(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार- सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 13/01/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 15.04.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. प्रस्तुत तक्रारीत तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, त्याने वर्तमान पत्र व केबल वाहीनीवरील जाहिरातीवरुन ‘सिनिक बाईक’ ही दोन चाकी गाडी स्वतःसाठी आणि कुटूंबासाठी दि.25.03.2009 रोजी रु.29,000/- देऊन गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून विकत घेतली. सदर वाहनाचे निर्माते हे गैरअर्जदार क्र.2 असल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. तक्रारकर्त्याने सिनिक मॉडेल 3000, चेसिस क्र. एसपी07जीएओ-122, बॅटरी मॉडेल असुन तश्या प्रकारची कागदपत्रे तक्रारकर्त्याला गैरअर्जदार क्र.1 यांनी गैरअर्जदार क्र.2 तर्फे पूर्ण करुन दिल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. सदर वाहन खरेदी केल्यानंतर काही दिवसातच त्यामधे समस्या निर्माण झाल्या, बॅट-या फुगल्या व वाहन बरोबर चालत नव्हते. याबाबतची तक्रार तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडे केली त्यानुसार गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर दोष हा उत्पादीत दोष आहे असे सांगितले व त्याकडे दूर्लक्ष केले. तकारकर्त्याने परत विनंती केल्यानंतर सदर वाहनातील बॅटरीसेट काढून गैरअर्जदार क्र.2 यांना पाठवितो असे सांगून गैरअर्जदार क्र.1 यांनी दि.03.07.2009 ला वाहनाचा बॅटरीसेट काढून घेतला मात्र बदलवुन दिला नाही. 3. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.1 ला बॅटरीसेट बदलवुन देण्याकरता दि.23.07.2009 रोजी विचारणा केली तेव्हा बॅटरीमध्ये उत्पादीत दोष असल्यामुळे गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे दि.07.07.2009 रोजी पाठविल्याचे कळविले. त्यानंतर वारंवार विनंती करुन सुध्दा तक्रारकर्त्यास वाहनातील बॅटरीसेट बदलवुन न दिल्यामुळे त्याने दि.02.03.2010 रोजी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना वकीलामार्फत नोटीस पाठविली. सदर नोटीसला कोणत्याही प्रकारे उत्तर न दिल्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे व वाहनाची किंमत रु.29,000/- परत मिळण्याची मागणी केलेली आहे. तसेच शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रु.50,000/- व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.10,000/- ची मागणी केलेली आहे. 4. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना बजावण्यांत आली असता सदर नोटीस गैरअर्जदारांना प्राप्त झाल्याची टपाल विभागाची पावती प्रकरणात दाखल आहे. त्यानंतर सुध्दा गैरअर्जदार क्र.2 यांनी कोणतेही उत्तर दाखल न केल्यामुळे व ते उपस्थित न झाल्यामुळे मंचाने त्यांचे विरुध्द दि.07.08.2010 रोजी प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित केला. गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर तक्रारीला आपले उत्तर दाखल केले असुन त्यांनी आपल्या उत्तरात तकारकर्त्याचे वाहनाचा बॅटरीसेट गैरअर्जदार क्र.2 कडे दि.07.07.2009 रोजी बदलवुन देण्यासाठी पाठविल्याचे मान्य केले आहे. परंतु गैरअर्जदार क्र.2 यांनी सदर बॅटरीसेट अजून पर्यंत बदलवुन किंवा नव्याने दुसरा पाठविला नसल्याचे आपल्या उत्तरात नमुद केले आहे. त्यांनी पुढे असेही नमुद केले आहे की, गैरअर्जदार क्र.1 यांनी सेवेत कोणतीही त्रुटी दिलेली नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारिज करण्याची मंचास विनंती केलेली आहे. 5. सदर प्रकरणी तक्रारकर्त्याचे वकीलांनी दि.15.12.2010 रोजी युक्तिवाद केला त्यानंतर गैरअर्जदार क्र. 1 यांचे युक्तिवादाकरीता प्रकरण दि.05.01.2011 रोजी नेमण्यांत आले, परंतु अंतिम संधी देऊनही गैरअर्जदार क्र.1 यांचे वकील गैरहजर असल्यामुळे प्रकरण गुणवत्तेवर निकाली काढण्या करता ठेवण्यांत आले. उभय पक्षांचे कथन व मंचासमक्ष दाखल दस्तावेज यांचे निरीक्षण केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 6. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून गैरअर्जदार क्र.2 व्दारा निर्मीत ‘सिनिक बाईक’ रु.29,000/- ला खरेदी केली होती, ही बाब तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र.1 यांचे कथनावरुन व तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र.1 वरुन स्पष्ट होते. तसेच सदर वाहनाची निर्मीती ही गैरअर्जदार क्र.2 यांनी केलेली असल्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ‘ग्राहक’ ठरतो. 7. तक्रारकर्त्याचे वाहन हे बॅटरीव्दारा संचालीत आहे व त्यात दोष निर्माण झाला त्यामुळे सदर वाहन त्यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे नेले असता वाहनाच्या बॅटरीमध्ये दोष असल्याने तक्रारकर्त्यास वाहनाचा उपयोग घेणे शक्य नव्हते. गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर वाहनाच्या बॅटरीमध्ये दोष असल्याचे मान्य केले आहे व सदर दोष हा निर्मीती दोष असल्याचे मान्य केलेले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांचे कडे बॅटरी बदलवुन देण्याकरता पाठविली ही बाब सुध्दा तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र.1 यांचे कथनावरुन स्पष्ट होते. गैरअर्जदार क्र.1 यांनी दि.07.07.2009 रोजी सदर बॅटरीसेट बदलवुन देण्याकरता गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे पाठविल्यानंतर सुध्दा गैरअर्जदार क्र.2 यांनी बॅटरीसेट बदलवुन न देणे ही गैरअर्जदार क्र.2 यांची सेवेतील त्रुटी आहे. तसेच गैरअर्जदार क्र.1 गैरअर्जदार क्र.2 चे अधिकृत विक्रेते असल्यामुळे त्यांनी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून बॅटरीसेट बदलवुन देण्याकरता कुठली कारवाई केली याबाबत कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 यांनी सुध्दा आवश्यक ती सेवा दिलेली नसुन सेवेत त्रुटी दिल्याचे मंचाचे मत आहे. 8. तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र.1 यांचे कथनावरुन ही बाब स्पष्ट होते की, सदर वाहनातील बॅटरीमधे दोष होता व त्यामुळे ती बदलवुन देणे आवश्यक होते. म्हणून बॅटरीसेट बदलवुन मिळण्याकरता तक्रारकर्ता पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. 9. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रु.50,000/- ची मागणी केलेली आहे. सदर मागणी अवास्तव वाटत असल्यामुळे तक्रारकर्ता हा रु.3,000/- मिळण्यांस पात्र ठरतो तसेच तक्रारीच्या खर्चाचे रु.1,000/- मिळण्यांस पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. 10. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याचे वाहनातील एसपी07जीएओ-122क्रमांकाचाबॅटरीसेट आदेश प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसांचे आंत बदलवुन द्यावा, अन्यथा प्रति दिवस रु.200/- याप्रमाणे खर्च मिळण्यांस तक्रारकर्ता पात्र राहील. 3. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चाचे रु.1,000/- अदा करावे. 4. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |