न्या य नि र्ण य
(दि.14/06/2024)
व्दारा:- मा. श्रीमती अमृता नि.भोसले,सदस्या
1) तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून तक्रारीत नमुद वादातील मिळकत सदनिकेची संपूर्ण रक्कम अदा करुनही सदनिकेचे नोंद खरेदीखत करुन दिले नाही अथवा ताबाही दिला नाही त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कथन पुढीलप्रमाणे- सामनेवाला क्र.2 युवराज संभाजी वाघोले यांची गाव मौजे पडवेवाडी ता.जि.रत्नागिरी येथील भूमापन क्र.27, हि.नं.4/1/8अ/1/11 ही मिळकत सामनेवाला क्र.1 यांनी नोंदणीकृत दस्त क्र.रनग/ 4565/2012 अन्वये विकसन करार व दस्त क्र.4566/2012 अन्वये मुखत्यारपत्र करुन विकसनासाठी घेऊन सामनेवाला क्र.1 यांनी सदर मिळकतीवर “ आराध्य रेसिडेन्सी” ही इमारत बांधावयास चालू केली होती. तक्रारदाराने सदर इमारतीमधील तळ मजल्यावरील निवासी सदनिका क्र.1 क्षेत्र 475 चौ.फुट बिल्टअप क्षेत्राची निवासी सदनिका रक्कम रु.10,45,000/- इतक्या किंमतीस सामनेवालाकडून विकत घेण्याचे ठरवले. तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये सदर सदनिकेचे नोंदणीकृत साठेखत दस्त नं.3384/2013 दि.21/06/2013 रोजीने नोंदविण्यात आले. साठेखतावेळी तक्रारदार यांनी सामनेवाला यांना सदनिकेच्या मोबदल्यापोटी दि.02/11/2013 अखेर रक्कम रु.1,27,000/- अदा केलेली आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी विजया बँक, शाखा रत्नागिरी यांचेडून कर्ज घेतले व दि.24/12/2013 रोजी सामनेवालास रक्कम रु.1,18,000/- अदा केले. तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये झालेल्या साठेखतात नमुद केलेल्या सुखसुविधांसह सदनिकेचा ताबा मुदतीत तक्रारदारास दयावयाचा होता. परंतु तक्रारदार यांनी सामनेवाला यांना सदनिकेचा ताबा मिळणेबाबत वारंवार विचारणा केली असता सामनेवाला यांनी तक्रारदारास वेगवेगळी कारणे सांगून सदनिकेचा ताबा देणेस टाळाटाळ केली. शेवटी तक्रारदार यांनी दावा मिळकतीची पाहणी करणेसाठी गेले असता तेथे केवळ भिंती उभारलेल्या दिसून आल्या. तसेच सदरचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले. अशाप्रकारे तक्रारदार यांनी सामनेवाला यांना सदनिकेपोटी मोबदला स्विकारुनही आजतागायत सामनेवाला यांनी तक्रारदारास वादातील सदनिकेचे साठेखतात नमुद केलेप्रमाणे खरेदीखत करुन दिले नाही अथवा सदनिकेचा ताबाही दिलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराने सामनेवालांच्या फसवणूकीला कंटाळून नाईलाजाने दि.15/01/2020 रोजी वकीलामार्फत सामनेवाला क्र.1 व 2 यांना कायदेशीर नोटीस पाठवली. सदरची नोटीस सामनेवाला क्र.1 यांना मिळूनदेखील सामनेवाला क्र.1 यांनी सदर नोटीसला उत्तरही दिले नाही. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी सदर नोटीस न स्विकारलेने ती परत आली. त्यामुळे सदरची तक्रार आयोगात दाखल करणे तक्रारदारास भाग पडले आहे. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज मंजूर करुन सामनेवाला यांनी तक्रारदारास साठेखतात नमुद केलेल्या सर्व सुख सोयींनीयुक्त सदनिकेचा ताबा देण्याचा आदेश व्हावा तसेच सदर वादातील सदनिकेचे नोंदणीकृत खरेदीखत कोणतीही जास्तीची रक्कम न स्विकारता करुन देण्याबाबत आदेश व्हावा. तसेच शारिरीक त्रासापोटी रक्क्म रु.10,000/- मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- व तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु.15,000/- सामनेवालाकडून वसूल होऊन मिळावी अशी विनंती तक्रारदाराने केली आहे.
2) तक्रारदाराने त्याचे तक्रारीच्या पुष्टयर्थ नि.6 सोबत एकूण 4 कागदपत्रे दाखल केली असून त्यामध्ये नोंदणीकृत साठेखत दस्त क्र.रनग/3384/2013 ची प्रत, सामनेवाला यांना पाठविलेली वकीलांमार्फतची नोटीस, सदर नोटीस सामनेवाला क्र.1 यांना मिळालेची पोष्टाची पोहोच पावती, सामनेवाला क्र.2 यांनी नोटीस न स्विकारलेने परत आलेला लखोटा इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.30 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.32 कडे एकूण 6 कागदपत्रे दाखल केली असून त्यामध्ये सामनेवाला यांनी तक्रारदारास रक्कम पोहोच झालेबाबत दिलेल्या एकूण 5 पावत्या तसेच तक्रारदाराचे बँक ऑफ बडोदाचे अकौन्ट स्टेटमेंट दाखल केले आहे. तसेच नि.33 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.34 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. तसेच नि.37 कडे तक्रारदाराचे बँक ऑफ बडोदाचे स्टेटमेंट व सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेल्या रक्कमांची पोहोच पावती व पत्रे दाखल केली आहेत.
3) प्रस्तुत कामी सामनेवाला क्र.1 यांना रजि.पोष्टाची नोटीस लागू होऊनही तसेच सामनेवाला क्र.2 यांना वृत्तपत्रातून जाहीर नोटीस देऊनही दोघेही सदर कामी गैरहजर राहिलेने सामनेवाला क्र.1 यांचे विरुध्द दि.22/06/2022 रोजी व सामनेवाला क्र.2 यांचेविरुध्द 24/01/2024 रोजी “एकतर्फा” आदेश नि.1 वर पारीत करण्यात आला.
4) वर नमुद तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार व तक्रारीसोबतचे सर्व कागदपत्रे अवलोकन करुन आयोगाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्रदे विचारात घेतले.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | सामनेवाला यांनी तक्रारदाराला वादातील सदनिकेचे नोंद खरेदीखत करुन न देऊन व सदनिकेचा ताबा न देऊन सदोष सेवा पुरविली आहे काय? | होय. सामनेवाला क्र.1 यांनी |
3 | तक्रारदार हे सामनेवालाकडून वाद मिळकतीचे नोंद खरेदीखत करुन मिळणेस व वाद मिळकत सदनिकेचा ताबा मिळणेस व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
-वि वे च न –
मुद्रदा क्र.1 ते 3 :-
5) वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण गाव मौजे पडवेवाडी ता.जि.रत्नागिरी येथील भूमापन नं.27, हि.नं.4/1/8अ/1/11 या सामनेवाला क्र.2 यांच्या सदर मिळकतीवर सामनेवाला क्र.1 यांनी बांधलेल्या “आराध्य रेसिडेन्सी” या इमारतीमधील तळ मजल्यावरील निवासी सदनिका क्र.1 क्षेत्र 475 चौ.फुट बिल्टअप क्षेत्राची निवासी सदनिका या सदर तक्रारअर्जाचा विषय आहे. सदरची मिळकत सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्कम रु.10,45,000/- इतका मोबदला स्वीकारुन विक्री करण्याचे सामनेवाला यांनी मान्य केले. त्यानुसार तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये सदर सदनिकेचे नोंदणीकृत साठेखत दस्त नं.3384/2013 दि.21/06/2013 रोजी झालेले आहे. त्याची प्रत तक्रारदाराने नि.6/1 कडे दाखल केलेली आहे. सामनेवाला यांनी याकामी हजर होवून प्रस्तुत बाब नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट सिध्द झाली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
6) तक्रारदाराने नि.6/1 कडे दाखल केलेले तक्रारदार व सामनेवाला यांचेमधील दि.21/06/2013 रोजीचे नोंदणीकृत साठेखत दस्त नं.3384/2013 चे अवलोकन करता वाद मिळकत सदनिका रक्कम रु.10,45,000/- या किंमतीस खरेदी करण्याचे ठरले होते. त्यासाठी तक्रारदाराने बँकेकडे कर्ज घेतले होते. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांना सदनिकेच्या खरेदीपोटी दिलेल्या रक्कमांच्या एकूण 5 पावत्या नि.32 कडे दाखल केलेल्या आहेत. तसेच नि.37 कडे सदर 5 पावत्यांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांना सदनिकेच्या खरेदीपोटी एकूण रक्कम रु.2,95,000/- दिलेचे दिसून येते. तसेच तक्रारदाराने सदर कामी त्यांचे बँक ऑफ बडोदाचे अकौन्ट स्टेटमेंट दाखल केले आहे. त्यामध्ये सुरुवातीलाच दि.23/12/2013रोजी फ्लॅट ए-1 च्या पार्टपेमेंटसाठी रक्कम रु.5,00,000/-तसेच दि.07-04-2014 रोजी लोनचा दुसरा हप्ता रक्कम रु.1,43,250/-घेतलेचे दिसून येते. तसेच नि.22/09/2014 रोजी पार्टपेमेंट रक्कम रु.50,000/- रिलीज केलेचे नमुद आहे. सदर रक्कम रु.50,000/- मिळालेची पावती सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास दिलेली आहे व सदर पावती तक्रारदाराने याकामी दाखल केलेली आहे. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदाराकडे पार्टपेमेंटबाबत मागणी केलेली पत्रे दाखल केली असून दि.05/11/2013रोजी सामनेवाला यांनी विजया बँकेला दिलेल्या मॉरगेजच्या परवानगीचे पत्र दाखल केले आहे. असे असताना सामनेवाला यांनी तक्रारदारास वादातील मिळकत सदनिकेचे खरेदीखत करुन सदनिकेचा ताबा दिलेला नाही.
7) तक्रारदाराची तक्रार अर्जातील सदरची कथने सामनेवाला यांनी याकामी हजर होऊन नाकारलेली नाहीत. सामनेवालास यांना तक्रार अर्जाची नोटीस लागू होऊनसुध्दा ते याकामी आयोगासमोर हजर झालेले नाहीत. म्हणून, सामनेवाला क्र.1 व 2 यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. म्हणजेच सामनेवाला यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. तक्रारदारांनी त्यांचे कथनाचे पुष्ठयर्थ पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. सबब, तक्रारदाराने तक्रार अर्जात केले कथनांवर विश्वासार्हता ठेवणे न्यायोचित वाटते.
8) सदरची बाब विचारात घेता, तक्रारदाराचे रजि.क्र.3384/2013 चे नोंद साठेखताचे अवलोकन करता सामनेवाला क्र.2यांनी त्यांची सदर वादमिळकत नोंद रजि.क्र.4566 /2012 अन्वये कुलमुखत्यारपत्राव्दारे सामनेवाला क्र.1 यांना विकसनाकरिता दिलेली होती. तसेच सदर वाद मिळकत सदनिेकेचा व्यवहार तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांचेशी केलेचा साठेखत व सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास रक्कम मिळालेच्या दिलेल्या पावतीवरुन स्पष्ट होते. सबब सदर सदनिका खरेदी-विक्रीच्या व्यवहाराशी सामनेवाला क्र.2 यांचा कोणताही संबंध नाही. सबब सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास दयावयाचे सेवेत कोणतीही त्रुटी केली नसल्याचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. त्यामुळे सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांचेकडून वादमिळकतीचे मोबदल्यापोटी रक्कम स्विकारुनही नोंद खरेदीखत करुन दिलेले नाही ही बाब शाबीत होते. यावरुन सामनेवाला यांनी तक्रारदारास सदनिकेचे नोंदणीकृत खरेदीखत करुन न देऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली असलेचे शाबीत होते. सबब सामनेवाला यांनी तक्रारदारास सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
9) सबब तक्रारदार यांनी वादातील सदनिकेच्या ठरलेल्या मोदबल्यापोटी काही उर्वरित रक्कम येणे बाकी असल्यास ती रक्कम सामनेवाला क्र.1 यांना अदा करुन सामनेवाला यांचेकडून वाद मिळकतीचे नोंदणीकृत खरेदीखत करुन मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
10) सबब, प्रस्तुत कामी हे आयेाग पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येतो.
2) सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास गाव मौजे पडवेवाडी ता.जि.रत्नागिरी येथील भूमापन नं.27, हि.नं.4/1/8अ/1/11 या सदर मिळकतीवर सामनेवाला यांनी बांधलेल्या “आराध्य रेसिडेन्सी” सदर इमारतीमधील तळ मजल्यावरील निवासी सदनिका क्र.1 क्षेत्र 475 चौ.फुट बिल्टअप क्षेत्राच्या निवासी सदनिकेच्या मोबदल्यापोटी काही रक्कम देणे लागत असतील तर ती रक्कम तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांना अदा करावी व तदनंतर सामनेवाला क्र.1 यांनी सदर वाद मिळकत सदनिकेचे नोंद खरेदीखत तक्रारदाराचे नांवे करुन सदनिका तक्रारदाराचे ताब्यात दयावी.
3) सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- (रक्कम रुपये पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्क्म रु.3,000/- (रक्कम रुपये तीन हजार फक्त) अदा करावेत.
4) सामनेवाला क्र.2 विरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
5) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता सामनेवाला यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
6) विहीत मुदतीत सामनेवाला यांनी आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
7) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.