नि. 19 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 71/2011 नोंदणी तारीख - 11/05/2011 निकाल तारीख - 12/07/2011 निकाल कालावधी - 62 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) -------------------------------------------------------------------------------- श्री रामराव जयसिंग गायकवाड, रा. शिरगांव, ता.कराड, जि. ----- अर्जदार (अभियोक्ता श्री. व्ही.पी.जगदाळे) विरुध्द 1. सहयाद्री ऊस उत्पादक व तोडणी वाहतूक यंत्रणेचे घटक यांची सहकारी संस्था लि., यशवंतनगर तर्फे चेअरमन 2. सहयाद्री ऊस उत्पादक व तोडणी वाहतूक यंत्रणेचे घटक यांची सहकारी संस्था लि., यशवंतनगर तर्फे चेअरमन श्री. दत्तात्रय बाबुराव जाधव रा. उंब्रज, ता. कराड, जि. सातारा 3. सहयाद्री ऊस उत्पादक व तोडणी वाहतूक यंत्रणेचे घटक यांची सहकारी संस्था लि., यशवंतनगर तर्फे कार्यकारी संचालक चारुदत्त नारायण अहिरे रा. यशवंतनगर, ता. कराड, जि. सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री सी.ए. कदम) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे- 1. अर्जदार हे शिरगांव येथील रहिवासी असून त्यांचा शेती हा व्यवसाय आहे. जाबदार क्र.1 ही संस्था महा.सह.कायदा 1960 मधील तरतूदींनुसार नोंदविलेली सहकारी संस्था आहे. जाबदार क्र. 2 हे संस्थेचे चेअरमन व जाबदार क्र. 3 हे संस्थेचे कार्यकारी संचालक आहेत. जाबदार संस्था ही ट्रॅक्टर व ट्रेलरमालकांची ऊस वाहतूक व्यवसायासाठी करार करुन भारतीय स्टेट बँकेमार्फत कर्ज देत असतात व सदर ट्रॅक्टरचे वाहतूकीतून झालेल्या बिलातून तसेच ऊस बिलातून कर्जाची रक्कम परस्पररित्या जमा करीत असतात. अर्जदार यांचे मालकीचा महिंद्रा अॅन्ड महिंद्रा 575 डि.आय मॉडेल 2006 चा ट्रॅक्टर एम.एच.11/यु 2494 व ट्रेलर नं.एम एच 11 एल 3808 व एम एच 11 एल 3809 असून सदर अर्जदार यांचे ट्रॅक्टरचा करार जाबदार क्र. 1 यांनी ऊस वाहतुकीचा करार करुन अर्जदार यांना रक्कम रु.2,00,000/- कर्ज अदा केले होते. सदर अॅडव्हान्स रक्कम देताना जाबदार संस्थेने अर्जदाराचे संमतीविना रक्कम रु. 50,000/- परस्पर कपात केलेमुळे ऊस तोडणी कामगार व मुकादम त्यामुळे अर्जदार जाबदार संस्थेबरोबर वाहतूक व्यवसाय करु शकले नाहीत. त्यामुळे जाबदार संस्थेने शिरगाव येथून दि.26/12/2008 रोजी जबरदस्तीने येवून ट्रॅक्टर ओढून नेलेला आहे. ट्रॅक्टर ओढून नेलेनंतर अर्जदार यांनी जाबदार संस्थेच्या करारापोटी घेतलेले कर्ज परतफेड केलेली आहे. तरीही अर्जदार जाबदार संस्थेकडे ओढून नेलेला ट्रॅक्टर मागणी केला असता त्यांनी तो परत दिलेला नाही. अर्जदार यांनी दि. 16/03/2010 रोजी कराराची प्रत व नुकसानभरपाईचा मागणी केली असता ती दिलेली नाही. अर्जदार यांचा ट्रॅक्टर बेकायदेशिररित्या ताब्यात घेवून दि. 26/12/2011 पासून अर्जदार यांचे उत्पन्नाचे नुकसान केले आहे. तसेच सदर ट्रॅक्टरवर महिंद्रा अॅन्ड महिंद्रा फायनान्स कंपनीचे कर्ज असल्याने कंपनीकडून कर्जाची रक्कम सोसावी लागून कर्ज पूर्णपणे थकित झालेले आहे. सबब जाबदारांनी अर्जदाराचे मालकीचा ट्रॅक्टर परत द्यावा तसेच ट्रॅक्टर उत्पन्नाचे नुकसानभरपाई, ट्रॅक्टर दुरुस्तीचा खर्च, मानसिक व शाररिक त्रासाकरिता व तक्रार अर्जाचा खर्च व्याजासह केलेली अर्जदार यांनी प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार क्र.1 व 2 यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि. 10 ला दाखल केले आहे. त्यांनी अर्जदारचे तक्रार अर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. जाबदार क्र.1 हे प्रत्येक गळीत हंगामात ऊस तोडणी व वाहतूकीचे कामे करण्याबाबत करार करतात व सभासदांना संभाव्य होणारे कामाचे बिलापोटी अॅडव्हान्स रकमा देते. अशाप्रकारे मंजूर पोटनियमातील तरतूदीनुसार जाबदार संस्था काम पाहते. या जाबदारांचे कथनानुसार जाबदार नं. 1 व 2 संस्थेबरोबर ऊस तोडणी वाहतूक करणेबाबतचा सभासद व सहकारी संस्था या नात्याने करारदि.22/8/08 रोजी केलेला आहे. सदर जाबदार संस्थेकडून अर्जदार यांनी ऊस वाहतूकीचे होणारे बिलापोटी अॅडव्हान्स म्हणून एकूण रक्कम रु. 2,06,764/- एवढी अॅडव्हान्स रकमेची उचल केली आहे. अर्जदार यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कराड ट्रेझरी यांचेकडून वाहन दुरुस्ती व तोडणी मजूरांना देणेसाठी कर्ज घेतलेले होते. त्या कर्जाची परतफेडीची डिफॉल्ट गॅरंटी जाबदार संस्थेने घेतलेली होती. अर्जदारांकरिता जाबदार संस्थेने डिफॉल्ट गॅरंटीप्रमाणे रक्कम रु. 1,08,299/- स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कराड ट्रेझरी यांचेकडे भरणा केलेली आहे. अर्जदार यांचा ट्रक जाबदार यांचेकडे नसल्यामुळे परत देण्याचा प्रश्नच येत नाही. अर्जदार यांनी केलेली सदरचा तक्रार अर्ज खोटा व लबाडीचा असून तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा असे या जाबदारांनी त्यांचे कैफियतमध्ये कथन केले आहे. तसेच अर्जदार व जाबदार संस्था यांचेमधील संबंध व व्यवहार हा ग्राहक व मालक या पात्रतेत बसत नसल्यामुळे अर्जदार यांची तक्रार या मंचाचे अधिकारक्षेत्रात येत नाही त्यामुळे तक्रार रद्द होणेस पात्र आहे असे या जाबदारांचे कथन आहे. 3. जाबदार क्र. 3 यांनी नि. 14 ला त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले आहे. या जाबदारांनी त्यांचे कथनात असे म्हटले आहे की, सदरचे जाबदार हे जाबदार क्र. 1 या संस्थेचे कार्यकारी संचालक नव्हते व या संस्थेशी त्यांचा काहीही संबंध नाही जाबदार नं. 1 ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील तरतूदीनुसार स्थापन झालेले ऊस तोडणी व वाहतूक करणारी स्वतंत्र सहकारी संस्था आहे. . जाबदार क्र. 3 ही संस्था जाबदार नं. 1 संस्थेकडून ऊस तोडणी कार्यक्रमाप्रमाणे ऊसाची तोडणी व वाहतूक करुन घेवून ऊसावर प्रक्रिया करणेसाठी घेत असते. व जाबदार क्र. 1 संस्थेने तोडून व वाहतूक करुन जाबदार क्र. 3 यांचेकडे पोहोच केलेल्या ऊसाचे वजन पाहून ऊसतोडणी व वाहतूकीची रक्कम जाबदार नं. 1 यांना नियमाप्रमाणे वेळोवेळी परत करत असते. तसेच जाबदार क्र. 3 कार्यकारी संचालक असलेली सहयाद्री सहकारी साखर कारखाना लि. यशवंतनगर ही ऊसावर प्रक्रिया करुन ऊसापासून साखर तयार करणारी स्वतंत्र संस्था आहे. जाबदार नं 3 यांचे जाबदार क्र. 1 या संस्थेवर कोणतेही प्रशासकीय नियंत्रण नसून त्यांची दैनंदिन व्यवहाराशी काहीही संबंध नाही. अर्जदार यांनी जाबदार नं. 1 संस्थेकडून करारापोटी घेतलेल्या उचल रकमेची वाहतूक बिलातून अथवा ऊस बिलातून परस्पर कपात करणेचा या जाबदारांचा प्रश्नच नाही. सबब अर्जदार यांचा तक्रारअर्ज खोटा व लबाडीचा असून अर्जदाराचा तक्रारअर्ज खर्चातसहीत नामंजूर करावा व निष्कारण या जाबदारांचे विरुध्द तक्रार केल्यामुळे मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 30,000/- देणेचे आदेश व्हावेत असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 4. अर्जदार तर्फे अभियोक्ता श्री. जगदाळे व जाबदारतर्फे अभियोक्ता श्री कदम यांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकला. तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहिली. 5. अर्जदारतर्फे दाखल करण्यात आलेले शपथपत्र नि. 2 ला पाहिले. अर्जदारतर्फे दाखल केलेली नि. 5 सोबतची 5/1 ते 5/10 व नि. 17 कडील कागदपत्रे पाहिली. जाबदारतर्फे दाखल शपथपत्र नि. 11 व 15 ला पाहिले. तसेच जाबदारतर्फे दाखल नि. 13 सोबतची 11 कागदपत्रे पाहिली. 6. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही ब) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. कारणे 7. निर्वादितपणे अर्जदार यांनी जाबदार क्र. 1 यांचेशी दि. 23/08/2008 रोजी ऊस वाहतूक करार केला आहे. तसेच अर्जदार यांनी करारापोटी जाबदार क्र. 1 कडून उचल केलेली जाबदार क्र. 1 व 2 यांनी त्यांचे म्हणणेमध्ये मान्य केले आहे. जाबदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदार यांचेकडून दि.20/8/2008 रोजी करार करताना को-या छापील फॉर्मवर सहया घेतल्या तसेच जाबदार संस्थेने अर्जदार यांचे विविध को-या कागदपत्रांवर सहया घेतल्या होत्या असे अर्जदारांचे मोघमपणे म्हणणे आहे. तसेच अर्जदार यांनी को-या फॉर्मवर सहया घेतल्याबाबत ताबडतोब कोठेही तक्रार केली नाही असे दिसून येते. सदरची तक्रार या मे. मंचात प्रथमच केली आहे. अशापरिस्थितीत सदरच्या कथनामध्ये काहीही तथ्य नाही असे मे. मंचाचे मत आहे. 8. अर्जदार यांचे तक्रारीनुसार जाबदार संस्थेने शिरगाव येथून दि.26/12/2008 रोजी जबरदस्तीने येवून ट्रॅक्टर ओढून नेलेला आहे. ट्रॅक्टर ओढून नेलेनंतर अर्जदार यांनी जाबदार संस्थेच्या करारापोटी घेतलेले कर्ज परतफेड केलेली आहे. तरीही अर्जदार यांचा जाबदार संस्थेकडे ओढून नेलेला ट्रॅक्टर मागणी केला असता त्यांनी तो परत दिलेला नाही. अर्जदार यांचा ट्रॅक्टर बेकायदेशिररित्या ताब्यात घेवून दि. 26/12/2011 पासून अर्जदार यांचे उत्पन्नाचे नुकसान केले आहे. तसेच सदर ट्रॅक्टरवर महिंद्रा अॅन्ड महिंद्रा फायनान्स कंपनीचे कर्ज असल्याने कंपनीकडून कर्जाची रक्कम सोसावी लागून कर्ज पूर्णपणे थकित झालेले आहे. तसेच जाबदार यांनी अर्जदारांचा ट्रॅक्टर परत द्यावा अशी मागणी केली आहे परंतु अर्जदार यांनी दाखल केलेल्या नि. 5/7 नुसार अर्जदार यांनी मा. जिल्हा पोलीस प्रमुख, सातारा यांचेकडे फिर्याद देवून अर्जदारांचे मालकीचा ट्रक्टर नं. एम.एच.11/यु 2494 व ट्रेलर नं.एम एच 11 एल 3808 व एम एच 11 एल 3809 असून हा चोरुन नेलेची फिर्याद दाखल केली आहे. सदरच्या फिर्यादीमध्ये कर्जास ऊस वाहतूकदार जामीनदार म्हणून श्री. शिवाजी महादेव चव्हाण जामीनदार व श्री. पांडूरंग आण्णा यादव हे दोन जामीनदार आहेत. सन 2008 मध्ये करार केल्यानंतर सदर कर्जफेडीसाठी कारखाना बंद पडेपर्यंत मुदत असताना अर्जदार यांचे ताबेतील ट्रॅक्टर जबरदस्तीने दि. 24/12/2008 रोजी घेवून गेले व सहयाद्री साखर कारखान्यात नेवून लावलेला आहे. अशा स्वरुपाची मा. जिल्हा पोलीस प्रमुख यांचेकडे फिर्याद दाखल केली आहे. त्यामुळे अर्जदार यांनी जाबदार क्र. 1 व 2 यांचेकडून ट्रॅक्टर परत मिळणेसाठी मागणी केली आहे. सदरची मागणी मान्य करता येणार नाही असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. 9. अर्जदार यांनी जाबदार संस्थेच्या करारापोटी घेतलेले कर्ज परतफेड केलेली आहे असे कथन केले आहे. जाबदारांचे कथनानुसार अर्जदार यांनी ऊस वाहतूकीचे होणारे बिलापोटी अॅडव्हान्स म्हणून एकूण रक्कम रु. 2,06,764/- एवढी अॅडव्हान्स रकमेची उचल केली आहे. अर्जदार यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कराड ट्रेझरी यांचेकडून वाहन दुरुस्ती व तोडणी मजूरांना देणेसाठी कर्ज घेतलेले होते. त्या कर्जाची परतफेडीची डिफॉल्ट गॅरंटी जाबदार संस्थेने घेतलेली होती त्याप्रमाणे जाबदार संस्थेने कर्जाची रक्कम भरणा केली आहे असे कथन केले आहे. अर्जदार यांचे मागणीनुसार जाबदार यांनी भरणा केलेल्या रकमेबाबत हिशोबाचा वाद उपस्थित केला आहे. सदरच्या वादाबाबत सविस्तर जाबजबाब व पुरावा घेणे जरुरीचे आहे. सबब अर्जदार यांनी योग्य त्या न्यायालयात दाद मागावी असे या मंचाचे मत आहे. 10. अर्जदार यांनी याकामी दाखल केलेली नि.5 कडील सर्व कागदपत्रे पाहीली असता असे स्पष्टपणे दिसून येते की, नि.5/1 ते 5/10 कडील सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्या आहेत. सबब सदरची कागदपत्रे पुराव्यात ग्राहय धरता येणार नाहीत असे या मंचाचे मत आहे. 11. जाबदार यांनी याप्रकरणी वरिष्ठ न्यायालयाचा निवाडा दाखल केलेला आहे. सदर न्यायनिवाडयाचा अवलोकन केले असता असे दिसून येते की, सदरचे निवाडयातील घटनाक्रम व प्रस्तुत प्रकरणातील घटनाक्रम हा भिन्न आहे. सबब जाबदार यांनी दाखल केलेले न्यायनिवाडा याकामी लागू होत नाहीत असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. 12. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत येत आहे. 2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 12/07/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) जयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |