::: आ दे श :::
( पारित दिनांक : 29/05/2017 )
माननिय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले , यांचे अनुसार : -
1. तक्रारकर्ते यांनी सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये विरुध्द पक्षांविरुध्द नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली.
तक्रारकर्ते यांची तक्रार, सोबत दाखल केलेले सर्व दस्तऐवज, विरुध्द पक्ष क्र. 1 ते 4 चा संयुक्त लेखी जबाब, उभय पक्षातर्फे दाखल दस्त व उभय पक्षांचा लेखी युक्तिवाद, यांचे अवलोकन करुन, खालील निर्णय पारित केला.
तक्रारकर्ते यांचा युक्तिवाद असा आहे की, दिनांक 06/09/2013 रोजी तक्रारकर्ते यांनी त्यांच्याकरिता व मित्रांकरिता, अकोला ते वाशिम प्रवासासाठी अकोला येथुन विरुध्द पक्ष क्र. 1 च्या दुकानातून एक कॅरेट बिसलेरी पॅकेज्ड ड्रिंकींग वॉटर या नावाने विक्री होत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या विकत घेतल्या होत्या. वाशिम जवळ आल्यावर जेंव्हा तक्रारकर्त्याने एक बाटली पाणी पिण्यासाठी हातात घेतली असता, त्यात मृत पाल असल्याचे आढळून आले. विरुध्द पक्ष क्र. 1 हा बिसलेरी कंपनीचा अकोला येथील विक्रेता व वितरक आहे. विरुध्द पक्ष क्र. 2 हा सदरहू कंपनीचे नागपूर येथील कार्यालय आहे व तिथे पाण्याचा प्लांट आहे. विरुध्द पक्ष क्र. 3 सदरहू कंपनीचे अकोला येथील कार्यालय आहे व विरुध्द पक्ष क्र. 4 ही सदरहू कंपनी आहे व विरुध्द पक्ष क्र. 5 हा सदरहू कंपनीचा वाशिम येथील विक्रेता आहे. पिण्याच्या बॉटलमध्ये पाल असलेली घटना विरुध्द पक्ष कंपनीला तोंडी फोन व्दारे कळविली असता, त्यांनी सदर बॉटल किंवा फोटो चौकशीकरिता पाठवा असे सांगितले. त्यानुसार तक्रारकर्ते यांनी सदरहू बॉटलचे फोटो व सि.डी. ताबडतोब विरुध्द पक्षाला पाठविले. परंतु त्यांनी कोणतीही दखल किंवा चौकशी केली नाही, म्हणून कायदेशीर नोटीस पाठविली. परंतु विरुध्द पक्षाने नोटीसला ऊडवाऊडवीचे ऊत्तर पाठविले. विरुध्द पक्षाने हे मान्य केले की, त्यांना बॉटलचे फोटो व सि.डी. प्राप्त झालेले आहे. सदर नोटीस ऊत्तरात विरुध्द पक्षाने उलट तक्रारकर्ते यांचेवरच आरोप लावले आहेत, परंतु याबाबत कोणतीही चौकशी केली नाही. विरुध्द पक्षाचे हे कृत्य म्हणजे ग्राहकांची फसवणूक, सेवेत न्युनता, व्यापारातील अनुचित प्रथा आहे. म्हणून तक्रारकर्त्याने मंचाला अशी प्रार्थना केली की, .
- वि. न्यायालयाने सदरहू बॉटल ज्याच्यात पाल आहे ती बॉटल सरकारी कार्यशाळा मध्ये पाठवावी व त्याची तपासणी करावी व त्याचा अहवाल मागवावा व तसेच त्या कालावधी मध्ये किती लोकांना सदरहू पाणी पिल्यामुळे त्रास झाला आहे, हयाची चौकशीचे आदेश द्यावे.
- तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर करण्यात यावी व अर्जदार यांना गैरअर्जदार यांच्याकडून, एकत्रित व संयुक्तिक, अर्जदाराचे गैरअर्जदार यांच्या चुकीमुळे, निष्काळजीपणामुळे व विश्वासघातामुळे व शारीरिक व मानसिक त्रास व पिडा पोहचविल्यामुळे अर्जदाराला रक्कम रुपये 20,00,000/- ( वीस लक्ष रुपये फक्त ) गैरअर्जदार यांच्याकडून देण्याचा आदेश करावा.
- अन्य योग्य ती दाद तक्रारकर्त्याच्या हितावह व गैरअर्जदार यांचे विरुध्द वि. न्यायमंचाव्दारे देण्याचा आदेश व्हावा.
- तसेच गैरअर्जदार यांनी आपल्या ग्राहकांची फसवणूक करु नये व त्यांचा विश्वासघात करु नये असा वेगळा आदेश गैरअर्जदार यांचे विरुध्द वि. न्यायमंचाने करावा.
- गैरअर्जदार हे सध्या बिसलेरी या ब्रॉंन्ड खाली पिण्याचे पाणी विक्रीचे व्यवसाय त्यांनी त्वरीत जन-सामान्याच्या स्वास्थ्याचे संरक्षण करीत बंद करण्याचा आदेश पारित करण्यात यावा.
- गैरअर्जदार क्र. 6 यांनी 2 ते 4 यांच्यावर नियमाप्रमाणे कार्यवाही करुन तसा अहवाल वि. न्यायालयात सादर करावा.
2) विरुध्द पक्ष क्र. 1 ते 4 यांनी पुरसिस दाखल करुन, त्यांचा लेखी जबाब हाच लेखी युक्तिवाद समजण्यात यावा असे मंचाला कळविले. त्यानुसार विरुध्द पक्ष क्र. 1 ते 4 यांचे संयुक्तपणे असे कथन आहे की, विरुध्द पक्ष क्र. 2 आणि 3 हे मिनरल वॉटरचे निर्माते नाही. बिसलेरी ब्रॅंन्ड मिनरल वॉटर हे विरुध्द पक्ष क्र. 2 ते 4 यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 किंवा विरुध्द पक्ष क्र. 5 यांना विकले आहे, याबद्दल ठोस पुरावा नाही, असल्याशिवाय असे म्हणता येणार नाही. सदर बॉटल मध्ये मृत पाल असल्याची घटना खोटी आहे. विरुध्द पक्ष क्र. 4 ही कंपनी आहे. तक्रारकर्ते यांनी अशा घटनेबद्दलचे फोटो व सि.डी. विरुध्द पक्षाला पाठविली, परंतु त्यावरुन देखील अशी घटना घडलेली नाही, असेच दिसते. विरुध्द पक्षाकडून पैसे उकळण्यासाठी तक्रारकर्ते यांनी ही खोटी तक्रार वाईट हेतूने दाखल केली आहे. तक्रारकर्ते यांचे विरुध्द पक्ष क्र. 5 शी संगनमत असल्याची बाब नाकारता येत नाही. सदर बॉटलच्या फोटोग्राफ्स व सि.डी. वरुन, सदर बॉटल ही नकली आहे, असा निष्कर्ष निघतो. शिवाय हे फोटो तक्रारकर्त्याने रेकॉर्डवर दाखल केले नाही. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या नोटीसला ऊत्तर दिले आहे, ते खरे आहे. सदर तक्रारीतील फॅक्टस व परिस्थिती पाहता, तक्रारीची चौकशी करुन दखल घेण्यालायक तक्रार नाही. सदर बॉटल रेकॉर्डवर लावल्याशिवाय, प्रयोगशाळेत पाठविण्याची विनंती मंजूर करता येणार नाही. तक्रारकर्ते हे विरुध्द पक्ष क्र. 1 ते 4 चे ग्राहक नाही. तक्रारकर्ते खोटी तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्षाला धमकवत आहे व कंपनीची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. तक्रारकर्त्याचा उद्देश वाईट हेतूचा आहे. पाणी पॅक करण्याची प्रक्रिया ही काळजीपूर्वक, शासकीय नियमांनुसार पूर्ण केल्या जाते, त्यामुळे ग्राहकांचे आरोग्य जपले जाते.
विरुध्द पक्ष क्र. 5 व 6 यांना मंचाची नोटीस पुनः पाठविण्याची पुढील कार्यवाही तक्रारकर्ते यांनी केली नाही म्हणून त्यांच्याविरुध्द असलेले आक्षेप तपासता येणार नाही.
3) कारणे व निष्कर्ष ::
अशा रितीने उभय पक्षांचा युक्तिवाद एैकल्यानंतर व दाखल दस्त दिनांक 06/09/2013 रोजीचे बील पाहता असे दिसते की, तक्रारकर्ते यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 यांच्या दुकानातून एक कॅरेट बिसलेरी मिनरल वॉटर रक्कम रुपये 155 मध्ये बिल क्र. 2910 नुसार खरेदी केली होती, तसेच सदर बिलावरुन विरुध्द पक्ष क्र. 1 हे वितरक – Distributor : Bisleri Packged Drinking Water आहे, असा त्यावरील मजकुरावरुन बोध होतो व विरुध्द पक्ष क्र. 1 ते 4 बाबत, दाखलरिव्हीजन पिटीशन प्रत ( मा. राज्य आयोग नागपूर खंडपीठ यांचेकडील ) यावरुन असे लक्षात येते की, सदर रिव्हीजन ही विरुध्द पक्ष क्र. 4 यांनी दाखल केली होती व त्यात त्यांचे असे म्हणणे होते की, The original opponent No. 2 is the manufacturer of packaged drinking water under the name and style ‘‘Bisleri’’ as per the arrangement arrived at between the Respondent No. 4 and the present Applicant. शिवाय विरुध्द पक्ष क्र. 1 ते 4 यांनी त्यांच्या लेखी कथनात कबुली दिली की, विरुध्द पक्ष क्र. 4 कंपनी आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत तक्रारकर्त हे विरुध्द पक्ष क्र. 1 ते 4 चे ग्राहक / लाभार्थी या संज्ञेत मोडतात, असे मंचाचे मत आहे.
विरुध्द पक्ष क्र. 1 ते 4 यांनी तक्रारकर्ते यांच्या नोटीसला दिलेले ऊत्तर व मंचासमोर दाखल केलेला लेखी जबाब यात तक्रारकर्त्याच्या तक्रारीमधील मुद्दे नाकबूल करण्याशिवाय ईतर कोणतीही माहिती मंचाच्या नजरेस आणून दिली नाही. याउलट तक्रारकर्ते यांनी सदर विवादीत पाण्याची बॉटल मंचासमोर हजर केली होती, मंचाने याबाबत तक्रारकर्ते यांच्या अर्जावरुन, तहसिलदार, वाशिम यांना सदर बाटलीचा पंचनामा करण्याबाबत पत्र जारी केले, त्यानुसार त्यांनी दिनांक 02/09/2014 रोजी पंचनामा केला होता. त्यातील मजकूर खालीलप्रमाणे आहे.
प्रभारी प्रबंधक, जिल्हा ग्राहक मंच, वाशिम यांचे पत्र क्र.जिग्रामं/वाशिम/2014/352 दिनांक 27/08/2014 च्या पत्रानुसार दिनांक 02/09/2014 रोजी तहसिल कार्यालय, वाशिम येथे दुपारी ठिक 12.15 वाजता प्रकरण क्रमांक 25/2014 शाम नेनवानी वि. श्री गणेश मार्केटिंग, अकोला या प्रकरणात बिसलरी बॉटलचा पंचनामा करण्यात येत आहे. श्री. शाम नेनवानी यांचेजवळ असलेली बिसलरी या कंपनीची शिलबंद असलेली पाण्याची बॉटलमध्ये मृत अवस्थेतील पाल आढळून आली. सदर पालीचे मासाचे तुकडे बॉटलमध्ये विखुरलेले होते. बॉटलमधील पाणी अस्वच्छ होते. सदर बॉटलची मॅनीफॅक्चरींग तारीख 30 मे 2013 असुन B.No. 130 ( AK&AG ) 17.45 MRP – 18.00 Trade Mark 8 906017290040 हा आहे. सदर पाणी बॉटल ही शिलबंद आढळून आली.
बाटलीचे विष्लेशन करणेकरिता ती बाटली रिजनल पब्लीक हेल्थ लेबॉरटरी , नागपूर येथे मंचाने पाठवली असता, त्यांनी दिनांक 10/03/2015 रोजी निशाणी-36 नुसार रिपोर्ट मंचाला पाठविला. त्याचे अवलोकन केल्यास हे स्पष्ट होते की, विवादीत बाटली ही रिजनल पब्लीक हेल्थ लेबॉरटरी , नागपूर यांना सिल्ड पॅक बॉटल म्हणून मिळाली होती व त्या बाटलीत मृत पालीचे अवशेष आढळून आले. त्यांनी पुढे त्यात असेही नमुद केले की, त्या बाटलीमधील पाण्यामध्ये सॅलमोनेली हया विषारी घटकाबाबत चाचणी केली असता, तो घटक त्या पाण्यात आढळून आला. म्हणजे या चाचणी अहवालावरुन हे स्पष्ट होते की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास विक्री केलेले सिलबंद पिण्याचे पाणी दूषीत व विषारी होते, त्यातील Food Analyst यांचा Remarks असा आहे.
Remarks :- The aforesaid sample dose not conform to the standard of packaged Drinking Water as laid down under Food safety & standard Regulation 2011. Moreover sealed sample contains Dead Lizard along with Strong Putrid odour & hence unsafe for human consumption w.r.t. 3. (i),(ii),&(iii) Of Food Safety & Standard ACT 2006.
सबब तक्रारकर्ते यांनी त्यांच्या तक्रारीतील कथन पुराव्यानिशी सिध्द केले आहे. याउलट विरुध्द पक्षाने स्वतःची भुमिका मवाळ ठेवली, त्यामुळे मंच या निष्कर्षाप्रत पोहचले की, विरुध्द पक्ष क्र. 1 ते 4 यांचा व्यापार हा जनसामान्याच्या जिवितास हानीकारक आहे. वास्तविक विरुध्द पक्षाने या घटनेची गंभिर दखल घेणे आवश्यक होते. विरुध्द पक्षाने पिण्याचे पाणी विक्री करण्याच्या व्यवसायामध्ये, सदर पाणी प्रोसेस करुन पॅक करण्याच्या क्रियेमध्ये निष्काळजीपणा दाखविला व चुकीच्या मार्गाने पाणी विक्री करण्याचा व्यवसाय विरुध्द पक्ष करत असून त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे, मात्र विरुध्द पक्ष हे या व्यवसायातून अवाढव्य नफा कमवित आहे. विरुध्द पक्षाच्या बिसलेरी ब्रॅंण्डवर जनसामान्य ग्राहक डोळे बंद करुन विश्वास ठेवतो. परंतु प्रस्तुत प्रकरणातील घटनाक्रमावरुन हे स्पष्ट झाले की, विरुध्द पक्ष वापरत असलेली पाणी पॅक करण्याची प्रक्रिया दोषपूर्ण आहे. त्यामुळे जनसामान्याच्या स्वास्थ्याशी विरुध्द पक्ष खेळ करीत आहे. म्हणून मंच ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 14 (i) (d) (f) इ. नुसारचे अधिकार वापरण्यास बाध्य झाले आहे. परंतु तक्रारकर्ते यांची नुकसान भरपाई रक्कम मिळण्याची मागणी पुर्णपणे मंजूर करता येणार नाही. मात्र वर नमूद विश्लेषणानुसार तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 1 ते 4 विरुध्द अंशतः मंजूर, खालीलप्रमाणे आदेश पारित करुन केली.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ते यांची तक्रार विरुध्द पक्ष क्र. 1 ते 4 विरुध्द अंशतः मंजूर करण्यांत येते.
- विरुध्द पक्ष क्र. 1 ते 4 यांनी संयुक्तपणे वा वेगवेगळे तक्रारकर्त्यास सर्व प्रकारच्या नुकसान भरपाईपोटी व प्रकरणाच्या न्यायिक खर्चासह रक्कम रुपये 1,00,000/- ( अक्षरी रुपये एक लाख फक्त ) अदा करावी.
- विरुध्द पक्ष क्र. 1 ते 4 यांनी बिसलेरी या ब्रॅंण्डखाली पिण्याचे पाणी विक्रीचा व्यवसाय, जनसामान्याच्या स्वास्थ्याचे संरक्षण करण्याकरिता यापुढे अतिसुरक्षितपणे, काळजीपूर्वक करावा, असे आदेशीत करण्यात येते.
- विरुध्द पक्ष क्र. 1 ते 4 यांनी आदेशाची पुर्तता 45 दिवसात करावी अन्यथा क्लॉज नं. 2 मधील आदेशीत रक्कमेवर आदेश पारित तारखेपासुन प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत दरसाल, दरशेकडा 10 % व्याज देय राहील, याची नोंद घ्यावी.
- तक्रारकर्ते यांनी सदर आदेशाची प्रत शासनाकडे, विरुध्द पक्ष क्र. 1 ते 4 विरुध्द, पुढील न्यायिक कार्यवाहीसाठी सुपूर्द करावी.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
(श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri