निकालपत्र :- (दि.22/09/2010) (व्दारा-श्री एम.डी.देशमुख,अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.9 यांनी मे.मंचासमोर हजर होऊन लेखी म्हणणे दाखल केले. शेष सामनेवाला क्र.1 ते 8 व 10 ते 15 यांना प्रस्तुत कामी नोटीस लागू होऊनही ते सदर कामी हजर झाले नाहीत किंवा त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले नाही. सबब सामनेवाला क्र.1 ते 8 व 10 ते 15 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करणेत आला. सुनावणीचे वेळेस तक्रारदाराचे वकील यांनी युक्तीवाद केला सामनेवाला गैरहजर आहेत. (2) यातील तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी :- यातील सामनेवाला क्र.1 चे सामनेवाला क्र.2 ते 13 हे सामनेवाला संस्थेचे संचालक मंडळ सदस्य होते व आहेत व सामनेवाला क्र.14 व 15 हे सामनेवाला संस्थेचे शाखा मॅनेजर व सेक्रेटरी म्हणून काम करीत होते व आहेत. यातील तक्रारदार यांनी सामनेवाला पत संस्थेत दामदुप्पट ठेव पावती क्र.63 व 74 अन्वये रक्कम रु.15,000/- व रु.10,000/- दि. 15/2/2001 व दि.05/12/2002 रोजी ठेवल्या होत्या. रक्कमा ठेवलेल्या होत्या. सदर ठेवींची मुदत दि.30/6/2006 व दि.20/06/2007 अशा होत्या. मुदतीनंतर दामदुप्पट रक्कम रु.30,000/- व रु.20,000/- मिळणार होते. (3) सदर ठेवींच्या मुदती संपलेनंतर तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे व्याजासह ठेव रक्कमांची तोंडी व लेखी मागणी केली असता सामनेवाला क्र. 14 व 15 यांनी सामनेवाला संस्थेमध्ये पैसे उपलब्ध नसलेचे कारण सांगून त्या परत करणेस नकार दिला. तसेच तक्रारदार यांना सामनेवाला संस्थेने दावा व्यवहाराच्या वेळी असलेले संचालक मंडळ यांचेकडे ठेव रक्कमा व्याजासहीत मागणी केली असता सामनेवाला संस्था ही सध्या आर्थिक अडचणीत असलेने संस्थेकडे जसजसे पैसे उपलब्ध होतील तसतशी रक्कम परत देऊ असे तक्रारदारांना सदर सामनेवाला यांनी सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने दि.26/03/2009 रोजी श्री एम.जी.पाटील या वकीलांमार्फत नोटीस पाठवून सदर ठेव रक्कमेची मागणी केली. सामनेवाला यांना सदर नोटीस मिळूनही सामनेवाला यांनी तक्रारदाराची रक्कम अदा केलेली नाही. सबब तक्रारदाराची एकूण मुदत बंद ठेव पावती क्र.63 व 74 वरील दामदुप्पट रक्कम रु.30,000/- व रु.20,000/- त्यावर 15 टक्के प्रमाणे व्याज, मानसिक त्रासापोटी रु.5,000/- प्रत्येकी व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व नोटीस खर्च व वकील फी प्रत्येकी रु.10,000/- सामनेवाला यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या वसुल होऊन मिळणेकरिता सदरील तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केलेला आहे. (4) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत दामदुप्पट ठेव पावत्यांच्या सत्यप्रती व ठेव रक्कमेबाबत सामनेवाला यांना तक्रारदाराने पाठविलेली वकीलांमार्फतची नोटीस, सदर नोटीसची यु.पी.सी.ची पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत व शपथपत्र दाखल केले आहे. (5) या मंचाने सामनेवाला यांना नोटीसा पाठविल्या असता सामनेवाला क्र. 9 यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाला क्र.1 ते 8, 10 ते 15 यांना मंचा तर्फे नोटीस लागू होऊनही ते सदर कामी हजर झालेले नाहीत किंवा त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले नाही. (6) सामनेवाला क्र.9 यांनी त्यांचे लेखी म्हणण्यात तक्रारदाराची तक्रार ठेवीच्या रक्कमा वगळता नाकारलेली आहे. ते आपल्या म्हणण्यात पुढे सांगतात, प्रस्तुत सामनेवाला यांच्या ठेवी सामनेवाला क्र.1 कडे होत्या. सदर ठेवी व त्यावरील व्याज बुडविण्याचे हेतुने सामनेवाला क्र.1, 2, 11, 13 आणि सामनेवाला क्र.11 चे पती दिलीप आनंदा शिंदे यांनी संगनमताने सदर ठेवी व त्यावरील व्याज बुडविण्याच्या गैरहेतुने सदर ठेवी व्याजासह परत देणेस टाळाटाळ सुरु केली. त्यामुळे सदर ठेवी परत मिळाव्यात म्हणून त्यांचेविरुध्द कायदेशीर कारवाई करणेसाठी प्रस्तुत सामनेवाला यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांचेकडे दि.18/07/008 रोजी तक्रार देऊन संचालक मंडळाच्या यादीची मागणी केली असता सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तालूका करवीर यांनी दि.25/0/2008 रोजी संचालक मंडळाची यादी उपलब्ध करुन दिली. यामध्ये सामनेवाला क्र.1 संस्थेचे सन 2003-04 या कालावधीचे लेखापरिक्षण अहवालातील यादीमध्ये संचालक म्हणून प्रस्तुत सामनेवाला यांचे नांव असलेचे समजले. सामनेवाला संस्थेतर्फे सामनेवाला क्र.2 मारुती शंकर संकपाळ व सामनेवाला क्र.11सौ.वंदना दिलीप शिंदे व त्यांचे पती दिलीप आनंदा शिंदे यांनी संगनमत करुन सामनेवाला क्र.9 यांचे नांव संचालक मंडळाचे यादीत घुसडले असून सामनेवाला संस्थेचे संचालक म्हणून प्रस्तुत सामनेवाला यांनी कधीही कारभार पाहिलेला नाही अगर कधीही सहभाग घेतलेला नाही. त्यामुळे इतर सामनेवाला यांनी केलेल्या व्यवहारास कायदयाने बांधिल नव्हते व नाहीत. प्रस्तुत सामनेवाला यांनी त्यांचे राजीनामापत्रक दि.14/08/2008 रोजी मा.सहाय्यक निबंधक सहाकरी संस्था ता. करवीर बिंदू चौक कोल्हापूर यांनी त्याची प्रत सामनेवाला क्र.1 व 2 यास रवाना केली असून त्याचे रजि. पोष्टाचे पावतीची प्रत तक्रारीसोबत दाखल केली आहे. सबब प्रस्तुत सामनेवाला यांचेविरुध्दची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती सदर सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (7) सामनेवाला क्र.9 यांनी आपले लेखी म्हणणेसोबत सहा.निबंधक सहकारी संस्था ता.करवीर यांचेकडे दि.14/08/08 रोजी राजीनामा दिलेबद्दलचा केलेला अर्ज, सहा.निबंधक यांनी सामनेवाला संस्थेला व सेक्रेटरी यांना पाठवलेची रजि.पावती, त्याची पोच पावती इत्यादी कागदपत्र दाखल केलेली आहेत. (8) तक्रारदाराचा तक्रार अर्ज, शपथपत्र व दाखल कागदपत्रे, सामनेवाला क्र. 9 यांचे लेखी म्हणणे व दाखल केलेली कागदपत्रे, तसेच तक्रारदाराचे वकीलांचा युक्तीवाद याचा या मंचाने साकल्याने विचार करता तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे मुदत बंद ठेव स्वरुपात रक्कमा ठेवलेल्या आहेत. सदर ठेवींच्या मुदती संपलेल्या आहेत व तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे वारंवार मागणी करुनही त्या सामनेवाला यांनी परत केलेल्या नाहीत असे निदर्शनास येते. त्यामुळे तक्रारदारांना त्यांच्या व्याजासह ठेव रक्कमा मिळविणेकरिता या मंचासमारे तक्रार अर्ज दाखल करणे भाग पडले आहे. (9) तक्रारदारने दाखल केलेल्या दामदुप्पट ठेव पावती क्र.63 व 74 चे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्यांच्या मुदती संपलेल्या आहेत. सबब सदर ठेव पावतीवरील दामदुप्पट रक्कम रु.30,000/-, व 20,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सदर रक्कमेवर मुदत संपले तारखेपासून म्हणजे दि.30/06/2006 व दि.20/06/2007 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याज मिळणेस तक्रारदार पात्र असलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (10) सामनेवाला क्र.9 यांनी त्यांचे लेखी म्हणणेत संचालक पदाचा राजीनामा दिलेचे कथन केले आहे. परंतु तक्रारदाराने जेव्हा ठेव रक्कम ठेवली त्यावेळी सदर सामनेवाला हे संचालक होते. तसेच राजीनामा मंजूर झालेबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे प्रस्तुत सामनेवाला यांना राजीनामा दिला म्हणून आपली जबाबदारी झटकता येणार नाही. तसेच सामनेवाला क्र.1 ते 8 व 10 ते 15यांना नोटीस लागू होऊनसुध्दा ते सदर कामी हजर झालेले नाहीत किंवा त्यांनी आपले लेखी म्हणणेही दाखल केलेले नाही. तसेच सामनेवाला यांचे वर्तणूकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या ठेव खातेची रक्कम परत करणेकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्न केलेले नाहीत हे स्पष्ट होते. तसेच सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणणे दाखल न करुन त्यांना तक्रारदारची तक्रार मान्य असलेचे दाखवून दिले आहे.सबब सामनेवाला क्र. 1 ते 13 यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदाराच्या व्याजासह मुदत बंद ठेव रक्कमा परत करण्याकरिता जबाबदार आहेत तर सामनेवाला क्र. 14 हे शाखा मॅनेजर असलेने व सामनेवाला क्र.15 हे सेक्रेटरी असलेने म्हणजेच ते सामनेवाला संस्थेचे कर्मचारी असलेने त्यांना फक्त संयुक्तिकरित्या जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. (2) सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या व सामनेवाला क्र. 14 व 15 यांनी फक्त संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना दामदुप्पट ठेव पावती क्र.63 वरील दामदुप्पट रक्कम रु.30,000/-(रु.तीस हजार फक्त)अदा करावेत. सदर रक्कमेवर दि.30/06/2006 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याज दयावे व दामदुप्पट ठेव पावती क्र.74 वरील दामदुप्पट रक्कम रु.20,000/-(रु.वीस हजार फक्त) अदा करावेत. सदर रक्कमेवर दि.20/06/2007 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याज दयावे. (3) सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या व सामनेवाला क्र.14 व 15 यांनी फक्त संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |