जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –52/2011 तक्रार दाखल तारीख –09/03/2011
संजय पि.साहेबराव साळुंके
वय 24 वर्षे,धंदा नौकरी .तक्रारदार
रा.जवळगांव ता.अंबाजोगाई जि.बीड
विरुध्द
1. प्रो.प्रा.सिध्दीविनायक फ्राईट प्रा.लि.
अंबाजोगाई बसस्थानक ता.अंबाजोगाई
जि.बीड ..सामनेवाला
2. प्रो.प्रा.सिध्दीविनायक फ्राईट प्रा.लि.
पहिला मजला,श्रीराम कॉम्प्लेक्स, लोकमत ऑफीसच्यावर
साकरी रोड, धुळे.
3. आगार प्रमुख
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, अंबाजोगाई
ता.अंबाजोगाई जि.बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.एन.एम.कुलकर्णी
सामनेवाले क्र. 1 व 2 तर्फे :- अँड.एस.बी.शेख
सामनेवाले क्र.3 तर्फे ः- अँड.जी.बी.कोल्हे.
निकालपत्र
( श्री.अजय भोसरेकर, सदस्य )
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार हा जवळगांव ता.अंबाजोगाई येथील रहिवासी असून त्यांने सामनेवाला क्र.1 यांचेमार्फत त्यांचे भाऊ महादेव साहेबराव साळुंके हल्ली मु.कोल्हापुर यांचे आर्मीचे पे बुक व सर्व्हीस बूक अशी महत्वाची कागदपत्रे गांवी विसरल्यामुळे सामनेवाला क्र.1 यांचेकडून कूरिअरने पाठविले. दि.10.10.2010 रोजीची पावती नंबर 3666735 असून त्या कूरिअरपोटी रु.30/- एवढा चार्ज सामनेवाला क्र.1 यांनी आकारला आहे. सामनेवाला क्र.1 हे सामनेवाला क्र.2 यांचे वतीने काम पाहतात व सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.3 यांचे अधिकृत प्रतिनिधी आहेत. तक्रारदराने सामनेवाला क्र.1 यांचेकडे वारंवार कूरिअर बाबत चौकशी करत राहिले व त्यांनी उडवाउडवी व टाळाटाळाची उत्तरे दिली. त्यामुळे तक्रारदाराने नाईलाजाने अध्यक्ष ग्राहक पंचायत अंबाजोगाई यांचेमार्फत दि.15.11.2010 रोजी एक लेखी पत्र सामनेवाला क्र.1 व 3 यांचेकडे पाठविले. त्या पोहचचे उत्तर त्यांनी दिले नाही. म्हणून तक्रारदाराने दि.10.01.2011 रोजी सामनेवाला क्र.1 ते 3 यांना कायदेशीर नोटीस पाठविली. त्यात त्यांनी नोटीसला लेखी उत्तर देऊन संपूर्ण जबाबदारी टाळलेली आहे.
तकारदाराने सर्व्हीस बूक, आर्मी पे बूक कूरिअरने पाठविले ते न मिळाल्यामुळे सैन्य दलाचे नियमाप्रमाणे अंति गंभीर स्वरुपाचा गून्हा मानला जातो व त्या शिक्षेचेपोटी तक्रारदारास प्रतिमहा रु.20,000/-चे मासिक पगार व त्यावरील भांडे रु.2,000/- असे दोन महिल्याचा रु.44,000/-दंड भरावा लागला.
तक्रारदाराने दोन महिन्याचा दंडात्मक कारवाईचा पगार रु.44,000/-,मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व त्यासाठी तक्रारदारास कोल्हापुर रत्नागिरी अन्य गांवी प्रवास व रिक्षा खर्च करावा लागला यासाठी रु.15,000/- व त्यावर 18 टक्के व्याज याप्रमाणे मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपल्या म्हणण्याचे पुष्टयर्थ एकूण 9 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाला क्र.1 व 2 यांनी आपले लेखी म्हणणे दि.07.08.2011 रोजी दाखल केले असून तक्रारदाराने पार्सल पावती नंबर 36666735 दि.10.10.2010 रोजीचे रु.30/- भरुन कूरिअर केले आहे हे त्यांना मान्य आहे. परंतु तक्रारदाराने केलेली तक्रार ही खोडसाळपणाची व त्रास देण्याचे उददेशाने केली आहे. सदर तक्रार ही सामनेवाला क्र.1 व 2 यांना अमान्य आहे. त्यामुळे तक्रार खर्चासह खारीज करावी अशी मागणी केली आहे. सामनेवाला क्र.1 व 2 हे एकमेकाचे पुरक व्यावसायीक म्हणून काम करतात हे मान्य आहे.
सामनेवाला क्र.3 यांचे वाहक बी.डी.ठोंबरे यांचेकडे दि.11.10.2010 रोजी सामेनवाला क्र.1 यांनी अंबाजोगाई येथून रत्नागिरीकडे जाणा-या बसच्या वाहकाकडे सूपूर्द केले व त्या बददलचा दि.22.10.2010 रोजीचा लेखी अहवाल श्री. ठोबरे यांनी दिला आहे.
सामनेवाला क्र.3 यांनी आपले लेखी म्हणणे दि.07.05.2011 रोजी दाखल केले असून,सामनेवाला क्र.2 हे त्यांचे अधिकृत परवानाधारक आहेत हे त्यांना मान्य आहे. त्यांचा परवाना कालावधी दि.1.10.2009 ते 30.09.2011 पर्यत आहे असे म्हटले असून तक्रारदाराची तक्रार अमान्य केली आहे. त्यांचे म्हणण्याचे सोबत त्यांनी श्री.बी.डी.ठोंबरे या वाहकाने दि.08.10.2010 रोजी ते दि.11.10.2010 अशा दिनांकाचे सामनेवाला क्र.1 यांचे कूरिअरचे पत्र पावती नंबरचे उल्लेखीत असणारे दाखल केले आहे व त्यांचे मागे एक कूरिअर मिळाले असा उल्लेख दि.11.10.2010 चा दिसून येत आहे. परंतु या पावतीचे अवलोकन केले असता तक्रारदाराच्या पावतीचा नंबर 3666735 या यादीत दिसून येत नाही. सामनेवाला क्र.3 यांनी आम्ही कोणत्याही प्रकारची तक्रारदाराची सेवा घेतली नसल्यामुळे तक्रारदाराची तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी अशी मागणी केली आहे.
तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे व त्यां संबंधीची कागदपत्रे व तोंडी युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन केले असता तक्रारदाराने आपल्या भावाच्या म्हणजेच महादेव साळूंके यांचा दोन महिन्याचा पगार सैन्य दलाने दंडात्मकरित्या कापला या बाबतचा कोणताही पुरावा या जिल्हा मंचात दाखल केलेला नाही परंतु तक्रारदाराचा भाऊ हा सैन्य दलात असल्याबददलचा पूरावा या जिल्हा मंचात दाखल केलेला आहे. त्यावरुन सैन्य दलाच्या कायदयानुसार महत्वाचे कागदपत्र गहाळ होणे हा सेवा नियमानुसार गून्हा असल्यामुळे त्यांस दंड झाला असेल हे नाकारता येत नाही.
सामनेवाला क्र.1 व 2 यांनी आपल्या लेखी म्हणण्यात फक्त कुरिअर त्यांचेकडे दिल्याचे मान्य केले असून त्यांनी तो कूरिअर तक्रारदारानी पाठविला त्यांचे भावास दिल्याचा कोणताही पुरावा व अन्य पुरावे या मंचात दाखल केलेले नाहीत. तसेच सामनेवाला क्र.3 यांनी आपले लेखी म्हणण्यात आम्ही तक्रारदारास कोणतीही सेवा दिलेली नाही. त्यामुळे तक्रार हा आमचा ग्राहक नाही म्हणून तक्रार खारीज करावी असे म्हटले परंतु त्यांचेसोबत श्री.बी.डी.ठोंबरे यांची दाखल केलेली संगणीकृत कूरिअरची यादी , या यादीमध्ये कूठेही तक्रारदाराच्या पावती क्र.3666735 चा उल्लेख दिसून येत नाही. म्हणजेच तक्रारदारास दयावयाच्या सेवेत कसूर हा सामनेवाला यांनी कसुर केलेला आहे हे सिध्द होते.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशत मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला क्र.1 ते 3 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास कूरिअरच्या नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.15,000/-(अक्षरी रु.पंधरा हजार फक्त) संयूक्तीक अथवा वैयक्तीक आदेश प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत अदा करावी.
3. सामनेवाला क्र.1 ते 3 यांना आदेश देण्यात येतो की,आदेश क्र.2 चे पालन मूदतीत न केल्यास दि.10.10.2010 पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याज तक्रारदाराच्या पदरीपडेपर्यत देण्यास सामनेवाले जबाबदार राहतील.
4. सामनेवाला क्र.1 ते 3 यांना आदेश देण्यात येतो की, प्रत्येकी मानसिक त्रासापोटी रु.2,000/-(अक्षरी रु.दोन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी प्रत्येकी रु.1,000/- (अक्षरी रु.एक हजार फक्त) आदेश प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत तक्रारदारास दयावेत.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड