तक्रारदारांकरिता अॅड घोणे
जाबदेणार एकतर्फा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
श्रीमती, अंजली देशमुख, मा. अध्यक्ष यांचेनुसार
:- निकालपत्र :-
20 जून 2012
1. तक्रारदार शेतकरी असून त्यांनी जाबदेणारांकडून दिनांक 25/11/2008 रोजी 1.5 इंच व्यासाचे 100 फुट लांबीचे दोन होस पाईप रोख रुपये 3700/- देऊन खरेदी केले. जाबदेणार यांनी तक्रारदारास पावती दिली. पावती देतांना तोंडी एक वर्षाची वॉरंटी दिली होती. काही दिवस पाईप व्यवस्थित चालत होता. परंतु पाईपच्या घडीवरच थोडया प्रमाणात गळती चालू झाली म्हणून तक्रारदारांनी जाबदेणार यांना त्याबाबत माहिती दिली. जाबदेणार यांनी तक्रारदारांना पाईपची शास्त्रीय माहिती दिली. पाईपला आतून रबराचे कोटिंग असून, उत्तम दर्जाच्या मटेरिअल पासून केले असून पाण्याचा दाब आला की पाईप फाटणार, चिरणार व गळणार नाही. किरकोळ स्वरुपाचा दोष काही दिवसात दुरु होईल असेही तक्रारदारांना सांगण्यात आले. तक्रारदारांना अजून एका पाईपची गरज असल्यामुळे जाबदेणार यांनी हा पाईप सुध्दा घेण्यास तक्रारदारांना गळ घातली व जर पुर्वी घेतलेल्या व नवीन पाईप मध्ये काही दोष आढळले तर सर्व पाईप बदलून देण्याचे जाबदेणार यांनी तक्रारदारांना आश्वासन दिले. म्हणून तक्रारदारांनी दिनांक 6/1/2009 रोजी रुपये 1750/- देऊन एक पाईप खरेदी केला, जाबदेणार यांनी पावती क्र.2131 तक्रारदारांना दिली. तिनही पाईपचा उपयोग तक्रारदार शेतीला पाणी देण्यासाठी करु लागल्यानंतर पाईप खराब असल्याचे व त्याचा उपयोग होत नसल्याचे तक्रारदारांच्या लक्षात आले. म्हणून तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडे तिनही पाईप बदलून मिळण्याची विनंती केली असता जाबदेणार यांनी तीन पैकी एकच पाईप तक्रारदारांना बदलून देतो असे सांगून एक पाईप पी व्ही सी कंपनीचा दिला व उर्वरित दोन पाईप नंतर बदलून देतो असे सांगितले. नंतर मागणी करुनही दोन पाईप बदलून दिले नाहीत, दिनांक 26/6/2009 रोजी नोटीस देऊनही उपयोग झाला नाही. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार हजाबदेणार यांच्याकडून उर्वरित दोन पाईपच्या बदल्यात दोन पी व्ही सी किंवा इतर चांगल्या कंपनीचे पाईप मिळावेत अशी मागणी करतात. नुकसान भरपाई पोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 25,000/- मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून जाबदेणारांविरुध्द मंचाने एकतर्फा आदेश पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडून प्रथम दोन होज पाईप खरेदी केले. ते आतून फाटत गेले हे त्यांनी जाबदेणार यांना सांगितले तेव्हा पाईपच्या आत जे रबर आहे ते इंर्पोटेड आहे, त्यामुळे ते कधी फाटणार नाही, वापरामुळे काही दिवसांनी प्रश्न सुटेल असे जाबदेणार यांनी तक्रारदारांना समजावले. तक्रारदारांनी सदर पाईप्स मंचात आणून दाखविले. त्यांची पाहणी केली तेव्हा, पाईप्सच्या आतील रबराचे तुकडे पडत असल्याचे आढळून आले व त्यामुळेच ते गळत असावेत. अशा पाईपचा तक्रारदार/शेतक-यास उपयोग होणार नाही. पाण्याचा दुरुपयोग/नासाडीही चालणार नाही. जाबदेणा-यांनी तक्रारदारांना एक पाईप बदलून दिला पी व्ही सी चा पाईप दिला हे पावतीच्या मागील बाजुस लिहील्यावरुन दिसून येते. म्हणजेच जाबदेणा-यांनी पाईप्सच्याच दोषांसाठी एक पाईप बदलून दिला व दुसरे दोन पाईप बदलून देण्यास नकार दिला. यावरुन पाईप बदलून न देणे, दोषयुक्त पाईपची विक्री करणे, त्यास तोंडीच वॉरंटी देणे हे सर्व दुकानदारावरच अवलंबुन असल्याचे दिसून येते. छोटा शेतकरी/ग्राहक [ज्यास अटी व शर्तीची माहिती नाही] पाहून जाबदेणा-यांनी त्याची दोषयुक्त पाईप देऊन फसवणूक केलेली दिसून येते. एक पाईप बदलून दिला म्हणजेच पाईप बदलून देता येतो हेही दाखवून दिले. पाईप्सची संपुर्ण रक्क्म घेऊन दोषयुक्त पाईप्स देणे हे अनुचित व्यापारी प्रथा ठरते. म्हणून मंच जाबदेणार यांना असा आदेश देतो की त्यांनी तक्रारदारांकडून दोन पाईप्स घेऊन त्याबदल्यात चांगल्या कंपनीचेच दोन पाईप्स वॉरंटीसह दयावेत. तक्रारदारांनी नुकसान भरपाई मागितली परंतु त्याबद्यलचा पुरावा, स्पष्टीकरण दिलेले नाही. परंतु जाबदेणार यांनी अवलंबिलेल्या अनुचित व्यापारी पध्दतीमुळे व सेवेतील त्रुटीपोटी तक्रारदार नुकसान भरपाई पोटी रुपये 2000/- मिळण्यास पात्र आहेत. तसेच तक्रारीचा खर्च रुपये 1000/- मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून दोन पाईप्स घेऊन त्याबदल्यात चांगल्या कंपनीचेच दोन पाईप्स वॉरंटीसह आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावेत.
[3] जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रुपये 2000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावेत.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.