निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय 1. तक्रारदार ही कंपनी कायद्याखाली नोंदविलेली कंपनी असून सा.वाले हे गृहोपयोगी वस्तुचे विक्री करणारी कंपनी असून त्यांच्या वेगवेगळया शाखा आहेत. 2. तक्रारदारांचे तक्रारीतील कथनाप्रमाणे दिनांक 4 फेब्रृवारी, 2008 रोजी तक्रारदारांचे प्रतिनिधी श्रीमती प्रिनी डॅनियल यांनी सा.वाले यांचेकडून 6 पुस्तके खरेदी केली. परंतु त्यापैकी एका पुस्तकाच्या दोन प्रती तक्रारदारांचे प्रतिनिधींनी सा.वाले यांना परत केल्या ज्याची किंमत एकूण रु.10,791/- अशी होती. सा.वाले यांचे प्रतिनिधींनी पुढील खरेदीचे व्यवहारामध्ये तेवढी रक्कम कमी करण्यात येईल असे बिलावर लिहून दिले. 3. तक्रारदार यांच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे सा.वाले यांनी दिनांक 15 मे, 2008 रोजी ई-मेलव्दारे असे कळविले की, बिलाच्या रक्कमेची खरेदी तक्रारदारांचे प्रतिनिधींनी केली असून कुठलीही रक्कम देय नाही. त्याबद्दल तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे पुरावा मागीतला असता सा.वाले त्या बाकी रक्कमेच्या व्यवहाराचा तपशिल देवू शकले नाहीत. यावरुन सा.वाले यांचेकडून तक्रारदारांना पुस्तक परतीची किंमत रु.10,791/- येणे बाकी आहे असा तक्रारदारांचा आरोप आहे. याबद्दल तक्रारदारांनी सा.वाले यांना 6 ऑक्टोबर, 2008 रोजी पत्र देवून तपशिल मागीतला तथापी सा.वाले तपशिल पुरवू शकले नाहीत. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांनी सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा आरोप करुन प्रस्तुतची तक्रार दाखल केली व नुकसान भरपाईची मागणी केली. 4. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली व त्यात असे कथन केले की, तक्रारदार व सा.वाले यांचे दरम्यान कुठेलाही व्यवहार झाला नव्हता. श्रीमती प्रिनी डॅनीयल हया पुस्तक सदस्य योजनेच्या सदस्य असून त्यांनी 4 फेब्रृवारी, 2008 रोजी सा.वाले यांचेकडून रु.19,831.50 येवढया रक्कमेची खरेदी केली व त्या खरेदीबद्दल रु.10,000/- नकदी व बाकीची रक्कम क्रेडीट कार्डावरुन श्रीमती प्रिनी यांनी अदा केली. त्यानंतर 15 फेब्रृवारी 2008 रोजी प्रिनी डॅनीयल यांनी रु.10,791/- किंमतीची दोन पुस्तके परत केली. व त्याबद्दल सा.वाले यांच्या रोखापालाने ती रक्कम भविष्यात जमा धरण्यात येईल असे लिहून दिले. तथापी श्रीमती प्रिनी डॅनीयल यांनी 7 मार्च, 2008 रोजी पावती क्र.8080 प्रमाणे रु.10,804/- येवढया रक्कमेची खरेदी केली व फरकाची रक्कम रु.13 नकदी अदा केली. या प्रमाणे सा.वाले यांनी असे कथन केले की, श्रीमती प्रिनी डॅनीयल यांनी 7 मार्च, 2008 रोजी देय रक्कमेच्या किंमती येवढी खरेदी केल्याने व देय रक्कम त्यात जमा धरल्याने सा.वाले तक्रारदारांना कुठलीही रक्कम देण्यास जबाबदार नाहीत. 5. तक्रारदारांनी त्यानंतर प्रतिउत्तराचे शपथपत्र दाखल केले व दोन्ही बाजुंनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारदारांचे वतीने त्यांचे व्यवस्थापक श्रीमती कविता बसू यांनी शपथपत्र दाखल केले. तर सा.वाले यांचे वतीने त्यांचे व्यवस्थापक श्री.प्रशांत मेहता यांनी आपले पुरावे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी पुराव्याचे कागदपत्र दाखल केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीचे कामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना पुस्तक परतीचे किंमतीपोटी रु.10,791/- अदा करण्यास नकार देवून सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. | 2 | तक्रारदार हे सा.वाले यांचेकडून मुळ रक्कम व नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र आहेत काय ? | नाही | 3. | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा 6. सा.वाले यांनी आपल्या कैफीयेतीमध्ये असे स्पष्टपणे कथन केले आहे की, पुस्तक खरेदी संबंधीचा व्यवहार हा श्रीमती प्रिनी डॅनीयल यांचे सोबत झाला होता व तक्रारदार कंपनीचा त्या व्यवहाराशी काही संबंध नव्हता. वरील प्रकारचे सा.वाले यांचे कथनाचे खंडण करणेकामी तक्रारदारांनी त्यांचे प्रतिउत्तराचे शपथपत्रासोबत दिनांक 4 फेब्रृवारी, 2008 रोजीच्या कंपनीच्या देय रक्कमांच्या पावतीची प्रत हजर केलेली आहे. त्यातील नोंदीवरुन असे दिसते की, रु.19,832/- पुस्तकाबद्दल कर्मचा-यास देण्यात आले होते. तथापी त्या नोंदीमध्ये श्रीमती प्रिनी डॅनीयल यांचा उल्लेख नाही. त्याच पावतीवर रक्कम रु.67/- श्रीमती प्रिनी डॅनीयल यांना वाहतुक खर्चाबद्दल अदा केल्याची नोंद आहे. परंतु ती नोंद पुस्तकांचा व्यवहार रु.19,832/-याबद्दल नाही. यावरुन श्रीमती प्रिनी डॅनीयल यांनी तक्रारदार कंपनीचे प्रतिनिधी म्हणून सा.वाले कंपनीकडून रु.19,832/- येवढया किंमतीची पुस्तके खरेदी केली होती ही बाब तक्रारदार सिध्द करु शकले नाहीत असा निष्कर्ष काढावा लागतो. 7. सा.वाले यांनी त्यांचे लेखी युक्तीवादासोबत पावती क्रमांक 9652 दिनांक 4.2.2008 रक्कम रु.19,832/- ही सा.वाले यांनी दिलेल्या पावतीची प्रत हजर केली आहे. त्यामध्ये श्रीमती प्रिनी डॅनीयल यांचा उल्लेख आहे. तसेच त्या पावती व्यतिरिक्त श्रीमती प्रिनी डॅनीयल हया तक्रारदार कंपनीचे सेवेमध्ये होत्या या बद्दलच्या प्रमाणपत्राची प्रत हजर केलेली आहे. श्रीमती प्रिनी डॅनीयल हया तक्रारदारांच्या कर्मचारी किंवा प्रतिनिधी होत्या ही बाब जरी मान्य केली तरी देखील दिनांक 4.2.2008 रोजीचा पुस्तक खरेदीचा व्यवहार श्रीमती प्रिनी डॅनीयल यांनी सा.वाले यांचे प्रतिनिधी म्हणून केला ही बाब सिध्द होत नाही. याउलट पावती क्रमांक 9652 यामध्ये असा उल्लेख आहे की, श्रीमती प्रिनी डॅनीयल यांनी रु.10,000/- रोखीने तर बाकीची रक्कम क्रेडीटकार्डाव्दारे अदा केली. श्रीमती प्रिनी डॅनीयल यांनी पुस्तक खरेदीचा व्यवहार तक्रारदार कंपनीचे प्रतिनिधी म्हणून केला असता तर निच्शितच त्यांनी आपल्या क्रेडीट कार्डाचा वापर पुस्तक खरेदीकामी केला नसता. यावरुन श्रीमती प्रिनी डॅनीयल यांनी 4 फेब्रृवारी, 2008 रोजी केलेली पुस्तक खरेदी ही तक्रारदार संस्थेकरीता होती ही बाब तक्रारदार सिध्द करु शकले नाहीत असा निष्कर्ष काढावा लागतो. 8. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये तसेच लेखी युक्तीवादामध्ये असे कथन केले आहे की, सा.वाले यांनी त्यांचे कैफीयतीमध्ये श्रीमती प्रिनी डॅनीयल यांनी रु.10,791/- येवढया किंमतीची दोन पुस्तके परत केली ही बाब मान्य केली आहे. परंतु ती रक्कम कुठल्या व्यवहारामध्ये जमा केली याचा तपशिल सा.वाले हे देवू शकले नसल्याने ती रक्कम सा.वाले यांचेकडून अद्याप वसुल होणे आहे असा निष्कर्ष काढावा लागतो. थोडक्यात सा.वाले यांनी जमा रक्कमेच्या व्यवहाराबद्दलची पावती हजर केलेली नसल्याने ती रक्कम अद्यापही सा.वाले यांचेकडून वसूल होणे बाकी आहे असा निष्कर्ष नोंदवावा असा तक्रारदारांचा युक्तीवाद आहे. तथापी सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीचे परिच्छेद क्र.9 मध्ये असे स्पष्टपणे कथन केले आहे की, दिनांक 7 मार्च, 2008 रोजी श्रीमती प्रिनी डॅनीयल यांनी रु.10,804/- येवढया रक्कमेची पावती क्र.8080 व्दारे खरेदी केली व त्या व्यवहारात पुस्तक परतीची रक्कम रु.10,791/- वळती करण्यात आली व ज्यादा रक्कम रु.13/- श्रीमती प्रिनी डॅनीयल यांनी अदा केली. सा.वाले यांनी या स्वरुपाचे स्पष्ट कथन आपल्या कैफीयतीमध्ये तसेच पुराव्याचे शपथपत्रामध्ये केल्यानंतर दिनांक 7 मार्च, 2008 रोजी या स्वरुपाचा कुठलाही व्यवहार झाला नाही या मजकुराचे श्रीमती प्रिनी डॅनीयल यांचे शपथपत्र तक्रारदार हजर करु शकले असते. परंतु तक्रारदारांनी श्रीमती प्रिनी डॅनीयल यांचे शपथपत्र हजर केले नाही. वस्तुतः श्रीमती प्रिनी डॅनीयल हयाच या संपूर्ण व्यवहाराचे केंद्रस्थानी असल्याने शपथपत्राव्दारे श्रीमती प्रिनी डॅनीयल यांचे कथन या सर्व व्यवहारावर प्रकाश टाकू शकले असते. तथापी तक्रारदार त्यांचे शपथपत्र दाखल करु शकले नाहीत. 9. उपलब्ध पुराव्यावरुन असे दिसते की, तक्रारदार व श्रीमती प्रिनी डॅनीयल यांचे दरम्यान पुस्तक परतीच्या रक्कमेबद्दल वाद असल्याने तक्रारदार ती रक्कम सा.वाले यांचेकडून वसुल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तथापी श्रीमती प्रिनी डॅनीयल यांनी केलेली खरेदी ही तक्रारदार कंपनीकरीता होती ही बाब तक्रारदार सिध्द करु शकले नाहीत. तसेच पुस्तक परतीचे किंमतीपोटी सा.वाले यांनी तक्रारदारांना रु.10,791/- ही रक्कम अदा केली नाही ही बाब देखील तक्रारदार सिध्द करु शकले नाहीत. याबद्दलचे सा.वाले यांची कैफीयतीचे परिच्छेद क्र.9 मधील 7 मार्च, 2008 रोजीच्या व्यवहाराबाबतची कथने स्पष्ट असल्याने त्या विरोधातील कथन सिध्द करण्याची जबाबदारी तक्रारदारांची होती. जी जबाबदारी तक्रारदार यशस्वीरीतीने पार पाडू शकले नाहीत. सबब सा.वाले यांनी तक्रारदारांना शिल्लक रक्कम अदा केली नाही व सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करु शकले नाहीत. 10. वरील निष्कर्षानुरुप पुढील आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 49/2009 रद्द करण्यात येते. 2. खर्चाबाबत काही आदेश नाही. 3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MR. MR.V.G.JOSHI] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |