जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्ष - श्री.डी.डी.मडके.
मा.सदस्य – श्रीमती.एस.एस.जैन.
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – 57/2012
तक्रार दाखल दिनांक – 27/03/2012
तक्रार निकाली दिनांक – 31/10/2012
(1)ताराबाई राजकुमार चौरसिया. ----- तक्रारदार
उ.वय.50 वर्ष, धंदा-काहीनाही.
(2)सौ.सरिता आशीश चौरसीया.
उ.वय.40 वर्ष, धंदा-काहीनाही
(3)आशीश रामनारायण चौरसीया.
उ.वय.सज्ञान, धंदा-व्यापार.
सर्व रा.गल्ली नं.7,एच.डी.एफ.सी.
बँकेच्या पाठीमागे,द्वारा-मधुकर लक्ष्मण वराडे.
सैफी वाडा,धुळे.ता.जि.धुळे.
विरुध्द
(1)श्री.अग्रसेन सहकारी पतसंस्था मर्यादित धुळे. ----- विरुध्दपक्ष
आग्रा रोड, धुळे.ता.जि.धुळे.
(2)मॅनेजर,धर्मराज शंकरराव बारी.
श्री.अग्रसेन सहकारी पतसंस्था मर्यादित धुळे.
आग्रा रोड,धुळे.ता.जि.धुळे.
(3)म.मुख्य प्रशासक,श्री.कंडारे सो/श्री.चौधरी सो.
श्री.अग्रसेन सहकारी पतसंस्था मर्यादित धुळे.
आग्रा रोड,धुळे.ता.जि.धुळे.
कोरम
(मा.अध्यक्ष – श्री.डी.डी.मडके)
(मा.सदस्या – श्रीमती.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.नितिन यु.लोखंडे.)
(विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 तर्फे – गैरहजर )
--------------------------------------------------------------------------
निकालपत्र
(द्वारा-मा.सदस्याः श्रीमती.एस.एस.जैन)
--------------------------------------------------------------------------
(1) मा.सदस्याःश्रीमती.एस.एस.जैन – विरुध्दपक्ष पतसंस्थेने तक्रारदारांच्या मुदत ठेवीची रक्कम न देऊन सेवेत त्रृटी केली म्हणुन तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
(2) तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, विरुध्दपक्ष क्र.1 ही नोंदणीकृत पतसंस्था असून, विरुध्दपक्ष क्र.2 हे विरुध्दपक्ष क्र.1 पतसंस्थेत मॅनेजर म्हणून कामकाज पाहतात आणि विरुध्दपक्ष क्र.3 हे विरुध्दपक्ष क्र.1 पतसंस्थेचे मुख्य प्रशासक आहेत. तक्रारदार हे विरुध्दपक्ष पतसंस्थेचे ग्राहक असून त्यांचेकडे तक्रारदारांनी मुदत ठेव स्वरुपात काही रकमा ठेवल्या आहेत. त्याचा सविस्तर तपशिल खालील तक्त्यात नमूद केल्या प्रमाणे आहे.
अ.नं. | मुदत ठेव पावती नंबर | ठेवीची रक्कम | ठेव ठेवल्याची तारीख | ठेवीची देय तारीख | व्याजासह देय रक्कम |
(1) | (2) | (3) | (4) | (5) | (6) |
1 | 2810 | 10,000 | 28-11-2003 | 28-05-2009 | 20,000 |
2 | 19247 | 5,000 | 29-09-2004 | 25-01-2011 | 10,000 |
3 | 20019 | 2,000 | 31-05-2005 | 30-09-2011 | 4,000 |
4 | 15731 | 1,000 | 07-06-2004 | 07-10-2010 | 2,000 |
5 | 030008 | 2,500 | रिन्यू तारीख 05-10-2004 | 05-02-2011 | 10,000 |
6 | 017560 | 21210 | रिन्यू तारीख 05-09-2003 | 02-03-2009 | 42,420 |
7 | 017561 | 21210 | रिन्यू तारीख 05-09-2003 | 02-03-2009 | 42,420 |
8 | 2407 | 10,000 | 05-09-2003 | 05-03-2009 | 20,000 |
9 | 2408 | 10,000 | 05-09-2003 | 05-03-2009 | 20,000 |
(3) तक्रारदारांनी उपरोक्त ठेवलेल्या ठेव रकमेची मुदतीअंती विरुध्दपक्ष यांचेकडे मागणी केली असता, रकमेची तरतुद झाल्यावर देतो असे सांगून आजतागायत रक्कम व त्यावरील व्याज अदा केले नाही. म्हणून दि.09-01-2012 रोजी अॅड श्री.एन.यु.लोखंडे यांचे मार्फत विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांना रजिष्टर्ड पोष्टाद्वारे नोटिस पाठविली. सदरील नोटीस विरुध्दपक्ष क्र.1 व 3 यांनी स्वीकारली. मात्र विरुध्दपक्ष क्र.2 यांनी नोटिस स्वीकारली नाही म्हणून पाकीट परत आले. विरुध्दपक्ष अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करीत आहेत. रक्कम वेळेत न मिळाल्याने तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रास होत आहे.
(4) तक्रारदार यांनी विरुध्दपक्ष पतसंस्थेकडून मुदत ठेवीपोटी जमा असलेली रक्कम रु.1,70,840/- अधिक त्यावर द.सा.द.शे.12 टक्के प्रमाणे व्याजासह मिळावी. मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.50,000/- तसेच तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावे अशी विनंती केली आहे.
(5) तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्टयार्थ शपथपत्र आणि मुदत ठेव पावतीच्या साक्षांकीत प्रती तसेच विरुध्दपक्ष क्र.1 व 3 यांनी नोटिस स्वीकारल्याच्या पोहोच पावत्या तसेच विरुध्दपक्ष क्र.2 यांचे परत आलेल्या पाकीटाची साक्षांकीत प्रत प्रकरणात दाखल केली आहे.
(6) विरुध्दपक्ष क्र.1 व 3 यांना या न्यायमंचाच्या नोटिसीची बजावणी झाली आहे. परंतु सदर नोटिसीचे ज्ञान होऊनही विरुध्दपक्ष ते सदर प्रकरणी नेमलेल्या सर्व तारखांना गैरहजर आहेत, तसेच त्यांनी स्वतः अथवा अधिकृत प्रतिनिधी द्वारे स्वतःची कैफीयतही दाखल केली नाही. तसेच विरुध्दपक्ष क्र.2 यांना पाठविलेली नोटिस त्यांनी न स्वीकारल्यामुळे, त्यावर रिफयुज्ड अशा पोष्टाच्या शे-यासह परत आले आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश करण्यात आला आहे.
(8) तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपत्रे पाहता तसेच त्यांच्या विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्यासमोर निष्कर्षासाठी खलील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) विरुध्दपक्ष पतसंस्थेने तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रृटी केली आहे काय ? | ः होय. |
(ब) तक्रारदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? | ः होय. |
(क) आदेश काय ? | ः अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(9) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी विरुध्दपक्ष पतसंस्थेमध्ये मुदत ठेव पावती स्वरुपात काही रक्कम ठेवल्याचे व मुदतीअंती सदर रक्कम व्याजासह मिळण्यास ते पात्र असल्याचे मुदत ठेव पावत्यांच्या छायांकीत प्रतीवरुन स्पष्ट होते. परंतु मुदतीअंती सदर रकमेची तक्रारदारांनी वारंवार मागणी करुनही रक्कम परत न करणे हे विरुध्दपक्ष यांचे कृत्य अत्यंत अन्यायकारक व बेकायदेशीर आहे असे आमचे मत आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष पतसंस्थेने तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रृटी केल्याचे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(10) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – आमच्या मते तक्रारदार हे विरुध्दपक्ष पतसंस्थेकडून त्यांच्या एकूण नऊ मुदत ठेव पावत्यांच्या रकमा व्याजासह मिळण्यास पात्र आहेत. तसेच विरुध्दपक्षाच्या अशा बेकायदेशीर वागणूकीमुळे तक्रारदारांना वेळेवर स्वतःची रक्कम न मिळाल्यामुळे निश्चितच मानसिक त्रास व पैशांची अडचण भासणे स्वाभावीक आहे, त्यासाठी तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळण्यासही तक्रारदार पात्र आहेत. तक्रारदार यांनी सदर रक्कम विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांच्याकडून मिळावी अशी विनंती केली आहे. परंतु विरुध्दपक्ष क्र.2 हे पतसंस्थेचे पगारी नोकर असून ते पतसंस्थेच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारास अथवा धेय्य धोरणास जबाबदार नसतात. त्यामुळे त्यांना तक्रारदारांची रक्कम देण्यास जबाबदार धरता येणार नाही. तसेच विरुध्दपक्ष क्र.3 प्रशासक हे शासकीय नोकर असून त्यांनाही कायदेशीर रित्या तक्रारदारांची रक्कम देण्यास जबाबदार धरता येणार नाही असे या न्यायमंचाचे मत आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र.1 पतसंस्थेने तक्रारदारांची संपूर्ण ठेव रक्कम व्याजासह परत देणे योग्य होईल असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(12) मुद्दा क्र. ‘‘क’’ – उपरोक्त सर्व विवेचनावरुन हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
(ब) विरुध्दपक्ष क्र.1 श्री.अग्रसेन सहकारी पतसंस्था धुळे यांनी तक्रारदारांना खालील तक्त्यात नमूद केलेल्या मुदत ठेवीच्या रकमा, मुदतीअंती ठरलेल्या देय व्याजदरासह ठेव दिनांकापासून ते संपूर्ण रक्कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.6 टक्के व्याजासह, या आदेशाच्या प्राप्ती पासून पुढील 30 दिवसांचे आत द्याव्यात. (मुदत ठेव पावतीचा सविस्तर तपशील खालील तक्त्या प्रमाणे)
अ.नं. | मुदत ठेव पावती नंबर | ठेवीची रक्कम | ठेव ठेवल्याची तारीख | ठेवीची देय तारीख | व्याजासह देय रक्कम |
(1) | (2) | (3) | (4) | (5) | (6) |
1 | 2810 | 10,000 | 28-11-2003 | 28-05-2009 | 20,000 |
2 | 19247 | 5,000 | 29-09-2004 | 25-01-2011 | 10,000 |
3 | 20019 | 2,000 | 31-05-2005 | 30-09-2011 | 4,000 |
4 | 15731 | 1,000 | 07-06-2004 | 07-10-2010 | 2,000 |
5 | 030008 | 2,500 | रिन्यू तारीख 05-10-2004 | 05-02-2011 | 10,000 |
6 | 017560 | 21210 | रिन्यू तारीख 05-09-2003 | 02-03-2009 | 42,420 |
7 | 017561 | 21210 | रिन्यू तारीख 05-09-2003 | 02-03-2009 | 42,420 |
8 | 2407 | 10,000 | 05-09-2003 | 05-03-2009 | 20,000 |
9 | 2408 | 10,000 | 05-09-2003 | 05-03-2009 | 20,000 |
(क) विरुध्दपक्ष क्र.1 श्री.अग्रसेन सहकारी पतसंस्था धुळे यांनी, तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम 1,000/- (अक्षरी रु.एक हजार मात्र) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी 500/- (अक्षरी रु.पाचशे मात्र) या आदेशाच्या प्राप्ती पासून पुढील 30 दिवसांचे आत द्यावेत.
(ड) उपरोक्त आदेश कलम (ब) आणि (क) मध्ये उल्लेखीलेल्या रकमेमधून, विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांना काही रक्कम किंवा व्याज रक्कम दिली असल्यास, तक्रारदारांना काही कर्ज दिले असल्यास अथवा तक्रारदारांकडून काही रक्कम नियमानुसार येणे असल्यास, अशी रक्कम नियमानुसार वजावट करुन उर्वरीत रक्कम व्याजासह तक्रारदारांना अदा करावी.
धुळे.
दिनांक – 31/10/2012.
(श्रीमती.एस.एस.जैन.) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.