नि. 23
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष : श्री.ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य : श्री के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 348/2011
-----------------------------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 30/12/2011
तक्रार दाखल तारीख : 04/01/2012
निकाल तारीख : 14/06/2013
-----------------------------------------------------------------
1. श्री बंडू श्रीरंग पोळ
2. सौ पुष्पा बंडू पोळ
3. कु.प्रणाली बंडू पोळ
तर्फे अ.पा.क. सौ पुष्पा बंडू पोळ
सर्व रा. वायफळे रोड, सावळज,
ता.तासगांव जि. सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. श्री शिवप्रताप ग्रा.बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.
सावळज, ता.तासगांव जि. सांगली तर्फे
चेअरमन, श्री दिलीप इराप्पा देसाई
रा.सावळज, ता.तासगांव जि. सांगली
2. श्री दिलीप इराप्पा देसाई, चेअरमन
3. श्री तुकाराम महादेव माळी, व्हाईस चेअरमन
4. श्री वैभव दिनकर पोळ, संचालक
5. श्री दिलीप भाऊसो पाटील, संचालक
6. श्री सर्जेराव दगडू दुबोले, संचालक
7. श्री सुर्यकांत तातोबा पवार, संचालक
8. श्री बाळासाहेब गंगाराम चव्हाण, संचालक
9. श्री एकनाथ महादेव चव्हाण, संचालक
10. श्री सुभाष मारुती उनउने, संचालक
11. श्री संजय जगन्नाथ थोरात, संचालक
12. श्री मिलींद वसंत झेंडे, संचालक
13. कविता विलास तोडकर, संचालक
सर्व रा.सावळज, ता.तासगांव, जि. सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड श्री एम.एन.शेटे
जाबदार क्र.3 तर्फे : अॅड एस.बी.ओलेकर
जाबदार क्र.2,5,8,13 : म्हणणे नाही
जाबदार क्र.1,4,6,7,9 ते 12 : एकतर्फा
- नि का ल प त्र -
द्वारा – मा. सदस्य - श्री के.डी.कुबल
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदार यांनी जाबदार पतसंस्थेकडे गुंतविलेल्या मुदत ठेवीच्या रकमा वैयक्तिक आकस्मिक गरज असताना दिल्या नाहीत म्हणून दाखल करण्यात आली आहे.
2. सदरचे तक्रारीचा थोडक्यात तपशील असा -
तक्रारदाराने स्वतःच्या व कुटुंबियांच्या नांवे खालील तपशीलाप्रमाणे मुदत ठेव योजनेत जाबदार यांचेकडे गुंतवणूक केलेली होती.
अ.क्र. |
पावती क्र. |
रक्कम रु. |
रक्कम ठेवल्याचा दिनांक |
मुदत ठेव परतीची तारीख |
1 |
0231 |
36000 |
31/12/2009 |
31/5/2016 |
2 |
0232 |
40000 |
5/1/2010 |
5/6/2016 |
3 |
0281 |
100000 |
9/9/2010 |
9/2/2017 |
4 |
0233 |
56000 |
9/1/2010 |
9/6/2016 |
5 |
0234 |
50000 |
9/1/2010 |
9/6/2016 |
6 |
0282 |
100000 |
9/9/2010 |
9/2/2017 |
7 |
0283 |
90000 |
9/9/2010 |
9/2/2017 |
|
|
|
एकूण |
472000/- |
|
|
|
|
|
सदर रक्कमा सन 2009-10 मध्ये गुंतविलेल्या होत्या व त्यांची मुदत सन 2016 व 2017 मध्ये संपणार होती. मधल्या कालावधीत तक्रारदाराला मुलांच्या शिक्षणासाठी तसेच द्राक्षबागेच्या शेती खर्चासाठी पैशांची अत्यंत गरज असल्याने त्याने जाबदार संस्थेत जाऊन पैशाची निकड सांगून त्याप्रमाणे मागणी केली. मात्र जाबदार संस्थेने मुदतपूर्व रक्कम देण्यास नकार दर्शविला. अनेक वेळा तक्रारदाराला विनंती करुनही जाबदार क्र.1 ते 13 यांनी तक्रारदारास पैसे दिले नाहीत. पर्यायाने तक्रारदार यांनी मंचाकडे धाव घेवून आपली तक्रार नोंदविली व गुंतविलेली रक्कम रु.4,72,000/- तसेच मुदत ठेवीवर ठरविल्याप्रमाणे व्याजासह रक्कम मिळावी तसेच मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.10,000/- व प्रकरण खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत अशी मागणी प्रस्तुत तक्रारअर्जात केली आहे.
3. प्रस्तुत प्रकरणात तक्रारदाराने अर्जासोबत स्वतःचे शपथपत्रासह नि.4 वर एकूण 8 कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. जाबदार क्र.2, 5, 8 व 13 हे मंचात हजर झाले परंतु त्यांनी आपले म्हणणे दाखल केले नाही.
5. जाबदार क्र.1, 4, 6, 7, 9 ते 12 यांचेविरुध्द नि.क्र.1 वर एकतर्फा आदेश पारत करण्यात आला आहे.
6. जाबदार क्र. 3 यांनी आपले लेखी म्हणणे नि.क्र.16 वर दाखल केले आहे. तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कथन अमान्य केले असून सदर मुदत ठेवीची मुदत सन 2016 व 2017 मधील आहे, त्यामुळे तक्रारदारास मुदतीपूर्वी ठेवपावत्यांची रक्कम मागण्याचा अधिकार नाही. तसेच संचालकांची जबाबदारी त्याने खरेदी केलेल्या शेअर्सच्या रकमेइतकीच मर्यादीत असते, त्यामुळे जादा जबाबदारी येवू शकत नाही. त्याचप्रमाणे औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाप्रमाणे संचालकांची ठेवीच्या रकमेच्या परतफेडीची जबाबदारी नाही इत्यादी कथन केले आहे.
7. आपले म्हणणेचे पुष्ठयर्थ जाबदार क्र.3 यांनी कोणताही पुरावा जोडलेला नाही.
8. तक्रारदाराची तक्रार, लेखी पुरावे, जाबदार क्र.3 चे कथन यांचे अवलोकन केले असता मंचासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होत आहेत.
अ.क्र. |
मुद्दे |
उत्तरे |
1 |
तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत का ? |
होय |
2 |
जाबदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे काय ? |
होय |
3 |
काय आदेश ? |
खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 ते 3
1. तक्रारदार यांनी नि.क्र.4/1 ते 4/7 वर जाबदार यांचेकडे गुंतविलेल्या रकमेच्या पावत्या सादर केलेल्या आहेत. त्यावरुन असे दिसून येते की, तक्रारदाराने जाबदार संस्थेत मुदत ठेवीमध्ये रक्कम गुंतवणूक केलेली असून त्या दोहोंमध्ये ग्राहक-सेवादार हे नाते प्रस्थापित झालेले आहे. म्हणजेच पर्यायाने तक्रारदार हा जाबदार क्र. 1 ते 13 यांचा निश्चितपणे ग्राहक आहे. त्याप्रमाणे जाबदार क्र.3 याने तसे मान्यही केले आहे.
2. तक्रारदाराने गुंतविलेल्या रकमेची मागणी मुदतपूर्व केलेली आहे. एखादी व्यक्ती आपल्या किंवा मुलांच्या भविष्यासाठी पैशांची गुंतवणूक करीत असते. मात्र त्याचवेळी एखादी आकस्मिक घटना किंवा आकस्मिक खर्च निर्माण झाल्यास त्याने गुंतविलेली रक्कम त्याला काढता येणार नाही असे वित्तीय संस्थांना बंधन घालता येणार नाही. तक्रारदाराला मुलांच्या शिक्षणासाठी आणि द्राक्ष बागेच्या शेती खर्चासाठी पैशांची निकड निर्माण झाली अशावेळी त्याने जाबदार क्र.1 ते 13 यांचेकडे पैशांची मागणी केली यात गैर नाही. किंबहुना तक्रारदाराच्या मागणीप्रमाणे पैसे न देवून जाबदार क्र. 1 ते 13 यांनी सेवेत त्रुटी केल्याचे प्रत्यही दिसून येते आणि तसे ते स्पष्टही होते.
3. जाबदार संस्थेचे संचालक हे पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहाराला जबाबदार असतात. त्यांची जबाबदारी केवळ शेअर्सच्या रकमेइतकीच मर्यादीत नसते. आर्थिक जबाबदारी आली की, मर्यादीत जबाबदारीची आठवण जाबदारांना होते. हे नैतिकतेत बसत नाही. सर्वसामान्य गुंतवणूकदार आपल्या घामाच्या पैशातून विश्वासाने पतसंस्थेत गुंतवणूक करतो, त्यावेळी त्याची गुंतविलेली रक्कम व्याजासह विश्वासाने परत करणे ही खरी नैतिकता आहे आणि म्हणून corporate veil open करुन जाबदार क्र.2 ते 13 यांचेवर वैयक्तिकरित्या जाबदारांची रक्कम परत करणेची जबाबदारी निश्चित करणेत येत आहे. सन्मा. औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानंतर सन्मा. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात संचालकांच्या वैयक्तिक आर्थिक जबाबदारीसंदर्भात विवेचन केलेले आहे. त्यामुळे जाबदार क्र.1 ते 13 हे तक्रारदार यांची गुंतविलेली रक्कम देणेस बांधील आहेत आणि म्हणून आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदार क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिक वा संयुक्तपणे तक्रारदार यांनी गुंतवणूक केलेल्या ठेवपावती क्र. 0231, 0232, 0281, 0233, 0234, 0282, 0283 मधील रकमा ठेव ठेवल्याच्या तारखेपासून रक्कम पूर्ण अदा होईपर्यंत द.सा.द.शे.8.5 टक्के व्याजदराने तक्रारदारांना अदा करणेचे आदेश देण्यात येतात.
3. शारिरिक मानसिक त्रासापोटी रु.5,000/- जाबदार क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिक वा संयुक्तपणे तक्रारदारास अदा करावेत.
4. तक्रारदार यांना जाबदार यांनी तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रुपये 1,000/- अदा करावेत.
5. वर नमूद आदेशाची अंमलबजावणी निकाल जाहीर झालेल्या तारखेपासून 45 दिवसांत
करावी.
6. जाबदार यांनी आदेशाची पुर्तता न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 14/06/2013
(के.डी. कुबल ) ( ए.व्ही. देशपांडे )
सदस्य अध्यक्ष