::: नि का ल प ञ ::: (मंचाचे निर्णयान्वये, अधि.वर्षा जामदार,मा.सदस्या) (पारीत दिनांक : 06.02.2012) 1. अर्जदाराने, प्रस्तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 व 14 अन्वये दाखल केलेली आहे. गै.अ. क्रं. 1 हे होंडा कंपनीचे अधिकृत विक्रते असुन अर्जदाराने दि.21/12/2009 रोजी त्यांचे कडून रु.49,327/- रक्कम देवून ‘शाईन’ नावाची होंडा कंपनीची दुचाकी गाडी विकत घेतली. गै.अ.च्या वाहन पुस्तिकेत नमुद असलेल्या शर्ती व अटी नुसार होंडा कंपनीच्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही सर्व्हीसिंग सेंटर मध्ये सर्व्हीसिंग करावी असे असल्यामुळे अर्जदाराने दि.16/01/2010 रोजी वर्धा येथील हरिसन्स मोटर्स गै.अ.क्रं. 2 येथे पहिली सर्व्हीसिंग केली. त्यावेळी अर्जदाराने इंजिन ब्लॉक मधून ऑईल गळती होते अशी तक्रार केली होती. गै.अ.क्रं.2 ने सर्व्हीसिंग व्दारे तेल गळती बंद होवून जाईल अशी ग्वाही अर्जदाराला दिली. परंतु त्या नंतर ही ऑईल गळती बंद झाली नाही. त्यानंतर दुसरी फ्रि सर्व्हीसिंग दि.19/03/2010 रोजी, दि.17/05/2010 रोजी तिसरी आणि दि.19/07/2010 रोजी चौथी मोफत सर्व्हीसिंग अर्जदाराने केली. प्रत्येक सर्व्हीसिंगच्या वेळी अर्जदाराने गाडीतील इंजिन ब्लॉक मधील तेल गळती न थांबल्या बद्दल तक्रार केली, व गै.अ.क्रं. 2 ने वाहनातील बिघाड दुरुस्त होवून जाईल अशी ग्वाही दिली. अर्जदाराने दि.22/03/2011 रोजी पैसे देऊन सर्व्हीसिंग गै.अ.क्रं. 1 कडून करवीली. परंतु त्यानंतरही अर्जदाराच्या वाहनातील इंजिन ब्लॉक मधील तेल गळती न थांबल्यामुळे दि.25/04/2011 रोजी नोटीस पाठवून वाहनातील इंजिन ब्लॉक मध्ये होणा-या तेल गळतीचा बिघाड दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी केली. गै.अ.क्रं. 1 यांना नोटीस प्राप्त झाला, परंतु गै.अ.क्रं. 1 ने नोटीसचे उत्तर दिले नाही. त्यामुळे अर्जदाराने सदर तक्रार दाखल करुन अर्जदाराच्या वाहनातील इंजिन ब्लॉक मधील तेल गळतीचा दोष दुरुस्त करुन दयावा, व अर्जदाराला झालेल्या मानसिक, शारीरिक ञासापोटी रु.10,000/- आणि तक्रारीच्या खर्च रु.5,000/- दयावा असा आदेश गै.अ. विरुध्द व्हावा अशी मागणी केलेली आहे. अर्जदाराने आपल्या तक्रारी सोबत नि. 5 नुसार 9 दस्ताऐवज दाखल केलेले आहे. 2. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांविरुघ्द नोटीस काढण्यात आले.
3. गै.अ. क्रं. 1 ने नि. 10 वर आपले लेखीउत्तर दाखल करुन अर्जदाराच्या तक्रारीतील सर्व कथन अमान्य केले आहे. गै.अ. क्रं. 1 चे म्हणणे नुसार अर्जदाराने होंडा शाईन हे वाहन गै.अ. क्रं. 1 कडून खरेदी केल्यानंतर दि.21/03/2011 रोजी पैसे देऊन सर्व्हीसिंग करिता गै.अ. क्रं.1 कडे आणले, त्यावेळी अर्जदाराने इंजिन ब्लॉक मधील तेल गळती होत असल्याबाबतची तक्रार केली. त्यानुसार गै.अ. क्रं.1 च्या कर्मचा-यांनी वाहनातील तक्रारीबाबत Job Card बनवून दिला. तसेच अर्जदाराला इंजिन ब्लॉक मधील तेल गळती विनामोबदला दुरुस्ती करायची असेल तर, सर्व्हीस बुक (ग्राहक पुस्तिका) व गै.अ. क्रं. 2 कडे केलेल्या सर्व्हीसिंगचे दस्ताऐवज आणावयास सांगितले, त्यावरुन गाडीचे वारंटीचे काम करता येईल. अर्जदाराने सर्व दस्ताऐवज पुरवितो असे आश्वासन देवून पैसे देऊन सर्व्हीसिंग करुन दि.22/03/2011 रोजी गै.अ. क्रं.1 कडून गाडी घेवून निघून गेला व परत आला नाही. अर्जदाराने ग्राहक पुस्तिकेत वारंटी पॉलिसीचे शर्ती व अटीचे पालन केले नाही. अर्जदाराने दाखल केलेल्या दस्ताऐवजा वरुन स्पष्ट होते की, दि.19/07/2010 रोजी गै.अ. क्रं.2 कडून चौथी सर्व्हीसिंग केल्यानंतर दि.21/03/2011 पर्यंत म्हणजेच 8 महिने ग्राहक पुस्तिकेत दिल्याप्रमाणे कोणतीही सर्व्हीसिंग केली नाही. यावरुन अर्जदाराने वारंटी पॉलिसीच्या अटीमधील पहिल्या अटींचे उल्लंघन केले आहे. वारंटी पॉलिसीची पहिली अट खालील प्रमाणे आहे. ‘’इसके पश्चात यह वारंटी इन पर लागु नही होती. (1) कोई भी होन्डा शाईन जिस पर सभी मुफ्त देय सर्व्हीसेस ग्राहक पुस्तिका मे दिये गये श्येडयुल के अनुसार नही की गई हो’’ 3. अर्जदाराने गै.अ. क्रं.2 कडे केलेल्या चार सर्व्हीसिंग मध्ये या प्रकरणात उपस्थित केलेल्या तथाकथीत इंजिन ब्लॉक मध्ये तेल गळती बाबत गै.अ. क्रं. 2 कडे कधीही तक्रार केलेली नाही. अर्जदाराने गै.अ. क्रं. 1 कडून वाहन खरेदी केल्यापासुन तर, गै.अ. क्रं. 2 कडे नियमाप्रमाणे केलेल्या सर्व्हीसिंग पर्यंत वाहनात इंजिन ऑईल बाबत कोणतीही तांञिक अडचण नव्हती. सदर वाहनाबाबतची तथाकथीत तक्रार ही वाहनाची नियमानुसार दक्षता न घेता अयोग्य वापरामुळे उपस्थित झाली ही बाब स्पष्ट आहे. अर्जदाराच्या निष्काळजीपणामुळे वाहनाला झालेल्या इजेचा भुर्दंड भरण्यास गै.अ. जबाबदार नाही. त्यामुळे अर्जदार हा वारंटी पॉलिसी मध्ये बसत नसल्यामुळे गै.अ. कडून वाहनाची कोणत्याही प्रकारची विना मोबदला दुरुस्ती करुन घेण्यास व कोणत्याही प्रकारची मागणी करण्यास पाञ नाही. त्यामुळे गै.अ.विरुध्द बेकायदेशीर व खोटी तक्रार दाखल केली असुन खर्चासह खारीज करावी अशी मागणी गै.अ. क्रं. 1 ने केली.
4. गै.अ. क्रं. 2 ने आपले लेखीउत्तर नि. 11 नुसार दाखल केले असुन अर्जदाराचे सर्व कथन अमान्य केले आहे. गै.अ. क्रं.2 चे म्हणणे नुसार अर्जदाराने यांच्याकडे केलेल्या चार ही मोफत सर्व्हीसिंग मध्ये इंजिन ब्लॉक मधून तेल गळती बाबत तक्रार केली नाही. चार ही सर्व्हीसिंग दरम्यान अर्जदाराचे वाहन योग्य व सुस्थितीत होते व त्यात कोणतीही तांञिक अथवा इतर प्रकारची अडचण नव्हती. अर्जदाराला स्वतःच्या चुकीचे खापर गै.अ.वर फोडण्याचा अधिकार नाही. आणि अर्जदाराच्या निष्काळजीपणामुळे वाहनाला झालेल्या इजेचा भुर्दंड भरण्यास गै.अ. जबाबदार नाही. गै.अ. क्रं.2 ने सदर तक्रार खोटी असुन खर्चासहीत खारीज करण्यात यावी अशी मागणी केली आहे. 5. अर्जदाराने नि. 16 वर शपथपञ दाखल केले व गै.अ. क्रं.1 ने नि.18 वर आपले शपथपञ दाखल केले. गै.अ. क्रं.2 ने नि.19 वर लेखीउत्तर हेच रिजॉइंडर समजण्यात यावे अशी पुरसीस दाखल केली. अर्जदार व गै.अ. च्या वकीलांनी केलेल्या तोंडी युक्तीवाद व दाखल दस्ताऐवजा वरुन खालील कारणे व निष्कर्ष काढण्यात येत आहे. // कारणे व निष्कर्ष // 6. अर्जदार तक्रारकर्त्याने दि.21/12/009 रोजी गै.अ. क्रं. 1 कडून रु.49,327/- देऊन होंडा कंपनीचे ‘’शाईन’’ हे दुचाकी वाहन खरेदी केले. त्यानंतर होंडा कंपनीच्या हरिसन्स मोटर्स वर्धा येथे 16/10/2010, 19/03/2010, 17/05/2010 व 19/07/2010 चार मोफत सर्व्हीसिंग केल्या. अर्जदाराचे म्हणणे आहे की, मोफत सर्व्हीसिंगच्या वेळी गाडीमध्ये इंजिन ब्लॉक मधून ऑईल गळती होते असे सांगण्यात आले होते. अर्जदाराने निशानी 5 अ- 4 ते अ- 7 हे दस्तऐवज दाखल केले आहे. त्या सर्व Job Cards वर सर्व्हीसिंगला देते वेळी असणारे समस्येबाबत नमुद करण्यात आले आहे. परंतु त्यामध्ये कुठेही इंजिन ब्लॉक मधुन गळती बद्दल कुठेही नमुद केलेले नाही. सर्व Job Cards वर अर्जदाराची सही आहे. त्यामुळे पहिल्या मोफत सर्व्हीसिंग पासुनच इंजिन ब्लॉक मध्ये ऑईल गळती होती, व अर्जदाराने गै.अ. क्रं. 2 ला सांगितली होती. त्याबद्दल काहीही पुरावा नाही. उलटपक्षी अर्जदाराच्या स्वतःच्या दस्तऐवजा वरुन हे दिसते की, अर्जदाराने आपले म्हणणे कुठेही नोंदविलेले नाही. त्यामुळे फक्त तक्रारीत असे म्हणणे की मी ऑईल गळती बाबत सांगितले होते हे ग्राहय धरण्याजोगे नाही. अर्जदाराने नि. 5, अ- 7 प्रमाणे दि. 19/07/2010 रोजी चौथी सर्व्हीसिंग केली. त्यानंतर 21/03/2011 रोजी सर्व्हीसिंग केली. गै.अ. क्रं. 1 च्या वारंटी पॉलिसीच्या अटीनुसार त्यांनी दिलेल्या पुस्तिकेतील शेडयुलनुसार सर्व्हीसिंग करणे आवश्यक आहे. अर्जदाराच्या गाडीची सर्व्हीसिंग 19/07/2010 ते 22/03/2011 पर्यंत मधल्या काळात 3 वेळा होणे गरजेचे होते. परंतु अर्जदाराने हया सर्व Paid सर्व्हीस सोडून (Skip) दिल्या, व एकदम दि.22/03/2011 ला सर्व्हीसिंग केली. ही बाब अर्जदाराने कुठेही नाकारली नाही. म्हणजे अर्जदाराने गाडीच्या वारंटी साठी असलेल्या सर्व्हीसिंगच्या अटीचे उल्लंघन केले आहे.
7. अर्जदाराने आपल्या शपथपञात म्हटले की, दि.22/03/2011 रोजी गै.अ. क्रं.1 ने इंजिन ब्लॉक ला छिद्र असल्याचे सांगितले. त्यामुळे हा उत्पादन दोष आहे. परंतु नि. 5, अ- 8, व नि. 13 – ब – 2 वर कुठेही हा दोष असल्याचे नमुद नाही. उलट निशानी 13 ब- 2 मध्ये अर्जदाराने काम पुर्ण झाल्याचे मान्य करुन गाडीची डिलेव्हरी घेतली असुन सही केली आहे. त्या व्यतिरीक्त अर्जदाराने उत्पादन दोष असल्याबाबतचा तज्ञांचा पुरावा सादर केला नाही. त्यामुळे उत्पादन दोष आहे हेच सिध्द होत नाही. 8. त्यामुळे अर्जदाराच्या मागणी प्रमाणे इंजिन ऑईलचा दोष दुरुस्त करुन द्यावा व मानसीक व शारीरिक ञासापोटी रु.10,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.5,000/- देण्याचा आदेश व्हावा हे मान्य करण्यास अर्जदार पाञ नाही, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले असुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश // (1) अर्जदाराची तक्रार खारीज. (2) दोन्ही पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा. (3) सर्व पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी. चंद्रपूर, दिनांक : 06/02/2012. |