आदेश (दिः 03/02/2011) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. तक्रारकर्त्याचे थोडक्यात कथन असे की, विरुध्द पक्षाचा स्थावर मिळकत खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. श्री. चिंतामणी टॉवर, मनोरमा नगर, ठाणे(पश्चिम) या इमारतीतील 238 चौ.फु बांधकाम रु.3,100/- चौ. फु भावाने विरुध्द पक्षाकडुन विकत घेण्याचे त्यांनी ठरवले. दि.05/02/2008 रोजी उभयपक्षात जागा खरेदीचा व्यवहार पक्का झाला व त्यांनी विरुध्द पक्षाला रु.51,000/- दिले. ही रक्कम मागणी नोंदविण्याखातर देण्यात आली. त्यानंतर दि.24/02/2008 रोजी रु.2,00,000/- विरुध्द पक्षाला देण्यात आले. या दोन्ही रक्कमा मिळाल्याबाबतच्या पावत्या विरुध्द पक्षाने त्यांना दिल्या. जागेचा व्यवहार पुर्ण करण्यात यावा अशी वारंवार मागणी विरुध्द पक्षाकडे करण्यात आली. ऑक्टोबर 2009 मध्ये सदनिकेचा ताबा तक्रारकर्त्याला देण्यात येईल असे आश्वासन विरुध्द पक्षाने दिले होते. अनेकदा पाठपुरावा करुनही विरुध्द पक्षाने व्यवहार पुर्ण केला ... 2 ... (तक्रार क्र. 306/2010) नाही. त्यामुळे त्यांना रु.5,000/- प्रतीमाह भाडयाने पर्यायी जागेत रहावे लागत आहे. प्रार्थनेत नमुद केल्यानुसार सदनिकेचा ताबा त्यांना मिळावा अथवा त्याच विभागात जवळपास समान श्रेत्रफळाची दुसरी सदनिका विरुध्द पक्षाने त्यांना द्यावी तसेच नुकसान भरपाई व न्यायिक खर्च मंजुर करण्यात यावा असे त्यांचे म्हणणे आहे. तक्रारीचे समर्थनार्थ निशाणी 2 अन्वये प्रतिज्ञापत्र तसेच निशाणी 3(1) ते 3(4)अन्वये कागदपत्रे दाखल करण्यात आले. यात वादग्रस्त सदनिकांचे माहितीपत्रक, विरुध्द पक्षाला दिलेल्या रक्कमांच्या पावत्या तसेच विरुध्द पक्षाला पाठविलेल्या दि.02/07/2010 रोजीच्या नोटिसची प्रत यांचा समावेश आहे.
2. मंचाने विरुध्द पक्ष 1 ते 3 यांना निशाणी 6 अन्वये नोटिस जारी केली. त्यांच्या पोचपावत्या निशाणी 7, 8, 9 अभिलेखात उपलब्ध आहे. सदर प्रकरणी दि.29/10/2010, 16/11/2010, 30/11/2010, 27/12/010, 25/01/2011 व 03/03/011 या प्रमाणे अनेक तारखा झाल्या नोटिस प्राप्त होऊनही विरुध्द पक्षाने लेखी जबाब सादर न केल्याने ग्राहक कायद्याचे कलम 13(2)(ब)(ii) अन्वये एकतर्फी सुनावणीच्या आधारे सदर तक्रारीचे निराकरण करणे मंचाने निश्चित केले. तक्रारकर्त्याचे म्हणणे ऐकण्यात आले तसेच त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे व प्रतिज्ञापत्रे यांचा विचार करण्यात आला. त्या आधारे सदर तक्रारीचे निराकरणार्थ खालील मुद्दे मंचाने विचारात घेतले. मुदा क्र. 1 - विरुध्द पक्ष सदोष सेवेसाठी जबाबदार आहे काय ? उत्तर-होय. मुद्दा क्र. 2 - तक्रारकर्ता नुकसान भरपाई व न्यायिक खर्च विरुध्द पक्षाकडुन मिळण्यास पात्र आहे काय ? उत्तर – होय. स्पष्टिकरण मुद्दा क्र. 1- विरुध्द पक्ष 2 व 3 हे श्री. विश्वानंद एन्टरप्रायजेस या नावाने नवपाडा, ठाणे येथे स्थावर मिळकत खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात श्री. चिंतामणी टॉवर्स या इमारतीतील 'बि' विंग मधील 4थ्या मजल्यावरील सदनिका क्र. 404 विरुध्द पक्षाच्या मार्फत विकत घेण्याचे तक्रारकर्त्याने निश्चित केले. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दि.24/02/2008 रोजी रु.2,00,000/-मिळाल्याबाबत 91 क्रमांकाची छापील पावती दिली तसेच त्यापुर्वी 05/02/2008 रोजी रु.51,000/- कॅनरा बँकेच्या चेकद्वारा मिळाल्याची पावती क्र. 84 दिली. सुनावणीच्या वेळेस या पावत्यांची यातर जमा मंचाने करुन घेतली. तक्रारकर्त्याचे खात्यातुन 06/02/08 रोजी धनादेशाची रक्कम विरुध्द पक्षाच्या खात्यात गेल्याबाबतची नोंद असणा-या खातेउतारा तक्रारकर्त्याने दाखल केला. रु.2,51,000/- ही रक्कम विरुध्द पक्षाला वादग्रस्त सदनिकेच्या मागणी नोंदविण्यासाठी तक्रारकर्त्याकडुन प्राप्त झालेली आहे. मात्र कोणताही करारनामा विरुध्द पक्षाने नोंदवुन देण्यासाठी कार्यवाही केली नाही. तक्रार दाखल करण्यापुर्वी त्यांनी विरुध्द पक्षकडे पाठपुरावा केला ऐवढेच नव्हे तर वकिलामार्फत लेखी नोटिस पाठविली त्याला कोणताही प्रतीसाद मिळाला नाही. सबब तक्राकर्त्याकडुन रु.2,51,000/- एवढी मोठी रक्कम वसुल करावयाची, रक्कमेच्या पावत्या
... 3 ... (तक्रार क्र.306/2010) त्यांना द्यायच्या, मात्र कबुल करुनही खरेदीखत/करारनामा नोंदवुन देण्याबाबत जाणीवपुर्वक टाळायचे ही विरुध्द पक्षाची कृती मंचाच्या मते निश्चितपणे ग्राहक कायद्याचे कलम 2(1)(ग) अन्वये दोषपुर्ण सेवा ठरते. स्पष्टिकरण मुद्दा क्र. 2- मुद्दा क्र. 2 चे संदर्भात विचार केला असता असे स्पष्ट होते की विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडुन 2,51,000/- एवढी मोठी रक्कम वसुल करुनही त्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे करारनामा नोंदवुन दिला नाही एवढेच नव्हेतर त्यांच्या तोंडी तसेच लेखी मागणीची दखल घेतली नाही. विरुध्द पक्ष व्यवहार पुर्ण करेल अशी कोणतीही शक्यता आढळुन येत नाही. तक्रारकर्त्याची मोठी रक्कम अकारण विरुध्द पक्षाकडे अढकलेली आहे. यासाठी विरुध्द पक्ष 1 ते 3 हे वैयक्तिकरित्या तसेच संयुक्तरित्या जबाबदार असल्याचे स्पष्ट होते. न्यायाचे दृष्टिने त्यांनी तक्रारकर्त्याला रु.2,51,000/- ही रक्कम दि.24/02/2008 ते आदेश तारखेपर्यंत द.सा.द.शे 15% दराने व्याजासह परत करणे आवश्यक आहे. तक्रारकर्त्याचे विरुध्द पक्षाच्या दोषपुर्ण सेवेमुळे केवळ आर्थिक नुकसान झाले असे नसुन त्यांना मोठया प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे ते विरुध्द पक्षाकडुन रु.25,000/- नुकसान भरपाई मानसिक त्रासासाठी मिळण्यास पात्र आहेत. त्यांच्या मागणीची दखल विरुध्द पक्षाने न घेतल्याने त्यांना सदर प्रकरण दाखल करणे भाग पडले. सबब, ते विरुध्द पक्षाकडुन न्यायिक खर्च रु.5,000/- वसुल करण्यास पात्र आहे. सबब अंतिम आदेश पारित करण्यात येतो- आदेश 1. तक्रार क्र.306/2010 मंजुर करण्यात येते. 2.आदेश तारखेच्या 2 महिन्याचे आत विरुध्द पक्ष 1, 2 व 3 यांनी वैयक्तिकरित्या अथवा संयुक्तरित्या तक्रारदारांना रु.2,51,000/- (रु. दोन लाख एकावन हजार फक्त) रक्कम दि. 24/02/2008 ते आदेश तारखेपर्यंत द.सा.द.शे 15% दराने व्याजासह परत करावी. 3.या रक्कमेव्यतिरिक्त विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई रु.25,000/- (रु.पचंवीस हजार फक्त) व न्यायिक खर्च रु.5,000/- (रु. पाच हजार फक्त) विहीत मुदतीत द्यावेत. 4.उपरोक्त आदेशाचे पालन विहित मुदतीत विरुध्द पक्षाने न केल्यास तक्रारकर्ता आदेशान्वीत संपुर्ण रक्कम प्रत्यक्ष रक्कम मिळेर्यंत द.सा.द.शे 15% दराने विरुध्द पक्षाकडुन व्यक्तिकरित्या अथवा संयुक्तरित्या व्याजासह वसुल करण्यास पात्र राहिल.
दिनांक – 03/02/2011 ठिकाण - ठाणे (ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
| [HONABLE MRS. Jyoti Iyyer] MEMBER[HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT | |