(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 24/02/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 13.05.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडून भुखंड विकत घेण्याचा सौदा केला होता सदर भुखंड हा खसरा क्र.40, मौजा-बेलतरोडी, प.ह.नं.38, वर्धा रोड, ता.जि.नागपूर येथील प्लॉट क्र. 35 आहे. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, सदर भुखंड घेण्याबाबतचा विक्रीचा करार गैरअर्जदारांनी करुन दिला नाही, तसेच सदर भुखंडाचे विक्रीपत्रही करुन दिले नाही. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, सदर भुखंडाचे क्षेत्रफळ हे 1850 चौ.फूट एवढे होते व ते विकत घेण्याकरता दि.13.12.1994 रोजी सौदा झाला होता. त्यानुसार भुखंडाची किंमत रु.30,090/- एवढी ठरली होती व ती मासिक किस्तीने भरण्याचे ठरले होते. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, त्याने पुढील प्रमाणे रक्कम भरलेली आहे, दि.10.02.1995 रोजी रु.300/-, दि.07.03.1995 रोजी रु.500/-, दि.28.10.1995 रोजी रु.1,100/-, दि.08.11.1995 रोजी रु.800/-, दि.17.11.1995ा रोजी रु.600/-, दि.19.11.1995 रोजी रु.2,800/-, दि.23.12.1995 रोजी रु.1,000/-, दि.04.01.1996 रोजी रु.400/-, दि.13.01.1996 रोजी रु.600/-, दि.23.03.1996 रोजी रु.2,200/- व दि.30.06.1996 रोजी रु1,000/- असे एकूण रु.11,300/- भरलेले आहेत व त्याच्या पावत्याही गैरअर्जदारांनी दिलेल्या आहेत. 3. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, त्याने रु.6,000/- गैरअर्जदारांना प्लॉटचे नोंदणीकरीता दिलेले आहे, तसेच कंपनीचा अभिकर्ता रक्कम स्विकरण्याकरीता तक्रारकर्त्याकडे येत होता. परंतु दि.30.06.1996 नंतर कोणताही अभिकर्ता तक्रारकर्त्याकडे आला नाही, त्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचे पत्त्यावर गेला असता, त्या पत्त्यावर कंपनीचे कार्यालय आढळून आले नाही व नवीन कार्यालयाचा पत्ता सुध्दा त्यावर लिहीलेला नव्हता. त्यामुळे गैरअर्जदारांच्या स्थळाचा पत्ता तक्रारकर्त्यास मिळाला नाही. या मध्यंतरीच्या काळात तक्रारकर्त्याची नागपूर येथून बदली झाल्यामुळे गैरअर्जदारांचा शोध घेता आला नाही. त्यानंतर परत नागपूरला आल्यानंतर गैरअर्जदारांचा शोध घेतला व त्यांना लेखी अर्ज देण्याचा प्रयत्न केला असता तो त्यांनी स्विकारला नाही व विक्रीपत्र करुन देण्यांस टाळाटाळ केली. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, गैरअर्जदारांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला असुन सेवेत त्रुटी दिलेली आहे. त्यामुळे त्याने गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना दि.20.08.2008 रोजी नोटीस पाठविली, त्याचे उत्तर गैरअर्जदारांनी दि.05.09.2008 रोजी दिलेले आहे. तसेच गैरअर्जदारांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचात दाखल केलेली असुन त्याव्दारे मागणी केली आहे की, तक्रारीत नमुद भुखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन व्यक्तीशः ताबा द्यावा अथवा तेवढयाच क्षेत्रफळाचा दुसरा भुखंड द्यावा. तसेच शारीरिक व मानसिक त्रास व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.10,000/- ची मागणी केलेली आहे. 4. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदाराला बजाविण्यांत आली असता त्यांनी आपले उत्तरात तक्रारकर्त्यानेच त्याचा पत्ता पुरविला नाही व पत्ता बदलवला असे नमुद केले आहे. सदर तक्रार 12 वर्षे 6 महिन्यांचे विलंबाने दाखल केलेली असुन भुखंडाचे क्षेत्रफळ हे 1850 चौ.फूट नसुन 1770 चौ.फूटाचे असल्याचे म्हटले आहे. तसेच असे नमुद केले आहे की, सदर भुखंड हा एक वर्षाचे आंत द्यावयाचा होता. तसेच तक्रारकर्त्याने रु.16.990/- भरले असल्याचे नमुद केले आहे. गैरअर्जदारांनी पुढे असेही नमुद केले आहे की, सदर भुखंडाची जागा मेट्रो रिजनमध्ये गेल्यामुळे शासनाकरता जागा सोडावी लागली व लेआऊटमध्ये बदल झाला. तसेच तक्रारकर्त्याने रक्कम जमा न केल्यामुळे व 1996 पासुन कोणताही व्यवहार गैरअर्जदारासोबत न केल्यामुळे तक्रारकर्त्याचा भुखंड रद्द करण्यांत आला असुन तो दुस-या व्यक्तिस आवंटीत करण्यांत आला. तसेच गैरअर्जदार हे तक्रारकर्त्याचे रु.17,300/- परत करण्यांस तयार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी तक्रारकर्त्याचे इतर सर्व म्हणणे नाकारले असुन सदर तक्रार खारिज करण्यांची मंचास विनंती केलेली आहे. 5. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.14.02.2011 रोजी आली असता मंचाने तक्रारकर्त्याचा युक्तिवाद त्यांचे वकीला मार्फत ऐकला. तसेच तक्रारीत दाखल दस्तावेज व तक्रारकर्त्याचे कथन यांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 5. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडून खसरा क्र.40, मौजा-बेलतरोडी, प.ह.नं.38, वर्धा रोड, ता.जि.नागपूर येथील भुखंड क्र. 35 खरेदी करण्याचा सौदा केला होता, ही बाब उभय पक्षांचे कथनावरुन स्पष्ट होत असल्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ‘ग्राहक’ ठरतो असे मंचाचे मत आहे. 6. गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरात तक्रारकर्त्याने सदर तक्रार ही विलंबाने दाखल केल्या बद्दलचा आक्षेप घेतलेला आहे. सदर आक्षेपाचा विचार करता तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांसोबत भुखंड खरेदी करण्याचा सौदा झाला होता ही बाब स्पष्ट होते. तसेच तक्रारकर्त्यानुसार सदर भुखंड खरेदी करण्या करता सौदा हा दि.13.12.1994 रोजी झाल्याचे म्हटले आहे. गैरअर्जदारांनी आपल्या लेखीउत्तरात सौदा हा दि.13.12.1994 रोजी झाला नसुन दि.05.01.1995 रोजी तक्रारकर्त्याने सदर भुखंडाची बुकींग केली असे नमुद केले आहे. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीतील कथन सिध्द करण्याकरता त्यांनी आपली भिस्त मंचासमक्ष दाखल केलेलया पावत्यांवर ठेवली आहे. सदर पावत्यांचे अवलोकन केले असता व तक्रारीतील कथनानुसार तक्रारकर्त्याने सर्वप्रथम दि.10.02.1995 रोजी गैरअर्जदारांना रक्कम दिल्याचे स्पष्ट होते. म्हणजेच सन 1995 साली तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचेमध्ये तोंडी खरेदी विक्रीचा सौदा झाला होता, ही बाब स्पष्ट होते. या उलट गैरअर्जदारांना संपूर्ण रक्कम ही एक वर्षाचे आंत द्यावयास पाहिजे होती, असे गैरअर्जदारांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे. परंतु सदर बाब सिध्द करण्याकरता कोणताही दस्तावेज दाखल केलेला नाही, तसेच सदर भुखंड ज्या अभिन्यासात आहे ते अभिन्यास NATP झाले आहे किंवा नाही व भुखंड कायदेशिररित्या विक्रीकरता परिपूर्ण आहे किंवा नाही, याबाबतचा कोणताही पुरावा दाखल न केल्यामुळे गैरअर्जदार हे विक्रीपत्र करुन देण्यांस समर्थ होते परंतु तक्रारकर्त्याने विक्रीपत्र करुन घेतले नाही आणि त्यामुळे तक्रार ही कालातीत नाही असे गैरअर्जदारांचे कथन मान्य करण्यांत येत नाही. कारण जो पर्यंत अभिन्यास (Layout) चे NATP होत नाही तो पर्यंत त्या अभिन्यासातील भुखंडांचे विक्रीपत्र करता येत नाही. अश्या परिस्थितीत विक्रीपत्र करुन देण्याकरता आवश्यक सर्व कायदेशिर बाबीही गैरअर्जदारांनी पुर्ण केल्या नव्हत्या, असा निष्कर्ष निघतो. गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरातील बचावात्मक मुद्दे सिध्द करण्याकरता कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे सदर तक्रार ही कालबाह्य असे समजू शकत नाही. 7. गैरअर्जदारांच्याच लेखी उत्तरावरुन ही बाब स्पष्ट होते की, त्यांचे कार्यालयाचा पत्ता बदललेला होता, या बाबत त्यांनी असे कथन केले आहे की, कार्यालय प्रथम ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी नवीन कार्यालयाचे पत्त्याचा सुचना फलक लावलेला होता, परंतु सदर बाब सुध्दा कोणत्याही दस्तावेजांवरुन स्पष्ट होत नाही. तसेच मंचाचे असे मत आहे की, जर कार्यालयाचा पत्ता बदलला होता तर गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास पत्राव्दारे सुचित करावयास पाहिजे होते, परंतु त्यांनी तसेही केले नाही. त्यामुळे अश्या परिस्थितीत गैरअर्जदारांचा पत्ता शोधण्याची संपूर्ण जबाबदारी तक्रारकर्त्यावर आली, त्यामुळे भुखंडाची रक्कम देण्याबाबत तक्रारकर्त्याकडून विलंब झाला या संपूर्ण बाबींबद्दल तक्रारकर्त्याला जबाबदार धरता येत नाही, असे मंचाचे मत आहे. उभय पक्षांचे कथनावरुन प्रस्तुत तक्रारीत भुखंडाचा सौदा हा रु.30,090/- ला झाला होता ही बाब स्पष्ट होते. 8. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीमध्ये गैरअर्जदारांना रु.17,300/- दिल्याचे नमुद केले आहे. परंतु सदर बाब गैरअर्जदारांनी नाकारीत असतांना आपल्या उत्तरातील परिच्छेद क्र.3 मधील शेवटच्या ओळीत ते तक्रारकर्त्यास रु.17,300/- परत करावयास तयार आहेत, असे नमुद केले आहे. यावरुन तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांना एकूण रु.17,300/- दिले होते ही बाब स्पष्ट होते. 9. गैरअर्जदारांनी पुढे असेही नमुद केले आहे की, त्यांनी तक्रारकर्त्याचा भुखंड रद्द करुन गरजू व्यक्तिस आवंटीत केला आहे. परंतु त्याबाबतचा कोणताही दस्तावेज दाखल केलेला नाही, त्यामुळे गैरअर्जदारांचे सदर म्हणणे मान्य करण्यांत येत नाही. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये भुखंडाचे क्षेत्रफळ 1850 चौ.फूट असल्याचे नमुद केले आहे, तर सदर बाब गैरअर्जदारांनी नाकारुन भुखंडाचे क्षेत्रफळ 1770 चौ.फूट असल्याचे म्हटले आहे. तक्रारकर्त्याने आपल्या प्रतिउत्तरात भुखंडाचे क्षेत्रफळ 1770 चौ.फूट होते पण तक्रारीमध्ये टंकलेखनाच्या चुकीमुळे भुखंडाचे क्षेत्रफळ 1850 चौ.फूट नमुद केलेले आहे. यावरुन सदर भुखंडाचे क्षेत्रफळ 1770 चौ.फूट होते हे गृहीत धरण्यांत येते. 10. सदर प्रकरणामध्ये गैरअर्जदारांनी भुखंड क्र.35 च्या संदर्भात रु.17,300/- एवढी रक्कम तक्रारकर्त्याकडून स्विकारली होती व भुखंडाची किंमत रु.30,090/- ठेवली होती. त्यामुळे उर्वरित रक्कम स्विकारुन गैरअर्जदारांनी सदर भुखंडाचे विक्रीपत्र करुन द्यावे, जर भुखंड दुस-यास आवंटीत केला असेल तर गैरअर्जदारांनी त्यांचे मालकीचा व त्याच अभिन्यासातील 1770 चौ.फूट क्षेत्रफळाचा दुसरा कोणताही भुखंड तक्रारकर्त्याकडून उर्वरित रक्कम स्विकारुन विक्रीपत्र करुन ताबा द्यावा. 11. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास सेवेत त्रुटी दिली असुन त्यामुळे त्यास शारीरिक व मानसिक त्रास झाला असुन तक्रारीचा खर्च करावा लागला. या सर्व बाबींकरीता गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास रु.10,000/- द्यावयास पाहिजे असे मंचाचे मत आहे. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता वरील परिस्थितीचा विचार करुन आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास सेवेत त्रुटी दिल्याचे घोषीत करण्यांत येते. 3. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याकडून भुखंडाची उर्वरित रक्कम स्विकारुन भुखंड क्र.35 चे अथवा त्याच अभिन्यासातील 1770 चौ.फूट क्षेत्रफळाचे दुस-या कोणताही भुखंडाचे विक्रीपत्र करुन ताबा द्यावा. 4. गैरअर्जदार यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याना झालेल्या शारीरिक, मानसिक त्रास व तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.10,000/-अदा करावे. 5. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |