निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 15/12/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 15/12/2011
तक्रार निकाल दिनांकः- 13/04/2012
कालावधी 03 महिने 28 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B.
सदस्या सदस्या
सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc.
विलासराव भास्करराव देशमुख अर्जदार
वय 35 वर्ष, धंदा. शेती, अड.जी.एच.दोडीया.
रा.नांदखेडा, ता. जि.परभणी.
विरुध्द
शाखाधिकारी,
दि ओरीएंटल इन्शुरन्स कंपनी लि. गैरअर्जदार.
दौलत बिल्डींग, शिवाजी चौक, अड.बी.एम.कुलकर्णी.
परभणी ता.जि.परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.
2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष)
इंश्युअर्ड ट्रॅक्टरची अपघातात झालेली नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीने नाकारले म्हणून प्रस्तुतची तक्रार आहे.
तक्रार अर्जातील थोडक्यात हकीकत
अर्जदार मौजे नांदखेडा, ता.परभणी येथील रहिवासी शेतकरी असून शेती कामासाठी त्याने MH-22/D-5730 नंबरचा ट्रॅक्टर खरेदी केला आहे. सदर ट्रॅक्टरचा त्याने गैरअर्जदाराकडून विमा उतरविलेला होता. त्याचा पॉलिसी क्रमांक 182003/47/2010/270 याप्रमाणे होता. तारीख 14/01/2011 रोजी ट्रक्टरमध्ये उस भरून कारखान्याकडे घेवुन जात असतांना समोरून येणारी जीप क्रमांक MH-22/B-4357 च्या चालकाने ट्रॅक्टरला समोरून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. अपघातात ट्रॅक्टरचे बरेच नुकसान झाले. परभणी ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा रजिष्टर क्रमांक 243/11 प्रमाणे नोंद केली व पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीला अपघातातील ट्रॅक्टरच्या नुकसानाची माहिती कळविली होती. विमा कंपनी तर्फे सर्व्हेअर मार्फत पाहणी करून नुकसानीचा सर्व्हे केला. अर्जदाराचे म्हणणे असे की, ट्रॅक्टरचे रूपये.2,50,000/- इतके नुकसान झाले होते. ट्रॅक्टरची अपघात विमा पॉलिसी मुदतीत झाल्यावर नुकसान भरपाई मिळण्यासाठी विमा कंपनीकडे आवश्यक त्या कागदपञासह क्लेम दाखल केला होता. परंतु गैरअर्जदार यांनी ट्रॅक्टरला जोडलेल्या दोन ट्रॉलीचा विमा उतरविलेला नाही या कारणास्तव विमा क्लेम नामंजुर केला म्हणुन त्याची कायदेशीर दाद मिळणेसाठी प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करून अपघातातील ट्रॅक्टरची नुकसान भरपाई रूपये 2,50,000/-, मानसीक ञास व सेवाञुटीबददल रूपये 25000/- 18 टक्के व्याजासह मिळावे म्हणुन गैरअर्जदाराविरूध्द दाद मागितली आहे.
तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र (नि.2) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.5 लगत घटनास्थळाचा पंचनामा आणि गैरअर्जदाराने क्लेम नाकारल्याचे पञ दाखल केलेले आहे.
तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीस पाठविल्यावर त्याने तारीख 07/04/2012 रोजी प्रकरणात आपला लेखी जबाब ( नि.10) दाखल केलेला आहे. अर्जदाराने तक्रार अर्जात वर्णन केले प्रमाणे त्याच्या मालकीच्या ट्रॅक्टरचा गैरअर्जदारकडून विमा उतरविल्या संबंधीचा मजकूर वगळता बाकीची सर्व विधाने साफ नाकारलेली आहेत. त्याचे म्हणणे असे की, अपघाताच्यावेळी अर्जदाराच्या ट्रॅक्टरला दोन ट्रॉलीमध्ये उस लोडींग केला होता. त्या दोन ट्रॉलीचा नंबर MH-22/D-9325 व MH-22/B-9711 (या दोन्ही ट्रॉलीचा) विमा उतरविलेला नव्हता. त्यामुळे पॉलिसी नियम व अटींचे अर्जदाराने उल्लंघन केलेले आहे कारण ट्रॅक्टर व ट्रॉली हे एकच युनीट मानले जाते. नियमाप्रमाणे ट्रॉलीचा विमा उतरविणे बंधनकारक असतांनाही ट्रॉलीचा विमा कंपनीकडे काढलेला नसल्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने नियमानुसार अर्जदाराचा क्लेम नामंजुर केलेला आहे. त्याबाबतीत त्यांच्याकडुन कोणत्याही प्रकारे सेवाञुटी अथवा बेकायदेशीरपणा झालेला नाही. गैरअर्जदाराचे पुढे म्हणणे असे की, अर्जदाराने ट्रॅक्टर अपघाताची माहिती कळविल्यानंतर त्यांनी सर्व्हेअरची नेमणुक करून नुकसानीचा सर्व्हे केला होता. त्यामुळे सर्व्हेअर श्री परळीकर यांनी ट्रॅक्टरच्या नुकसान भरपाईचे असेसमेंट रूपये 84060/- एवढे केले आहे. परंतु अर्जदाराकडुन पॉलिसी कंडीशनचे उल्लंघन झाल्यामुळे ती नुकसान भरपाई देण्यास गैरअर्जदार जबाबदार नाही. त्यामुळे तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे.
लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र (नि.11) आणि पुराव्यातील कागदपञ नि.5 लगत एकुण 5 कागदपञे दाखल केलेली आहे.
तक्रार अर्जाचे अंतिम सुनावणीच्यावेळी अर्जदार तर्फे अड जी.एच.दोडीया आणि गैरअर्जदारातर्फे अड बी.एम.कुलकर्णी यांनी युक्तीवाद केला.
निर्णयासाठी उपस्थितीत होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदाराच्या मालकीच्या ट्रॅक्टर रजिष्टर
क्र.MH-22/D-5730 ची अपघातात झालेली नुकसान
भरपाई देण्यास बेकायदेशिररित्या नाकारुन सेवात्रुटी
केली आहे काय ? होय.
2 अर्जदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? होय.
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2
अर्जदाराच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक MH-22/D-5730 चा गैरअर्जदाराकडून विमा उतरविलेला होता, ही अडमिटेड फॅक्ट आहे. गैरअर्जदाराने पुराव्यात 13/1 वर पॉलिसी सर्टीफिकेटची प्रत ही दाखल केली आहे. तिचे अवलोकन केले असता पॉलिसी सर्टीफिकेट क्र. 18200347/2010/270 व पॉलीसीची मुदत 28/01/2010 ते 27/01/2011 असल्याची त्यावर नोंद आहे.
तारीख 14.01.2011 रोजी ट्रॅक्टरसोबत जोडलेल्या दोन ट्रॉलीमध्ये उस भरून कारखान्याकडे घेवुन जात असतांना परळी ते गंगाखेड रोडवर बाम्हणवाडा शिवारात समोर भरधाव येणारी जीप क्र. MH-22/B4357 च्या चालकाने ट्रॅक्टरला समोरून धडक देवुन अपघात केला होता व अपघातात ट्रॅक्टरचे बरेच नुकसान झाले होते ही देखील अडमीटेड फॅक्ट आहे. अर्जदाराने पुराव्यात नि.5 लगत परभणी ग्रामीण पोलीस स्टेशनला गु.र.नं. 243/11 मधील घटनास्थळ पंचनाम्याची छायप्रत ही दाखल केलेली आहे. अपघातानंतर अर्जदाराने घटनेची माहिती गैरअर्जदारास लगेच कळविली होती व त्यानुसार विमा कंपनीने सर्व्हेअरची नेमणुक करून सर्व्हेअरने ट्रॅक्टरच्या नुकसानीचा सर्व्हे केला होता ही देखील अडमीटेड फॅक्ट आहे. अर्जदाराने त्यानंतर गैरअर्जदाराकडे आवश्यक त्या कागदपञासह नुकसान भरपाई मिळण्यासाठी क्लेम केला होता हे गैरअर्जदाराने नाकारले नाही. गैरअर्जदारातर्फे नेमलेले सर्व्हेअर श्री परळीकर यांनी अर्जदाराने दिलेल्या कागदपञावरून अपघातात ट्रॅक्टरच्या डॅमेज झालेल्या स्पेअर पार्टस बदलावे लागणार असल्यामुळे त्याची तपशीलवार नोंद करून व त्याची किंमत विचारात घेवुन नियमाप्रमाणे योग्य तो घसारा स्पेअर पार्टस च्या किंमतीतुन वजा करून एकुण नुकसान भरपाई रूपये 84060/- देय असेसमेंट केलेले होते. ती मुल्यांकन शिट तथा बिल चेक रिपोर्टच्या छायाप्रती गैरअर्जदाराने पुराव्यात नि.13/5 ला दाखल केलेले आहे. असेसमेंट रिपोर्टप्रमाणे अर्जदाराची सदरची नुकसान भरपाई मंजुर न करता अर्जदाराने त्याच्या ट्रॅक्टरला जोडलेल्या दोन ट्रॉलीचा विमा उतरविलेला नव्हता या कारणास्तव नुकसान भरपाईचा क्लेम नामंजुर केलेला होता. त्या क्लेम नामंजुरीची तारीख 29.08.2011 चे पञ अर्जदाराने पुराव्यात नि.5/2 वर दाखल केलेले आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने ज्या कारणास्तव विमा नाकारला होता तो निर्णय कायदेशिररित्या ग्राह्य धरता येईल का? एवढाच मुददा प्रकरणाच्या निर्णयासाठी महत्वाचा आहे.अर्जदाराच्या ट्रॅक्टरला अपघातात झालेले नुकसान हे समोरून येणा-या ति-हाईत वाहनाच्या(जीपची) धडकेमूळे झाले होते ही वस्तुस्थिती आहे.त्यामुळे ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीचा विमा उतरविलेला नव्हता हे कारण मुळीच संयुक्तीक वाटत नाही कारण ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा अपघात विमा नाही याचा काहीच संबंध नाही.गैरअर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे ट्रॉलीचा विमा नाही म्हणुन कराराचे उल्लंघन झालेले आहे असे क्लेम नाकारण्याच्या पञात कारण दिले असले तरी संबंधीत पॉलिसी कराराची ती अट मंचाला युक्तीवादाच्या वेळी दाखवुन दिलेली नाही किंवा लेखी जबाबासोबत स्पष्ट उल्लेखही केला नसल्यामुळे याबाबतीत घेतलेला बचाव मुळीच मान्य करता येणार नाही. नुकसान भरपाई देण्याचे टाळण्यासाठीच गैरअर्जदाराने क्लेम नाकारण्याच्या पञात चुकीचे कारण नमुद करून बेकायदेशीररित्या क्लेम नाकारून सेवाञुटी केलेली आहे. त्यामुळे सर्व्हेअर श्री परळीकर यांनी क्लेम नुकसान भरपाईचे मुल्यांकनाप्रमाणे अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यासाठी निश्चित पाञ आहे. सबब मुददा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने आदेश तारखेपासून 30 दिवसाचे आत अर्जदाराच्या मालकीच्या ट्रॅक्टर
क्रमांक MH-22/D-5730 ची अपघातात झालेली नुकसान भरपाई रुपये 84060/-
द.सा.द.शे. 9% दराने तारीख 01.09.2011 पासून व्याजासह द्यावी.
3 याखेरीज मानसिक त्रास व सेवा त्रूटीची नुकसान भरपाई रु. 3000/- व अर्जाचा खर्च रु. 2000/- आदेश मुदतीत द्यावेत.
4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवण्यात याव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे.
सदस्या. सदस्या. अध्यक्ष.