तक्रारदारातर्फे – वकील – ए.बी.लांडगे,
सामनेवालेतर्फे – वकील – बी.बी.नामलगांवकर,
।। निकालपत्र ।।
( निकाल घोषितद्वारा सौ.एम.एस.विश्वरुपे – सदस्या )
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, श्री.हनुमंत धोंडीबा गायकवाड हे तक्रारदार क्र.1 चे पती क्र.2,3 चे वडील आणि क्र.4 व 5 चा मुलगा आहे. हनुमंत धोंडीबा गायकवाड हे व्यवसायाने ड्रायव्हर होते. त्यांचे मालकीच्या दोन अँपे रिक्षा होत्या. एक अँपे रिक्षा स्वत: चालवत असे व दुसरा पगारी ड्रायव्हर ठेवून चालवत असत. कुटूंबाचे कायमस्वरुपी उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण याद्वारे केले होते. अँपे रिक्षा खरेदी केल्यानंतर सामनेवाले यांचेकडे सदर अँपेरिक्षांचा विमा घेतला असुन त्यांचा कालावधी 29.07.2009 ते 28.07.2010 असा आहे. सदर विमा पॉलसीची प्रिमियमची रक्कम रु.3,435/- सामनेवाले यांचेकडे दिलेला असुन त्यानी स्विकारली आहे. सदर पॉलसी घेताना सामनेवाले यांचे प्रतिनिधींना अँपेरिक्षाचे मालक हनुमंत धोंडीबा गायकवाड हे स्वत: ड्रायव्हर म्हणुन काम करणार असल्या बाबतची कल्पना दिलेली होती. त्याप्रमाणे अँपेरिक्षाचे मालकाच्या जोखीमीसह, अँपेरिक्षाचे नुकसान, त्यातीत व्यक्तीचा जीवीताचे नुकसान वैगेरे बाबतचा विमा उतरविण्या बाबत विमा प्रतिनिधीला विनंती केली होती.
दुर्दैवाने तक्रारदारांचे पतीचा मोटार सायकल अपघात ता.10.11.2009 रोजी मृत्यू झाला. तक्रारदारांचे पती हनुमंत धोंडीबा गायकवाड मयत झाले. अपघाता नंतर तक्रारदारांनी अपधाताची पोलीस कागदपत्रे, मयताचा वैद्य वाहन चालवण्याचा परवाना व मिवा पॉलीसीसह अपघाती मृत्यू बाबतची नुकसान भरपाई देण्या बाबत सामनेवाले यांना विनंती केली. परंतु सामनेवाले यांनी प्रतिसाद दिला नाही. तक्रारदारांनी ता.18.2.2010 रोजी सामनेवाले यांना नोटीस पाठविली, सदरील नोटीस सामनेवाले यांना ता.22.2.2010 रोजी प्राप्त झाली. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना नूकसान भरपाईची रक्कम दिली नाही.
तरी तक्रारदारांची विनंती की, तक्रारदारांना एकुण रक्क्म रु.5,00,000/- नुकसान भरपाईची रक्कमवर 12.50 टक्के व्याजासह सामनेवाले यांचेकडून वसुल होवून मिळावी.
सदर प्रकरणात सामनेवाले हजर झालेले असुन त्यांनी त्यांचा खूलासा ता.07.01.2011 रोजी न्यायमंचात दाखल केला आहे.
सामनेवाले यांचा खूलाशानुसार त्यांना तक्रारदारांच्या पतीने घेतलेली अँपेरिक्षाची विमा पॉलीसी घेतल्याची बाब मान्य आहे. परंतु सदर विमा पॉलीसी प्रमाणे मालक अथवा मालक/ड्रायव्हरची रिस्क कव्हर होत नसल्यामुळे त्या बाबतची नुकसान भरपाई तक्रारदारांना देता येणार नाही. सामनेवाले यांनी विमा पॉलीसी ( O.D. Basic along with 3 Passenger and 1 W.C.to employee ) ओन डॅमेज, 3 प्रवासी, 1 पगारी नोकर ( Works men Compensation ) अशी इंश्युरन्स केलेली आहे. या संदर्भात तक्रारदारांना तोंडी सांगीतले असूनही सदरची तक्रार न्यायमंचात दाखल केली आहे. तरी सदरची तक्रार रद्द करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र, शपथपत्र, सामनेवाले यांचा लेखी खुलासा, शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील ए.बी लांडगे व सामनेवाले यांचे विद्वान वकील बी.बी.नामलगांवकर यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदारांचे पती श्री.हनुमंत धोंडीबा गायकवाड यांनी आकाश फायनान्स कंपनी तर्फे कर्ज घेवून अँपेरिक्षा विकत घेतली होती. सदरची रिक्षा ते स्वत: चालवत होते. सदर अँपेरिक्षाची विमा पॉलीसी क्र. सामनेवाले यांचेकून ता.29.7.2009 ते 28.7.2010 या कालावधीसाठी घेवून प्रिमियमची रक्कम रु.3,435/- भरणा केली. दूर्दैवाने ता.10.11.2009 रोजी मोटार अपघातात तक्रारदारांचे पतीचा मृत्यू झाला. तक्रारदारांनी आवश्यक त्या कागदपत्रासह सदर पॉलीसी प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम मिळण्याकरीता सामनेवाले यांचेकडे विनंती केली, परंतु अद्यापपर्यन्त तक्रारदारांना सदरची रक्कम मिळाली नाही.
सामनेवाले यांच्या खूलाशानुसार त्यांना सदरची विमा पॉलीसी मान्य आहे, परंतु सदर पॉलीसीमध्ये मालक चालकाची रिस्क कव्हर केलेली नसल्यामूळे नूकसान भरपारईची रक्कम देता येणार नाही , असे नमूद केले आहे.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता, विमा पॉलीसीचे अवलोकन केले असता, O.D.Basic करीता रु.1,364/- तसेच Liability to Passenger (s) 3, W C to Employee 1 करीता रु. 1,480 असे एकुन रु.3,455/- प्रिमियमची रक्कम भरणा केल्याचे दिसून येते. मालक/चालकाचे सरंक्षण विमापत्रात नसल्यामूळे तक्रारदारांनी तक्रारीत मागणी केल्या प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम देता येणार नाही, असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी दाखल केलेला न्याय निवाडयाचा त्यांचे म्हणन्याचे समर्थनार्थ 2010 SAR(Civil) मा.सर्वोच्च न्यायालय. बिमलेश अँण्ड ऑदर विरुध्द न्यू इंडियन ऍश्युरन्स कं.लि. चा आधारघेतला आहे.
सदरचा न्याय निवाडा हा मोटार वाहन कायदा 1988 कलम 163 अ आणि 166 च्या संदर्भात आहे. तसेच सदर प्रकरणात संबंधीत अर्जदाराने संरक्षण विमा हाप्ता मालक वाहन चालकाचा भरले असल्याचे विधान आल्याने सदरचे प्रकरण फेरचौकशीसाठी पाठविण्यात आले आहे.
वरील न्याय निवाडयाचे सखोल वाचन केले असता सदरील न्यायनिवाडा हा तक्रारदाराचे प्रकरणास लागू होत नाही, असे न्यायमंच नंम्रपणे नमुद करीत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदारांची तक्रार रद्द करण्यात येते.
2. सामनेवाले खर्चाबाबत आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे
तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांला परत करावेत.
( सौ.एम.एस.विश्वरुपे ) ( पी. बी. भट )
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि. बीड