श्री. मनोहर चिलबुले, अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
- आ दे श -
(पारित दिनांकः 04/02/2015)
1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप असे कि, तक्रारकर्त्याला त्यांचे स्वलिखित ग्रंथ ‘’बुध्द धम्म दुःख मुक्तीचा मार्ग’’ हा 450 पृष्ठांच्या 700 प्रती छापावयाच्या होत्या. सदर ग्रंथाच्या प्रकाशक सौ. उषा कृष्णाजी बंसोड या होत्या. दि.11.01.2012 रोजी तक्रारकर्त्याने मॅप लिथो या कागदांचे 42 रीम खरेदी करुन टॅक्ससह रु.15,501/- व्यापा-याला दिले.
तक्रारकर्ता व वि.प. यांच्यामध्ये झालेल्या कराराप्रमाणे ज्युस शिलाई बांधणीचा खर्च प्रती नग रु.13/- प्रमाणे देण्याचे ठरले होते. असे एकूण 700 पुस्तकांचे रु.9,100/- देण्याचे ठरले होते व अग्रीमादाखल 05.05.2012 ला रु.2,000/- वि.प.ला दिले. त्यानंतर वेळोवेळी वि.प.ला तक्रारकर्त्याने रु.2,000/- असे एकूण रु.4,000/- तक्रारकर्त्याने वि.प.ला दिले आहेत. वि.प.ने 02.09.2012 पूर्वी एकूण 93 पुस्तके आणि त्यानंतर 150 पुस्तके तक्रारकर्त्याला बाईंडींग करुन दिली. त्यात 13 पुस्तके दोषयुक्त आहेत. म्हणजे वि.प.ने एकूण 230 विक्रीस योग्य पुस्तके तक्रारकर्त्याला दिली आहेत. तक्रारकर्त्याने वि.प.ला एकूण रु.4,000/- दिले. परंतू प्रत्यक्षात वि.प.ने रु.2,990/- चे काम केलेले आहे. तसेच पुढे दि.02.09.2012 ला बाईंडींगकरीता वेळ मिळत नाही असे सांगून 267 पुस्तके बाईंडींग न करताच परत केली. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे 13 पुस्तके जी दोषयुक्त आहेत, ती परत वि.प.ने बाईंडींग करुन देण्याचे कबूल केले होते. वि.प.ने बाईंडींग करुन दिलेल्या पुस्तकांबाबत एकूण रक्कम रु.2290/- तक्रारकर्ता देणे लागतो, परंतू त्याने वि.प.ला एकूण रु.4,000/- दिले असल्याने न केलेल्या कामाचे तक्रारकर्त्यास वि.प.कडून रु.1,010/- घेणे आहेत. तसेच वि.प.ने 190 पुस्तके बाईंडीग करुन परत केलेली नाहीत. तक्रारकर्त्याला छापील पुस्तकावर 50 टक्के कमीशन द्यावे लागते व एका पुस्तकाची किंमत रु.350/- असल्याने तक्रारकर्त्यास प्रती पुस्तक रु.175/- मिळतात. वि.प.ने बेकायदेशीरपणे 190 पुस्तके आपल्या ताब्यात ठेवल्याने तक्रारकर्त्याचे रु.32,300/- चे नुकसान झाले आहे. तक्रारकर्त्याने वि.प.ला याबाबत कायदेशीर नोटीसची बजावणी केली असता वि.प.ने सदर नोटीसला कुठलाही प्रतिसाद दिला नाही, म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रारीत 190 पुस्तकांच्या विक्रीतून मिळणारा लाभ रु.32,300/-, तसेच मानसिक व शारिरीक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.15,000/- आणि तक्रारीचा व नोटीसचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत.
आपल्या तक्रारीसोबत तक्रारकर्त्याने 42 रीम खरेदी केल्याची पावती, पुस्तक बांधणीसाठी अग्रीम व काही रक्कम दिल्याच्या पावत्या, 700 पुस्तके स्विकारल्याचे व 243 परत केल्याचे पत्र, बाईंडींग न करता पुस्तके परत दिल्याचे पत्र, 190 पुस्तके परत करण्याविषयी पत्र, पोचपावती, कायदेशीर नोटीस व पोचपावती आणि बुध्द धम्म दुःख मुक्तीचा मार्ग पाने 450 ची प्रत दाखल केलेले आहेत.
2. सदर तक्रारीची नोटीस वि.प.ला बजावली असता नोटीस प्राप्त होऊनही वि.प. मंचासमोर हजर न झाल्याने त्यांचेविरुध्द प्रकरणात एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश मंचाने पारित केला.
3. मंचाने सदर प्रकरणी दाखल शपथपत्र, दस्तऐवज यांची तपासणी केली असता मंचाचे विचारार्थ खालील मुद्दे, निष्कर्ष व त्यावरील कारणमिमांसा पुढीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) वि.प.ने दिलेल्या सेवेत न्यूनता दिसून येते काय ? होय.
2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय ? अंशतः.
3) आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
- कारणमिमांसा -
4. मुद्दा क्र. 1 ते 3 बाबत – तक्रारकर्त्याने दस्तऐवजांच्या यादीप्रमाणे दस्तऐवज क्र. 2 वर वि.प.ला 700 पुस्तकांच्या बाईंडींगचे काम दिल्याचे व त्याबाबत एकूण रु.4,000/- वि.प.ला अग्रीम रक्कम स्विकारल्याची नोंद आहे.
तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे वेळोवेळी वि.प.ला रकमा दिलेल्या आहेत. तसेच वि.प.ने आधी 93 पुस्तके व दि.02.09.2012 रोजी 150 पुस्तके बाईंडींग करुन दिल्याचे पृ.क्र. 10 वरुन स्पष्ट होते. दस्तऐवज क्र. 3 वर वि.प.ने तक्रारकर्त्यास एकूण 243 पुस्तके बाईंडींग करुन दिल्याचे व त्यापैकी 13 पुस्तकांची बाईंडींग योग्य नसल्याचे लिहून दिले आहे. त्यानंतर दि.02.09.2012 रोजी बाईंडींग न करुन दिलेली 267 पुस्तके तक्रारकर्त्यास परत केल्याबाबत दस्तऐवज क्र. 4 वर वि.प.ने लिहून दिले आहे. म्हणजेच वि.प.ने तक्रारकर्त्यास 700 पुस्तकांपैकी 510 पुस्तके तक्रारकर्त्याला परत केलेली आहेत व उर्वरित 190 पुस्तके परत केलेली नाहीत. तक्रारकर्त्याचे शपथेवरील कथन वि.प.ने नाकबूल केलेले नाही. तसेच तक्रारकतर्याने सांगितले की, पुस्तकांची किंमत रु.350/- असून विक्री करतांना 50 टक्के सुट देऊन त्यास प्रती पुस्तक रु.175/- मिळाले असते, म्हणून 190 पुस्तके न मिळाल्याने त्यास रु.32,300/- चे नुकसान झाले आहे. याशिवाय, वि.प.ने बाईंडींग करुन दिलेल्या पुस्तकांचा मेहनतांना रु.2290/- तक्रारकर्ता वि.प.ला देणे लागतो, परंतू त्याने वि.प.ला एकूण अग्रीम रक्कम रु.4,000/- दिले असल्याने, त्यापैकी न केलेल्या कामाचे तक्रारकर्त्यास वि.प.कडून रु.1,010/- घेणे आहेत. सदर बाबदेखील वि.प.ने लेखी बयान दाखल करुन नाकारलेली नाही. म्हणून तक्रारकर्ता वि.प.कडून मागणीप्रमाणे बाईंडींग न केलेली 190 पुस्तकांची 21,280 पृष्ठे किंवा ते देणे शक्य नसेल तर सदर 190 पुस्तकांच्या विक्रीतून तक्रारकर्त्यास जो नफा मिळाला असता ती रक्कम रु.32,300/- मिळण्यास पात्र आहे. याशिवाय, मानसिक व शारिरीक त्रासाबाबत नुकसान भरपाई म्हणून रु.5,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे, म्हणून मुद्दा क्र. 1 ते 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
उपरोक्त निष्कर्षावरुन व दाखल दस्तऐवजांवरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- आदेश -
1) तक्रारकर्त्याची तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत मंजूर करण्यात येते.
2) वि.प.ला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला मागणीप्रमाणे बाईंडींग न केलेली 190 पुस्तकांची 21,280 पृष्ठे किंवा ते देणे शक्य नसेल तर सदर 190 पुस्तकांच्या विक्रीतून तक्रारकर्त्यास जो नफा मिळाला असता ती रक्कम रु.32,300/- ही तक्रार दाखल दि.19.03.2013 पासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावी.
3) वि.प.ने तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रासाबाबत नुकसान भरपाईबाबत रु.5,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.3,000/- द्यावा.
4) उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
5) तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.