::निकालपत्र:: (पारीत व्दारा – श्री नितीन माणिकराव घरडे , मा.सदस्य ) (पारीत दिनांक – 12 नोव्हेंबर, 2013 ) 1. तक्रारकर्त्याने, विरुध्दपक्ष क्रं-1-शिवतृप्ती बिल्डर्स भागीदारी संस्थे तर्फे भागीदार क्रं-2 व भागीदार क्रं-3 यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारकर्त्याचे कथन थोडक्यात येणे प्रमाणे- तक्रारकर्त्याने, विरुध्दपक्षाचे मौजा बेलतरोडी, ग्राम पंचायत बेसा, तालुका जिल्हा नागपूर येथील भूखंड क्रं-3, खसरा क्रं 43-ए/3, पटवारी हलका नंबर-38 या जमीनीवर उभारलेल्या शिव अपार्टमेंट मधील फ्लॅट क्रं 102, क्षेत्रफळ 29.750 चौरसमीटर आणि सोबत अवभिक्ता हिस्सा 2.560 चौरसमीटर सहित विकत घेतला. सदर फ्लॅट संबधी विक्रीचा करारनामा दि.07.04.2007 रोजी करण्यात आला आणि नोंदणीकृत विक्रीपत्र दि.12.01.2009 रोजी नोंदविण्यात आले. तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्षाने, तक्रारकर्त्या कडून विक्रीपत्र नोंदणी झाल्या नंतर महाराष्ट्र राज्य विज मंडळा कडून ट्रॉन्सफॉर्मरची व्यवस्था आणि विज मीटर घेण्यासाठी तसेच परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी अतिरिक्त रक्कम रुपये-20,000/- दि.17.12.2009 रोजी नगदी घेतले व त्याची पावती सुध्दा तक्रारकर्त्यास देण्यात आली. परंतु सदर व्यवहारा नंतर आज पर्यंत विरुध्दपक्षाने आश्वासित केल्या नुसार ट्रॉन्सफॉर्मरची व्यवस्था तसेच विज मीटर लावून दिले नाही व परिसरात वृक्षारोपणही करुन दिले नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने त.क. कडून मोबदला स्विकारुनही पुर्तता केली नाही व तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, या बाबतीत त्याने अनेकदा विरुध्दपक्षाशी प्रत्यक्ष आणि दुरध्वनीव्दारे संपर्क साधून पुर्तता करण्याची विनंती केली परंतु विरुध्दपक्षाने त्यास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने अधिवक्ता यांचे मार्फतीने दि.14.11.2011 रोजी विरुध्दपक्षास कायदेशीर नोटीस पाठविली परंतु सदर नोटीस मिळूनही आज पर्यंत त्यांचे उत्तर विरुध्दपक्षाने दिलेले नाही, म्हणून, तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल करुन, खालील मागण्या केल्यात. विरुध्दपक्षाने, ट्रॉन्सफॉर्मरची व्यवस्था करुन, तक्रारकर्त्या कडे विज मीटर बसवून दयावे तसेच परिसरात वृक्षारोपण करण्यात यावे, असे विरुध्दपक्षास निर्देशित करण्यात यावे. तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-2000/- विरुध्दपक्षा कडून मिळण्याचे आदेशित व्हावे. तक्रारकर्त्याने ट्रॉन्सफॉर्मर आणि विज मीटर पोटी विरुध्दपक्षाकडे जमा केलेली रक्कम रुपये-20,000/- वर रक्कम जमा केल्याचे दिनांका पासून ते प्रत्यक्ष विज ट्रॉन्सफॉर्मर आणि विज मीटर लावून देई पर्यंत द.सा.द.शे. 24% दराने व्याज मिळावे. 3. तक्रारकर्त्याने निशाणी क्रं 5 नुसार विलंब माफीचा अर्ज सादर केला.
4. विरुध्दपक्षाने मंचा समक्ष उपस्थित होऊन आपले लेखी उत्तर निशाणी क्रं 10 अनुसार पान क्रं 23 ते 26 वर दाखल केले. विरुध्दपक्षाचे लेखी उत्तरा नुसार, तक्रारकर्त्याने त्यांचे कडून तक्रारीत नमुद केल्या नुसार फ्लॅट विकत घेतल्याची बाब मान्य केली. तक्रारकर्त्याने ट्रॉन्सफॉर्मर आणि विज मीटर संबधाने रक्कम रुपये-20,000/- दिल्याची बाब मान्य केली. परंतु आज पर्यंत ट्रॉन्सफॉर्मर आणि विज मीटर लावण्यात आले नाही या बाबत खुलासा करताना असे नमुद केले की, सदर ईमारतीतील सर्व सदनीकाधारक यांचे कडून अतिरिक्त रक्कम प्राप्त झाल्या नंतरच ट्रॉन्सफॉर्मरची रक्कम विरुध्दपक्षाने महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे कार्यालयात जमा केले. ट्रॉन्सफॉर्मर व विज मीटर करीता संपूर्ण रक्कम प्राप्त झाल्या शिवाय, विज वितरण कंपनी रक्कम स्विकारणार नव्हती व त्यामुळे संपूर्ण सदनीकाधारकां कडून ट्रॉन्सफॉर्मर व विज मीटरची रक्कम प्राप्त झाल्या वरच, विरुध्दपक्ष विज वितरण कंपनीचे कार्यालयात रक्कम भरु शकत होते. परंतु अन्य सदनीकाधारकां कडून रक्कम देण्यास विलंब झाल्यामळे, योग्य त्या रकमेचा भरणा विरुध्दपक्ष करु शकले नाही. सध्याचे परिस्थितीत महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे कार्यालयात विरुध्दपक्षाने संपूर्ण रकमेचा भरणा केलेला आहे व लवकरात लवकर सदर ईमारतीमधील सदनीकां मध्ये विज मीटर बसवून देण्यात येईल. विरुध्दपक्षाने पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्त्यास सदर सदनीकेचा ताबा दिल्या नंतरही आज पर्यंत सदर सदनीकेचा उपभोग तक्रारकर्त्याने घेतलेला नाही व त्या ठिकाणी कोणीही राहत नसल्यामुळे विज मीटर ते लावून देऊ शकले नाही व असेच म्हणणे महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे सुध्दा आहे. त्यामुळे विरुध्दपक्षाने रकमेचा चुकीचे मार्गाने विनियोग केला व तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिली हे म्हणणे गैरकायदेशीर व अयोग्य, चुकीचे ठरते व त्यामुळे तक्रारकर्त्याने विज मीटर व ट्रॉन्सफॉर्मर करीता दिलेल्या रकमेवर, द.सा.द.शे.24% दराने व्याज देण्यास विरुध्दपक्ष बाध्य नाही. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी ही एक सरकारी यंत्रणा असल्यामुळे त्यांना तक्रारकर्त्याचे मागणी प्रमाणे काम करण्यास काही अडचणी असू शकतात व त्या दुर झाल्यावर ताबडतोब महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी, तक्रारकर्त्यास त्यांचे सदनीकेत ट्रॉन्सफॉर्मरची व्यवस्था आणि मीटर लावून देईल, यात विरुध्दपक्षाचा कुठलाही सहभाग नाही व हेतूपुरस्पर विरुध्दपक्षाने सदर काम प्रलंबित ठेवलेले नसल्यामुळे, विरुध्दपक्षाने कुठल्याही सेवा व शर्तीचा भंग केलेला नाही व त्यामुळे सदर तक्रार खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्षाने पुढे असे नमुद केले की, त्यांनी सदर ईमारती मधील सर्व सदनीका धारकास ट्रॉन्सफॉर्मर व विज मीटर लावून देण्याचे कबुल केले होते परंतु सदर कार्य पूर्ण करण्यास कुठलीही मुदत दिलेली नव्हती. कारण सदरची प्रक्रिया ही विरुध्दपक्षाचे अखत्यारीचे बाहेरची आहे व विरुध्दपक्ष हे त्यासाठी दुस-यांवर अवलंबून आहेत. त्यामुळे विरुध्दपक्ष यांनी ट्रॉन्सफॉर्मर आणि विज मीटरसाठी तक्रारकर्त्यास कुठल्याही मुदतीचे आश्वासन दिले नव्हते. तरी सुध्दा लवकरात लवकर ट्रॉन्सफॉर्मर व विज मीटर ईमारतीमधील सदनीकांमध्ये लावून देण्यासाठी विरुध्दपक्ष सर्वोतोपरी मदत करतील असे विरुध्दपक्षाने नमुद केले.
5. तक्रारकर्त्याने प्रतिज्ञालेखावर आपली तक्रार दाखल केली. सोबत निशाणी क्रं-3 वरील यादी नुसार एकूण 08 दस्तऐवज दाखल केले, ज्यामध्ये विरुध्दपक्षास अतिरिक्त रक्कम रुपये-20,000/- दिल्या बद्दलची पावती प्रत, विरुध्दपक्षास पाठविलेली कायदेशीर नोटीस, पोस्टाच्या पावत्या व पोच पावत्या अशा दस्तऐवजाचा समावेश आहे. तक्रारकर्त्याने प्रतिवाद नि.क्रं 15 वर दाखल केला. 6. विरुध्दपक्षाने प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्तर निशाणी क्रं 10 नुसार दाखल केले. सोबत निशाणी क्रं 14 वर लेखी युक्तीवाद दाखल केला. सोबत महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे दि.20.06.2012 रोजीची Detailed cost of service connection firm quotation ची प्रत दाखल केली व दि.02.06.2012 रोजी रुपये-2077/- cost of service connection firm quotation राजू बाबुराव बागडे यांचे नावे प्रत अभिलेखावर दाखल केली. तसेच महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे मीटर बसविल्या बाबतचा फोटोग्राफ दाखल केला. 7. तक्रारकर्त्याची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, त्यास विरुध्दपक्षाचे प्रतिज्ञालेखावरील उत्तर, उभय पक्षानीं दाखल केलेले दस्तऐवज,उभय पक्षांचे अधिवक्त्यांचा युक्तीवाद यावरुन मंचा समक्ष खालील मुद्दे निर्णयार्थ उपस्थित होतात- मुद्दा उत्तर (1) वि.प.ने त.क. कडून अतिरिक्त रक्कम रुपये-20,000/- स्विकारुनही ट्रॉन्सफॉर्मर आणि विज मीटरची सेवा त.क.ला विहित मुदतीत न पुरवून दोषपूर्ण सेवा दिली आहे काय? .............................................................. होय.
(2) काय आदेश?.......................................................अंतिम आदेशा नुसार :: कारणे व निष्कर्ष :: मुद्दा क्रं-1 व 2-
8. तक्रारकर्त्याने, विरुध्दपक्षास ( “विरुध्दपक्ष” म्हणजे वि.प. क्रं-1-शिव तृप्ती बिल्डर संस्थे तर्फे वि.प. क्रं-2- चंद्रकांत धनंजयराव भोंडे आणि वि.प. क्रं-3 ज्ञानेश्वर जंगलुजी काकडे असे वाचण्यात यावे) ट्रॉन्सफॉर्मर, विज मीटर आणि परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी नगदी अतिरिक्त रक्कम रुपये-20,000/- दि.17.12.2009 रोजी ट्रॉन्सफॉर्मर आणि वृक्षारोपण करण्यासाठी दिली या बद्दल उभय पक्षांमध्ये विवाद नाही आणि तसा उल्लेखही संबधीत पावतीचे प्रतीवर केल्याचे दिसून येते. परंतु तक्रारकर्त्याचे म्हणण्या नुसार विरुध्दपक्षाने अशी रक्कम स्विकारुनही, तक्रारकर्त्यास आज पर्यंत ट्रॉन्सफॉर्मर आणि विज मीटर तसेच परिसरात वृक्षारोपण इत्यादी सोयी सुविधा पुरविलेल्या नाहीत. 9. तक्रारकर्त्याने या संबधाने विरुध्दपक्षास नोंदणीकृत डाकेने दिनांक- 14.11.2011 रोजी कायदेशीर नोटीस पाठविल्या बद्दल, नोटीसची प्रत, पोस्टाच्या पावत्या व पोच पावत्या अभिलेखावर दाखल केलेल्या आहेत परंतु विरुध्दपक्षाने सदर नोटीसला कोणतेही उत्तर दिले नाही व प्रतिसाद दिला नाही व असे उत्तर दिल्या बाबत आपले लेखी उत्तरामध्ये सुध्दा नमुद केले नाही. म्हणून तक्रारकर्त्याने शेवटी न्यायमंचा समक्ष दि.16.03.2012 रोजी प्रस्तुत तक्रार दाखल केली. 10. सन-2009 मध्ये विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्या कडून रक्कम स्विकारुन प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल करे पर्यंत कोणतीही कार्यवाही केली नाही वा तक्रारकर्त्याचे नोटीसला साधे उत्तरही दिले नाही. विरुध्दपक्षाने मंचा समक्ष दाखल केलेले उत्तर हे अतिशय मोघम स्वरुपाचे असून, विरुध्दपक्षाने इतर सदनीकाधारकां कडून ट्रॉन्सफॉर्मर व विज मीटर करीता केंव्हा केंव्हा रकमा प्राप्त केल्यात व नेमक्या कोणत्या तारखेस त्या रकमा महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे कार्यालयात जमा केल्यात? या बाबतचा कोणताही लेखी पुरावा मंचा समक्ष दाखल केलेला नाही व त्या संबधाने सखोल भाष्यही आपले लेखी उत्तरामध्ये केलेले नाही. 11. विरुध्दपक्षाने, तक्रारकर्त्याचे वतीने दि.02.06.2012 रोजी रुपये-2077/- cost of service connection firm quotation राजू बाबुराव बागडे यांचे नावाची प्रत दाखल केली. सन-2009 मध्ये तक्रारकर्त्या कडून रुपये-20,000/- एवढी रक्कम विरुध्दपक्षाने स्विकारुनही आज पावेतो तक्रारकर्त्यास ट्रॉन्सफॉर्मर आणि विज पुरवठा केला नसल्याचे दिसून येते. तक्रारकर्त्याचे तक्रारी नुसार आणि लेखी युक्तीवादा नुसार त्यास आज पर्यंत विज पुरवठा मिळालेला नाही असे नमुद केलेले आहे. 12. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने, तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे. म्हणून तक्रारकर्ता, विरुध्दपक्षा कडून, ट्रॉन्सफॉर्मर व विज मीटर लावून मिळण्यास तसेच परिसरात वृक्षारोपण करुन मिळण्यास पात्र आहे. वि.प.चे दोषपूर्ण सेवेमुळे, तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-2000/- विरुध्दपक्षाकडून मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारकर्त्याच्या अन्य मागण्या या नामंजूर करण्यात येत आहेत. 13. उपरोक्त वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत- ::आदेश:: 1) तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात अंशतः मंजूर करण्यात येते. 2) विरुध्दपक्षास निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्ता राहत असलेल्या ठिकाणी ट्रॉन्सफॉर्मरची व्यवस्था करुन दयावी त्याच बरोबर तक्रारकर्त्याचे सदनीकेसाठी विज मीटर लावून देऊन विज पुरवठा सुरु करुन दयावा. तसेच तक्रारकर्ता राहत असलेल्या सदनीकेचे परिसरात वृक्षारोपण करुन देण्यात यावे. 3) तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-2000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास अदा करावे. 4) सदर आदेशाचे अनुपालन, विरुध्दपक्षाने प्रस्तुत निकालपत्र प्राप्त झाल्या पासून 45 दिवसांचे आत करावे. 5) तक्रारकर्त्याच्या अन्य मागण्या या नामंजूर करण्यात येत आहेत. 6) निकालपत्राची प्रमाणित प्रत सर्व संबधित पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी. |