निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री. आर.एच.बिलोलीकर, सदस्य)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार निर्मलसिंग कबालसिंग संधू राहणार भगतसिंग रोड,नांदेड हा ट्रक क्रमांक एम एच 26/एच 6637 चा मालक व ताबेदार आहे. अर्जदाराने सदर ट्रकचा विमा गैरअर्जदार यांचेकडे काढला आहे. त्याचा पॉलिसी क्रमांक 100003/31/13/624473 असा असून त्याचा कालावधी दिनांक 10.02.2013 ते दिनांक 09.02.2014 असा आहे. दिनांक 18.09.2013 रोजी सदर ट्रक नांदेडकडे येत असतांना मालेगांव जवळ अज्ञात ट्रकने अर्जदाराच्या ट्रकवर फोकस मारुन निष्काळजीपणाने चालवून कट मारल्यामुळे होणारा अपघात टाळण्यासाठी अचानक ब्रेक मारुन अर्जदाराने ट्रक रस्त्याच्या खाली घेतला असता अर्जदाराचा ट्रक पलटी झाला. सदर अपघातात अर्जदाराचा ट्रकचे जवळपास 3 ते 4 लक्ष रुपयाचे नुकसान झाले.
अर्जदाराने सदर अपघाताची माहिती गैरअर्जदार यांना दिली. गैरअर्जदार यांनी सदर ट्रकचे नुकसानीचे असेसमेंट करण्यासाठी सर्व्हेअर नेमला. सदर सर्व्हेअरने त्याचा अहवाल गैरअर्जदार यांना दिला. त्यानंतर गैरअर्जदार यांचे सुचनेप्रमाणे अर्जदाराने त्याचे वाहन घटनास्थळावरुन काढून दुरुस्त केले.
त्यानंतर अर्जदाराने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह नुकसान भरपाई मिळणेसाठी गैरअर्जदार यांचेकडे क्लेम दाखल केला. दिनांक 27.11.2013 रोजी गैरअर्जदार याने असंबद्ध कारण देऊन चुकीच्या व बेकायदेशीररीत्या सदरचा क्लेम नामंजूर केलेला आहे. त्यामुळे अर्जदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदार यांनी त्यांची तक्रार मंजूर करण्यात येऊन अर्जदारास नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.2,00,000/- त्यावर अपघात तारखेपासून म्हणजेच दिनांक 18.09.2013 पासुन द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह देण्याचा आदेश गैरअर्जदार यांना द्यावा. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व दावा खर्च रु.5,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी वकीलमार्फत हजर होऊन लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे लेखी म्हणणे थोडक्यात पुढीलप्रमाणेः-
4. अर्जदाराचे संपूर्ण कथन गैरअर्जदार यांना मान्य नाही. सदर तक्रार वास्तविक घटनेवर नसून वस्तुस्थिती लपवून अर्जदाराने सदर खोटी तक्रार केलेली आहे. म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा ट्रक क्रमांक एम एच 26/एच 6637 चा विमा दिनांक 10.02.2013 ते दिनांक 09.02.2014 कालावधीसाठी पॉलिसी क्रमांक 100003/31/13/624473 अन्वये काढला होता हे गैरअर्जदार यास मान्य आहे. परंतु सदर ट्रकचा दिनांक 18.09.2013 रोजी अपघात झाला व त्यामुळे ट्रकचे अंदाजे 3-4 लाखाचे नुकसान झाले हे मान्य नाही. घटनेची माहिती दिल्यावर गैरअर्जदार यांनी सर्व्हेअर नेमला व सर्व्हेअरने वाहनाचा सर्व्हे करुन अहवाल गैरअर्जदार यांचेकडे सादर केला. सर्व्हेअरच्या अहवालानुसार सदरील क्लेम हा नियमीत देखभालीचा(Regular Maintenance Claim) आहे. या कारणास्तव योग्यरीत्या फेटाळलेला आहे. त्यामुळे अर्जदारास कोणतीही सेवेत त्रुटी दिलेली नाही. गैरअर्जदार अर्जदारास कांहीही देणे लागत नाही. गैरअर्जदार यांनी त्यांच्या अतिरिक्त म्हणणेत असे म्हटले आहे की, सर्व्हेअर श्री.बसवराज बरबडे यांची नियुक्ती केली होती, त्यांनी दिलेल्या पत्रानुसार सदरील क्लेम हा नियमीत वाहन दुरुस्तीचा क्लेम आहे. सर्व्हेअरने काढलेल्या फोटोचे अवलोकन केले असता असे लक्षात येते की, वाहनाचा कोणताही अपघात झालेला नसुन ते नियमीत देखभाल नसल्यामुळे खराब झाले आहे. त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराचा क्लेम योग्यरीत्या फेटाळला आहे. गैरअर्जदार यांनी मंचास विनंती केली आहे की अर्जदाराचा अर्ज खर्चासह खारीज करण्यात यावा.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
6. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या पॉलिसीच्या प्रतीवरुन स्पष्ट आहे. गैरअर्जदार यांना देखील हे मान्य आहे की, गैरअर्जदार यांनी सदर ट्रक क्रमांक एम एच 26/एच 6637 ची पॉलिसी काढली होती. अर्जदार यांनी दिनांक 18.09.2013 रोजी सदर ट्रकचा अपघात झाल्यानंतर गैरअर्जदारास कळविलेले आहे व त्यानुसार गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या ट्रकचा सर्व्हे करणेसाठी सर्व्हेअर श्री.बसवराज बरबडे यांची नियुक्ती केलेली होती. सर्व्हेअर यांनी त्यांचा फायनल रिपोर्ट दिलेला आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा विमा दावा हा दिनांक 27.11.2013 च्या पत्राव्दारे नाकारलेला आहे. सदर पत्रात असा उल्लेख आहे की, “the damages as per surveyor report caused were not due to any accidental external means but due to a mechanical/wear-tear breakdown. The damages arising due to mechanical breakdown are not covered cover under the policy of insurance and hence the claim is not payable’’.
सर्व्हेअरच्या रिपोर्टचे अवलोकन केले असता असे दिसून येते की,
Cause of Accident: As indicated in the motor claim form at spot Front coming unknown truck coming with full dazzling head lights and negligent manner to save dash with it . I.V. driver applied brakes but I.V.sliped and collapsed in the road side ditch on LH side. Hence met loss to the I.V.
सदर अहवालात मेकॅनीकल ब्रेकडाऊनमुळे नुकसान झालेले आहे असे कोठेही उल्लेख नाही. सर्व्हेअरच्या अहवालाप्रमाणे अर्जदाराचे रक्कम रु.1,64,635/- चे नुकसान झालेले दिसून येते. सर्व्हेअरने सदर सर्व्हे हा मेकॅनीकल ब्रेकडाऊनबद्दल केलेला आहे असे कोठेही नमुद केलेले नाही.
गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा दावा चुकीच्या कारणास्तव नाकारलेला आहे असे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास रक्कम रु.1,64,635/- आदेश तारखेपासून तीस दिवसाच्या आत द्यावेत.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदार यास सेवेत त्रुटी दिल्याबद्दल मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1500/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1000/- आदेश कळाल्यापासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
5. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.