सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 77/2015.
तक्रार दाखल दि.18-04-2015.
तक्रार निकाली दि.03-10-2015.
समशेरबहादूर हिंदूराव नाईक-निंबाळकर,
रा. फलटण,ता.फलटण,जि.सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
1. श्रीमंत मालोजीराजे सहकारी गृहतारण संस्था मर्या.,
फलटण,लक्ष्मीनगर,फलटण,ता. फलटण, जि.सातारा, तर्फे
चेअरमन, दुर्योधन दत्तात्रय रणनवरे
2. संस्थापक/चेअरमन, श्री. दुर्योधन दत्तात्रय रणनवरे,
रा. दत्तकृपा,गोळीबार मैदान, संभाजीनगर,
फलटण, ता.फलटण,जि.सातारा
3. चेअरमन,श्री. शंतनु दुर्योधन रणनवरे,
रा. दत्तकृपा, गोळीबार मैदान, संभाजीनगर,
गोळीबार मैदान, फलटण, ता.फलटण,जि.सातारा
4. व्हा.चेअरमन, श्री. देवराज विश्वासराव जाधव,
रा. गोळीबार मैदान,फलटण,
ता.फलटण,जि.सातारा
5. संचालक, श्री. प्रकाश प्रतापराव जाधव,
रा. संजीव राजेनगर,
ता. फलटण जि. सातारा.
6. संचालक, श्री. पुरुषोत्तम लक्ष्मण बक्षी,
रा. रॉयल रेसिडेन्सी, कसबा पेठ, फलटण,
ता.फलटण,जि.सातारा
7. संचालिका, सौ.शारदादेवी दुर्योधन रणनावरे,
रा. दत्तकृपा,गोळीबार मैदान,
फलटण, ता.फलटण,जि.सातारा .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.ए.आर.कदम.
जाबदार क्र.3 ते 6 तर्फे अँड.ए.आर.कदम.
जाबदार क्र.1,2 व 7 – एकतर्फा.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला
1. तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे फलटण, जि.सातारा येथील कायमस्वरुपी रहिवासी आहेत. जाबदार क्र.1 ही सहकार कायद्याप्रमाणे स्थापन झालेली सहकारी पतसंस्था असून ग्राहकांकडून ठेवी स्वरुपात रक्कम स्विकारुन मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी ग्राहकांनी रक्कम मागीतल्यास सदर रक्कम परत देणे अशा उद्देशाने स्थापन झाली आहे. तक्रारदाराने जाबदार पतसंस्थेत खालील कोष्टकात नमूद केलेप्रमाणे मुदत ठेव योजनेत रक्कम गुंतवली होती व आहे.
अ.क्र. | ठेवपावती क्र. | ठेव रक्कम | ठेव ठेवली तारीख | मुदत संपते तारीख |
1 | 031255 | 3,00,000/- | 10/11/2010 | 10/11/2011 |
2 | 031256 | 3,00,000/- | 10/11/2010 | 10/11/2011 |
3 | 031257 | 3,00,000/- | 10/11/2010 | 10/11/2011 |
4 | 031258 | 3,00,000/- | 10/11/2010 | 10/11/2011 |
| एकूण | 12,00,000/- | | |
वर नमूद तपशिलाप्रमाणे जाबदार यांचेकडून तक्रारदार यांना ठेवींची एकूण रक्कम रु. 12,00,000/- (रुपये बारा लाख मात्र) व त्यावरील आजअखेरचे व्याज जाबदार हे तक्रारदार यांना देणे लागत आहेत आणि प्रस्तुत ठेवीची रक्कम मुदत संपल्यानंतर व्याजासह जाबदाराने तक्रारदार यांना देणे बंधनकारक होते व आहे. परंतू तक्रारदाराने प्रस्तुत ठेवच्या मुदत संपलेनंतर ठेवीच्या रकमेची व्याजासह जाबदार यांचेकडे मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम देणेस टाळाटाळ केली व आजअखेर तक्रारदार यांना ठेवीची रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे. म्हणून त्याचा तक्रारदाराला मानसिक व शारिरीक त्रास झालेला असलेने जाबदार यांचेकडून सदर ठेवीच्या सर्व रकमा व्याजासह वैयक्तीक व संयुक्तिकरित्या वसूल होऊन मिळावी व नुकसानभरपाई मिळावी म्हणून तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज मे मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदार यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या रक्कम रु.12,00,000/- (रुपये बारा लाख मात्र) प्रस्तुत ठेवपावतीवर नमूद व्याजासह वसूल होवून मिळावी व प्रस्तुत रकमेवर दि. 10/11/2011 पासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याज मिळावे, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.3,00,000/-, तर तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.50,000/- जाबदार यांचेकडून मिळावा, अशी विनंती तक्रारदाराने या कामी केली आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी नि.4 चे कागदयादीसोबत नि.4/1 ते 4/2 कडे जाबदार संस्थेत मुदत ठेव ठेवलेल्या ठेवपावत्यांच्या सत्यप्रती, नि.7 कडे नोटीसचे लखोटे, व पोहोचपावत्या, नि. 8 कडे ठेवपावत्या व्हेरीफाय करणेसाठीचा अर्ज व व्हेरिफाय केलेल्या ठेवपावत्या, नि. 14 चे कागदयादीसोबत नि. 14/1 कडे जाबदार पतसंस्थेच्या संचालक मंडळाची यादी वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1,2 व 7 यांना नोटीस लागू होऊनसुध्दा ते मे मंचात गैरहजर राहीलेने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि. 1 वर पारीत झालेला आहे. तर जाबदार क्र. 3 ते 6 हे याकामी हजर झाले परंतू त्यांनी विहीत मुदतीत म्हणणे दाखल केलेले नसल्याने प्रस्तुत जाबदार क्र. 3 ते 6 यांचेविरुध्द ‘म्हणणे नाही’ (No-Say) आदेश पारीत झालेले आहेत. त्यामुळे जाबदार क्र. 1 ते 7 यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. सबब प्रस्तुतचे प्रकरण जाबदार क्र. 1 ते 7 यांचेविरुध्द एकतर्फा चालविणेत आले.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे.मंचाने प्रस्तुत कामी प्रस्तुत तक्रारीचे निराकरणार्थ खालील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदाराना सदोष सेवा पुरवली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? खालील नमूद
केलेप्रमाणे.
विवेचन
मुद्दा क्र.1 व 2-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण-
प्रस्तुत तक्रारदाराने जाबदार क्र1 पतसंस्थेत खालील परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे केलेली रक्कम मुदतठेव योजनेत गुंतविली होती व आहे.
अ.क्र. | ठेवपावती क्र. | ठेव रक्कम | ठेव ठेवली तारीख | मुदत संपते तारीख |
1 | 031255 | 3,00,000/- | 10/11/2010 | 10/11/2011 |
2 | 031256 | 3,00,000/- | 10/11/2010 | 10/11/2011 |
3 | 031257 | 3,00,000/- | 10/11/2010 | 10/11/2011 |
4 | 031258 | 3,00,000/- | 10/11/2010 | 10/11/2011 |
| एकूण | 12,00,000/- | | |
प्रस्तुत ठेवपावत्यांची व्हेरिफाईड प्रती याकामी तक्रारदाराने नि. 4 चे कागदयादीसोबत नि. 4/1 ते नि.4/2 कडे व नि. 8/1,8/2 व 8/3 कडे दाखल केल्या आहेत. म्हणजेच तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत व होते हे स्पष्ट होते. तक्रारदाराने याकामी जाबदार क्र. 1 पतसंस्थेच्या संचालक मंडळाची यादी दाखल केलेली नाही. प्रस्तुत ठेवींची मुदत संपलेनंतर तक्रारदाराने जाबदार यांचेकडे रकमेची व्याजासह मागणी केली असता जाबदाराने रक्कम देणेस टाळाटाळ केली व रक्कम तक्रारदाराला अदा केली नाही हे तक्रारदाराचे कथन योग्य व विश्वासार्ह वाटते कारण प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1,2 व 7 हे नोटीस मिळूनही मंचात हजर राहीले नाहीत म्हणून त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत झाला आहे. तसेच जाबदार क्र. 3 ते 6 यांनी हजर होवूनही तक्रार अर्जावर कोणतेही म्हणणे दाखल केलेले नाही त्यामुळे त्यांचेविरुध्द ‘म्हणणे नाही’ आदेश नि. 1 वर पारीत झाला आहे. म्हणजेच जाबदार क्र. 1 ते 7 यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन नाकारलेले नाही अथवा खोडून काढलेले नाही हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे तक्रारदाराने त्यांच्या वरील परिशिष्टात नमूद ठेवपावत्यांची ठेवीची व्याजासह रक्कम मुदतीनंतर तक्रारदाराने जाबदारांकडे वारंवार मागणी करुनही जाबदारांनी अदा केलेली नाही हे स्पष्ट सिध्द होत आहे. त्यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. सबब आम्ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
जाबदार यांनी तक्रारदार यांना ठेवीची रक्कम व्याजासह अदा करणे बंधनकारक असूनही जाबदाराने प्रस्तुत ठेवीची रक्कम तक्रारदारास अदा केलेली नाही ही सेवेतील त्रुटीच आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब जाबदार क्र. 1 ते 7 यांना वैयक्तिक व संयुक्तीकपणे तक्रारदाराला वरील परिशिष्टात नमूद ठेवपावत्यांची त्या ठेवपावतींवरील नमूद केले व्याजदराने होणा’या व्याजासह रक्कम तक्रारदारास अदा करणेसाठी Co-operative corporate veil नुसार जबाबदार धरणेत येते. सबब प्रस्तुत कामी आम्ही मा.उच्च न्यायालय मुंबई यांचे रिट पिटीशन क्र.117/2011- मंदाताई संभाजी पवार विरुध्द स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र या न्यायनिवाडयाचा व त्यातील दंडकांचा आधार घेतला आहे.
7. सबब आम्ही प्रस्तुत कामी खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-
-ः आदेश ः-
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदार क्र. 1 ते 7 यांना वैयक्तीक व संयुक्तीकरित्या तक्रारदाराची अनुक्रमे ठेवपावती क्र. 031255, 031256, 031257, 031258 वरील संपूर्ण रक्कम प्रस्तुत ठेवपावतीवर नमूद केले व्याजदाराने होणा-या व्याजासह तक्रारदार यांना अदा करणेसाठी जबाबदार धरणेत येते.
3. जाबदार क्र. 1 ते 7 यांना वैयक्तीक व संयुक्तीकरित्या तक्रारदाराची अनुक्रमे ठेवपावती क्र. 031255, 031256, 031257, 031258 वरील संपूर्ण रक्कम प्रस्तुत ठेवपावतीवर नमूद केले व्याजदाराने होणा-या व्याजासह तक्रारदार यांना अदा करावी. प्रस्तुत व्याजासह रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजाने होणारी सर्व रक्कम जाबदार क्र. 1 ते 7 यांना वैयक्तीक व संयुक्तीकरित्या तक्रारदार यांना अदा करावी.
4. तक्रारदाराला झाले मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/-(रुपये पंधरा हजार मात्र) जाबदार क्र. 1 ते 7 यांना वैयक्तीक व संयुक्तीकरित्या तक्रारदारांना अदा करावेत
5. अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र) जाबदार क्र. 1 ते 7 यांना वैयक्तीक व संयुक्तीकरित्या तक्रारदारांना अदा करावेत.
6. वरील सर्व आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसात जाबदार क्र. 1 ते 7 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे करावे.
7. आदेशाची पूर्तता विहीत मुदतीत न केलेने तक्रारदाराला ग्राहक संरक्षण
कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची प्रक्रिया करणेची मुभा
राहील.
8. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
9. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि.03-10-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.