-- आदेश --
( पारित दि. 11.07.2011)
द्वारा सौ. अलका उमेश पटेल, सदस्या
तक्रारकर्ता श्री. अशोक कौशलसिंग चौधरी यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,
1 तक्रारकर्ता यांनी दि. 25.02.2008 ला वि.प.यांचा एजेंट मार्फत लाइफ टाईम गोल्ड पॉलिसी रु.25,000/- वार्षिक हप्ताप्रमाणे घेतली आहे. पॉलिसीचा क्रं. 07934130 UIN 105L077V01 असे आहे. त.क. यांनी पॉलिसीचा पहिला हप्ता रु.25,000/- भरलेला आहे व त्यानंतर काही दिवसात वि.प.यांचे गोंदियाचे ऑफिस बंद झाल्यामुळे त.क. यांना त्यांचेशी संपर्क करता आले नाही. त.क. यांनी एजंटला भेट देऊन पॉलिसीच्या कागदपत्राबद्दल विचारणा केली परंतु काही प्रतिसाद मिळाला नाही व पॉलिसी बंद झाली असून भरलेली संपूर्ण रक्कम परत मिळावे म्हणून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
2 तक्रारकर्ता मागणी करतात की, वि.प.यांनी पॉलिसीचा हप्ता म्हणून स्विकारलेले रु.25,000/- व्याजासह त.क.ला परत करावे. तसेच रु.25,000/-शारीरिक व मानसिक त्रासासाठी तसेच रु. 500/- न्यायालयीन खर्च म्हणून द्यावे.
3 वि.प. यांना विद्यमान मंचाचा नोटीस प्राप्त झाल्यावर सुध्दा ते मंचात हजर झाले नाही व त्यांनी आपले लेखी उत्तरही दाखल केलेले नाही.अश्या परिस्थितीत दि. 22.06.2011 ला त्यांचा विरोधात प्रकरण एकतर्फी चालविण्याचे आदेश करण्यात आले.
कारणे व निष्कर्ष
4 तक्रारकर्ता यांनी रेकॉर्डवर दाखल केलेली शपथपत्र, दस्ताऐवज , कागदपत्र व केलेला युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांनी वि.प.कडून दि.25.02.2008 ला रु.25,000/- वार्षिक हप्ता भरुन पॉलिसी घेतली आहे परंतु काही दिवसात वि.प.यांचे गोंदियाचे ऑफिस बंद झाले. परंतु वि.प.यांनी त.क.ला पॉलिसीबद्दल कोणतीही महिती किंवा सूचना दिलेली नाही. तसेच त.क.ने नोटीस दिल्यानंतर त्यांना मागच्या तारखेचे पॉलिसी सर्टिफिकेट मुळ पत्र देण्यात आले. नंतर वि.प.द्वारा दि.30.04.11 ला पत्र व सोबत रु.4909.99 चे धनादेश पाठविण्यात आले. परत वि.प.यांनी त.क.ला दि. 11.05.2011 ला दुसरे पत्र पाठविले. त्यामध्ये सांगितले आहे की, रु.9409.09 चा धनादेश नष्ट करा आम्ही तुम्हाला दुसरा नविन धनादेश पाठवू परंतु अजून पर्यंत त्यांनी धनादेश पाठविलेला नाही ही बाब त्यांच्या सेवेतील न्यूनता आहे. वि.प.यांनी पॉलिसीचे रु.25,000/- स्विकारले आहे ही बाब नाकारता येत नाही. म्हणून वि.प. यांनी त.क.ला पॉलिसीची संपूर्ण रक्कम रु.25,000/- परत करावे असे मंचाचे मत आहे.
असे तथ्य व परिस्थिती असतांना सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
1 त.क. यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 वि.प. यांनी त.क. ला पॉलिसीचे भरलेले रु.25000/- परत करावे.
3 वि.प.यांनी त.क. यांना शारीरिक, मानसिक त्रासासाठी रु.3000/- व न्यायालयीन
खर्च म्हणून रु.500/- द्यावे.
4. विरुध्द पक्ष यांनी आदेशाचे पालन हे आदेश पारीत तारखेपासून 30 दिवसाच्या
आत करावे.
(सौ. अलका उमेश पटेल) (श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, गोंदिया