- नि का ल प त्र -
(दि.23-04-2024)
व्दारा : श्री. स्वप्निल द.मेढे, सदस्य,
1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे शेतघराच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब चुकीचा करुन दिलेने (समप्रमाणात नसलेने) तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार अर्ज आयोगात दाखल केला आहे.
2) तक्रार अर्जाचा सारांश तक्रारदार यांचे कथनाप्रमाणे थोडक्यात असा-
तक्रारदारांच्या वेरळ येथील शेतघराच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅबचे काम करावयचे असल्याने बांधकाम करणा-या चांगल्या ठेकेदाराच्या शोधात असताना सामनेवाला शशिकांत तुळशिराम जाधव यांचेशी ओळख झाली. सदर सामनेवाला यांनी दि.11-08-2016 रोजी तक्रारदार यांचे जागेची पाहणी करुन अंदाजपत्रक दिले. सदर अंदाजपत्रक हे रक्कम रु.24,50,000/- चे होते. तक्रारदार यांनी सामनेवाला यांना बांधकाम साहित्य तक्रारदार आणणार असून फक्त लेबर चार्जेसचे दरपत्रक असलेले करारपत्र दयावयास सांगितले. त्याप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदारास लेबर कामाचे एकूण रक्कम रु.6,00,000/- असून त्यामध्ये पाण्याच्या टाक्या ठेवण्यासाठी वेगळा स्लॅब, पहिल्या मजल्यावरील स्लॅब आणि पहिल्या मजल्यावरील स्लॅबच्या म्हणजे गच्चीच्या वर अर्धा स्लॅब यांचा समावेश होता. सामनेवालाने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे एखादा अपवाद वगळता काम पूर्ण झाले. माशेतघराच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब हा पूर्ण झाल्यानंतर सम प्रमाणात (लेव्हल) नसल्याचे तक्रारदारास दिसून आले. त्याबाबत तक्रारदाराने सामनेवाला यांना विचारले असता स्लॅब सम प्रमाणात करता येतो आणि तो मी करुन देईन असे सामनेवाला यांनी तक्रारदारास सांगितले व त्याबाबत तेथे उपस्थित असलेल्या कामगारांना सुचना दिल्या. परंतु वेळोवेळी विचारणा करुनही सामनेवाला व त्यांचे कामगारांनी शेतघराच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब सम प्रमाणात (लेव्हल) करुन दिला नाही. त्यामुळे सदर स्लॅबवर पावसाळयात पाणी साचले होते. सरतेशेवटी तक्रारदाराने दि.11-04-2018 रोजी सामनेवाला यांना वकीलांमार्फत कायदेशीर नोटीस पाठवली असता सदरची नोटीस सामनेवाला यांना दि.17-04-2018 रोजी मिळूनदेखील त्यांनी आजअखेर सदर पत्राला कोणतेही उत्तर दिलेले नाही. सामनेवाला यांनी बांधकामाचा स्लॅब असमान झाला असल्याचे मान्य करुन स्लॅब सम प्रमाणात (लेव्हल) करुन देण्याच्या कामात टाळाटाळ करुन तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे. त्यामुळे तक्रारदारास मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास झाला आहे. त्यामुळे तक्रारदाराने सदरची तक्रार दाखल केली आहे. सबब सामनेवाला यांच्या सेवात्रुटीमुळे तक्रारदारास झालेल्या मानकिस त्रासापोटी प्रतिमाह रक्कम रु.5,000/- प्रमाणे आठ महिन्याचे रक्कम रुपये 40,000/- व तक्रारीचा निकाल लागेपर्यंत वाढणारी रक्कम व वकील नोटीसीचा खर्च रक्कम रु.25,000/- असे एकूण रक्कम रु.1,15,000/- सामनेवाला यांनी तक्रारदारास देणेबाबत आदेश व्हावेत तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रक्कम रु.13,000/- देण्योच आदेश व्हावेत, अशी विनंती तक्रारदाराने सामनेवालास केली.
- तक्रारदार यांनी तक्रारीच्या पुष्टयर्थ नि.5 कडे एकूण 4 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्यामध्ये सामनेवाला यांनी तक्रारदारास दि.11-08-2016 रोजी दिलेले अंदाजपत्रक, सामनेवाला यांनी दिलेले दरपत्रक/करारपत्र, सामनेवालास पाठविलेली वकीलांमार्फतची नोटीस, सदर नोटीस सामनेवालास मिळालेबाबतची पोष्टाची पोहोच पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.12 कडे पाच फोटोग्राफ दाखल केले आहेत. नि.13 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे.
- ) प्रस्तुत कामी सामनेवाला यांना आयोगामार्फत नोटीस पाठविली असता सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन म्हणणे दाखल केले. सामनेवाला यांनी नि.11 कडे त्यांचे लेखी म्हणणे दाखल करुन तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारुन तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करावा अशी विनंती केली आहे. सामनेवाला त्यांचे म्हणणेत पुढे कथन करतात की, तक्रारदार व सामनेवाला यांचेमधील वाद विषय पाहता सदरची तक्रार मे. दिवाणी कोर्टात दाखल करणे आवश्यक आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून तथाकथित करारपत्रामध्ये नमुद नसलेली कामेही करुन घेतली तसेच तथाकथीत करारातील अटी प्रमाणे पैसे अदा केलेले नाहीत. त्यामुळे सामनेवाला यांनी कामगारांचे पैसे देणेसाठी आय.सी.आय.सी.आय बँकेकडून गोल्ड लोन घेतले व त्यातून कामगारांचे पैसे दिले. परंतु तक्रारदाराने सामनेवालास सदर कामाचे पैसे अदा केलेले नाहीत. तसेच तक्रारदार यांनी तळमजल्यावरील बांधकाम करण्यासाठी आर.सी.सी. डिझायनर श्री अभय तलाठी यांची नेमणूक केली होती. पहिल्या मजल्यावरील स्लॅब अतिपर्जन्यवृष्टीत गळण्याची शक्यता असल्याचे तक्रारदाराला माहित असल्यानेच ते टाळण्यासाठी तक्रारदाराने प्रस्तुतचे बांधकाम करण्याचे ठरविले होते. तक्रारदार राहात असलेल्या ठिकाणी पावसाचे प्रमाण प्रचंड आहे. त्यामुळे सदर ठिकाणातील सर्व घरांच्या स्लॅबमधून पावसाळयात लिकेज होण्याचा प्रकार सामान्य आहे. तक्रारदाराने पत्र्याची शेड उभी करुन स्लॅबवर पाणी साचण्यापासून थांबविण्यासाठी आवश्यक ती कारवाई करणे आवश्यक होते. किंवा सदर स्लॅबवर फरशी/ कोबा करणे गरजेचे असताना तक्रारदाराने ते केलेले नाही त्यामुळे स्लॅबचे लिकेजसाठी तक्रारदारच जबाबदार आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे सांगण्यानुसार शेडकरिता अर्ध्या भागात पिलर व अर्ध्या भागात पाण्याच्या टाकीसाठी आरसीसी स्लॅबचे बांधकाम केले आहे. त्यामुळे त्याखालील म्हणजेच पहिल्या मजल्यावरील स्लॅबचे लेव्हलिंग करुन देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. मूळात हे काम सामनेवाला यांचे नाही. करारपत्राप्रमाणे केलेल्या कामाचा मोबदला तसेच वाढीव बांधकामाचा मोबदला रक्कम रु.50,000/- सामनेवालास देणेस तक्रारदाराने नकार दिला आहे. सबब तक्रारदाराची सदरची खोटी, खोडसाळ व लबाडीची तक्रार खर्चासह फेटाळावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर आयोगास केली आहे.
-
6) सामनेवाला यांनी नि.22 कडे कोर्ट कमिशनर नेमणूकीच्या दिलेल्या अर्जावर दि.03/03/2020 रोजी आदेश पारीत होऊन उपकार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, खेड ता.खेड जि.रत्नागिरी यांची कोर्ट कमिशनर म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तसेच नि.35 कडे उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग,खेड यांनीदि.03/08/2021 रोजीचा कोर्ट कमिशन अहवाल आणि तक्रारदार यांच्या घराचे आतून व टेरेसवरील फोटो आयोगात सादर केले आहेत.
7) तक्रारदाराची तक्रार, तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, सरतपासाचे प्रतिज्ञापत्र, दाखल केलेली कागदपत्रे (फोटो),नि.35 कडील कोर्ट कमिशन अहवाल व लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन करता या आयोगाच्या विचारार्थ पुढील मुद्दे उपस्थित होतात व त्यावर कारणमिमांसेसहीत नमूद निष्कर्ष खालीलप्रमाणे-
अ.क्र | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये ग्राहक व सेवापुरवठादार असे संबंध निर्माण होतात काय ? | होय |
2 | सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारास कराराप्रमाणे बांधकाम पूर्ण करुन दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | होय |
3 | कराराप्रमाणे सामनेवालाकडून बांधकामातील त्रुटी दुर करुन मिळणेस तक्रारदार पात्र आहेत काय? तक्रारदार शारिरीक, मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
4 | आदेश काय ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा –
मुद्दा क्रमांकः 1 –
8) तक्रारदाराने नि.5/1 कडे दाखल केलेले सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेले बांधकामाचे खर्चाबाबतचे अंदाजपत्रक व नि.5/2 कडे दाखल केलेले करारपत्र पाहता सदरचे करारपत्र हे तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये तक्रारदाराच्या वाद मिळकतीचे बांधकामाबाबतचे असलेचे दिसून येते. सदरची बाब सामनेवाला यांनी त्यांचे नि.11 कडील लेखी म्हणणेमध्ये नाकारलेली नाही. त्यामुळे तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते असलेचे स्पष्ट होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्रमांक 2 : –
- तक्रारदारांच्या वेरळ येथील शेतघराच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅबचे काम करण्यासाठी सामनेवाला शशिकांत तुळशिराम जाधव यांचेकडून अंदाजपत्रक घेतले. सदरचे अंदाजपत्रक तक्रारदाराने नि.5/1 कडे दाखल केले आहे. सदरचे अंदाजपत्रक हे रक्कम रु.24,50,000/- चे होते. तक्रारदार सामनेवालास बांधकाम साहित्य आणून देणार असल्याने तक्रारदाराने सामनेवालास फक्त लेबर चार्जेसचे दरपत्रक असलेले करारपत्र दयावयास सांगितले. त्याप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदारास लेबर कामाचे एकूण रक्कम रु.6,00,000/- असलेचे करारपत्र दिले. त्याप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदाराचे दावा मिळकतीचे बांधकाम पूर्ण केले. मात्र तक्रारदाराच्या शेतघराच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब हा पूर्ण झाल्यानंतर सम प्रमाणात (लेव्हल) नसल्याने तेथे पावसाचे पाणी साचून गळती सुरु झालेने तक्रारदाराचे बांधकामचे नुकसान होऊ लागले. त्याबाबत तक्रारदाराने सामनेवाला यांना विचारले असता स्लॅब सम प्रमाणात करुन देतो असे सामनेवाला यांनी तक्रारदारास सांगितले व त्याबाबत तेथे उपस्थित असलेल्या कामगारांना सुचना दिल्या. परंतु वेळोवेळी विचारणा करुनही सामनेवाला व त्यांचे कामगारांनी तक्रारदाराच्या शेतघराच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब सम प्रमाणात (लेव्हल) करुन दिला नाही. त्यामुळे तक्रारदाराने दि.11-04-2018 रोजी सामनेवाला यांना वकीलांमार्फत कायदेशीर नोटीस पाठवली असता सदरची नोटीस सामनेवाला यांना दि.17-04-2018 रोजी मिळूनदेखील त्यांनी आजअखेर सदर पत्राला कोणतेही उत्तर दिलेले नाही.
-
- A) सदर स्लॅबचे टेरेसवरील भागावर अंतिम काँक्रीट करताना पाण्याचा निचरा त्वरीत होणेचे दृष्टीने उतार व सम पातळीत केलेल्या काँक्रीटचा भाग दिसून येत नाही. (B) कोकणातील पर्जन्यमान पाहता टेरेसवर पाण्याचा निचरा होणेसाठीची आवश्यक प्रमाणात no of water spouts योग्य त्या आकाराची दिसुन येत नाहीत असे स्पष्टपणे नमुद केले आहे.
यावरुन सामनेवाला यांनी तक्रारदारास बांधून दिलेल्या पहिल्या मजल्यावरील स्लॅबचे अंतिम काँक्रीट करताना पाण्याचा निचरा त्वरीत होणेचे दृष्टीने उतार व सम पातळीत काँक्रीट केलेले नसलेने व सम प्रमाणात (लेव्हलिंग) करुन न दिलेने सदर स्लॅबवर पावसाचे पाणी साचत असलेचे स्पष्ट होते. यावरुन सामनेवाला यांनी तक्रारदारास दयावसाच्या सेवेत त्रुटी ठेवलेचे स्पष्ट होते. तसेच सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये सदरचे काम सामनेवालाचे कामात येत नाही असे कथन केले आहे. तसेच कामगारांचे चार्जेस सामनेवाला यांनी आयसीआयसीआय बँकेत सोने तारण कर्ज करुन अदा केलेचे कथन केले आहे व नि.18 कडे सदर बँकेचे सोने तारण कर्ज मंजूरीचे पत्र दाखल केले आहे. सदर पत्रावरील दिनांक 23/05/2016 असा असलेचा दिसून येतो. तर सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेले अंदाजपत्रकावरील दिनांक 11/08/2016 असलेचा दिसून येतो. याचा अर्थ तक्रारदाराचे बांधकाम सुरु होण्यापूर्वीच सामनेवाला यांनी बँकेकडून सोने तारण कर्ज घेतले असलेचे दिसून येते. तसेच सोने तारण कर्जाचा उद्रदेश हा Dirying cow-buffalo असा उल्लेख दिसून येत असल्याने सदरचे कर्ज हे कामगारांचे वेतन देण्यासाठी सामनेवालाने घेतले नसल्याचे स्पष्ट होते. तसेच ठरलेल्या रक्कमेच्या व्यवहाराबाबत तक्रारदाराने किंवा सामनेवाला या दोघांनीही कोणताही पुरावा याकामी हजर केलेला नाही. त्यामुळे सदर बांधकामाच्या व्यवहाराबाबत हे आयोग कोणतेही भाष्य करीत नाही. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदारास बांधून दिलेल्या स्लॅबमध्ये दोष असलेचे तसेच सदर स्लॅब समप्रमाणात नसलेबाबत यांनी त्यांचा अहवाल दाखल केलेला आहे. सबब सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवल्या आहेत. त्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्रमांक 3 : –
12) वरील सर्व विवेचनांचा विचार करता हे आयोग या निष्कर्षाप्रत आले आहे की, सामनेवाला यांनी तक्रारदाराचा पहिल्या मजल्यावरील स्लॅब असमान केलेला असलेने तक्रारदाराचे स्लॅबवर पावसाचे पाणी साचून राहते. सबब तक्रारदाराचे वादातील स्लॅबचे टेरेसवरील भागावर अंतिम काँक्रीट करुन देऊन पाण्याचा निचरा त्वरीत होणेचे दृष्टीने उतार व सम पातळीत करुन मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदारास स्लॅबचे सदोष बांधकाम करुन दिलेने तक्रारदारास साहजिकच मानसिक व शारिरीक व आर्थिक त्रास झालेला आहे. त्यामुळे तक्रारदारास झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.10,000/- सामनेवालाकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. त्यामुळे मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मु्दृा क्र.4:-
13) वरील विवचेनास व कारणमिमांसेस अनुसरुन हे आयोग खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- आ दे श -
(1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
(2) सामनेवाला यांनी तक्रारदारास वादातील स्लॅबचे टेरेसवरील भागावर अंतिम काँक्रीट करुन देऊन पाण्याचा निचरा त्वरीत होणेचे दृष्टीने उतार व सम पातळीत करुन दयावे.
(3) तक्रारदार यांना झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- (र.रुपये वीस हजार मात्र) तसेच तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.10,000/-(र.रुपये दहा हजार मात्र) सामनेवाला यांनी अदा करावेत.
(4) वरील आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी सदरहू आदेश पारीत झालेच्या दिनांकापासून 45 दिवसांचे आत करणेची आहे.
(5) सदर आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी वरील मुदतीत न केल्यास तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा कलम 71 व 72 प्रमाणे सामनेवाला विरुध्द दाद मागू शकेल.
(6) उभय पक्षकारांना निकालपत्राच्या सत्यप्रती विनामुल्य पुरवाव्यात.