जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर. तक्रार दाखल दिनांकः 01/01/2010 आदेश पारित दिनांकः 25/11/2010 तक्रार क्र. : 36/2010 तक्रारकर्ता : सिध्दार्थ रामनाथ हाडके, क्वार्टर नं. 35, न्यु एम्प्रेस क्वार्टर, बेजोनबाग, नागपूर 17. //- विरुध्द -// गैरअर्जदार : ए. बी. बोबडे, माहिती अधिकारी (माहिती अधिकार कानुन-2005 मध्ये) आणि सहायक पोलीस आयुक्त, नागपूर शहर पोलीस, इंदोरा चौक, नागपूर. तक्रारकर्त्यातर्फे : अधिकारपत्रधारक श्री.तरुण परमार. . गैरअर्जदारांतर्फे : ऍड. श्री. हेमंत भोंडगे. गणपूर्ती : 1. श्री.विजयसिंह राणे - अध्यक्ष. 2. श्री. मिलिंद केदार - सदस्य. मंचाचे निर्णयान्वये - श्री. विजयसिंह राणे, अध्यक्ष. - आदेश - (पारित दिनांक – 25/11/2010) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्याच्या आईच्या शेतीसंबंधाने विवादातून पोलीस स्टेशन, कोराडी येथे तक्रार नोंदविली होती. त्यावर कार्यवाही झाली नाही, म्हणून दि.27.10.2009 रोजी माहितीच्या अधिकाराखाली रजिस्टर पोस्टाद्वारा माहिती मागण्याचा अर्ज पाठविला. तो 29.10.2010 रोजी गैरअर्जदाराला प्राप्त झाला. 30 दिवसात माहिती मिळणे आवश्यक आणि अपेक्षित होते. मात्र ती मिळाली नाही. महणून त्याने ही गैरअर्जदाराची सेवेतील त्रुटी आहे, यास्तव त्याने झालेल्या मानसिक व आर्थिक नुकसानापोटी नुकसान भरपाई मिळावी, म्हणून तक्रार दाखल केलेली आहे व त्याद्वारे रु.25,000/- नुकसानाबाबत व न्यायिक खर्चाबाबत रु.5,000/- ची मागणी केलेली आहे. 2. मंचाने गैरअर्जदारावर नोटीस बजावला. गैरअर्जदाराने लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदारांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले की, माहितीच्या कायद्यात अपिलाची तरतूद आहे, त्यामुळे मंचाला तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. तक्रारकर्त्याने तक्रारीत केलेली विपरीत विधाने गैरअर्जदाराने नाकबूल केली. तक्रारकर्त्याने मागितलेली माहिती दि.02.12.2009 रोजी दिलेली आहे, म्हणून तक्रार खोटी आहे, करीता तक्रार खारीज करावी अशी विनंती केलेली आहे. -निष्कर्ष- 3. सुनावणीच्यावेळी उभय पक्ष गैरहजर. सदर प्रकरणात गैरअर्जदाराने आपल्या उत्तरात मंचास अधिकारक्षेत्र नाही असा जो उजर घेतलेला आहे, त्यावर सर्वप्रथम निर्णय होणे गरजेचे आहे. यासंबंधात मा. राष्ट्रीय आयोगाने रीव्हीजन पीटीशन क्र. 1975/05 मध्ये दिलेला निकाल जो 28.05.2009 आहे, हा स्पयंस्पष्ट आहे व अशाप्रकारचा मंचाला अधिकार आहे असे त्यात निर्धारित करण्यात आलेले आहे. त्यामुळे गैरअर्जदाराचे वरील आक्षेपात तथ्य नाही. 4. गैरअर्जदाराने आपल्या लेखी उत्तरात तक्रारकर्त्याने मागितलेली माहिती 02.12.2009 रोजी तक्रारकर्त्याला दिले आहे असे स्पष्ट केले आहे आणि या कथनास तक्रारकर्त्याने प्रतिउत्तर देऊन नाकारलेले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला मागितलेली माहिती प्राप्त झालेली आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याचे तो म्हणतो त्याप्रमाणे मोठे नुकसान होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. 5. तक्रारकर्त्याने मागितलेली माहिती त्यास एक महिन्यात देणे संबंधात कायद्याप्रमाणे गरजेचे होते. असे असतांना ते गैरअर्जदार ह्यांनी चार दिवस उशिरा दिली. त्याचे कोणतेही कारण नमूद केले नाही. माहितीच्या अधिकाराच्या तरतूदीचे अनुपालन काळजीपूर्वक व काटेकोरपणे होणे गरजेचे आहे व ते तसे करणे हे गैरअर्जदाराचे कर्तव्य आहे. तसे न करणे ही गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटी आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास रु.500/- नुकसानीदाखल आणि रु.300/- तक्रार खर्च म्हणून द्यावे. 3) गैरअर्जदाराने सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाच्या आत करावे. (मिलिंद केदार) (विजयसिंह राणे) सदस्य अध्यक्ष
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |