जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 567/2009. तक्रार दाखल दिनांक : 25/10/2010. तक्रार आदेश दिनांक :25/02/2011. 1. कु. मयूर शाम जगताप, वय 16 वर्षे, व्यवसाय : शिक्षण, रा. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. 2. कु. प्रतिक्षा शाम जगताप, वय 12 वर्षे, व्यवसाय : शिक्षण, रा. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. (तक्रारदार क्र.1 व 2 अज्ञान असून अ.पा.क. तक्रारदार क्र.3 आई श्रीमती संगिता शामराव जगताप) 3. श्रीमती संगिता शामराव जगताप, वय 37 वर्षे, व्यवसाय : घरकाम, रा. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. 2. चेअरमन, शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. 3. मॅनेजर, शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. 4. सेक्रेटरी, शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : श्री. आर.एफ. सोनिमिंडे विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : श्री. एस.एन. कदम आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार क्र.1 व 2 यांचे वडील व तक्रारदार क्र.3 यांचे पती शाम पांडुरंग जगताप यांनी दि.22/3/2003 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेमध्ये रु.49,000/- दामदुप्पट ठेव पावती क्र.002067 अन्वये गुंतवणूक केले असून पावतीची मुदत दि.23/10/2007 रोजी संपली आहे. शाम पांडुरंग जगताप हे दि.12/5/2003 रोजी मृत्यू पावले असून तक्रारदार त्यांचे वारस आहेत. तसेच तक्रारदार क्र.3 यांचे नांवे विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेमध्ये दि.22/3/2003 रोजी रु.49,000/- पावती क्र.002068 अन्वये दामदुप्पट ठेवीद्वारे गुंतवणूक करण्यात आले असून सदर पावतीची मुदत दि.24/10/2007 रोजी संपली आहे. तक्रारदार यांनी मुदत पूर्ण झाल्यानंतर दोन्ही ठेव पावतींची रक्कम मागणी केली असता रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यांनी अभियोक्त्यांमार्फत नोटीस पाठवूनही ठेव रक्कम परत न केल्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करुन दामदुप्पट ठेव रक्कम व त्यावरील व्याज, नोटीस खर्च, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई, तक्रार खर्च असे एकूण रु.2,74,478/- व्याजासह मिळावी, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार शाम उर्फ शामराव पांडुरंग जगताप हे त्यांचे सभासद होते आणि त्यांना दि.29/1/2002 रोजी रु.90,000/- कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे. शाम उर्फ शामराव यांनी स्वत:चे व पत्नी संगिता यांचे नांवे प्रत्येकी रु.49,000/- दि.22/3/2003 रोजी दामदुप्पट ठेव पावतीद्वारे गुंतवणूक केले आहेत. त्यावेळी त्यांनी कर्जासाठी व त्यांनी स्वीकालेल्या जबाबदारीसाठी सदरची ठेव ठेवलेली होती. कर्ज परतफेडीसाठी ठेव रक्कम मिळविण्याचा त्यांना अग्रहक्क आहे. मयत शाम उर्फ शामराव यांनी कर्जाची परतफेड केलेली नसल्यामुळे त्यांच्या विरुध्द सहकार न्यायालय, सोलापूर येथे सह. केस नं. 1498/06 दाखल असून ती प्रलंबीत आहे. तसेच श्री.लक्ष्मण सूर्यकांत पवार व श्री. दादा त्रिंबक यादव यांच्या कर्जासही मयत शाम उर्फ शामराव यांनी जामीन राहून कर्ज परतफेडीची जबाबदारी स्वीकारलेली आहे. श्री.लक्ष्मण सूर्यकांत पवार व श्री. दादा त्रिंबक यादव यांनी कर्जाची परतफेड केलेली नसल्यामुळे त्यांच्या विरुध्दही सह. केस नं.1499/06 व 1500/06 चालू आहे. मयत शाम उर्फ शामराव यांनी घेतलेल्या कर्जाची व जबाबदारीची संपूर्ण रक्कम भरल्याशिवाय तक्रारीत नमूद रकमेची मागणी तक्रारदार यांना करता येणार नाही. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह नामंजूर करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच तक्रारदार यांच्या अभियोक्त्यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार ठेव रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्था मर्या., कुर्डुवाडी या पतसंस्थेमध्ये शाम पांडुरंग जगताप व तक्रारदार क्र.3 सौ. सांगिता शाम जगताप यांचे नांवे अनुक्रमे रु.49,000/- दि.22/2/2003 रोजी दामदुप्पट ठेव पावतीद्वारे गुंतवणूक केल्याविषयी विवाद नाही. प्रामुख्याने, ठेवीची मुदत पूर्ण झाल्यानंतर वारंवार मागणी करुनही ठेव रक्कम परत करण्यात आली नसल्याची तक्रारदार यांची तक्रार आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांच्या म्हणण्यानुसार मयत शाम पांडुरंग जगताप यांनी रु.90,000/- कर्ज घेतले असून ते थकीत आहे आणि श्री.लक्ष्मण सूर्यकांत पवार व श्री. दादा त्रिंबक यादव यांच्या कर्जासही मयत शाम उर्फ शामराव यांनी जामीन राहून कर्ज परतफेडीची जबाबदारी स्वीकारलेली असून ते कर्जही थकीत आहे. मयत शाम उर्फ शामराव यांनी घेतलेल्या कर्जाची व जबाबदारीची संपूर्ण रक्कम भरल्याशिवाय तक्रारीत नमूद रकमेची मागणी तक्रारदार यांना करता येणार नाही, असे त्यांनी नमूद केले आहे. 5. तक्रारदार यांना दामदुप्पट ठेव रक्कम परत केली नसल्याबद्दल विवाद नाही. तक्रारदार यांचे अभियोक्त्यांनी युक्तिवादामध्ये मयत शाम यांना दि.29/1/2002 रोजी कर्ज दिलेले असल्यामुळे त्या कर्जासाठी दि.22/3/2003 रोजी ठेव तारण म्हणून ठेवणे अशक्य असल्याचे व ठेव तक्रारदार यांच्याच ताब्यात असून त्यावर तारण नोंद नसल्याचे नमूद केले आहे. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर मयत शाम जगताप यांच्यासह श्री.लक्ष्मण सूर्यकांत पवार व श्री. दादा त्रिंबक यादव यांचे कर्जविषयक कर्ज मागणी अर्ज, कर्ज रोखा, वचनचिठ्ठी इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. मयत शाम जगताप यांनी स्वत: कर्ज घेताना, तसेच श्री.लक्ष्मण सूर्यकांत पवार व श्री. दादा त्रिंबक यादव यांच्या कर्जविषयक कर्ज मागणी अर्ज, कर्ज रोखा, वचन चिठ्ठी, इ. कागदपत्रांवर जामीनदार या नात्याने स्वाक्ष-या केल्याचे निदर्शनास येते. 6. वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन मयत शाम जगताप यांनी व तक्रारदार क्र.3 यांनी गुंतवणूक केलेली दामदुप्पट ठेव पावती परिपक्व झालेली आहे आणि त्यांची रक्कम तक्रारदार यांना अदा केली नसल्याचे स्पष्ट आहे. तसेच मयत शाम जगताप यांनी स्वत: कर्ज घेताना व श्री.लक्ष्मण सूर्यकांत पवार व श्री. दादा त्रिंबक यादव यांच्या कर्जास दामदुप्पट ठेव पावत्या विरुध्द पक्ष यांच्याकडे तारण म्हणून ठेवल्या नसल्याचे निदर्शनास येते. निर्विवादपणे, ठेव पावती क्र.002068 ही तक्रारदार क्र.3 यांचे नांवे असून ती ठेव पावती तारण नाही किंवा तक्रारदार क्र.3 या स्वत: कोणत्याही कर्जास जामीनदार नाहीत किंवा त्या स्वत: कर्जदार नाहीत. ठेव पावती क्र.002067 मयत शामराव पांडुरंग जगताप यांचे नांवे असली तरी त्यांनी कर्ज घेतल्यानंतर ठेवीमध्ये रक्कम गुंतवणूक केलेली असल्यामुळे निश्चितच ती कर्जासाठी तारण होऊ शकत नाही. तसेच त्यांच्या कर्जासह श्री.लक्ष्मण सूर्यकांत पवार व श्री. दादा त्रिंबक यादव यांच्या कर्जास पावती तारण ठेवल्याचे सिध्द होऊ शकलेले नाही. अशा परिस्थितीमध्ये तक्रारदार यांच्या ठेव पावत्यांवर 'बँकर्स लीन' लागू होत नाही, या मतास आम्ही आलो आहोत. 7. अशाच एका प्रकरणामध्ये मा.राष्ट्रीय आयोगाने 'आय.एन.जी. व्याज बँक लि. /विरुध्द/ वाय.जी. श्रीराम शेट्टी', 1986-2006 कंझ्युमर 11382 (एन.एस.) निवाडयामध्ये असे नमूद केले आहे की, Para.1 : The question requiring consideration in this revision is 'Whether a Banker in exercise of its lien under Section 171 of the Contract Act, straightway appropriate the money deposited by a gurantor in FDR without any bailment and without informing the gurantor' ? Obvious answer is - 'No'. Para.9 : Therefore, it is apparent that in a case of bailment of goods, the banker can retain as a security for general balance of account any goods bailed to them. However, this would not mean that bank can straightway appropriate the amount due and payable under the FDRs for a general balance of account. In any case, no such power can be exercised with regard to guarantors of FDR without calling upon the principal debtor to repay the loan amount and also the guarantor to repay in case loan is not paid by the principal debtor. Para. 14 : Learned Counsel for the Bank submitted that 'general lien of the banker' is to the effect that the bank can retain a security for general balance of accounts on any goods bailed to them. Section 171 specifically provides that in the absence of a contract to the contrary, the bank can retain as a security for general balance of accounts any goods bailed to them. Para. 15 : In our view, this submission is without any substance. The Complainant 'has not bailed any goods' to the bank. The FDRs were also not pledged with the Bank against the loan taken by M/s. Gautam Enterprises. The amount was deposited with the bank after more that one year of the loan given to M/s. Gautam Enterprises. The wording of the section are clear to the effect that the bankers would have general lien only on any goods bailed to them. If goods are not bailed, Bank cannot go and take away any goods, wherever they are lying into their custody and contend that they have lien over the same. 8. मा.राष्ट्रीय आयोगाने विषद केलेले न्यायिक तत्व आणि तक्रारीची वस्तुस्थिती पाहता, मयत शाम जगताप यांच्या कर्जाकरिता तक्रारदार क्र.1 यांचे नांवे असलेली व मयत शाम जगताप यांचे नांवे असलेली दामदुप्पट ठेव पावती तारण म्हणून ठेवली नसल्याचे सिध्द होते. अशा परिस्थितीत, आमच्या मते, मयत शाम जगताप यांच्या कर्जाची वसुली करण्यासाठी इतर योग्य व उचित कायदेशीर मार्ग विरुध्द पक्ष यांना उपलब्ध आहेत आणि त्या मार्गाचा अवलंब करुन कर्ज वसुली करण्यास त्यांना स्वातंत्र्य आहे. तक्रारदार क्र.3 यांचे व मयत शाम जगताप यांचे नांवे असलेली दामदुप्पट ठेव पावती तारण नसल्यामुळे व त्यावर बॅकर्स लीन येत नसल्यामुळे विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांची ठेव रक्कम रोखून धरुन निश्चितच सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे, या मतास आम्ही आलो आहोत. 9. मयत शाम जगताप यांनी कर्ज घेतल्याचे व त्यांचे कर्ज भरण्यास तयार असल्याचे तक्रारदार यांच्या अभियोक्त्यांनी युक्तिवादामध्ये नमूद केले. निर्विवादपणे, वित्तीय संस्थेच्या कर्जाची परतफेड करणे कर्जदाराचे कर्तव्य व जबाबदारी आहे. 10. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या पावती क्र.002067 ची दामदुप्पट रक्कम रु.98,000/- दि.23/10/2007 रोजी पासून रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने तक्रारदार यांना द्यावी. 2. विरुध्द पक्ष यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या पावती क्र.002068 ची दामदुप्पट रक्कम रु.98,000/- दि.24/10/2007 रोजी पासून रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने तक्रारदार यांना द्यावी. 3. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- द्यावेत. 4. विरुध्द पक्ष यांनी वरील संपूर्ण आदेशाची अंमलबजावणी या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत करावी. (सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/11211)
| [HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |