(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौ.जागीरदार, सदस्या)
(पारीत दिनांक– 26 नोव्हेंबर, 2019)
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष श्री श्याम बबनराव चन्ने, बांधकाम ठेकेदार याचे विरुध्द घराचे बांधकामा संबधात दोषपूर्ण सेवा आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे कारणावरुन प्रस्तुत ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती ही महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीमध्ये सध्या भंडारा डिव्हीजन अंतर्गत कारधा सबस्टेशन येथे कार्यरत आहे आणि ती सध्या भाडयाचे घरात उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत आहे. विरुध्दपक्ष हा व्यवसायाने बांधकाम ठेकेदार आहे. तक्रारकर्तीचे मालकीचा मौजा नविन कारधा, अर्जुन अॅकडमी जवळ तालुका जिल्हा भंडारा येथे तलाठी साझा क्रं 17, गट क्रं -63/02/30 येथे भूखंड क्रं 7 आहे आणि तिने सन-2015 मध्ये सदर भूखंडावर पक्के पायव्याचे बांधकाम पूर्ण केले होते.
तक्रारकर्तीला सदर जागेवर तळमजला आणि पहिल्या मजल्याचे सर्व सोयी सुविधांसह घराचे बांधकाम करावयाचे होते आणि यासाठी तिने विरुध्दपक्ष बांधकाम ठेकेदार याची भेट घेतली असता विरुध्दपक्षाने संपूर्ण घर बांधकाम करुन देण्याची तयारी दर्शविली होती, त्यावेळी तक्रारकर्तीने दोन मजली ईमारत सर्व सोयी सुविधांसह ज्यामध्ये टाईल्स, पुटींग,पीओपी, मॉडयुलर किचन, वॉल कम्पाऊंड, टॉवर व उत्तम प्रतीचे पेंट असलेले घर तयार करण्याची ईच्छा व्यक्त केली असता विरुध्दपक्षाने सदर घराचे संपूर्ण बांधकामास मजूरी व साहित्यासह एकूण रुपये-15,00,000/- खर्च येणार असल्याचे सांगितले होते. तसेच विरुध्दपक्षाने असेही सांगितले होते की, त्याचे कॉर्पोरेशन बँक शाखा भंडारा येथील अधिकारी व कर्मचारी यांचेशी चांगले संबध असून तो घरासाठी कर्ज काढून देऊ शकतो, त्यानुसार कर्ज संबधी सर्व दस्तऐवजी प्रक्रिया पूर्ण पार पाडल्या नंतर तक्रारकर्तीला कॉर्पोरेशन बँके कडून घराचे बांधकामा साठी एकूण रुपये-17,35,000/- एवढया रकमेचे कर्ज मंजूर झाले होते.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष बांधकाम ठेकेदाराने तिचे नावे असलेले कॉर्पोरेशन बँकेचे पासबुक आणि धनादेश पुस्तीका स्वतःजवळच ठेवली होती तसेच को-या धनादेशावर तिच्या सहया घेतल्या होत्या परंतु कर्ज मंजूरीचे दिनांकास म्हणजे दिनांक-09.12.2016 रोजी तक्रारकर्तीला कोणतीही माहिती न देता परस्पर विरुध्दपक्षाने रुपये-7,00,000/- एवढया रकमेची उचल कॉर्पोरेशन बँक भंडारा येथून केली होती. दिनांक-09.12.2016 रोजी कर्ज रकमेचा प्रथम हप्ता रुपये-7,00,000/- रकमेची उचल करुनही विरुध्दपक्षाने प्रत्यक्ष घराचे बांधकाम मार्च-2017 मध्ये सुरु केले आणि हया अवधी पर्यंत मंजूर कर्ज रकमे पैकी दुस-या टप्प्याचे रकमेची सुध्दा विरुध्दपक्षाने उचल केली होती. विरुध्दपक्ष बांधकाम ठेकेदार याने चार वेगवेगळया धनादेशाव्दारे दिनांक-14.06.2017 रोजी पर्यंत मंजूर संपूर्ण कर्ज रक्कम रुपये-17,35,000/- ची उचल केली होती. परंतु विरुध्दपक्ष बांधकाम ठेकेदार याने संपूर्ण कर्ज रकमेची उचल करुनही माहे जानेवारी-2018 पर्यंत फक्त घराच्या भिंती, स्लॅब व प्लॉस्टर एवढीच कामे करुन उर्वरीत घराचे बांधकाम बंद केले. त्यानंतर वेळोवेळी तक्रारकर्तीने प्रत्यक्ष आणि दुरध्वनीव्दारे विरुध्दपक्ष बांधकाम ठेकेदाराशी संपर्क साधून उर्वरीत घराचे बांधकाम पूर्ण करुन देण्याची विनंती केली परंतु त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ केली. विरुध्दपक्षाने घराचे बांधकाम अपूर्ण ठेवले परंतु कर्ज परतफेडीचे हप्ते तिचे मासिक वेतनातून कपात करणे सुरु झाले होते. तक्रारकर्तीने माहे फेब्रुवारी-2018 मध्ये कॉर्पोरेशन बँक भंडारा येथे कर्ज रकमेच्या खात्याचे विवरणा बाबत चौकशी केली असता तिला मंजूर संपूर्ण कर्ज रकमेची उचल झालेली असल्याचे समजले. तक्रारकर्तीचे धनादेश पुस्तीकेतील धनादेश क्रं-307801 ते 307804 अशा एकूण चार धनादेशाव्दारे मंजूर संपूर्ण कर्ज रक्कम रुपये-17,35,000/- ची उचल विरुध्दपक्ष बँक ठेकेदाराने केली होती परंतु त्याने घराचे अर्धवट काम केले होते आणि फीनीशींगचे काम सुध्दा सोडून दिले होते.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिला कर्ज खात्या संबधी उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे माहिती मिळाल्यावर तिने विरुध्दपक्षाकडे उर्वरीत बांधकामा बाबत चौकशी केली असता ठरल्या प्रमाणे घराचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले परंतु आज पर्यंत ठरल्या प्रमाणे संपूर्ण घराचे बांधकाम पूर्ण केले नाही, त्यावर तिने एकतर उर्वरीत बांधकाम पूर्ण करुन द्यावे अन्यथा पैसे परत करावेत अशी मागणी विरुध्दपक्षाकडे केली असता विरुध्दपक्षाने तिला धमकी दिली. तक्रारकर्तीचे पतीने विरुध्दपक्षा विरुध्द पोलीस मध्ये रिपोर्ट केला असता विरुध्दपक्षाने ठरल्या प्रमाणे घराचे बांधकाम पूर्ण करुन देतो असे पोलीसांना सांगितले. विरुध्दपक्षाने दिनांक-21 जुलै, 2018 रोजी घर बांधकाम अटीचा संक्षीप्त करारनामा नोटरी समोर तक्रारकर्तीला नोंदवून दिला, त्या करारनाम्या नुसार विरुध्दपक्षाला माहे नोव्हेंबर-2018 पर्यंत ठरल्या प्रमाणे घराचे संपूर्ण बांधकाम पूर्ण करुन द्यावयाचे होते परंतु आज पर्यंत त्याने कुठलेही नविन काम सुरु केलेले नाही. शेवटी तक्रारकर्तीने वकीलांचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने दिनांक-17.12.2018 रोजी विरुध्दपक्षास नोटीस पाठविला परंतु पोस्टाची सुचना मिळूनही त्याने सदर नोटीसचे पॉकीट स्विकारले नाही. तक्रारकर्तीला घराचे कर्जाचे परतफेडीपोटी दरमहा रुपये-1800/- बँकेत भरावे लागत आहे परंतु तिला घराचे उपभोगापासून वंचित राहावे लागत असून प्रतीमाह रुपये-4000/- घराचे भाडे द्यावे लागत आहे.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिने विरुध्दपक्ष बांधकाम ठेकेदार याने केलेल्या घराचे बांधकाम कामाचे मुल्यांकन अन्य सिव्हील अभियंता याचे कडून केले असता ते रुपये-4,50,000/- एवढया रकमेपेक्षाही कमी असल्याचे आढळून आले. अशाप्रकारे विरुध्दपक्षाला घराचे संपूर्ण बांधकामाची रक्कम मिळूनही त्याने ठरल्या प्रमाणे घराचे संपूर्ण बांधकाम सर्व सोयीसुविधांसह न करता ते बांधकाम अर्धवट सोडून देऊन तिला दोषपूर्ण सेवा दिलेली आहे.
म्हणून शेवटी तिने विरुध्दपक्ष बांधकाम ठेकेदार याचे विरुध्द तक्रारीव्दारे खालील प्रमाणे मागण्या केल्यात.
(1) विरुध्दपक्ष बांधकाम ठेकेदाराने करारा प्रमाणे व ठरल्या प्रमाणे तक्रारकर्तीचे घराचे उर्वरीत बांधकाम दोन महिन्याचे आत पूर्ण करुन देण्याचे आदेशित व्हावे. परंतु असे करणे विरुध्दपक्षास शक्य नसल्यास उर्वरीत बांधकामाचा खर्च, नुकसान भरपाई आणि झालेला खर्च असे मिळून रुपये-15,00,000/- विरुध्दपक्षा कडून तिला देण्यात यावे.
(2) तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक, मानसिक आणि आर्थिक त्रास बद्यल रुपये-3,00,000/-एवढी नुकसान भरपाई विरुध्दपक्षा कडून देण्यात यावी असे आदेशित व्हावे.
(3) याशिवाय तक्रारकर्तीला प्रस्तुत तक्रारीचा खर्च, वकीलांची फी असे मिळून रुपये-30,000/- विरुध्दपक्ष याचे कडून देण्याचे आदेशित व्हावे.
(4) या शिवाय योग्य ती दाद तक्रारकर्तीचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष बांधकाम ठेकेदारास ग्राहक मंचाचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविली असता सदरची नोटीसची सूचना दिनांक-05.03.2019 रोजी मिळूनही त्याने ती स्विकारली नसल्याने “Refused Return to Sender” या पोस्टाचे शे-यासह परत आली. सदरचे नोटीचे पॉकीट पान क्रं-29 व 30 वर अभिलेखावर दाखल आहे. अशाप्रकारे ग्राहक मंचाची नोटीसची सुचना प्राप्त होऊनही विरुध्दपक्षाने सदर नोटीस स्विकारली नसल्याने त्याचे विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश ग्राहकमंचाव्दारे दिनांक-02 मे, 2019 रोजी पारीत करण्यात आला.
04. तक्रारकर्तीने तक्रारीचे पृष्टयर्थ दस्तऐवज यादी पृष्ठ क्रं- 11 नुसार एकूण-06 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्या असून ज्यामध्ये उभयपक्षां मधील घर बांधकाम करारनामा प्रत, तक्रारकर्तीचे बँकेच्या पासबुकाची प्रत, विरुध्दपक्षा विरुध्द पोलीस स्टेशन कारधा येथे केलेली तक्रार, तक्रारकर्तीने वकीलांचे मार्फतीने विरुध्दपक्षास रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस, रजिस्टर पोस्टाची पावती आणि विरुध्दपक्षाने रजि.नोटीस स्विकारण्यास नकार दिल्याने परत आलेले बंद पॉकीट अश्या दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. पृष्ट क्रं- 31 ते 34 वर तक्रारकर्तीने शपथेवरील पुरावा दाखल केला तसेच पृष्ट क्रं-35 व 36 वर तक्रारकर्तीने लेखी युक्तीवाद दाखल केला. पान क्रं 43 वर श्री क्रिष्णा बी.डोरले, सिव्हील इंजिनियर आणि गव्हरनमेंट कॉन्ट्रक्टर यांचे दिनांक-18.09.2019 रोजीचे तक्रारकर्तीचे घराचे झालेल्या बांधकामाचे मुल्यांकन दर्शविणारे प्रमाणपत्राची प्रत दाखल केली.
05. तक्रारकर्तीची तक्रार, शपथेवरील पुरावा आणि लेखी युक्तिवाद तसेच तिने प्रकरणांत दाखल केलेल्या दस्तऐवजांचे ग्राहक मंचातर्फे अवलोकन करण्यात आले, त्यावरुन ग्राहक मंचा समोर खालील मुद्ये उपस्थित होतात आणि त्यांचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
अक्रं | मुद्या | उत्तर |
1) | त.क. ही वि.प. बांधकाम ठेकेदार याची ग्राहक होते काय? | -होय- |
2) | वि.प. याने मोबदला स्विकारुनही करारा प्रमाणे घराचे संपूर्ण बांधकाम करुन न देऊन दोषपूर्ण सेवा आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याची बाब सिध्द होते काय? | -होय- |
3) | काय आदेश | अंतिम आदेशा नुसार |
:: निष्कर्ष ::
मुद्दा क्रं 1 बाबत-
06. तक्रारकर्तीने तिचे मालकीचे नविन कारधा येथील गट नं.-63/2/17 मधील भूखंड क्रं 7, एकूण क्षेत्रफळ 1650 चौरसफूट यावर विटा सिमेंटचे पक्के बांधकाम करण्या बाबत विरुध्दपक्ष बांधकाम ठेकेदार श्री श्याम चन्ने याचेशी दिनांक-21 जुलै, 2018 रोजी नोटरी समोर नोंदविलेल्या करारनाम्याची प्रत अभिलेखावर पान क्रं 12 ते 15 वर पुराव्या दाखल सादर केलेली आहे. सदर बांधकाम करारनाम्यावर उभय पक्षांच्या स्वाक्ष-या असून साक्षीदार म्हणून तक्रारकर्तीचे पती ही खुशाल लक्ष्मण धुळसे यांची सही आहे. सदर करारनामा हा श्री जयंत व्ही.वैरागडे, नोटरी, भंडारा यांचे समोर नोंदविलेला असल्याचे दिसून येते. सदर करारा प्रमाणे विरुध्दपक्ष बांधकाम ठेकेदार याने लेआऊट मधील मंजूर नकाशा प्रमाणे तक्रारकर्तीच्या संपूर्ण घराचे बांधकाम एकूण रुपये-17,35,000/- एवढया किमतीत करुन देण्याचे मान्य केले होते. करारामध्ये एकूण रकमे पैकी अग्रीम रुपये-7,00,000/- बँकेचा धनादेश क्रं-303801 नुसार मिळाल्याचे विरुध्दपक्षाने मान्य केले असून उर्वरीत रकमेचे धनादेश क्रं-303802 ते 303804 अॅडव्हान्समध्ये मिळाल्याचे विरुध्दपक्षाने मान्य केलेले आहे. अशाप्रकारे विरुध्दपक्षाला बांधकाम करारापोटी तक्रारकर्ती कडून करारा प्रमाणे रक्कम प्राप्त झालेली असल्याने तक्रारकर्ती ही विरुध्दपक्ष बांधकाम ठेकेदाराची ग्राहक ठरते आणि म्हणून आम्ही मुद्दा क्रं 1 चे उत्तर “होकारार्थी” नोंदवित आहोत.
मुद्दा क्रं 2 व 3 बाबत-
07. उभय पक्षां मधील दिनांक-21 जुलै, 2018 रोजी झालेल्या तक्रारकर्तीचे घरा संबधीचे बांधकाम करारा प्रमाणे मंजूर नकाशा प्रमाणेच बांधकाम करण्यात येईल. या व्यतिरिक्त काही अतिरिक्त बांधकाम करावयाचे असल्यास त्याचा खर्च तक्रारकर्तीला करावा लागेल असेही करारात नमुद आहे. करारा मध्ये संपूर्ण बांधकाम फीनीशींग सहीत रुपये-1000/- प्रती चौरस फूट प्रमाणे दर राहिल. तसेच आरसीसी ब्रिक वर्क, प्लॉस्टर, स्लॅब बांधकाम रुपये-700/- प्रती चौरस फूट दर राहिल असे नमुद आहे.
08. उभय पक्षांमधील बांधकाम करारा मध्ये खालील कामे नमुद करण्यात आलेली आहेत, त्याला येथे परिशिष्ट- अ देण्यात येतो-
“परिशिष्ट- अ”
Speciation of the Residential House Construction
GF/FF
Sl.No. | Work | |
1 | Outer Wall | 9” Brick Work |
2 | Inner Wall | 4” Brick Work |
3 | Flooring | Hall-Verified (2’X2’) Other Bed Room & Kitchen(15’X16’) |
4 | Painting Work | Hall-Putting & Painting Other Room & Kitchen-Asian Distemper Outer side-Balaji Sem Outer Front Side-Apex |
5 | Door | Front T.W.(Teak-wood) Other-Concrete & Flush Door. |
6 | Windows | All Window-Aluminum |
7 | Kitchen | Vota Green Marble 12ft. 1 Chajja, 1 Almirah |
8 | 2 Bedroom | 1 Chajja, 1 Almirah |
9 | Bed Room Hall Ground Floor | POP Modular Kitchen |
सदर बांधकाम कराराव्दारे विरुध्दपक्षाने उर्वरीत संपूर्ण काम नोव्हेंबर, 2018 पर्यंत पूर्ण करुन देण्याचे आश्वासन दिलेले आहे.
09. तक्रारकर्तीला सदर घराचे बांधकामासाठी कॉर्पोरेशन बँक भंडारा यांचे कडून एकूण रुपये-17,35,000/- एवढया रकमेचे कर्ज मंजूर झाले होते. तक्रारकर्तीने कॉर्पोरेशन बँक येथील तिचे कर्ज खाते असलेल्या खाते क्रं-520101026161563 ची प्रत पान कं 17 व 18 वर पुराव्या दाखल सादर केली, त्याचे अवलोकन केले असता, विरुध्दपक्षाला (यश ट्रेडर्स) दिनांक-09.12.2016 रोजी रुपये-7,00,000/-तसेच धनादेश क्रं-307802 प्रमाणे दिनांक-27.03.2017 रोजी रुपये-2,00,000/-, धनादेश क्रं-307803 प्रमाणे दिनांक-31.03.2017 रोजी रुपये-5,00,000/-आणि धनादेश क्रं-307804 प्रमाणे दिनांक-14.06.2017 रोजी रुपये-3,35,000/- असे मिळून करारा प्रमाणे संपूर्ण बांधकामाची रुपये-17,35,000/- एवढी रक्कम मिळाल्याची बाब पुराव्यानिशी सिध्द होते.
10. तक्रारकर्तीचे तक्रारी प्रमाणे विरुध्दपक्ष बांधकाम ठेकेदार याने करारा प्रमाणे संपूर्ण कर्ज रकमेची उचल करुनही माहे जानेवारी-2018 पर्यंत फक्त घराच्या भिंती, स्लॅब व प्लॉस्टर एवढेच काम करुन घराचे उर्वरीत बांधकाम बंद केले. त्यानंतर वेळोवेळी तिने प्रत्यक्ष आणि दुरध्वनीव्दारे विरुध्दपक्ष बांधकाम ठेकेदाराशी संपर्क साधून उर्वरीत घराचे बांधकाम पूर्ण करुन देण्याची विनंती केली परंतु विरुध्दपक्षाने उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ केली. विरुध्दपक्षाने घराचे बांधकाम अपूर्ण ठेवले परंतु कर्ज परतफेडीचे हप्ते तक्रारकर्तीचे मासिक वेतनातून कपात करणे सुरु झाले होते. करारा प्रमाणे विरुध्दपक्षाला माहे नोव्हेंबर-2018 पर्यंत ठरल्या प्रमाणे घराचे संपूर्ण बांधकाम पूर्ण करुन द्यावयाचे होते परंतु आज पर्यंत विरुध्दपक्षाने कुठलेही नविन काम सुरु केलेले नाही. शेवटी तिने वकीलांचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने दिनांक-17.12.2018 रोजी विरुध्दपक्षास नोटीस पाठविला परंतु पोस्टाची सुचना मिळूनही त्याने सदर नोटीसचे पॉकीट स्विकारले नाही. तिला घराचे कर्जाचे परतफेडीपोटी दरमहा रुपये-1800/- बँकेत भरावे लागत आहे परंतु घराचे उपभोगापासून वंचित राहावे लागत असून प्रतीमाह रुपये-4000/- घराचे भाडे सुध्दा भरावे लागत आहे.
11. तक्रारकर्ती तर्फे तिचे पती श्री खुशाल लक्ष्मण धुळसे यांनी विरुध्दपक्ष बांधकाम ठेकेदार यांचे विरुध्द पोलीस स्टेशन कारधा, जिल्हा भंडारा येथे दिनांक-12.07.2018 रोजी जो लेखी रिपोर्ट दिला होता त्याची प्रत पुराव्या दाखल पान क्रं 19 वर दाखल केलेली आहे. तसेच विरुध्दपक्षास वकीलांचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस प्रत पुराव्या दाखल पान क्रं 20 ते 22 वर दाखल केलेली आहे . नोटीस पाठविल्या बाबत रजि.पोस्टाची दिनांक-17.12.2018 रोजीची पावती आणि परत आलेले नोटीसचे पॉकीट पान क्रं 23 वर पुराव्या दाखल सादर केलेले आहे. ईतकेच नव्हे तर ग्राहक मंचाचे मार्फतीने विरुध्दपक्षाला रजिस्टर पोस्टाने पाठविलेले पॉकीट नोटीसची सुचना देऊनही ते स्विकारले नाही या पोस्टाचे शे-यासह पॉकीट ग्राहक मंचात परत आले, ते पान क्रं 29 व 30 वर दाखल आहे. तक्रारकर्तीने पान क्रं 31 ते 34 वर स्वतःचे शपथपत्र आणि पान क्रं 35 व 36 वर लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे.
12. या व्यतिरिक्त तक्रारकर्तीने कॉर्पोरेशन बँक, शाखा भंडारा येथे विरुध्दपक्ष यश ट्रेडर्स प्रोप्रायटर श्याम चन्ने याचे खाते क्रं 560371000046391 असल्या बाबतचे प्रमाणपत्र पान क्रं-39 वर दाखल केलेले आहे. तसेच विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीचे मालकीचा मौजा कारधा, तालुका जिल्हा भंडारा येथील भूखंड क्रं 7, तलाठी साझा क्रं 17, गट क्रं-63/2/30 वर झालेल्या बांधकामाचे मुल्य दर्शविणारे अभियंता श्री क्रिष्णा बी.डोरले, सिव्हील इंजिनियर तसेच गव्हरनमेंट कॉन्ट्रक्टर यांचे दिनांक-18 सप्टेंबर, 2019 चे प्रमाणपत्राची प्रत पान क्रं 43 वर दाखल केलेली आहे, त्या प्रमाणपत्रा नुसार सदर जागेवर तळमजला 940.00 चौरसफूट बांधकाम आणि पहिल्या मजल्यावर 940.00 चौरसफूट बांधकाम झालेले असून त्याचे मुल्यांकन दर प्रतीचौरसफूट रुपये-400/- प्रमाणे असून तळमजला आणि पहिल्या मजल्या वरील बांधकामाचे एकूण मुल्यांकन रुपये-7,52,000/- असल्याचे नमुद केलेले आहे.
13. तक्रारकर्तीने वकीलांचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने पाठविलेल्या नोटीसची सुचना मिळूनही तसेच ग्राहक मंचाचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने पाठविलेल्या नोटीसची सुचना मिळूनही विरुध्दपक्षाने रजिस्टर नोटीस स्विकारलेल्या नाहीत. तसेच विरुध्दपक्ष हा ग्राहक मंचाचे नोटीसची सुचना मिळूनही ग्राहक मंचा समोर उपस्थित झालेला नाही तसेच त्याने तक्रारकर्तीने त्याचे विरुध्द तक्रारीतील आरोप खोडून काढलेले नाहीत. त्याच बरोबर तक्रारकर्तीने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तऐवज नाकारलेले नाहीत. या उलट तक्रारकर्तीने तक्रारी सोबत उभय पक्षां मधील बांधकामाचा करारनामा, झालेल्या बांधकामाचे मुल्यांकना संबधी अन्य इंजिनियरने दिलेला अहवाल, पुराव्या दाखल स्वतःचे शपथपत्र, रजिस्टर नोटीस, रजिस्टर पोस्टाची पावती अशा दस्तऐवजाच्या प्रती पुराव्या दाखल अभिलेखावर सादर केलेल्या आहेत. अशा परिस्थितीत तक्रारकर्तीची तक्रार ही गुणवत्तेवर निकाली काढण्यास काहीही हरकत नाही.
14. उभय पक्षां मधील झालेल्या बांधकाम करारा प्रमाणे विरुध्दपक्षाला संपूर्ण बांधकामाचे मुल्य रुपये-17,35,000/- प्राप्त झालेले असून सुध्दा त्याने करारा प्रमाणे संपूर्ण बांधकाम करुन दिलेले नाही. तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाने केलेल्या बांधकामा संबधीचे मुल्यांकन दाखल केलेले असून त्यानुसार तळमजला आणि पहिला मजला असे मिळून झालेल्या बांधकामाचे मुल्यांकन रुपये-7,52,000/- एवढे नमुद आहे, त्यामुळे विरुध्दपक्षाने बांधकामा बाबत अतिरिक्त रुपये-9,83,000/- एवढी जास्तीची रक्कम तक्रारकर्ती कडून स्विकारल्याचा निष्कर्ष काढण्यास काहीही हरकत नाही. विरुध्दपक्षाने करारा प्रमाणे संपूर्ण मोबदला मिळूनही उर्वरीत बांधकाम केले नाही आणि जास्तीच्या रकमेची उचल केली या बाबी वर नमुद केल्या प्रमाणे सिध्द होतात. तक्रारकर्ती कडून संपूर्ण मोबदल्याची रक्कम स्विकारुनही तिला राहण्यासाठी घर मिळाले नसल्याने ती दुसरीकडे भाडयाने राहत आहे आणि उचललेल्या कर्जाचे परतफेडीचे हप्त्यांची रक्कम तिचे वेतनातून कपात होत आहे या बाबी स्वयंस्पष्ट होतात. विरुध्दपक्षाने रजिस्टर पोस्टाच्या नोटीस सुध्दा स्विकारलेल्या नाहीत.विरुध्दपक्षाचा एकंदरीत व्यवहार पाहता त्याने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिल्याची तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याची बाब पुराव्यानिशी सिध्द होतोत आणि म्हणून आम्ही मुद्दा क्रं 2 चे उत्तर “होकारार्थी” नोंदवित आहोत. अशा परिस्थितीत उभय पक्षां मधील झालेल्या करारा प्रमाणे उर्वरीत बांधकाम विरुध्दपक्षाने पूर्ण करुन द्दावे परंतु असे करणे विरुध्दपक्षास शक्य नसल्यास तक्रारकर्ती कडून जास्तीची स्विकारलेली रक्कम रुपये-9,83,000/- शेवटचा हप्ता स्विकारल्याचा दिनांक-14.06.2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12 टक्के दराने व्याजासह तक्रारकर्तीला परत करावी असे विरुध्दपक्षास आदेशित करणे योग्य व न्यायोचित होईल. तसेच विरुध्दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्यामुळे तक्रारकर्तीला जो शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे त्याबद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-30,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/- विरुध्दपक्षा कडून तक्रारकर्तीला मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे ग्राहक मंचाचे स्पष्ट मत आहे.
15. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन ग्राहक मंचा व्दारे खालील प्रमाणे तक्रारीत आदेश पारीत करण्यात येत आहे-
:: अंतिम आदेश ::
(01) तक्रारकर्तीची तक्रार विरुध्दपक्ष श्याम बबनराव चन्ने याचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) उभय पक्षां मधील दिनांक-21 जुलै, 2018 रोजी झालेल्या घराचे बांधकाम करारा प्रमाणे तसेच निकालपत्रातील परिशिष्ट-अ मध्ये नमुद केल्या प्रमाणे विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीचे घराचे उर्वरीत बांधकाम सदर आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्याचे दिनांका पासून दोन महिन्याचे आत पूर्ण करुन द्दावे व केलेल्या बांधकामाचा संपूर्ण हिशोब साहित्य खरेदी व मजूरीची बिले तसेच करारा प्रमाणे संपूर्ण बांधकाम पूर्ण केल्या बाबत प्रमाणपत्र इत्यादी दसतऐवज तक्रारकर्तीला द्दावेत.
(03) परंतु असे करणे विरुध्दपक्षास शक्य नसल्यास घराचे बांधकाम करारा पोटी तक्रारकर्ती कडून जास्तीची स्विकारलेली रक्कम रुपये-9,83,000/- (अक्षरी रुपये नऊ लक्ष त्रयाऐंशी हजार फक्त) शेवटचा हप्ता स्विकारल्याचा दिनांक-14.06.2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12 टक्के दराने व्याजासह तक्रारकर्तीला प्रस्तुत निकालपत्राची प्रमाणित प्रत मिळाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीला परत करावी.
(04) विरुध्दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्यामुळे तक्रारकर्तीला जो शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला त्याबद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-30,000/- (अक्षरी रुपये तीस हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) अशा रकमा विरुध्दपक्षाने प्रस्तुत निकालपत्राची प्रमाणित प्रत मिळाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत तक्रारकर्तीला द्दाव्यात.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्षाने उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे विहित मुदतीचे आत करावे.विहित मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्षाने न केल्यास अंतिम आदेशातील मुद्दा क्रं-(03) मध्ये नमुद केलेली तक्रारकर्तीने विरुध्दपक्षास जास्तीची अदा केलेली रक्कम रुपये-9,83,000/- दिनांक-14.06.2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15% दराने दंडनीय व्याजासह तक्रारकर्तीला देण्यास विरुध्दपक्ष जबाबदार राहिल.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.