जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – २२०/२०११
तक्रार दाखल दिनांक – १७/११/२०११
तक्रार निकाली दिनांक – ३०/१२/२०१३
श्री.प्रशांत रमेश शिरसाठ, उ.व. ३०,
धंदा – शिवणकाम, राहणार – ग.नं.६,
नवभारत चौक, धुळे, ता.जि. धुळे. ................ तक्रारदार
विरुध्द
१. M/S Biocin Health Care,
Sector – 6, Plot No.26, SID CUL(II E),
Pantnagar, Rudrapur, U.S. Nagar,
Uttarakhand.
२. मे.श्रीराम मेडीकल अॅण्ड जनरल स्टोअर्स,
नकाणे रोड, देवपूर, धुळे, ता.जि. धुळे. ........... सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड. श्री.डी.डी. जोशी)
(सामनेवाला नं.१ तर्फे – अॅड. श्री.ब्रम्हभटट्)
(सामनेवाला नं.२ तर्फे – अॅड. श्री.दिनेश गायकवाड)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन)
तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.१ यांनी उत्पादित केलेली औषधी गोळी उत्पादित करू नये व सामनेवाला क्र.२ यांनी सदर औषधी विक्री करू नये. या करिता सदरची तक्रार दाखल केली आहे.
१. तक्रारदार यांनी डॉ.सुरेंद्र झेंडे यांनी लिहून दिलेली थायलोमिन नावाची औषधी गोळी सामनेवाला नं.१ यांनी उत्पादित केलेली व सामनेवाला नं.२ यांनी वितरित केलेली गोळी धुळे मेडिकल स्टोअर्स येथून विकत घेतली. सदर गोळी तक्रारदारने एक वर्ष घेवूनही त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. म्हणून तक्रारदारने डॉ.झेंडे यांना सदर बाब सांगितली. तसेच सदर गोळी शौचाद्वारे जशीच्यातशी निघून जाते असेही सांगितले. परंतु डॉ.झेंडे यांनी दखल न घेतल्याने तक्रारदारने दि.०७/०४/२०११ रोजी अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांचेकडे लिखीत पत्राद्वारे तपासणीसाठी पाठविली असता त्यांनी सदर गोळी शासकीय विश्लेषक, मुंबई यांचेकडे पाठविली. त्यांनी विश्लेषण करून सदरची गोळी अप्रमाणित असल्याचे घोषित केलेले आहे. वास्तविक सामनेवाला नं.१ यांनी अन्न व औषध प्रशासनाने मान्यताप्राप्तच गोळयाचे उत्पादन करून त्या विक्री केल्या पाहिजेत. परंतु त्यांनी नियमांचे उल्लंघन करून अप्रमाणित गोळीचे उत्पादन करून ती बाजारात विक्रीस पाठवून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. तर सामनेवाला नं.२ यांनी त्यांचेकडिल दि.१७/०८/११ रोजीचे अन्न व औषध प्रशासन धुळे यांना लेखी पत्र पाठवून सदर थायलोमिन ही गोळी बाजारात कुठेही शिल्लक नाही. तसेच त्यांचेकडेही शिल्लक नाही असे कळवून फसवणूक केलेली आहे. तक्रारदारने सदरची गोळी दि.१५/०९/२०११ रोजी धुलिया मेडिकल स्टोअर्स, पाचकंदिल, धुळे यांचेकडून खरेदी केलेली आहे. यावरून सामनेवाला नं.१ व २ यांनी संगनमताने शासनाची फसवणूक केलेली आहे. सामनेवाला यांच्या या कृतीमुळे तक्रारदारास मानसिक, शारिरीक व आर्थिक धक्का बसलेला आहे. त्या नुकसानीपोटी रू.१,५०,०००/-, तक्रारीचा खर्च मिळावा. तसेच सामनेवाला यांनी थायलोमिन या गोळीचे उत्पादन कायमचे बंद करावे व बाजारात विक्रीसाठी पाठविलेली गोळी परत मागवून ती नष्ट करावी असे आदेश व्हावेत. या मागणीसाठी सदर तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांनी आपले म्हणण्याचे पृष्ठयार्थ नि.४ सोबत नि.४/१ वर डॉ.झेंडे यांनी दिलेल्या औषधाचा तपशील, नि.४/२ वर आकाश मेडिकल स्टोअर्स व धुलिया मेडिकल स्टोअर्सचे बील, नि.४/३ वर अन्न व औषध प्रशासन यांचे पत्र, नि.४/४ वर अन्न व औषध प्रशासन मुंबई यांचा अहवाल, नि.४/५ वर सामनेवाला नं.२ यांचे पत्र नि.१९ वर पुराव्याचे शपथपत्र, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
३. सामनेवाला नं.१ यांनी आपला खुलासा नि.११ वर दाखल केलेला आहे. त्यात त्यांनी तक्रारदारने थायलोमिन औषधाचा बॅच नंबर दिलेला नाही. तक्रारदाराने तक्रारीत नमूद असल्याप्रमाणे गोळया घेतलेल्याच नाहीत. गोळयांवर तापमानाचा परिणाम होत असतो. अन्न व औषध प्रशसनाने तपासणीसाठी थायलोमिन नावाच्या औषधी गोळया कुठून घेतल्या या बाबत सुस्पष्ट उल्लेख नाही. दुकानदाराकडून औषधे जर योग्य त्या तापमानात ठेवल्या न गेल्यास, त्याच्या रंग, वास जाण्यास उत्पादकाला जबाबदार धरता येणार नाही. तक्रारदारने हात-पाय दुखायचे म्हणून डॉ.झेंडे यांना दि.२५/०३/२०१० रोजी दाखवले असता डॉ.झेंडे यांनी तक्रारदारला Tablets IF-100, Tab Traceta, Cap. Ozicap आणि Ointment Steenacgel आणि inj. Newijeu दि.०८/०४/२०१० रोजी Cap. Ibeufen sr., Tab. Tridol, Cap. Ozicap, Cap Thylomin or Myalamuiand inj. Newijeu असे दुस-या प्रकारचेही औषधे लिहून दिली होती. तक्रारदारने सदर औषधांचा परिणाम, दुष्परिणाम काय झाला हया बाबतची माहिती मंचापासून लपवून ठेवलेली आहे. तक्रारदारने थायलोमिनच्या गोळया ६ महिने डॉ. झेंडे यांचे सांगणेवरून घेतल्या हयाबाबत कोणताही पुरावा (गोळयांचे ६ महिन्यांचे बिल) मंचात दाखल केलेले नाही. तक्रारदारने अन्न व औषध प्रशासन (नियंत्रक) यांना लिहिलेले दि.०७/०४/२०११ रोजीचे पत्र तक्रारीसोबत दाखल केलेले नाही.
४. सामनेवाला यांचे पुढे असे म्हणणे आहे की, दि.१४/०६/२०११ रोजीच्या अन्न व औषध प्रशासन मुंबई यांचे अहवालानंतरही तक्रारदारने दि.१५/०९/२०११ रोजी धुळे मेडिकल स्टोअर्स मधून सदर गोळया घेतल्या आहेत. परंतु दि.२५/०१/२०११ रोजी आकाश मेडिकल धुळे येथून सदर गोळया घेतल्या ही बाब तक्रारीत नमुद नाही. त्यामुळे तक्रारदारने खोटा पुरावा निर्माण करून पैसे उकळण्याच्या हेतूने तक्रार दाखल केलेली आहे. औषधे व प्रशासने कायदा १९४० तसेच अन्न व औषधे नियंत्रण अधिकारी मुंबई यांचा दि.१४/०६/२०११ चा अहवाल हे स्वतंत्र व वेगवेगळया मुद्यांचे विषय असून तक्रारदारला त्याबाबत मनाई हुकुम मागण्याचा किंवा नुकसानभरपाई मागण्याचा अधिकार नाही. त्यामुळे तक्रार रद्द करण्यात यावी. सामनेवाला यांनी आपले म्हणण्याचे पृष्ठयार्थ खुलाश्यासोबत शपथपत्र दाखल केलेले आहे.
५. सामनेवाला नं.१ यांनी हजर होवून मुदतीत खुलासा दाखन न केल्याने त्यांचेविरूध्द ‘No w.s.’ चा आदेश पारित करण्यात आला आहे.
६. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला नं.१ यांचा खुलासा व तक्रारदार यांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर तसेच दाखल कागदपत्रे पाहता आमच्या समोर निष्कर्षाकरिता खालील मुद्दे उपस्थित होतात. त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुददे निष्कर्ष
१. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या
सेवेत त्रृटी केली आहे काय ? होय
२. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास अंतिम आदेशाप्रमाणे
पात्र आहे ?
३. आदेश काय ? खालीलप्रमाणे
विवेचन
७. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांची मुख्य तक्रार अशी आहे की, त्यांनी डॉ.सुरेंद्र झेंडे यांनी लिहून दिल्यानुसार थायलोमिन नावाची औषधी गोळी जी सामनेवाला नं.१ यांनी उत्पादित केलेली व सामनेवाला नं.२ यांनी वितरीत केलेली औषधी गोळी धुळे मेडिकल स्टोअर्स येथून विकत घेतली. सदर गोळी एक वर्ष घेवूनही तक्रारदाराच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. म्हणुन त्यांनी डॉ. झेंडे यांना त्याबाबत सांगितले. मात्र डॉ.झेंडे यांनी दखल न घेतल्याने तक्रारदारने दि.०७/०४/२०११ रोजी अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांचेकडे या गोळीबाबत तक्रार दिली. सदर गोळीची तपासणी केल्यानंतर ती ‘नॉट ऑफ स्टॅंडर्ड क्वॉलिटी’ असा अहवाल आला. त्यामुळे तक्रारदारास मानसिक, शारिरीक व आर्थिक धक्का बसला आहे.
याउलट सामनेवाला यांनी आपल्या खुलाश्यात तक्रारदारने थायलोमिन औषधाचा बॅच नंबर दिलेला नाही. गोळयांवर तापमानाचा परिणाम होतो. दुकानदारने जर गोळया योग्य त्या तापमानात व ठरवून दिलेल्या पध्दतीने ठेवल्या नसल्यास त्यांच्या (औषधांच्या) नुकसानीस उत्पादनवाला यास जबाबदार धरता येणार नाही. डॉक्टरांनी तक्रारदारला थायलोमिन गोळयाबरोबर इतरही औषधी लिहून दिलेली होती. त्या औषधांचा परिणाम काय झाला हया बाबतची माहिती मंचापासून लपवून ठेवली आहे. अन्न व औषध प्रशासन यांचे दि.१४/०६/२०११ रोजीच्या अहवालानंतरही तक्रारदारने दि.१५/०९/२०११ रोजी सदर गोळया घेतलेल्या आहेत. तसेच दि.२५/०१/२०११ रोजी आकाश मेडिकल येथून सदर गोळया घेतल्या ही बाब तक्रारीत नमूद नाही. तक्रारदारला नुकसानभारपाई मागण्याचा अधिकार नाही. असे नमुद केलेले आहे.
याबाबत आम्ही तक्रारदारने दाखल केलेल्या कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले आहे. त्यात त्यांनी नि.४/४ वर थायलोमिन हया औषधी गोळयांचा तपासणी अहवाल दाखल केलेला आहे. सदर अहवालात श्री.एस.एन.साळे, निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन, धुळे यांनी दि.०६/०४/२०११ रोजी ७ x १० (टॅब) थायलोमिन गोळया तपासणीसाठी घेतल्या. सदर गोळयांचा बॅच नं.११०२, उत्पादकाचा परवाना नंबर २८/युए/एस.सी/पी/२००५ असून या वर्णनाच्या औषधी गोळया तपासणीसाठी ताब्यात घेवून शासकीय विश्लेषक यांच्याकडे पाठविल्याचे दिसून येते.
सदर अहवालात NOT OF STANDARD QUALITY as defined in the Drugs and Cosmetic Act 1940, Rules thereunder for the reasons given below.
“THE SAMPLE DOES NOT COMPANY WITH I.P. 2007 REQUIREMENT WITH RESPECT TO THE TEST FOR DISINTEGRATION TEST FOR FILM COATED TABLETS” असे नमूद असून त्यावर शासकीय विश्लेषक (government analyst) श्रीमती.ए.बी. राव यांची सही आहे. सदर अहवाल पाहता व तक्रारदारचे तक्रारीतील कथन पाहता, सदर गोळी अप्रमाणित असतांनाही बाजारात विक्रीस उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. याऊलट सामनेवाला नं.१ यांनी खुलासा व प्रतिज्ञापत्रा व्यतिरिकत सदरील औषधी गोळया प्रमाणित असल्याबाबतचा कोणताही अतिरिक्त पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे शासकीय विश्लेषक यांचा अहवाल या कामी ग्राहय धरणे उचित होईल, असे आम्हांस वाटते.
तसेच नि.४/५ वरील दाखल सामनेवाला नं.२ यांचे दि.१७/०८/२०११ रोजीचे पत्र पाहता त्यांनी सदरची औषधी गोळी बाजारात कोठेही शिल्लक नाही अशी खोटी माहिती मा.सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांना कळविल्याचेही दिसून येत आहे. कारण तक्रारदारने नि.४/२ वर सदर औषधी गोळया दि.१५/०९/२०११ रोजी धुलिया मेडिकल स्टोअर्स येथून खरेदी केल्याची पावती दाखल केलेली आहे. यावरून सामनेवाला नं.१ यांनी अप्रमाणित औषधी गोळी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिली व सामनेवाला नं.२ यांनी होलसेलर असतांनाही औषधीगोळी बाजारात कोठेही शिल्लक नाही अशी प्रशासनाला खोटी माहीती दिल्याचे सिध्द होत आहे. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहेात.
८. मुद्दा क्र.२- तक्रारदार यांनी थायलोमिन गोळीचे सामनेवाला नं.१ यांनी उत्पादन बंद करावे. सामनेवाला नं.१ व २ यांनी बाजारात विक्रीसाठी पाठविलेली गोळी परत मागवून ती त्वरीत नष्ट करावी असा आदेश करावा. तसेच तक्रारदारास झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रू.१,५०,०००/- मिळावेत व तक्रारीचा खर्च सामनेवाला नं.१ व २ यांचेकडून मिळावा अशी मागणी केली आहे. परंतु याबाबतीत सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन मुंबई यांनी सदर औषधाचे उत्पादका विरुध्द कारवाई होणेसाठी औषध नियंत्रक, उत्तराखंड यांना कळविले असल्याने त्याबाबत आदेश करणे उचित होणार नाही. सामनेवाला यांनी अप्रमाणित औषधी गोळी बाजारात उपलब्ध करून दिल्याने तक्रारदार यांना मानसिक, शारीरिक त्रास होणे साहजिकच आहे. म्हणून तक्रारदार हे त्यांना झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रू.५०००/- व तक्रारीचा खर्च रू.१०००/- सामनेवाला नं.१ व २ यांचेकडून मिळण्यास पात्र आहेत असे आम्हांस वाटते.
९. मुद्दा क्र.३- वरील सर्व विवेचनावरून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. सामनेवाला नं.१ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रू.५,०००/- व तक्रारीचा खर्च रू.१०००/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत दयावेत.
धुळे.
दि.३०/१२/२०१३.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी) सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.