आदेश पारित द्वारा ः श्री विजयसिंह ना. राणे अध्यक्ष आदेश (पारित दिनांक 22 मार्च 2011) तक्रारदाराचे वकील हजर. गैरअर्जदाराचे वकील हजर. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदाराने ही तक्रार वादातील मालमत्तेचे विक्रीपत्र गैरअर्जदार यांनी त्यांना करुन द्यावे आणि नोंदवुन द्यावे यासंबंधातील आहे व तशी मागणी त्यांनी या तक्रारीत केली आहे. तसेच नुकसान भरपाई मिळावी व तक्रारीचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार यांना या प्रकरणात नोटीस देण्यात आली. त्यांनी हजर होऊन आपला लेखी जवाब दाखल केला. गैरअर्जदाराने तक्रार मुदतीत नाही. तक्रारदार हे स्वतः नोंदणीकृत सदस्य नाही इत्यादी मुद्दे उपस्थित केले व इतर विपरित विधाने नाकबुल केले आणि तक्रार चुकीची आणि बेकायदेशिर आहे अशा स्वरुपाचा उजर घेतला. सदर प्रकरणात गैरअर्जदारांनी असा उजर घेतला की, तक्रारदाराने दिवाणी न्यायालय, कामठी येथे या संपत्ती बाबत दिवाणी दावा दाखल असुन त्याचा अनुक्रमांक 51/2010 असा आहे. त्यामुळे ही तक्रार खारीज करण्यात यावी. अशी विनंती केली. तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असुन तक्रारीसोबत एकुण 29 दस्तऐवज दाखल केले आहेत त्यात प्लाटचे वाटणी पत्र, असिस्टंट रजिस्टार कॉ-आपरेटिव्ह यांनी पाठविलेले पत्र, गैरअर्जदाराने पाठविलले पत्र, असिस्टंट रजिस्टार कॉ-आपरेटिव्ह यांनी वकीलास पाठविलेले पत्र, पैसे भरल्याच्या पावत्या, पोचपावती इत्यादी दस्तऐवज दाखल केले आहे. तर गैरअर्जदाराने आपल्या जवाबासोबत एकुण 6 एस्तऐवज दाखल केले आहेत त्यात तक्रारदाराने दिवाणी न्यायालय, कामठी येथे दाखल केलेल्या वादाची प्रत, मिटींगमधील ठरावाची प्रत, सहाय्यक निबंधक यांना दिलेल्या पत्राची प्रत, इत्यादी दस्तऐवज दाखल केले आहे. दोन्ही पक्षांचे वकीलांचा युक्तिवाद ऐकला. यामध्ये इतर मुद्दे विचारात घेण्यापुर्वी प्राथमिक मुद्दा विचारात घेऊन सदर चे प्रकरणात आदेश पारीत करणे योग्य आहे काय ? गैरअर्जदार यांनी, तक्रारदाराने दाखल केलेल्या मा. दिवाणी न्यायालयातील दाव्याची सत्यप्रत मंचासमक्ष दाखल केलेली आहे. ते दस्तऐवज तक्रारदारास मान्य आहे. त्यामध्ये तक्रारदाराने गैरअर्जदार यांना प्रतिवादी दर्शवुन त्यांचे विरुध्द दावा दाख केला आहे आणि त्यामध्ये वादातील मालमत्तेचे विक्रीपत्र करुन नोंदवुन द्यावे तसे न केल्यास न्यायालयीन कमिशनर मार्फत दावा नोंदवुन द्यावा असे आदेश व्हावे अशी मागणी केली आहे. तक्रारदाराचे सदर मालमत्ता ठेवल्याच तक्रार आहे. गैरअर्जदाराने त्या मालमत्ता कोणताही अडथळा करु नये अशी मागणी केली आहे. हा दावा दोन्हीपक्षाच्या मान्यतेने तक्रारदाराने पुर्वी दाखल केलेला आहे. असा दावा तक्रारीपुर्वी दाखल केलेला आणि आज रोजी प्रलंबीत असतांना या न्यायमंचाने कोणताही आदेश देणे चुकीचे होईल असे आमचे मत आहे. यास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश करित आहोत. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार निकाली काढण्यात येते. 2. उभयपक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. या निकालाचा विचार मा. दिवाणी न्यायालयाचे प्रकरणात करण्यात येऊ नये. 4. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना पाठविण्यात याव्या.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT | |