जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 7/2010.
तक्रार दाखल दिनांक: 05/01/2010.
आदेश दिनांक : / /2010.
सौ. प्राची प्रदीप कुलकर्णी, वय 40 वर्षे, व्यवसाय : नोकरी,
रा. फ्लॅट नं.5, नवोदय रिजन्सी, होटगी रोड, सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
1. श्री. शशिकांत लक्ष्मणराव आकुडे, वय सज्ञान,
व्यवसाय : व्यापार, रा. रमेश मॅचिंग सेंटर,
46, नवी पेठ, सोलापूर.
2. श्री. रमाकांत लक्ष्मणराव आकुडे, वय सज्ञान,
व्यवसाय : व्यापार, रा. रमेश मॅचिंग सेंटर,
46, नवी पेठ, सोलापूर. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष
सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य
सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : एस.एस. गोटे
विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : के.व्ही. वळसंगकर
आदेश
सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी तेजस पैठणी बचत योजनेंतर्गत विरुध्द पक्ष यांच्याकडून माहे ऑगस्ट 2009 मध्ये नवीन पैठणी साडी खरेदी केली आहे. त्या साडीस पिको-फॉल लावणे व ब्लाऊज शिवण्याकरिता तक्रारदार साडी घेऊन दि.4/10/2009 रोजी विरुध्द पक्ष यांच्याकडे गेल्या आणि त्यावेळी साडी सुस्थितीत होती. पिको-फॉलची मजुरी रु.40/- असल्याबद्दल दि.8/10/2009 रोजीची पावती त्यांना देण्यात आली. त्यानंतर तक्रारदार साडी व ब्लाऊज आणण्यासाठी गेल्या असता साडी फाटली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. विरुध्द पक्ष यांनी त्यांचे रु.3,600/- किंमतीच्या साडीचे नुकसान केले आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष यांच्याकडून साडीची किंमत रु.3,600/- व त्रासापोटी रु.10,000/- नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती केली आहे.
2. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असूनत तक्रार अमान्य केली आहे. तक्रारदार यांनी त्यांच्याकडे दोन साडया पिको-फॉलकरिता टाकल्या होत्या. त्यापैकी एक साडी खराब असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ती साडी पिको-फॉल न करता बाजूला ठेवण्यात आली. त्यांच्याकडून साडी पिको-फॉल करताना फाटलेली नसून तो उत्पादकीय दोष आहे. तक्रारदार यांनी खोटी तक्रार केलेली असल्यामुळे तक्रार रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे.
3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा
दिली आहे काय ? होय.
2. तक्रारदार नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्ष
4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून तेजस पैठणी बचत योजनेंतर्गत पैठणी साडी खरेदी केल्याबाबत विवाद नाही. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे साडी पिको-फॉल करण्यास दिल्याबद्दल विवाद नाही. सदर साडीची किंमत योजनेंतर्गत रु.3,600/- असल्याचे निदर्शनास येते. प्रामुख्याने, साडी पिको-फॉलकरिता दिल्यानंतर साडी फाटल्याने तक्रारदार यांचे नुकसान झाल्याची त्यांनी प्रमुख तक्रार आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांच्या म्हणण्यानुसार साडी खराब असल्याचे निदर्शनास आल्यामुळे ती साडी पिको-फॉल न करता बाजूला ठेवण्यात आली आहे.
5. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून साडी खरेदी करताना व विरुध्द पक्ष यांच्याकडे साडीस पिको-फॉल करण्यासाठी दिली असताना साडी सुस्थितीत असल्याचे नमूद केले आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांची साडी पिको-फॉल करण्यासाठी स्वीकारल्याचे मान्य केले आहे. आमच्या मते, साडी पिको-फॉल करण्यासाठी स्वीकारताना कोणताही दुकानदार साडी पूर्णपणे उकलून सुस्थितीत असल्याची खात्री केल्याशिवाय स्वीकारणार नाही. तसेच यदाकदाचित, साडीमध्ये दोष असल्यास त्याची नोंद पावतीवर करणे अनिवार्य ठरते. तक्रारदार यांची साडी पूर्वीच खराब झालेली होती, यापृष्ठयर्थ विरुध्द पक्ष यांनी नमूद केलेली कथने उचित पुराव्याअभावी मान्य करता येणार नाहीत. इतकेच नव्हेतर, विरुध्द पक्ष यांनी मंचासमोर विवादीत साडी दाखल केलेली नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष हे त्यांची जबाबदारी टाळू इच्छित आहेत आणि त्यांच्याकडूनच साडीचे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे, असे अनुमान काढण्यास काहीच हरकत नाही. वरील विवेचनावरुन विरुध्द पक्ष यांच्या सेवेमध्ये त्रुटी असल्याचे सिध्द होते आणि तक्रारदार यांच्या साडीचे नुकसान केल्यामुळे विरुध्द पक्ष हे तक्रारदार यांना साडीची किंमत व झालेल्या त्रासासह खर्चापोटी नुकसान भरपाई देण्यास जबाबदार ठरतात.
6. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना साडीची किंमत रु.3,600/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.
2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी एकूण रु.2,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
3. वरील आदेशाची पूर्तता तीस दिवसाचे आत न केल्यास तेथून पुढे देय रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने अदा करावी.
(सौ. संगिता एस. धायगुडे÷)
अध्यक्ष
(सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/31710)
|
[HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER |