निकालपत्र
(दि.13.07.2015)
(घोषीत द्वारा- मा.सौ. स्मिता बी.कुलकर्णी,अध्यक्ष)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार ही शिक्षिकेची नोकरी करते. अर्जदाराला नेहमी टी.ई.टी. करीता ऑनलाईन फॉर्म रजिस्ट्रेशनसाठी मोबाईलची अत्यंत गरज होती. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 1 कडे मोबाईल खरेदीसाठी अर्जदार ही गेली असता गैरअर्जदार क्र. 1 यांनी इंटेक्स कंपनीचा मोबाईल इतर कंपनीपेक्षा चांगला असे सांगून वारंटीच्या काळात खराब झाल्यास मोफत दुरुस्त करुन मिळेल असे सांगितले. त्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 वर विश्वास ठेऊन इंटेक्स कंपनीचा मोबाईल दिनांक 03.10.2013 रोजी रक्कम रु.9800/- ला खरेदी केला. सदरील मोबाईल खरेदी केल्यावर काही दिवसातच तो सदोष असल्याचे अर्जदारास आढळून आले. सदरील मोबाईल यंत्रणेत फंक्शन चालु होत नव्हते. तसेच ऑटो ऑफ,ऑटो रिस्टार्ट हँडसेट हिटींग, डिस्प्ले प्रॉब्लेम, सेंसर प्रॉब्लेम इत्यादी चालू होत नव्हते. अर्जदाराने दिनांक 13.10.2014 रोजी मोबाईलमध्ये बिघाड असल्याबाबत गैरअर्जदार क्र. 1 यांना दाखविले असता गैरअर्जदार क्र. 1 यांनी गैरअर्जदार क्र. 2 हे कंपनीचे अधिकृत सर्व्हीस सेंटर असल्यामुळे त्यांचेकडे दुरुस्तीसाठी मोबाईल देणेसाठी सांगितले. गैरअर्जदार क्र. 2 कडे अर्जदार मोबाईल दुरुस्तीसाठी घेऊन गेला असता गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदाराचा मोबाईल दुरुस्तीसाठी ठेऊन घेतला. परंतु आजपर्यात अर्जदाराचा मोबाईल दुरुस्त करुन दिलेला नाही. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 कडे अनेकवेळा मागणीकरुनही गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारचा मोबाईल दुरुस्त करुन दिलेला नाही. दिनांक 14.11.2014 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे मोबाईल दुरुस्त करुन किंवा मोबाईल बदलवून देणेसाठी विनंती केली असता गैरअर्जदार यांनी अर्जदारास मोबाईल बदलवून मिळणार नाही व दुरुस्त करुन देणार नाही. त्यामुळे अर्जदार यांनी सदरील तक्रार दाखल केलेली आहे.
गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी सदरील मोबाईल विक्री करतेवेळेस वारंटी गॅरंटीची पुर्तता केलेली नाही. त्यामुळे अर्जदारास मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागलेला आहे. त्यामुळे गैरअर्जदार विरुध्द अर्जदाराने तक्रारीमध्ये गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी अर्जदाराचा मोबाईल खरेदी रक्कम रु.9800/- खरेदी केल्याचे तारखेपासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह देण्याचा आदेश पारीत करावा. तसेच गैरअर्जदार यांनी मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.25,000/- , आर्थिक हानीपोटी रक्कम रु.5,000/- व दावा खर्च रु.5,000/- अशी एकूण रक्कम रु.40,000/- रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार क्र. 1 हे वकीलामार्फत हजर झाले व त्यांनी आपला लेखी खुलासा दाखल केलेला आहे.
गैरअर्जदार क्र. 1 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. गैरअर्जदार क्र. 1 यांचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. गैरअर्जदार क्र. 1 हे प्रत्येक ग्राहकास मोबाईल विक्री केल्यानंतर त्याची रितसर पावती देतात. या पावतीत सर्व सेवा शर्तींचा उल्लेख असतो. पावतीवरील सेवा शर्तीं अर्जदारास सांगितल्या जातात. सदरील सेवा शर्ती मान्य करुन अर्जदाराने मोबाईल विकत घेतलेला आहे. अर्जदाराने अर्जदारास कुठलीही त्रुटी,निष्काळजीपणा केलेला नाही. कुठलाही त्रास दिलेला नसतांना गैरअर्जदार क्र. 1 यांचेविरुध्द काल्पनिक गृहीतकांवर आधारीत तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार खोटी असल्या कारणाने खर्चासह नामंजूर करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार क्र. 1 यांनी आपल्या लेखी जबाबाव्दारे केलेली आहे.
5. गैरअर्जदार क्र. 3 यांचेमार्फत प्रतिनिधी श्री.प्रशांत,एएसएम(सर्व्हीस)
इंटेक्स कंपनीचे हे हजर झाले होऊन लेखी जबाब दाखल करणेसाठी वेळ मागीतला. परंतु त्यांनी आजपर्यंत लेखी जबाब दाखल केलेला नाही किंवा त्यानंतर तक्रारीत हजर राहिलेले नाहीत.
गैरअर्जदार क्र. 2 यांना नोटीस प्राप्त होऊनही तक्रारीमध्ये हजर झालेले नाहीत. त्यामुळे प्रकरणात अर्जदाराचा युक्तीवाद ऐकला, अर्जदार यांनी दाखल केलेल्या यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
6. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडून गैरअर्जदार क्र. 3 यांनी उत्पादीत केलेला इंटेक्स कंपनीचा मोबाईल दिनांक 03.10.2013 रोजी रक्कम रु.9800/- ला खरेदी केला असल्याचे दाखल पावतीवरुन स्पष्ट होते. अर्जदाराचा मोबाईल गैरअर्जदार क्र. 2 स्पेस कम्युनिकेशन अधिकृत सर्व्हीस सेंटर यांचेकडे दुरुस्तीसाठी दिनांक 13.10.2013 रोजी दिलेला असल्याचे असल्याचे दाखल पावतीवरुन दिसून येते. सदरील जॉबकार्डचे अवलोकन केले असता अर्जदाराच्या मोबाईलमध्ये ऑटो ऑफ,एल.सी.डी. लाईट †òन्ड सेंसर लाईट ऑफ ऑटो असे प्रॉब्लेम असल्याचे दिसून येते. तसेच अर्जदाराचा मोबाईल हँडसेटचे स्टेटस अंडर वारंटी असे नमुद केलेले असल्याने अर्जदाराचा हँडसेट वारंटी कालावधीमध्ये खराब झालेला असल्याचे सिध्द होते. अर्जदाराने दिनांक 03.10.2013 रोजी सदरील मोबाईल खरेदी केलेला असून खरेदी केल्यापासून 10 दिवसाच्या आतच सदरील मोबाईल नादुरुस्त झालेला आहे. गैरअर्जदार क्र. 2 याचेकडे मोबाईल दुरुस्तीसाठी दिलेला असतांनाही गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदाराच्या मोबाईल हँडसेटची दुरुस्ती केलेली नाही किंवा त्याबाबत कुठलेही समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत. त्यामुळे अर्जदारास सदरील तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. गैरअर्जदार क्र. 3 ही उत्पादक कंपनी असून गैरअर्जदार क्र. 2 हा गैरअर्जदार क्र. 3 चे अधिकृत सर्व्हीस सेंटर आहे. गैरअर्जदार क्र. 2 आणि गैरअर्जदार क्र. 3 यांचे अर्जदारास विक्री केलेल्या मोबाईल हँडसेटची वारंटी कालावधीमध्ये बिघाड निर्माण झाल्यास विक्री पश्चात योग्य सेवा देणे प्रथम कर्तव्य होते. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी तसे केल्याचे दिसून येत नाही. यावरुन गैरअर्जदार क्र. 2 व3 यांनी अर्जदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे असे निदर्शनास येते. अर्जदाराचा मोबाईल हँडसेट वारंटी कालावधीत नादुरुस्त झालेला असल्याने सदरील हँटसेट अर्जदारास बदलवून देणे किंवा दुरुस्त करुन देणे गैरअर्जदार क्र. 2 यांनी क्रमप्राप्त होते. गैरअर्जदार क्र. 2 आणि 3 यांना नोटीस प्राप्त होऊनही त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केलेला नाही. यावरुन अर्जदाराचे तक्रारीतील कथन गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांना मान्य असल्याचे दिसून येते. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदारास मोबाईल हँडसेटची किंमत रक्कम रु.9800/- खरेदी केल्याचा दिनांक दिनांक 03.10.2013 पासून द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यंत आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
3. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास दिलेल्या सेवेतील त्रुटीबद्दल नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.5000/- व दावा खर्चापोटी रु. 1000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात
दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.