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
१४. मुद्दा क्र.३- वरील विवेचनावरून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करणयात येत आहे.
२. दोन्ही पक्षांनी आपआपला खर्च सोसावा.
(सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.