द्वारा :-मा. अध्यक्षा, श्रीमती. प्रणाली सावंत // निकालपत्र // (1) प्रस्तूत प्रकरणातील जाबदार पतसंस्थेने आपण गुंतविलेली रक्कम परत दिली नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, (2) तक्रारदार श्री. सुभाष मेहेर यांनी जाबदार शिवनेर नागरी सहकारी पतसंस्था (ज्यांचा उल्लेख यापुढे “पतसंस्था” असा केला जाईल) यांचेकडे एकूण आठ ठेवपावत्यां अन्वये रक्कम गुंतविलेली होती. या ठेव पावत्यांची मुदत संपल्यानंतर तक्रारदारांनी रककम मिळणेसाठी पतसंस्थेशी संपर्क साधला असता त्यांनी तक्रारदारांची रक्कम परत केली नाही. अशाप्रकारे ठेवींची रक्कम परत न देऊन जाबदारांनी आपल्याला सदोष सेवा दिली आहे याचा विचार करता आपल्या ठेवपावत्यांच्या रकमा व्याज व इतर अनुषंगिक रकमांसह देवविण्यात याव्यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाच्या पृष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व निशाणी 6 अन्वये एकूण 11 कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत. (3) प्रस्तूत प्रकरणातील जाबदार क्र. 1,6,7,9 व 11 यांचेवरती नोटीशीची बजावणी होऊनसुध्दा त्यांनी आपले म्हणणे मंचापुढे दाखल केले नाही. सबब त्यांच्याविरुध्द एकतर्फा आदेश निशाणी 1 वर करण्यात आला. (4) प्रस्तूत प्रकरणातील जाबदार क्र. 4,5,8,10 व 12 ते 16 यांनी मंचापुढे अड. गोसावी यांचे वकीलपत्र व मुदतीचा अर्ज दाखल केला. मात्र यानंतर नेमलेल्या तारखेला त्यांनी आपले म्हणणे मंचापुढे दाखल न केल्याने या सर्व जाबदारांच्या विरुध्द “No Say” आदेश निशाणी 1 वर पारीत करण्यात आला. (5) प्रस्तूत प्रकरणातील जाबदार क्र. 1, 2 व 3 यांनी आपले म्हणणे विधीज्ञांमार्फत मंचापुढे दाखल केले. मात्र हे म्हणणे दाखल करणेपूर्वीच जाबदार क्र. 1 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत झालेला होता. या अनुषंगे जाबदार क्र. 1 संदर्भात त्यांच्या विधीज्ञांनी काहीही पूर्तता केलेली नाही तसेच मंचाने निर्देश देऊनही जाबदार क्र. 1,2 व 3 यांनी आपल्या म्हणण्या पृष्टयर्थ प्रतिज्ञापत्र दाखल केलेले नाही. सबब त्यांचे म्हणणे पुराव्याअभावी विचारात घेण्यात आलेले नाही. (6) प्रस्तूत प्रकरणातील जाबदार क्र. 17 यांचेवरती मंचाच्या नोटीशीची बजावणी झाल्यानंतर विधीज्ञांमार्फत त्यांनी आपले म्हणणे व या प्रकरणातून आपल्याला वगळण्यात यावे असा अर्ज त्यांनी मंचापुढे दाखल केला. आपण जुन्नर येथील शाखेमध्ये कामाला नसल्यामुळे तक्रारदारांनी आपल्याला येथे अनावश्यकरित्या पक्षकार केलेले आहे असे या जाबदारांचे म्हणणे आहे. आपण कधीही या संस्थेच्या संचालक पदावर काम करत नव्हतो तर आपण शाखाधिकारी म्हणून काम करीत होतो असे या जाबदारांचे म्हणणे आहे. तक्रारदारांची ठेव रक्कम देणेसाठी शाखाधिका-यांना जबाबदार धरणे अयोग्य असल्याने तसेच आपल्याला विनाकारण या न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाणे भाग पाडल्यामुळे सदरहू तक्रार अर्ज आपल्याविरुध्द खर्चासह रद्य करण्यात यावा अशी या जाबदारांनी विनंती केली आहे. या जाबदारांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व व्यवस्थापक या पदाचा दिलेला राजीनामा सादर केलेला आहे. (7) प्रस्तूत प्रकरणातील तक्रारदारांच्या तक्रार अर्जाचे अवलोकन केले असता त्यांच्या ठेव पावत्यांची रक्कम पतसंस्थेने परत केलेली नाही हे तक्रारदारांनी वस्तुस्थितीबाबत केलेले निवेदन जाबदारांनी हजर होऊन नाकारलेले नाही किंवा या ठेव पावत्यांच्या रकमा तक्रारदारांना अदा केल्याचा पुरावा मंचापुढे दाखल केलेला नाही. अशाप्रकारे ठेवींच्या रकमा परत न करण्याची पतसंस्थेची कृती त्यांच्या सेवेत दोष निर्माण करते असा मंचाचा निष्कर्ष आहे. सबब तक्रारदारांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे. (8) यातील जाबदार क्र. 17 यांनी दाखल केलेल्या म्हणण्याचे अवलोकन केले असता ते या पतसंस्थेचे व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते ही बाब लक्षात येते. तक्रारदारांची रककम परत करण्याची जबाबदारी पतसंस्था व त्यांचे संचालक मंडळाची असून यासाठी व्यवस्थापकाला जबाबदार धरणे अयोग्य ठरेल असे मंचाचे मत आहे. सबब अंतिम आदेशातून जाबदार क्र. 17 यांना वगळण्यात येत आहे. जाबदार क्र. 17 हे व्यवस्थापक असतानासुध्दा तक्रारदारांनी तक्रार अर्जामध्ये त्यांचा उल्लेख संचालक म्हणून केलेला आढळून येतो. तक्रारदारांनी ज्या यादीच्या आधारे हा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे त्यामध्ये जाबदार क्र.17 यांचा उल्लेख संचालक म्हणून केलेला आढळून येत नाही तर त्यांचा उल्लेख व्यवस्थापक असा केलेला आढळतो. अर्थातच अशा परिस्थितीत व्यवस्थापकाला संचालक म्हणून याकामी अयोग्य पध्दतीने सामील केल्याबद्यल तक्रारदारांनी जाबदार क्र. 17 यांना रककम रु.2,000/- मात्र द्यावेत असा आदेश करणे योग्य व न्याय्य ठरेल असे मंचाचे मत आहे. सबब त्याप्रमाणे आदेश करण्यात येत आहे. (9) प्रस्तूत प्रकरणातील पतसंस्थेने पावती क्र. 15643 वर रक्कम रु.10,000/- व पावती क्र. 14004 वर रु.20,000/- एवढे व्याज अदा केलेले असून अन्य 6 पावत्यांवर त्यांनी काहीही व्याज अदा केलेले नाही असे तक्रारदारांनी शपथेवर नमुद केलेले आहे. सबब ज्या पावत्यांवरती व्याज अदा केलेले आहे त्या पावत्यांची रक्कम मंचाच्या आदेशाप्रमाणे अदा करताना पूर्वी अदा केलेले व्याज या रकमेतून वजा करणेची जाबदारांना मुभा राहील. ठेवपावत्यांची रक्कम परत न करणे सदोष सेवा ठरते असा मंचाचा निष्कर्ष असल्याने ठेवपावत्यांची रक्कम ठेवपावतीच्या तारखेपासून पावतीत नमूद व्याजासह परत करण्याचे आदेश करण्यात येत आहेत. तक्रारदारांनी या प्रकरणामध्ये पतसंस्थेबरोबरच संपूर्ण संचालक मंडळाला पक्षकार म्हणून सामील केलेले आहे. पतसंस्थेचा कारभार हा संचालक मंडळाच्या निर्णयाप्रमाणे चालत असल्यामुळे तक्रारदारांची रककम परत देण्यासाठी पतसंस्थेबरोबरच पतसंस्थेचे प्रतिनिधी म्हणून पतसंस्थेच्या संचालक मंडळालाही ही रककम परत करणेसाठी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार धरणे योग्य ठरेल असे मंचाचे मत आहे. सबब त्याप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत. प्रस्तूत प्रकरणातील तक्रार अर्जाचे अवलोकन केले असता जाबदार क्र. 3 ते 16 यांची नावे संचालक म्हणून संचालक मंडळाच्या यादीमध्ये नमूद केलेली आढळतात. सबब अंतिम आदेश या सर्व जाबदारांविरुध्द करण्यात येत आहेत. मंचाने आपल्या वर नमुद सर्व निष्कर्षासाठी 1) W.P. No. 117/11, 3/5/2011 मंदाताई पवार विरुध्द महाराष्ट्र शासन कोरम मोहीत शहा सी.जे. डी.जी.कर्णिक, जे, 2) I (2004) CPJ 1 NC, 3) I (2009) CPR (87) NC, (4) 2006 (3) AIIMR Journal 25 Maha या आथॉरिटीजचा आधार घेतलेला आहे. (10) प्रस्तूत प्रकरणातील तक्रारदारांनी हजर केलेल्या पावत्यांवर व्याज अदा केल्याचा उल्लेख असतानाही आपल्याला दोन पावत्यांव्यतिरिक्त अन्य पावत्यांवर व्याज मिळालेले नाही अशा आशयाचे निवेदन तक्रारदारांनी केले होते. या अनुषंगे मंचाने तक्रारदारांकडे विचारणा केली असता पावत्यांवर व्याज जरी जमा दाखविण्यात आलेले असले तरीही प्रत्यक्षात आपल्याला हे व्याज प्राप्त झालेले नाही असे निवेदन तक्रारदारांनी केले. या आशयाचे प्रतिज्ञापत्र तक्रारदारांना दाखल करण्यात सांगितले असता त्यांनी असे प्रतिज्ञापत्र मंचापुढे दाखल केले. सबब पावत्यांवर व्याजाचा उल्लेख असला तरीही ठेवपावतीच्या तारखेपासून तक्रारदारांना व्याज मंजूर करण्यात आले आहे. वर नमूद सर्व निष्कर्ष व विवेंचनांच्या आधारे प्रस्तुत प्रकरणात पुढील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत. सबब मंचाचा आदेश की – // आदेश // (1) तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे. (2) यातील पतसंस्था व जाबदार क्र. 3 ते 16 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना पावती क्र. 14004 अन्वये देय होणारी रक्कम रु. 1,00,000/- (अक्षरी रक्कम रु. एक लाख मात्र) दि.12/10/2006 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यत 10% व्याजासह अदा करावेत. (3) यातील पतसंस्था व जाबदार क्र. 3 ते 16 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना पावती क्र. 15643 अन्वये देय होणारी रककम रु.30,000/- (अक्षरी रक्कम रु. तीस हजार मात्र) दि.12/05/2007 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत 10 % व्याजासह अदा करावेत. (4) कलम 2 व 3 मध्ये नमूद पावत्यांच्या देय रकमेतून पूर्वी अदा केलेले व्याज वजा करण्याची जाबदारांना मुभा राहील. (5) यातील पतसंस्था व जाबदार क्र. 3 ते 16 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना पावती क्र. 14005, 14006, 14007, 14008, 14009 अन्वये देय होणारी प्रत्येकी रककम रु.1,00,000/- (अक्षरी रक्कम रु. एक लाख मात्र) दि.12/10/2006 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत 10 % व्याजासह अदा करावेत (6) यातील पतसंस्था व जाबदार क्र. 3 ते 16 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना पावती क्र. 17416 अन्वये देय होणारी रककम रु.7,500/- (अक्षरी रक्कम रु. सात हजार पाचशे मात्र) दि.12/03/2008 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत 10 % व्याजासह अदा करावेत (7) यातील पतसंस्था व जाबदार क्र. 3 ते 16 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना रक्कम रु.3,000/- तक्रार अर्जाच्या खर्चापोटी अदा करावेत. (8) वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदारांनी निकालपत्राची प्रत मिळालेपासून तिस दिवसांचे आत न केलेस तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतूदीं अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील. (9) यातील तक्रारदारांनी जाबदार क्र. 17 यांना रक्कम रु.2,000/- मात्र निकालपत्राची प्रत मिळालेपासून तिस दिवसांचे आत अदा करावेत अन्यथा जाबदार तक्रारदारांविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतूदीं अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील. (10) निकालपत्राच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात. (श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत) सदस्या अध्यक्षा अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे पुणे. दिनांक – 30/08/2011
| [ Smt. Sujata Patankar] MEMBER[ Smt. Pranali Sawant] PRESIDENT | |