(घोषित दि. 20.06.2011 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष) गैरअर्जदार फायनान्स कंपनीने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, त्याने गैरअर्जदार श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी यांचेकडून दिनांक 04.08.2004 रोजी रक्कम रुपये 1,70,000/- कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड दरमहा रुपये 8,150/- या प्रमाणे 30 हप्त्यामध्ये करण्याचे ठरले होते. त्याने गैरअर्जदाराकडे 17 हप्ते भरले होते. गैरअर्जदाराने त्यास कोणतीही सुचना न देता त्याचे वाहन चोरुन नेले. त्यामुळे त्याचे उत्पन्न बुडाले म्हणून त्याने गैरअर्जदाराकडून त्रुटीच्या सेवे बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये 8,00,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदारास मंचातर्फे पाठविलेली नोटीस मिळूनही तो गैरहजर असल्यामुळे त्याचे विरुध्द ही तक्रार एकतर्फी चालविण्यात आली. तक्रारदाराच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1.तक्रारदाराची तक्रार या मंचात चालू शकते काय ? नाही 2.गैरअर्जदार कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे काय ? मुद्दा उरत नाही 3.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 – तक्रारदाराच्या वतीने अड.पी.एम.परिहार यांनी युक्तीवाद केला. प्रस्तुत प्रकरणातील गैरअर्जदार हे मुंबई येथील असुन, तक्रारदाराने मुंबई येथूनच गैरअर्जदाराकडून वाहनासाठी कर्ज घेतलेले होते. तसेच तक्रारदार स्वत: देखील मुंबई येथील राहणारा असुन, तशा प्रकारचा उल्लेख तक्रारदाराने परीवहन कार्यालया मार्फत देण्यात आलेले माहीतीपत्रकात तसेच गुड्सकॅरेज परमीटमध्ये त्याचप्रमाणे आर.सी.बुक आणि तक्रारदाराने अड.डी.एम.माने यांच्यामार्फत पाठविलेल्या नोटीसमध्ये करण्यात आलेला असुन तसा उल्लेख तक्रारदाराने स्वत: गैरअर्जदाराकडे दिलेल्या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे. तक्रारदाराने त्याचे वाहन गैरअर्जदाराने जालना येथून चोरुन नेले म्हणून ही तक्रार दाखल करण्याचे कारण या मंचाच्या कार्यक्षेत्रात घडले. असा उल्लेख तक्रारीमध्ये केलेला आहे. परंतू तक्रारदाराचे वाहन हे गैरअर्जदाराने जालना येथून चोरुन नेलेले असताना तक्रारदाराने जालना येथील पोलीस स्टेशनमध्ये चोरीबाबतची फिर्याद का दाखल केली नाही. याचा काहीही खुलासा तक्रारदाराने केलेला नाही. तसेच तक्रारदाराने अड.डी.एम.माने यांच्यामार्फत गैरअर्जदारास पाठविलेल्या नोटीसमध्ये तसेच तक्रारदाराने दिनांक 05.08.2010 आणि 18.08.2010 रोजी दिलेल्या पत्रामध्ये त्याचे वाहन गैरअर्जदाराच्या कर्मचा-यांनी कोणत्या ठिकाणाहून चोरुन नेले किंवा जबरदस्तीने नेले याचा काहीही उल्लेख केलेला नाही. तक्रारदाराने त्यास या मंचात ही तक्रार दाखल करता यावी यासाठी त्याचे वाहन जालना येथुन चोरुन नेले असा उल्लेख तक्रारीमध्ये केला आहे. परंतू तक्रारदाराला ही तक्रार दाखल करण्याचे कारण या मंचाचे कार्यक्षेत्रात घडलेले नाही असे आमचे स्पष्ट मत असुन, तक्रारदाराने ही तक्रार मुंबई येथील ग्राहक मंचात दाखल करणे योग्य राहील. त्यामुळे गैरअर्जदाराच्या सेवेत त्रुटी आहे किंवा नाही या बाबत चर्चा करणे योग्य ठरत नाही. तक्रारदाराची तक्रार या मंचात चालू शकत नाही म्हणून मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
सौ.माधूरी विश्वरुपे डी.एस.देशमुख सदस्या अध्यक्ष
| HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe, MEMBER | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | , | |