एकतर्फा आदेश
द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष
प्रतिज्ञापत्रासह दाखल केलेल्या सदर तक्रारीत तक्रारदाराचे संक्षिप्त कथन असे की, त्याने विरुध्द पक्षाकडून रु. 2,590/- किंमतीस दि. 4/12/2009 रोजी स्पाय कॅमेरा विकत घेतला. विकत घेतल्याचे सुरुवातीपासूनच या कॅमे-यामध्ये दोष निदर्शनास आल्याने त्याने विरुध्द पक्षाकडे तक्रार नोंदविली. विरुध्द पक्षाचे कर्मचारी येऊन कॅमेरा बदलून देतील असे त्याला सांगण्यात आले. मात्र कोणतीही कारवाई विरुध्द पक्षाने न केल्याने दोनवेळा नोटीस पाठविण्यात आली. त्याचीही दखल विरुध्द पक्षाने न घेतल्याने प्रार्थनेत नमूद केलेनुसार खरेदीची रक्कम रु. 2,590/- व्याजासह मिळावी तसेच नुकसान भरपार्इ व न्यायिक खर्च मंजूर करण्यात यावा असे त्यांचे म्हणणे आहे.
तक्रारीसोबत निशाणी 3(1) ते 3(3) अन्वये कागदपत्र दाखल करण्यात आले. यात विरुध्द पक्षाकडून विकत घेतलेल्या कॅमे-याचे बिल दि. 4/12/2009, विरुध्द पक्षाला पाठविलेली नोटीस दि. 14/7/2010 व पोचपावती यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
निशाणी 4 अन्वये विरुध्द पक्षाला नोटीस जारी केली व जबाब दाखल करण्याचा निर्देश दिला. नोटीस पोचपावती निशाणी 5 अभिलेखात उपलब्ध आहे. या पोचपावतीवर विरुध्द पक्षाचा शिक्का व स्वाक्षरी असल्याचे आढळते. मंचाची नोटीस प्राप्त होऊनही विरुध्द पक्षाने जबाब दाखल केलेला नाही. तक्रारदाराने मंचाचे निर्देशानुसार वृत्तपत्रात नोटीस प्रकाशित केली व त्याची प्रत निशाणी 6 दाखल केली.
ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 13(ब)(2)(ii) अन्वये सदर प्रकरणाची आज रोजी एकतर्फा सुनावणी करण्यात आली. मंचासमोर स्वतः हजर असलेल्या तक्रारदाराचे म्हणणे ऐकण्यात आले तसेच त्याने दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करण्यात आले. त्याआधारे खालील मुदद्यांचा विचार करण्यात आलाः
मुद्देः
1. विरुध्द पक्षाने तक्रारदारास सदोष स्पाय कॅमेरा विकला होता काय? ---- होय
2. तक्रारदार विरुध्द पक्षाकडून वादग्रस्त कॅमेराची खरेदी रक्कम तसेच नुकसान
भरपाई व न्यायिक खर्च मिळणेस पात्र आहे काय? --- होय
स्पष्टिकरणः
मुद्दा क्र. 1 संदर्भातः
मुद्दा क्र. 1 चे संदर्भात असे निदर्शनास येते की, दि. 4/12/2009 रोजी तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडून रु. 2,590/- रकमेस टेलेमॉल स्पाय पेन कॅमेरा क्र. 9822772379, रु. 2,590/- रकमेस विकत घेतला. मात्र सुरुवातीपासूनच हा कॅमेरा व्यवस्थित काम करीत नसल्याने त्याने विरुध्द पक्षाकडे वारंवार तक्रार नोंदविली. कबूल करुनही विरुध्द पक्षाने वादग्रस्त वस्तू बदलून न दिल्याने दोनवेळा नोंदणीकृत डाकेने विरुध्द पक्षास त्याने नोटीस पाठविली. या नोटीसच्या प्रती व पोस्टाच्या पावत्या प्राप्त होऊनही विरुध्द पक्षाने तक्रारदाराचे आरोपासंदर्भात आपले म्हणणे मांडले नाही. सबब तक्रारदाराचा पुरावा व तक्रारीसोबत जोडलेले कागदपत्रे यांचे आधारे विरुध्द पक्षाकडून विकत घेतलेल्या कॅमे-यामध्ये उत्पादनातील दोष होता असे आढळते. सबब विरुध्द पक्ष हा ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1)(फ) अन्वये सदोष वस्तु विकण्यास जबाबदार आहे.
स्पष्टिकरण मुद्दा क्र. 2 संदर्भातः
मुद्दा क्र. 2 चे संदर्भात विचार केला असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार हा भिवंडी शहरातील पत्रकार असून ज्या उद्देशाने त्याने विरुध्द पक्षाकडून स्पाय कॅमेरा विकत घेतला तो उद्देश सदर वस्तु दोषपूर्ण असल्यामुळे पूर्ण होऊ शकला नाही व त्याची रक्कम विरुध्द पक्षाकडे अडकून पडली. न्यायाचेदृष्टीने विरुध्द पक्षाने दोषयुक्त स्पाय कॅमेरा बदलून देणे आवश्यक आहे व त्याला झालेल्या मानसिक त्रासापोटी रु. 2,000/- देण्यास विरुध्द पक्ष जबाबदार आहेत. त्याने केलेल्या दुरध्वनीद्वारा तसेच लेखी तक्रारीची कोणतीही दखल विरुध्द पक्षाने न घेतल्याने त्यास सदर तक्रार मंचाकडे दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदार विरुध्द पक्षाकडून सदर तक्रारीचा न्यायिक खर्च रु. 2,000/- मिळणेस पात्र आहे.
सबब अंतीम आदेश पारीत करण्यात येतोः
आ दे श
तक्रार क्र. 299/2010 अंशतः मंजूर करण्यात येते.
विरुध्द पक्षाने आदेश तारखेचे 60 दिवसांचे आंत तक्रारदारास वादग्रस्त स्पाय कॅमेरा बदलून त्याऐवजी दोषरहीत नविन स्पाय कॅमेरा दयावा अथवा तक्रारदारास रक्कम रु. 2,590/- (अक्षरी रुपये दोन हजार पाचशे नव्वद) ही रक्कम दि. 4/12/2009 ते आदेश तारखेपावेतो 12% दराने व्याजासह परत करावे. तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार) व न्यायिक खर्च रु. 2,000/- (अक्षरी रुपये हजार) दयावेत.
विहीत मुदतीत उपरोक्त आदेशाचे पालन विरुध्द पक्षाने न केल्यास तक्रारदार सदर रक्कम आदेश तारखेपासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. 18% दराने व्याजासह विरुध्द पक्ष यांचेकडून वसूल करणेस पात्र राहिल.
सही/- सही/-
दिनांकः 04/01/2012. (ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर )
सदस्या अध्यक्ष