अर्जदारा तर्फे वकील - श्री.ए.एन.चव्हाण
गैरअर्जदार तर्फे वकील - श्री.पी.एस.भक्कड
निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्ष)
1. अर्जदाराची तक्रार ही गैरअर्जदारने दिलेल्या सेवेतील त्रुटीमुळे झालेल्या नुकसान भरपाई मिळणेसाठीची आहे.
अर्जदारची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे.
2. अर्जदार हा शेतीचा व्यवसाय करीत असून शेतीमाल विक्री करणेसाठी अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून वाहन घेतलेले आहे. अर्जदाराचे वाहनाचा नोंदणी क्रमांक एमएच 26/ 7699 असा आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून कर्जावर जाऊन पेमेंट पध्दतीने वाहनाची खरेदी केलेली आहे. परंतु सुरुवातीपासून कोणतेही कागदपत्रे न देता गैरअर्जदार यांनी व्यवहारात चुकीची पध्दती अवलंबलेली आहे. गैरअर्जदार यांनी आजपर्यंत कर्जाबाबतचे केलेल्या कराराची प्रत दिलेली नाही. तसेच कर्ज खात्याचा उताराही दिलेला नाही. कर्जाचे बाकीबाबत देखील कोणतेही लेखी पत्र दिलेले नाही. गैरअर्जदार तोंडी अवास्तव रक्कमेची मागणी करीत आहे जे कायद्यानुसार अभिप्रेत नाही. गैरअर्जदार यांनी वेळोवेळी विनंती करुनही वरील कागदपत्रे गैरअर्जदार यांनी दिलेली नाहीत. कर्ज देतेवेळी शेत सुध्दा तारण ठेवलेले आहे. गैरअर्जदार हा चुकीचे व्याजाची आकारणी करुन अवास्तव मागणी करीत आहे. अर्जदाराने आजपर्यंत नियमीत हप्ते दिलेले असून साध्या चिठठीवर रक्कम रु.10,74,137/- कर्जाची येणे दाखवून रक्कम रु.12,80,150/- जमा केल्याचे लिहून देऊन रक्कम रु.4,56,000/- ची तोंडी मागणी करीत आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे रक्कम रु.13,69,971/- जमा केलेले असून त्याच्या पावत्या जोडलेल्या आहेत. अर्जदाराने गैरअर्जदार यांना रजि.पोस्टाने दिनांक 27.12.2011 रोजी नोटीस पाठवून करारपत्रा संदर्भातील सर्व कागदपत्रे पाठविणेबाबत विनंती केली होती. परंतु गैरअर्जदार यांनी कुठलीही माहिती अर्जदारास दिलेली नाही. त्यामुळे सदरची तक्रार मंचासमोर दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदाराने गैरअर्जदार यांनी उपरोक्त वाहनाचे संदर्भात घेतलेल्या कर्जाची व आजपर्यंत परतफेडीपोटी केलेल्या रक्कमेचा तपशिलवार कागदपत्रे करारनाम्याच्या प्रतीसह देण्याबाबत आदेश द्यावेत. तसेच गैरअर्जदार यांचेकडून अर्जदार यांनी जमा केलेल्या जादा रक्कमेवर व्याज देणेबाबत आदेश व्हावेत. गैरअर्जदार यांनी सेवेत अनियमितता केल्यामुळे अर्जदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.50,000/- तसेच दावा खर्च रक्कम रु.10,000/- द्यावेत. अर्जदारास गैरअर्जदार यांनी कोणतीही कागदपत्रे दिलेली नसल्यामुळे अर्जदारास नाईलाजास्तव दावा दाखल करावा लागला त्याचा खर्च रक्कम रु.25,000/- गैरअर्जदार यांनी अर्जदारास द्यावेत. तसेच अर्जदाराचे वाहनास अडथळा येणार नाही अशी कृती गैरअर्जदार यांनी करु नये असा आदेश द्यावेत गैरअर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे विमा हप्ते स्वतः भरलेले आहेत, त्याचा हिशोबही सामाविष्ठ करावा अशी मागणी अर्जदाराने तक्रारीत गैरअर्जदार यांचेकडून केलेली आहे. 3. गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी वकीलमार्फत हजर होऊन लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे लेखी म्हणणे थोडक्यात पुढीलप्रमाणेः-
4. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या तक्रारीतील संपुर्ण कथन अमान्य केलेले असुन अर्जदार यांची तक्रार ग्राहक मंचास चालविणेचा अधिकार नाही. कारण लवाद कायदा कलम 8 नुसार अर्जदाराची तक्रार रद्य करण्यात यावी. अर्जदाराने सदरची तक्रार वाईट हेतुने दाखल केलेली असून अर्जदाराने गैरअर्जदार यांचे पैसे देण्यास विलंब व्हावा या उद्येशाने तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे सदरची तक्रार दाखल केल्यानंतर एकही रुपया जमा केलेला नाही. तसेच ठरवून दिलेला हप्ता देखील भरलेला नाही. अर्जदाराकडून आजमितीस एकूण रक्कम रु.5,29,055/- येणे बाकी आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून ट्रक विकत घेणेकरीता रक्कम रु.10,74,137/- चे कर्जही घेतलेले असून सदरील कर्जास 9 टक्के द.सा.द.शे. मंथली रेस्ट आहे. अर्जदार यांनी कर्जाची एकूण 47 मासिक हप्त्यांमध्ये परत करण्याचे मान्य केले. परतीची रक्कम रु.14,52,237/- अशी ठरलेली होती. पहिला मासिक हप्ता दिनांक 20.08ञ2008 रोजी देय असून शेवटचा मासिक हप्ता दिनांक 20.12.2011 रोजी देय होता. प्रतिमाह रु.30,906/- चा हप्ता होता. गैरअर्जदार यांनी रक्कम वेळोवेळी न दिल्यास थकीत रक्कमेवर 3 टक्के प्रतिमहाप्रमाणे दंड व्याज देण्याचे मान्य केलेले आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे रक्कम रु.13,32,649/- एवढी रक्कम जमा केलेली आहे. अर्जदाराचे विनंतीवरुन गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे ट्रकचा विमा 3 वेळेस काढलेला असून विम्याची रक्कम एका वर्षात 12 हप्त्यांमध्ये परत करण्याचे ठरले होते. गैरअर्जदारास अर्जदाराकडून रक्कम रु.77,520/- विम्याबद्दल व कर्जाच्या रक्कमेबाबत रु.5,29,055/- एवढी रक्कम येणे बाकी आहे अर्जदार हा स्वच्छ हाताने मंचासमोर आलेला नाही. अर्जदार यांनी ज्या ज्या वेळी पैसे भरले त्या त्या वेळेस त्याला पावत्या दिलेल्या आहेत. गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडून अवास्तव रक्कमेची मागणी कधीही केलेली नाही. अर्जदार यांनी गैरअर्जदार विरुध्द जाणुनबुजून खोटी तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे अर्जदार अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार यांनी लेखी जबाबाव्दारे केलेली आहे.
5. अर्जदार यांनी तक्रारीच्या पुराव्याकामी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अर्जदार व गैरअर्जदार यांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
6. अर्जदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन अर्जदाराची तक्रारीतील प्रमुख मागणी अशी आहे की, त्यांनी गैरअर्जदार यांचेकडून घेतलेल्या कर्जाच्या करारपत्राची प्रत तसेच कर्जाच्या रक्कमेचा परतफेडीपोटीचा तपशिल देणे संदर्भातील आहे. अर्जदाराच्या तक्रारीतील कथन असे आहे की, गैरअर्जदार यांनी अर्जदारास विनंती करुनही कर्जाचे संदर्भातील कागदपत्रे दिलेले नसल्याबद्दलचा आहे. त्यासाठी अर्जदारास दावा दाखल करावा लागलेला असून त्यासाठी झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई व दावाखर्चाची मागणी अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून केलेली आहे. अर्जदार यांनी तक्रार दाखल केल्यानंतर गैरअर्जदार यांनी तक्रारीमध्ये हजर होऊन कराराची प्रत, अर्जदाराचे वाहनाची घेतलेली विमा पॉलिसी तसेच अर्जदाराने कर्जाच्या पपरतफेडीपोटी भरलेल्या कर्ज खात्याचा उतारा(स्टेटमेंट) इत्यादी सर्व कागदपत्रे मंचासमोर दाखल केलेली असून त्याची प्रत अर्जदार यांना देण्यात आलेली आहे. यावरुन अर्जदाराच्या तक्रारीतील मागणी क्रमांक 1 व 2 ही पुर्ण झालेली असल्याचे दिसून येते. अर्जदाराने गैरअर्जदार यांना कर्जाच्या संदर्भातील कागदपत्रांची मागणी केलेली आहे. अर्जदाराने गैरअर्जदारास कागदपत्रे दिलेली नाहीत त्यासाठी अर्जदारास तक्रार दाखल करावी लागली. अर्जदाराने तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारीमध्ये गैरअर्जदार हजर झाल्यानंतर वरील सर्व कागदपत्रांची प्रत दाखल केलेली आहे. यावरुन अर्जदारास निश्चितच मानसिक व शारिरिक त्रास झालेला असावा. अर्जदार व गैरअर्जदार यांचेमध्ये झालेल्या कराराच्या नियम व अटी दोन्ही पक्षावर बंधनकारक असतात. करारातील नियम व अटींची माहिती दोन्ही पक्षास होणे क्रमप्राप्त असतांनाही गैरअर्जदार यांनी अर्जदारास कराराची प्रत दिलेली नाही. ही गैरअर्जदार यांनी अर्जदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेल्या सेवेतील त्रुटीमुळे निश्चितच मानसिक व शारिरिक त्रास झालेला आहे असे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2500/- आदेश कळाल्यापासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
3. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
4. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.