तक्रारदारांतर्फे अॅड प्रियंका शिंदे
जाबदेणार एकतर्फा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
श्री, एस. के. कापसे, मा. सदस्य यांचेनुसार
:- निकालपत्र :-
31/ऑगस्ट/2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार यांनी त्यांचे भाची मनिषा बिपीन भोसले हिच्या लग्नाकरिता आंदण म्हणून फर्निचर देण्याचे ठरविले. त्याप्रमाणे जाबदेणार यांच्या दुकानात दिनांक 19/2/2011 रोजी फर्निचर खरेदीसाठी गेले असता जाबदेणार यांनी ऑर्डर प्रमाणे आठ दिवसात फर्निचर तयार करुन फर्निचर करुन देतो म्हणून सांगितले व त्यानुसार तक्रारदाराने जाबदेणार यांना खालीलप्रमाणे फर्निचर बनवून देण्यास सांगितले.
अ] स्टील कपाट - 6 x 3 चे कपाट 22 x 24 गेज, ग्रेजचे ग्रे कलरचे दरवाजाचे आतील दोन्ही बाजूस 3-3 हँगर हुक, लॉकर व ड्रॉवर
ब] सोफा कम बेड – 26 x 72 चे लांब कुशन ट्रॉली अॅरेंजमेंटसह
क] ब्रँडेड गाद्या – नामांकीत कंपन्यांच्या
वरील फर्निचरची ऑर्डर जाबदेणार यांना तक्रारदार यांनी दिली व अॅडव्हान्स म्हणून रुपये 4000/- दिले. जाबदेणार यांनी फर्निचर तयार झाल्यानंतर फोन करुन सांगतो असे आश्वासन दिले परंतु तक्रारदार यांनी वारंवार विचारणा केली असता व मुलगी व भाची जाबदेणार यांच्या दुकानात गेल्या असता फर्निचर तयार नव्हते. तसेच जाबदेणार यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही. तक्रारदार यांना दिनांक 21/3/2011 रोजी भाचीच्या लग्नात भाचीला फर्निचर भेट दयावयाचे होते. सदरची कल्पना जाबदेणार यांना होती तरीसुध्दा जाबदेणार यांनी नमुद केलेल्या तारखेपूर्वी फर्निचर दिले नाही. त्यानंतर जाबदेणार यांनी दिनांक 23/3/2011 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सदरचे फर्निचर भाचीच्या घरी टेम्पोने पाठविले. त्यावेळी जाबदेणार यांचे चिरंजीव श्रीराम यांना उर्वरित रक्कम रुपये 9000/- दिले व पोहच घेतली. रात्रीची वेळ असल्याने फर्निचर तपासता आले नाही परंतू दुस-या दिवशी फर्निचर निकृष्ट दर्जाचे तसेच गाद्या नामांकित कंपनीच्या नसून निकृष्ट दर्जाच्व्या असल्याचे दिसून आले. त्यानंतर तक्रारदार स्वत: जाबदेणार यांच्या दुकानात गेले व फर्निचर निकृष्ट असल्याचे कळविले. त्यानंतर जाबदेणार यांनी दुरुस्तीसाठी माणूस पाठवितो म्हणून सांगितले. परंतू तक्रारदाराने वारंवार फोन करुन सुध्दा माणूस पाठविला नाही. त्यानंतर तक्रारदार स्वत: जाबदेणार दुकानातून कारागीर घेऊन आले. सदरच्या कारागीरांनीसुध्दा फर्निचर खराब असल्याचे मान्य केले. त्यानंतर आठ दिवसांनी जाबदेणार यांनी टेम्पो पाठवून सोफा कम बेड घेऊन गेले परंतू कपाट व गाद्या नंतर नेतो म्हणून सांगितले परंतू नेल्या नाहीत. तसेच सोफा कम बेड तक्रारदारांना अद्याप परत केला नाही व पैसेही परत दिले नाहीत. त्यानंतर तक्रारदारांनी अपमान टाळण्यासाठी भाचीसाठी दुस-या दुकानातून रुपये 7600/- चा सोफा कम बेड घेणे भाग पडले. तसेच तक्रारदार यांच्या भाचीने जाबदेणार यांच्या दुकानात अनेक हेलपाटे मारुन सुध्दा फर्निचर दिले नाही परंतू प्रत्येक वेळी अपमानास्पद वागणूक दिली. तसेच आजतागायत सोफा कम बेड तक्रारदार यांना दिलेला नाही तसेच कपाट दुरुस्त करुन दिले नाही व गाद्याही बदलून दिल्या नाहीत अथवा रक्कमही परत दिली नाही म्हणून तक्रारदारांनी वकीलामार्फत दिनांक 22/9/2011 रोजी नोटीस पाठविली. सदरची नोटीस स्विकारली नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून ऑर्डर दिल्याप्रमाणे फर्निचर मागतात अथवा फर्निचर साठी दिलेली रक्कम रुपये 13,000/- दिनांक 19/2/2011 पासून 18 टक्के व्याजासह मागतात. तसेच सदरचे फर्निचर वेळेत न दिल्यामुळे दुसरे फर्निचर रुपये 7600/- चे खरेदी करावे लागल्याने झालेला मानसिक त्रासासाठी रुपये 20,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रुपये 10,000/- मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून जाबदेणार यांच्या विरुध्द मंचाने दिनांक 19/1/2012 रोजी एकतर्फा आदेश पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी दाखल केलेल्या बिल नं 24 दिनांक 19/2/2011 ची पाहणी केली असता जाबदेणार यांना तक्रारदारांनी अॅडव्हान्स पोटी रुपये 4000/- दिल्याचे दिसून येते. तसेच तक्रारदार यांनी जाबदेणार यांना दिनांक 22/3/2011 रोजी रुपये 9000/- दिल्याचे सदरच्या पावतीवरुन स्पष्ट होते. जाबदेणार यांना तक्रारदार यांनी वकीलांचे मार्फत दिनांक 22/9/2011 रोजी नोटीस पाठविली. सदरची नोटीस जाबदेणार यांनी स्विकारली नसून अनक्लेम म्हणून परत आल्याचे स्पष्ट होते. तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेल्या लग्नपत्रिकेवरुन तक्रारदार यांच्या भाचीचे लग्न दिनांक 21/3/2011 रोजी होते हे स्पष्ट होते. तक्रारदार यांनी सदर कामी दिनांक 27/7/2012 रोजीच्या श्री. नितीन मिठूलाल कटारिया यांचा साईट व्हिजीट अहवाल दाखल केलेला आहे. सदरच्या अहवालाची पाहणी केली असता सदर अहवालामध्ये खालीलप्रमाणे नमुद केलेले आहे-
1. स्टील कपाट-
अ. कपाटाचे दोन्ही दरवाजे हॉरीझॉन्टल लेवल मध्ये फीट केलेले नाहीत.
ब. कपाटाचा लॉकींग हँन्डल आवश्यक त्या लांबीचा नाही.
क. लॉकींग रॉडची लांबी आवश्यकते पेक्षा कमी आहे.
ड. कपाटाच्या बाहेरील पृष्ठभागावर ब-याच ठिकाणी स्क्रॅचेस आहेत. त्यामुळे कपाटाचे बाहेरील फिनीशिंग खराब दर्जाचे दिलेले आहे.
इ. कपाटामध्ये 2 निकृष्ट स्टील हँगिंग हुक आहेत त्याचे फिटींग केलेले नाही अशा एका हुकचे फिटींग मॅन्युअली केलेले असुन त्यामुळे कपाटाचा पत्रा फिटींगच्या ठिकाणी बेंड झालेला आहे.
2. सोफा कम बेड वरील गादया-
अ. सदर गाद्या नामांकित कंपनीच्या नसुन त्या हातानी बनविलेल्या [हॅन्ड मेड] आहेत.
ब. गाद्यांसाठी वापरलेल्या फोमची डेन्सीटी 40 युनिट पेक्षा कमी असुन त्यावर येणा-या लोड मुळे त्या लवकर खराब होतील.
क. गाद्यांसाठी वारलेली ट्रॅपेस्ट्री [कापडी कव्हर] निकृष्ट दर्जाचे असून फाटलेले आहे तसेच त्यास निकृष्ट दर्जाची हात शिलाई करण्यात आलेली आहे.
4. तक्रारदारांनी दाखल केलेल्या श्री. कटारीया यांच्या अहवालावरुन हे सिध्द होते की, जाबदेणार यांनी तक्रारदार यांना दिलेले फर्निचर निकृष्ट दर्जाचे दिलेले आहे. तसेच तक्रारदारांच्या भाचीचे लग्न दिनांक 21/3/2011 रोजी झाल्यानंतर दिनांक 23/3/2011 रोजी फर्निचर दिल्याचे स्पष्ट होते. तसेच तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार जाबदेणारांनी तक्रारदार यांच्या भाचीच्या घरातून सोफा कम बेड घेऊन गेले परंतु अद्यापपर्यन्त परत केले नाही. तसेच वारंवार जाबदेणार यांच्याकडे मागणी करुनही पैसेही परत केले नाही ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी आहे. जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदार यांना त्यांच्या भाचीसाठी दुस-या दुकानातून रुपये 7600/- चा सोफा कम बेड घ्यावा लागला हे स्पष्ट होते. जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी मुळे तक्रारदारांना शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. म्हणून तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 13,000/- दिनांक 09/11/2011 पासून 9 टक्के व्याजासह परत मिळण्यास पात्र आहेत. तक्रारदारांची व्याजाची मागणी मंजुर करण्यात आल्यामुळे तक्रारदारांच्या नुकसान भरपाईपोटी व इतर केलेल्या मागण्या मंच नामंजुर करीत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार यांनी तक्रारदारांना रुपये 13,000/- दिनांक 09/11/2011
पासून 9 द.सा.द.शे टक्के व्याजासह संपुर्ण रक्कम अदा होईपर्यन्त आदेशाची
प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावी.
[3] जाबदेणार यांनी रुपये 13,000/- व्याजासह परत केल्यानंतर तक्रारदारांनी त्यांच्या ताब्यात असलेले फर्निचर जाबदेणार यांना परत द्यावे.
[4] जाबदेणार यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1000/- दयावेत.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी