जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड यांचे समोर …...
ग्राहक तक्रार क्रमांक – 151/2011 तक्रार दाखल तारीख- 10/10/2011
अनंत पि. ज्ञानदेव कोल्हे,
वय – 45 वर्ष, धंदा – शेती
रा.मांगवडगांव (कोल्हे वस्ती),
ता.केज, जि.बीड. ....... तक्रारदार
विरुध्द
1. शितल कृषी सेवा केंद्र,
मार्केट यार्ड,कळंब ता.कळंब जि.उस्मानाबाद
2. व्यवस्थापक,
यशोदा हायब्रीड सीडस् प्रा.लि.,
रजि. ऑफिस 248, लक्ष्मी टॉकीज जवळ,
हिंगणघाट-442301,जि.वर्धा (म.रा) ........ सामनेवाले.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य
तक्रारदारातर्फे – वकील – ए.व्ही.कुलकर्णी,
सामनेवाले1तर्फे – वकील – ए.पी.कुलकर्णी,
सामनेवाले2तर्फे – वकील – एकतर्फा आदेश,
।। निकालपत्र ।।
( घोषितद्वारा अजय भोसरेकर, सदस्य)
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार मांगवडगाव (कोल्हे वस्ती) ता.केज जि.बीड येथील रहिवाशी असुन तेथे त्यांना सर्व्हे नं.174 व 150 मध्ये 4 एकर शेतजमीन आहे. सदर जमिनीची स्वतः वहिती करतात.
सामनेवाले नं.2 यांचे अधिकृत बियाणे विक्रेते सामनेवाले नं.1 शितल कृषी सेवा केंद्र, कळंब यांचेकडून बॅच नं.1319 सोयाबीन बी 362 च्या 25 किलो दोन बॅग ज्याची प्रति बॅग किंमत रु.1150/- प्रमाणे रक्कम रु.2,300/- रोख देवून विकत घेतल्या. सदर बीयाणाची रितसर पावती घेतली त्यांचा क्रं.1047 दि.9.7.2011 असा आहे.
तक्रारदाराने सामनेवाले नं.1 यांचेकडून विकत घेतलेले सोयाबीन बियाणे दि.10.7.2011 रोजी स्वतःचे मालकीच्या सर्व्हे नं.150 व 174 मध्ये 2 एकर शेतामध्ये लागवड केली. सदर बीयाणे चांगल्या प्रतीचे नसल्याने उगवलेच नाही. म्हणुन गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, पंचायत समिती, केज तसेच तालुका कृषि अधिकारी, तहसिलदार, केज यांचेके तक्रारी अर्ज दि.15.7.2011 रोजी दिला. त्यानुसार तालुका कृषि अधिकारी, केज यांनी प्रत्यक्ष शेतात येवून दि.18.7.2011 रोजी पंचनामा केला त्यावेळी त्यांना कुजलेले व बुरशी आलेल्या स्वरुपात बियाणे आढळून आले ते अत्यल्प उगवण झाली आहे असे निदर्शनास आले.
तक्रारदाराने कृषी अधिकारी यांचे पाहणीनंतर सामनेवाले नं.1 व 2 यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून वकिला मार्फत कायदेशीर नोटीस दि.3.8.2011 रोजी पाठविली. सामनेवाले यांनी सदर नोटीसीची दखल घेतली नाही अथवा उत्तरही दिले नाही. म्हणून तक्रारदाराने सदरची तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
तक्रारदाराने सदरच्या तक्रारीमध्ये पिकाची झालेली नुकसान भरपाई पोटी रक्कम रु.55,000/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- असे एकुण 75,000/- यावर तक्रार दाखल तारखेपासुन द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह सामनेवाले नं.1 व 2 यांचेकडून मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपले लेखी म्हणणेच्या पुष्ठयार्थ एकुण 08 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाले नं.1 यांनी आपले लेखी म्हणणे दि.13.02.2012 रोजी दाखल केले असुन तक्रारदाराने सामनेवाले नं.2 कंपनीने उत्पादीत केलेले सोयाबिण बी त्याचेकडून खरेदी केल्याचे मान्य केले आहे. परंतु कंपनीचे सुचनेनुसार प्रति एकर 50 कि.ग्रॅ. बियाणे म्हणजेच दोन बॅग बियाणाची पेरणी करावी लागते. तक्रारदाराने सदर बीयाणे दोन एकरमध्ये पेरणी केली हे धांदात खोटे आहे. तालुका कृषि अधिका-यांनी बियाणाची उगवन झाली नाही याबाबत केलेल्या पंचनाम्याबाबत या सामनेवालेस कांहीही माहिती नाही. तक्रारदारास तक्रार दाखल करण्याचे कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारदार हा कळंब तालुक्यातील रहिवाशी असल्याने शेतजमीन त्याच तालुक्यात असल्याने सदर न्यायमंचाचे कार्यक्षेत्रात येत नाही व चालविण्याचा अधिकार नाही, असेही सामनेवाले यांनी म्हंटले आहे. या सामनेवाले नं.1 विरुध्दची तक्रार खर्चासह खारीज करावी अशी विनंती केली आहे.
सामनेवाले नं.2 यांनी न्यायमंचाची दि.5.12.2011 रोजीची नोटीस घेण्यास इंनकार केले बाबतचे पोष्टाचे शे-यासह न्यायमंचाची नोटीस विनातामिल परत आल्यामुळे सामनेवाले नं.2 विरुध्द एकतर्फा प्रकरण चालविण्याचा निर्णय दि.13.1.2012 रोजी न्यायमंचाने घेतला.
सामनेवाले नं.1 यांनी आपले लेखी म्हणण्याचे पूष्ठयार्थ एकुण 01 कागदपत्र दाखल केलेली आहेत.
तक्रारदाराची तक्रार, सोबतची कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र, सामनेवाले नं.1 यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे सोबतची कागदपत्रे तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद याचे बारकाईने वाचन केले, सामनेवाले नं.1 यांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर त्याचे बारकाईने आवलोकन केले असता,
सामनेवाला क्र.1 यांचेकडून तक्रारदाराने बियाणे खरेदी केले आहे. सामनेवाला क्र.1 हे रा. कळंब जि. उस्मानाबाद येथील आहेत. त्यामुळे तक्रारदाराला तक्रार या न्यायमंचात चालवण्याचा अधिकार नाही असे म्हटले आहे. तसेच तक्रारदारास सदर तक्रार दाखल करण्यास कोणतेच कारण उदभवले नाही असे म्हटले आहे. यावर तक्रारदाराचे उपविभागीय कृषी अधिकारी अंबाजोगाई यांनी दिलेल्या अहवालावरुन तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांचे बियाणे पेरले व ते अल्प उगवले मुळे त्यांस सदर तक्रार दाखल करण्यास कारण प्राप्त झाले आहे तसेच उपविभागीय कृषी अधिका-यांचे अहवालाचे अवलोकन केले असता तक्रारदाराचे सोयाबीन बियाणे अत्यंत अल्प उगवले असल्याचे दिसते व बियाणे कुजलेले व बुरशी असलेल्या स्वरुपात आढळलेले दिसले आहे असेही म्हटले आहे. यावरुन सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 यांनी उत्पादिक केलेले विक्री केलेले बियाणे हे सदोष असल्यामुळे तक्रारदाराने दोन बॅगची किती उत्पन्न मिळते याबाबतचा पुरावा दाखल केला नाही.
त्यामुळे तक्रारदारास त्यांचे खरेदी केलेल्या दोन बॅगचे रक्कम रु.2300/- व पेरणी व पेरणी पुर्व व उत्तर मशागत तिचा खर्च अंदाजे रु.3000/- तसेच मानसिक त्रासापोटी रु.2000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1000/- मिळण्यास पात्र आहे असे या न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: करण्यात येते.
2. सामनेवाले नं.2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास दोन बॅगची रक्कम रु.2300/- (अक्षरी रुपये दोन हजार तिनशे फक्त) आदेश प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत अदा करावेत.
3. सामनेवाले नं.2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास पेरणी पुर्व व नंतरच्या मशागतीच्या खर्चापोटी रु.3000/-(अक्षरी रुपये तिन हजार फक्त) आदेश प्राप्ती पासून 30 दिवसांचे आंत अदा करावेत.
4. सामनेवाले नं. 2 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र.2 व 3 चे पालन मुदतीत न केल्यास दि.10.10.2011 पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याज देण्यास सामनेवाले क्र.2 जबाबदार राहतील.
5. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी प्रत्येकी रु.1000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी प्रत्येकी रु.1000/- (अक्षरी रु.एक हजार फक्त) तिस दिवसांत अदा करावेत.
6. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारास परत करावीत.
( अजय भोसरेकर ) ( पी. बी. भट )
सदस्य, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि.बीड