// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक : 246/2014
दाखल दिनांक : 20/11/2014
निर्णय दिनांक : 05/03/2015
अशोक सुभानराव मनोहर
वय 50 वर्षे व्यवसाय – शेती
रा. पो. मार्डी, ता. तिवसा
जि. अमरावती : तक्रारकर्ता
// विरुध्द //
- श्री. साई कृषि केंद्र
- , ता. तिवसा जि. अमरावती
- महाराष्ट्र स्टेट सिडस कॉर्पोरेशन लि.
तर्फे मॅनेजर
महाबिज भवन, क्रिशी नगर, अकोला
ता.जि. अकोला : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. बेले
विरुध्दपक्ष 1 तर्फे : अॅड. वानखडे
विरुध्दपक्ष 2 तर्फे : अॅड. ठाकरे
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 05/03/2015)
ग्राहक तक्रार क्रमांकः 246/2014
..2..
मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
1. तक्रारदाराने हा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे या मंचा समोर सादर केला.
2. तक्रारदाराचे कथन असे आहे की, त्याचे मौजा मार्डी येथे सर्व्हे नं. 154 असून 95 आर ही शेत जमीन आहे. शेती पासुन त्याला दरवर्षी रु. ६०,०००/- उत्पन्न होते. विरुध्दपक्ष क्र. 1 हा विरुध्दपक्ष क्र. 2 ने उत्पादीत केलेल्या बियाणाची विक्री करणारे अधिकृत प्रतिनिधी आहे.
3. तक्रारदाराने असे कथन केले की, त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 कडून दि. १८.६.२०१४ रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी उत्पादीत केलेले महाबिज या कंपनीचे लॉट नं. ३००६ चे सोयाबीन बियाने 3 बॅग प्रति बॅग 30 किलो वजनाची रु. ७,१४०/- ला खरेदी केले होते. तक्रारदाराने दि. १७.७.२०१४ रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 कडून खरेदी केलेल्या बियाणाची पेरणी त्याच्या शेतात केली. त्यावेळी त्याच्या शेतात भरपुर पाणी होते व पेरणी योग्य परिस्थिती होती.
4. पेरणी केलेल्या बियाणाची उगवण ही योग्य झाली नाही कारण बियाणाची उगवण क्षमता ही कमी होती. उगवण योग्य न झाल्याने त्यांनी त्याबद्दलची तक्रार विरुध्दपक्ष
ग्राहक तक्रार क्रमांकः 246/2014
..3..
क्र. 1 कडे केली व त्याच्या सल्यानुसार विरुध्दपक्ष क्र. 2 कडे सुध्दा त्याने तक्रार केली. त्यानंतर विरुध्दपक्ष क्र. 2 यांचे कर्मचा-यानी तक्रारदाराच्या शेताची पाहणी दि. ३१.७.२०१४ रोजी केली त्यावेळी असे लक्षात आले की, बियाणाची उगवण 18 टक्के झालेली आहे. त्यानुसार पाहणी अहवाल तयार करण्यात आला. बियाणाची उगवण ही फक्त 18 टक्के झाल्याने तक्रारदाराचे आर्थिक नुकसान झाले. कमी उगवण ही बियाणे हे कमी प्रतिचे असल्याने झालेले आहे. त्यास झालेल्या रु. ६०,०००/- च्या नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 याच्यावर आहे. ज्याबद्दल त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 ला नुकसान भरपाई मागितली असतांना त्यांनी ते देण्याचे टाळाटाळ केली त्यामुळे त्यांनी हा तक्रार अर्ज दाखल केला.
5. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी निशाणी 16 ला प्राथमिक आक्षेप असणारा अर्ज दाखल केला व निशाणी 22 ला त्यांचा लेखी जबाब दाखल केला. विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा तक्रारदार हा ग्राहक आहे व त्यास बियाणाची विक्री केली होती हे कबुल केले. तक्रारीतील इतर मजकुर त्यांनी नाकारला. त्यांनी असे कथन केले की, आनंद कृषि सेवा केंद्र बडनेरा हे विरुध्दपक्ष क्र. 2 यांचे अधिकृत विक्रेते आहे. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी या केंद्रातून व्यवसाय
ग्राहक तक्रार क्रमांकः 246/2014
..4..
करण्यासाठी बियाणे खरेदी केले व त्यातील काही बियाणाचे बॅग तक्रारदाराला विकल्या होत्या. आतील बियाणे हे बॅग खरेदी करतांना जसेच्या तसे त्याच स्थितीत होते त्यामुळे तक्रारदारास नुकसान भरपाई देण्यास तो जबाबदार होत नाही. त्यांनी असेही कथन केले की, विरुध्दपक्ष क्र. 2 हे शासनाची संस्था आहे त्यामुळे सिव्हील प्रोसीजर कोडच्या कलम 80 खाली तक्रार दाखल करण्यापुर्वी नोटीस देणे आवश्यक होते, ती नोटीस न दिल्यामुळे तक्रार अर्ज रद्द करण्यात यावा.
6. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी निशाणी 20 ला त्यांचा लेखी जबाब दाखल करुन त्यांच्या विरुध्द करण्यात आलेल्या तक्रारी हया नाकारल्या. त्यांनी हे नाकारले की, बियाणे हे निकृष्ठ दर्जाचे होते. बियाणाचे बॅगे सोबत त्याची पेरणी व काळजी कशी घ्यावी याबद्दलचे परिपत्रक शेतक-यास देण्यात येते. त्यानुसार योग्य हवामानात बियाणाची पेरणी करावी लागते, तशी न झाल्यास बियाणाची उगवण क्षमतेवर परिणाम होते. त्यांनी असे कथन केले की, बियाणाची निर्मीती केल्यावर त्या बियाणाची तपासणी होउुन ते महाराष्ट्र शासनाचे बिज प्रमाणिकरण यंत्रणा अकोला यांच्याकडून प्रमाणित करण्यात येते व त्याबाबतचा मुक्तता अहवाल मिळाल्यानंतर ते बियाणे विक्रीस उपलब्ध करण्यात येते.
ग्राहक तक्रार क्रमांकः 246/2014
..5..
विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी या सर्वाची पुर्तता करुन बियाणे विक्री केलेले आहे. तक्रारदाराने दाखल केलेला रिपोर्ट हा चुकीचा कसा आहे हे त्यांनी जबाबात नमूद केले. शेवटी त्यांनी तक्रार अर्ज रद्द करावा अशी विनंती केली.
7. तक्रारदाराने निशाणी 24 ला प्रतिउत्तर व निशाणी 25 ला लेखी युक्तीवाद दाखल केला. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी निशाणी 27 ला त्यांचा लेखी युक्तीवाद दाखल केला.
8. तक्रार अर्ज, लेखी जबाब, प्रतिउत्तर व लेखी युक्तीवाद तसेच विरुध्दपक्ष क्र. 2 तर्फे अॅड. श्री. ठाकरे यांचा तोंडी युक्तीवाद विचारात घेवून खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.
मुद्दे उत्तरे
- सिव्हील प्रोसीजर कोडच्या कलम 80
ची नोटीस न दिल्याने हा तक्रार अर्ज
चालु शकतो का ? .... होय
- विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी उत्पादीत केलेले
सोयाबीन बियाणे दोषपूर्ण असल्याचे
तक्रारदाराने शाबीत केले का ? नाही
- तक्रारदार हा नुकसान भरपाई मिळण्यास
पात्र आहे का ? नाही
ग्राहक तक्रार क्रमांकः 246/2014
..6..
- आदेश ? ... अंतीम आदेशा प्रमाणे
कारणमिमांसा ः-
9. प्राथमिक आक्षेप निशाणी 16, लेखी जबाब निशाणी 22 मध्ये विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी असा मुद्दा उपस्थित केला की, तक्रार अर्ज दाखल करण्यापुर्वी तक्रारदाराने सिव्हील प्रोसीजर कोडच्या कलम 80 ची नोटीस देणे आवश्यक होते. कारण विरुध्दपक्ष क्र. 2 ही शासन या संज्ञेत मोडते. तशी नोटीस न दिल्यामुळे हा तक्रार चालु शकत नाही. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी मात्र हा मुद्दा उपस्थित केला नाही. विरुध्दपक्ष क्र. 1 च्या या मुद्दाशी वास्तविक तसा कोणताही संबंध येत नाही. तक्रार अर्जातील बाबी पाहिल्या असतांना कलम 80 ची नोटीस देणे आवश्यक होते असे दिसत नाही. वास्तविक तशी नोटीस देण्याची आवश्यकता तक्रारीचे स्वरुप पाहता आवश्यक नाही. त्यामुळे सिव्हील प्रोसीजर कोडच्या कलम 80 ची नोटीस दिलेली नसली तरी त्या मुद्दावरुन हा तक्रार अर्ज रद्द होऊ शकत नसल्याने मुद्दा क्र. 1 ला होकारार्थी उत्तर देण्यात येते.
10. तक्रारदाराचे असे कथन आहे की, विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी उत्पादीत केलेल्या सोयाबीन बियाणाच्या 3 बॅग प्रत्येकी 30 किलो वजनाचे त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 कडून दि. १८.६.२०१४
ग्राहक तक्रार क्रमांकः 246/2014
..7..
रोजी खरेदी केले, ज्याचा लॉट नं. ३००६ होता. बियाणाची पेरणी केल्या नंतर त्याची उगवण ही फक्त 18 टक्के झालेली असून बियाणे निकृष्ठ प्रतिचे असल्याने अति कमी उगवण झालेली आहे त्यामुळे त्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यांनी असेही तक्रार अर्जात नमुद केले की, पेरणी करतांना त्याच्या शेतात भरपुर पाणी होते. अशा परिस्थितीत बियाणे हे निकृष्ठ प्रतिचे होते हे शाबीत करण्याची जबाबदारी तक्रारदार याची येते. तक्रारदाराने निशाणी 2/5 ला तालुका /जिल्हा स्तरीय समितीने तयार केलेला अहवाल दाखल केला व तक्रार अर्जाचा तो आधार आहे.
11. विरुध्दपक्ष क्र. 2 तर्फे अॅड. श्री. ठाकरे यांनी युक्तीवाद दरम्यान पाहणी समितीने जो अहवाल दिला तो कसा चुकीचा आहे हया बाबी मंचाच्या निदर्शनास आणुन दिल्या. त्यांचे कथन असे आहे की, विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी बियाणाची उगवण क्षमतेचा तज्ञांचा अहवाल दाखल केला आहे. अशा परिस्थितीत तक्रारदाराने दाखल केलेला पाहणी अहवाल संशयातीत असल्याने तो विचारात घेता येत नाही व तक्रारदाराने बियाणे निकृष्ट असल्याबद्दल तज्ञांचा अहवाल दाखल करणे उचित झाले असते. तसा अहवाल त्यांनी दाखल न केल्याने तक्रार अर्ज रद्द करण्यात यावा.
ग्राहक तक्रार क्रमांकः 246/2014
..8..
12. तक्रारदाराच्या कथना नुसार त्याने दि. १८.६.२०१४ रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 कडून विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी उत्पादीत केलेले लॉट नं. ३००६ चे सोयाबीन बियाणे खरेदी करुन दि. १७.७.२०१४ रोजी त्याची पेरणी केली होती असे त्यांनी तक्रार अर्जात नमूद केलेले आहे. बियाणे जर लॉट नं. ३००६ चे होते व त्याची पेरणी केली होती तर पाहणी समितीने जो अहवाल दिला त्यात त्याचा उल्लेख येणे क्रमप्राप्त होते. तक्रारदाराने निशाणी 2/2 ला दि. १८.६.२०१४ रोजीचे बियाणे खरेदीचे बिल दाखल केले आहे त्यावरुन असे दिसत नाही की, त्यांनी लॉट नं. ३००६ चे सोयाबीन बियाणे खरेदी केले होते. या बिलावरुन असे दिसते की, त्यांनी लॉट नं. ४००९ व ४०१४ चे बियाणे अनुक्रमे 2 व 1 बॅग खरेदी केले होते असे असतांना त्यांनी लॉट नं. ३००६ चे सोयाबीन बियाणे खरेदी केले होते असे तक्रार अर्जात नमूद केले. परंतु ते शाबीत करणारा कोणताही दस्त दाखल केलेला नाही. यावरुन असे दिसते की, पेरणी केलेले बियाणे लॉट नंबर व खरेदी केलेल्या बियाणाचा लॉट नंबर याच्यात तफावत आहे. पाहणी अहवाल निशाणी 2/5 मध्ये तक्रारदाराने लॉट नं. ३००६ चे सोयाबीन बियाणाची पेरणी केल्याचे नमूद नाही.
ग्राहक तक्रार क्रमांकः 246/2014
..9..
13. तक्रारदाराच्या कथना नुसार त्याची शेत जमीन 95 आर आहे व यात पेरणी करण्यासाठी त्याने सोयाबीन बियाणे 3 बॅग खरेदी करुन त्याची पेरणी केली होती परंतु पाहणी अहवालात पेरणी केलेले क्षेत्र हे फक्त 40 आर दाखविण्यात आले आहे. तक्रारदाराने निशाणी 2 सोबत मार्डीचे तलाठयाने दिलेला दि. १९.९.२०१४ चे पिक पेरा प्रमाणपत्र दाखल केले ज्यात असे नमूद आहे की, तक्रारदाराच्या शेत सर्व्हे नंबर 154 मधील 50 आर क्षेत्रात त्यांनी कापुस पेरलेला आहे व 40 आर क्षेत्र हे पडीत दाखविले आहे. तक्रारदाराने जर सोयाबीन पेरले होते तर पिक पेरा प्रमाणपत्रात ते नमूद केले असते. परंतु या प्रमाणपत्रावरुन असे दिसते की, तक्रारदाराने सोयाबीन न पेरता त्याच्या शेतात कापुस पेरला होता. तक्रारदाराने नंतर निशाणी 26 ला अर्जा सोबत दि. १६.२.२०१५ चे पिक पेरा प्रमाणपत्र पुन्हा दाखल केले. ज्यात 40 आर क्षेत्रात सोयाबीन पेरल्याचे नमूद आहे तसेच 50 आर क्षेत्रात कापुस पेरल्याचे त्यात नमूद करण्यात आले. या ठिकाणी हे नमूद करावे लागेल की, निशाणी 2/6 ला दाखल केलेले पिक पेरा प्रमाणपत्र व निशाणी 26 ला अर्जा सोबत दाखल केलेले दि. १६.२.२०१५ चे पिक पेरा प्रमाणपत्र हे एकाच तलाठयाने दिलेले आहे. पहिल्या प्रमाणपत्रात सोयाबीनचा उल्लेख का करण्यात आला
ग्राहक तक्रार क्रमांकः 246/2014
..10..
नाही याचे कारण मंचा समक्ष तक्रारदाराने दाखल करणे उचित झाले असते. आधी दिलेले प्रमाणपत्र हे योग्य वाटते. युक्तीवाद दरम्यान अॅड. श्री. ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यावर तक्रारदाराने निशाणी 26 ला अर्जा सोबत दाखल केलेले दि. १६.२.२०१५ चे पिक पेरा प्रमाणपत्र ते केवळ असलेली तृटी भरुन काढण्याचा संबंधीत तलाठयाकडून घेवून दाखल केला असा निष्कर्ष काढावा लागेल.
14. तालुका/जिल्हा स्तरीय पाहणी समितीने दि. २८.७.२०१४ रोजी तक्रारदाराच्या शेताची पाहणी केली असे पाहणी अहवालावरुन दिसते परंतु ही बाब संशयास्पद वाटते कारण पाहणी समितीने तक्रारदाराचा जबाब नोंदविला होता ज्यात तक्रारदाराने असे कथन केले की, पाहणी दरम्यान त्याचे बयाण/जबाब नोंदविण्यात आला. समितीने जर दि. २८.७.२०१४ रोजी पाहणी केली तर या जबाबावर ती तारीख यावयास पाहिजे होती परंतु हा जबाब दि. ३१.७.२०१४ रोजी घेतल्याचे दिसते. त्यावरुन समितीने खरोबरच दि. २८.७.२०१४ रोजी पाहणी केली होती ही बाब संशयास्पद ठरते.
15. तक्रारदाराने त्याच्या तक्रार अर्जात तालुका/जिल्हा स्तरीय पाहणी समितीने त्याच्या शेताला भेट देवून
ग्राहक तक्रार क्रमांकः 246/2014
..11..
बियाणे उगवणाची पाहणी केली होती असे नमूद केले नाही उलट तक्रारदाराने असे कथन केले की, तक्रार केल्यानंतर विरुध्दपक्ष क्र. 2 यांचे अधिका-याने तक्रारदाराच्या शेताची पाहणी केलेली होती त्यामुळे समितीने पाहणी केली हे संशयास्पद ठरविण्यासाठी ही बाब पुरेशी आहे.
16. पाहणी समितीचा अहवाल व त्याने खरोखरच दि. २८.७.२०१४ रोजी प्रत्यक्ष पाहणी केली यात संशय निर्माण करणारी आणखी एक बाब पाहणी अहवालावरुन समोर येते ती अशी की, त्यात पाहणी करतांना उपस्थित असलेले संबंधीत अधिका-यांची नावे नमूद आहे परंतु अनुक्रमे 2, 4 व 6 चे नाव लिहलेले आहे त्यावर त्यांची सही नाही, इतर संबंधीत अधिका-याची सही त्यावर आहे. ते जर समितीचे सभासद होते व या समितीने पाहणी केली त्यानंतर उपस्थित सभासदाची सही हया पाहणी अहवालावर जर घेण्यात आली होती तर या 3 अधिका-याची सही त्यावर का घेण्यात आली नाही याचे कोणतेही कारण मंचा समोर तक्रारदाराने आणले नाही. या मुद्दावरुन पाहणी अहवाल संशयास्पद वाटतेा.
17. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी निशाणी 21 सोबत मुक्तता अहवाल दाखल केला त्यावरुन असे दिसते की, सोयाबीन बियाणे याचा लॉट नंबर ३८०६ – ४००९ व ४०१४ या बियाणाची
ग्राहक तक्रार क्रमांकः 246/2014
..12..
तपासणी होउुन ते प्रमाणित करण्यात आले होते या अहवालानुसार लॉट नं. ३८०६ व ४०१४ च्या बियाणाची शुध्दता ही ९९.१४ व उगवण क्षमता ७३ टक्के तसेच लॉट नं. ४००९ ची शुध्दता १०० टक्के व उगवण ७२ टक्के असल्याचे प्रमाणित करण्यात आले. योग्य त्या अधिका-या मार्फत विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी बियाणाचे प्रमाणीकरण करुन त्याच्या शुध्दते व उगवणी बद्दल तज्ञांचा अहवाल घेतला होता अशा परिस्थितीत तक्रारदाराने खरेदी केलेला लॉट नं. ३००६ च्या उगवण व शुध्दते बद्दल तज्ञांचा अहवाल दाखल करणे आवश्यक होते जे त्यांनी केलेले नाही.
18. विरुध्दपक्ष क्र. 2 यांचे तर्फे अॅड. श्री.ठाकरे यांनी जरी युक्तीवाद दरम्यान असे कथन केले की, तक्रारदाराने सुनंदा वानखडे यांचे शेत निम्मे बटाईने वहित केले याचे दस्त हे रेकॉर्डवर उपलब्ध आहे, परंतु त्या शेतातील पेरणी केलेल्या सोयाबीन बियाणे उगवणी बाबत कोणताही अहवाल तक्रारदाराने दाखल केलेला नाही त्यामुळे तक्रार अर्ज हा रद्द करण्यात यावा, तरी तो मुद्दा हा महत्वाचा नसल्याचे निष्कर्ष हे मंच काढते.
19. वरील विवेचनावरुन असा निष्कर्ष काढण्यात येतो की, तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी उत्पादीत केलेल्या सोयाबीनचे बियाणे हे निकृष्ट प्रतिचे होते ही बाब शाबीत केली
ग्राहक तक्रार क्रमांकः 246/2014
..13..
नाही त्यामुळे समितीचे ज्या अहवालाचा आधार घेतला तो आधार हा संशयास्पद आहे. त्यामुळे मुद्दा क्र. 2 ला नकारार्थी उत्तर देण्यात येते.
20. मुद्दा क्र. 2 ला नकारार्थी उत्तर देण्यात येत असल्याने तक्रारदार हा कोणतीही नुकसान भरपाई मिळण्यास पात्र होत नाही त्यामुळे मुद्दा क्र. 3 ला नकारार्थी उत्तर देण्यात येते व खालील आदेशा प्रमाणे तक्रार अर्ज हा नामंजूर करण्यात येतेा.
अंतीम आदेश
- तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो.
- उभय पक्षांनी आपआपला खर्च सोसावा.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य द्याव्यात.
दि. 05/03/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष