तक्रारदार – स्वत:
सामनेवालेतर्फे- अँड.एस.एस.कुलकर्णी./आर.बी.हसेगांवकर.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने त्यांनी त्यांची नौकरी सोडून Tell Medicine & Ambulance Hospital Project साठी सामनेवाले बँकेकडे रक्कम रु. 10 लाख कर्जाची मागणी सन 2002 चे सुरुवातीस केली होती. बँकेकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे त्यावरुन मागणीनुसार तक्रारदाराचे रु. 10 लाखाचे कर्ज मंजूर झाले. सदर कर्जाची हमी सुक्ष्म एवंम लघु उदयमं क्रेडीट गॅरंटी फंड ट्रस्ट एस.एम.ई. विकास केंद्र, सी-11 जी ब्लॉक बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स बांद्रा मंबई-51 यांचे मार्फत घेतली जाते.
तक्रारदाराने रक्कम रु.75,000/- म्हणजेच 15 टक्के रक्कम बॅंकेत जमा केली, व उर्वरीत रक्कम रु.4,25,000/- बँकेने रुग्णवाहीका व इतर वस्तु खरेदी करण्यासाठी दिले. त्यावेळी तक्रारदारांने ओमिनी कार रक्कम रु. 2,72,000/- मध्ये खरेदी केली व इतर साहित्या उर्वरीत रक्कमेतून खर्च करुन खरेदी करण्यात आलेले आहे.
मंजूर केलेल्या कर्ज रक्कमेपैकी रक्कम रु. 5,00,000/- कशा प्रकारे खर्च केली याबाबत तक्रारदाराने सामनेवाले बँकेस कळविलेले आहे. उर्वरीत कर्जाची रक्कम रु.5,00,000/- सामनेवाले बँकेने मंजूर केली होती परंतू अदयापपर्यंत तक्रारदारास दिलेली नाही, त्यामुळे तक्रारदारास त्याचा प्रकल्प योग्यरितीने सुरु करता आलेला नाही, म्हणून तक्रारदाराची तक्रार आहे.
विनंती की, कर्जाची उर्वरीत रक्कम रु. 5,00,000/- झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम रु. 4,00,000/- तक्रारदारांना देण्याबाबत आदेश व्हावा.
सामनेवालेने त्याचा खुलासा तारीख 11/06/2010 रोजी दाखल केला. त्यांनी तक्रारदारास रक्कम रु. 10,00,000/- कर्ज मंजूर केल्याची बाब नाकारलेली आहे. तक्रारदारांना फक्त रु. 5,00,000/- कर्ज मंजूर करण्यात आले व त्याचे वितरण करण्यात आले परंतू तक्रारदाराने सदर कर्जाचे हप्ते नियमितपणे भरलेले नाहीत. सदरचे कर्ज बुडविणेकामी तक्रारदाराने खोटे बेबाकी प्रमाणपत्र तयार केले आहे. त्याबाबत तक्रारदाराविरुध्द फौजदारी केसही चालू आहे. तसेच सदरचे प्रमाणपत्र बँकेने दिलेले नसल्याचे उपप्रादेशीक परिवहन कार्यालयाला कळविलेले आहे. तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी. बँकेस विनाकारण त्रास दिल्याबद्दल व खर्चास भाग पाडले म्हणून रु. 10,000/- नुकसान भरपाई देण्याबाबत आदेश व्हावा.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, तक्रारदाराचा लेखी युक्तिवाद, सामनेवालेचा खुलासा, दाखल कागदपत्रे, शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचे सखोल वाचन केले.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदाराने सामनेवाले बँकेकडे त्याच्या प्रकल्पासाठी रु. 10,00,000/- कर्जाची मागणी केलेली होती परंतू सदरचे कर्ज बँकेने मंजूर केल्याबाबतचे मंजूरीपत्र तक्रारीत दाखल नाही. तसेच तक्रारदाराने दाखल केलेली तक्रारीतील कागदपत्रे पाहता त्यात तक्रारदाराने जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे लोकशाही दिनाच्या दिवशी म्हणजेच ता. 04/01/2010 रोजी अर्ज दिलेला आहे. सदर अर्जात तक्रारदाराने सामनेवाले बँकेने तक्रारदारांना मंजूर केलेल्या कर्जतील रु. 15,00,000/- वाटप करण्याबाबत आदेश होण्याबाबत सदरचा अर्ज आहे. तारीख 31/08/2009 रोजी बँकेने तक्रारदारांना त्यांचा कर्ज प्रस्ताव मंजूर करण्याबाबत रक्कम रु. 2,50,000/- भरण्याबाबतचे पत्र दिलेले आहे. तक्रारदाराने तक्रारीतच नमूद केलेले आहे की, त्यांनी केवळ रक्कम रु. 75,000/- भरलेले आहेत व त्यात रु. 4,25,000/- कर्ज मिळालेले आहे, ही बाब सामनेवालेंनाही मान्य आहे. दाखल कागदपत्रावरुन कोठेही स्पष्ट होत नाही की, बँकेने तक्रारदारांना रु. 10,00,000/- कर्ज मंजूर केले आहे. सदर मंजूरीचा आदेश तक्रारीत नसल्याकारणाने सामनेवालेंनी तक्रारदारांना उर्वरीत रक्कम रु. 5,00,000/- न देवून दयावयाच्या सेवेत कसूर केल्याची बाब कोठेही स्पष्ट होत नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार रद्द करणे उचित होईल, असे न्याय मंचाचे मत आहे. तक्रारदार हे सुशिक्षीत आहेत, व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांनी कोणतेही कर्ज मंजूरीचे पत्र नसतांना केवळ सामनेवालेंना त्रास देण्यासाठी सदरची तक्रार दाखल केलेली दिसते, त्यामुळे तक्रारदाराने सामनेवालेंना रक्कम रु. 500/- खर्च देणे उचित होईल, असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब, न्याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
2. तक्रारदाराने सामनेवालेंना रक्कम रुपये 500/- (अक्षरी रुपये पाचशे फक्त ) खर्च म्हणून आदेश मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत अदा करावेत.
(एम.एस.विश्वरुपे) ( पी.बी.भट )
सदस्या, अध्यक्ष,
चुनडे/- स्टेनो जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड जि.बीड