::: आ दे श प त्र :::-
मा. सदस्य, श्री. रा. कि. पाटील यांचे नुसार :-
1. तक्रारकर्त्याने सदर अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये सादर केला.
2. तक्रारकर्त्याचे थोडक्यात असे म्हणणे आहे की, ते विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांचे ग्राहक असून त्यांचा ग्राहक क्रमांक 042801509666 आहे व त्यांच्याकडे बॅंकेची ए.टी.एम. सुविधा तिवसा येथे उपलब्ध आहे.
3. तक्रारकर्ता यांनी दिनांक 11-05-2015 रोजी सकाळी अंदाजे 9.15 वाजता विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांच्याकडे तिवसा येथे असलेल्या ए.टी.एम. मशीन मधून रुपये 10,000/- काढण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना रुपये 10,000/- रक्कम प्राप्त झाली नाही. म्हणून त्यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांना फोनवर माहिती दिली. विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्त्याला सांगितले की, 07 दिवस वाट पहा व रक्कम खात्यात जमा न झाल्यास बॅंकेत तक्रार करण्यास सांगितले.
4. तक्रारकर्ता यांनी दिनांक 18-05-2015 रोजी विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडे ऑनलाईन तक्रार नोंदविली. त्यानंतर, त्यांना दिनांक 20-05-2015 रोजी मोबाईलवर संदेश मिळाला की, रुपये 10,000/- चा व्यवहार पूर्ण झाला. तक्रारकर्ता यांनी सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासण्याकरिता दिनांक 22-05-2015 रोजी विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांना अर्ज दिला. तसेच बॅंकिंग लोकपाल अंतर्गत ऑनलाईन तक्रार दिनांक 30-07-2015 रोजी दिली. सदर तक्रारीची दखल न घेतल्यामुळे तक्रारकर्ता यांनी दिनांक 24-08-2015 रोजी पुन्हा ऑनलाईन तक्रार नोंदविली.
5. विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 हे रुपये 10,000/- देण्यास टाळाटाळ करीत आहे. तसेच त्याबाबतची माहिती सुध्दा देण्यास टाळाटाळ करीत आहेत. म्हणून, तक्रारकर्त्याने दिनांक 04-09-2015 रोजी पोलीस स्टेशन, तिवसा येथे तक्रार दिली. परंतु, त्याचाही काही परिणाम झाला नाही. तक्रारकर्ता यांचे मानसिक व आर्थिक नुकसान झालेले आहे, म्हणून तक्रारकर्ता यांनी सदर तक्रार विदयमान ग्राहक मंचात दाखल करुन रुपये 10,000/- ए.टी.एम. मधून प्राप्त न झालेली रक्कम, तसेच मानसिक व शारीरिक नुकसान भरपाई रुपये 50,000/- व सेवेत त्रुटी केल्याबद्दल रुपये 25,000/- व कोर्ट खर्च रुपये 15,000/- असे एकूण रु 1,00,000/- नुकसान भरपाई पोटी तक्रारकर्ता यांनी दर साल दर शेकडा 12 टक्के प्रमाणे नुकसान भरपाईची मागणी विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 कडून केली.
6. तक्रारकर्ता यांनी निशाणी क्रमांक 2 प्रमाणे दस्त क्रमांक 1 ते 9 सादर केले. विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी निशानी क्रमांक 17 या प्रमाणे लेखी जवाब सादर करुन तक्रारकर्ता यांचा परिच्छेद क्रमांक 1 मान्य करुन परिच्छेद क्रमांक 2 अमान्य केला. तसेच परिच्छेद क्रमांक 3 मधील मजकूर खोटा व बिनबुडाचा असल्यामुळे अमान्य केला. परिच्छेद क्रमांक 4 अमान्य असून परिच्छेद क्रमांक 5 अंशतः मान्य आहे.
7. इतर परिच्छेद क्रमांक 6 ते 12 पूर्णपणे अमान्य आहेत. विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी अतिरिक्त जवाबात म्हटले आहे की, तक्रारकर्ता यांनी रुपये 10,000/- काढण्याचा व्यवहार पूर्ण झाल्याबद्दल मोबाईलवर संदेश देण्यात आला, त्यात स्पष्टपणे “ It was successful transcation ” असे म्हटले आहे. यावरुन स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याला रुपये 10,000/- ही रक्कम पूर्णपणे प्राप्त झाली. असे असून देखील तक्रारकर्त्याने ए.टी.एम. मधील सी.सी.टी.व्ही. बंद असल्याचा फायदा घेऊन ही खोटी तक्रार दाखल केली.
8. तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रमांक 2 चा ग्राहक असल्यामुळे त्यांनी तक्रारकर्त्याच्या सेवेस विरुध्दपक्ष क्रमांक 1 हे जबाबदार नाही. विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचे मशीनची देखभाल ही प्रायव्हेट कंपनी पाहते. तरी देखील तक्रारकर्त्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर सी.सी.टी.व्ही. फुटेज प्राप्त करण्यासाठी विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने प्रयत्न केला, परंतु, सदर ए.टी.एम. चा तांत्रिक समस्या असल्यामुळे सी.सी.टी.व्ही फुटेज प्राप्त झाले नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारीची दखल घेऊन त्याची जबाबदारी पूर्णपणे पार पाडली नाही.
9. वरीलप्रमाणे तक्रारकर्त्याने ग्राहक मंचामध्ये तक्रार दाखल केल्यामुळे ती खर्चासह खारीज होण्याची विनंती केली.
10. विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी निशाणी क्रमांक 21 प्रमाणे लेखी जवाब सादर करुन तक्रारकर्त्याचा परिच्छेद क्रमांक 1 व 2 मान्य करुन परिच्छेद क्रमांक 3 अमान्य केला. तसेच परिच्छेद क्रमांक 4 व 5 अंशतः अमान्य आहे. इतर परिच्छेद क्रमांक 6 ते 12 हे पूर्णपणे अमान्य असून तक्रारकर्त्याच्या प्रार्थनेला उत्तर देतांना विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी नमूद केले की, तक्रारकर्ता क्रमांक 2 विरुध्द हेतूपुरस्सर खोटी तक्रार दाखल केली. विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचे ए.टी.एम. मधून तक्रारकर्ता यांना रुपये 10,000/- मिळाले नाही, याबाबत विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांना विरुध्दपक्ष क्रमांक 1 कडे चौकशी केली असता विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्ता यांना रुपये 10,000/- दिनांक 11-05-2015 रोजी मिळाले असल्याची माहिती दिली.
11. विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी अतिरिक्त जवाबात पुढे म्हटले की, विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी दिनांक 21-05-2015 रोजीच्या ए.टी.एम. व्यवहाराविषयी विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 1 कडे चौकशी केली असता सदर व्यवहार पूर्ण होऊन तक्रारकर्ता यांना रुपये 10,000/- रक्कम प्राप्त झाली आहे. तसेच तक्रारकर्ता यांचे खाते उता-यावरुन असे दिसून येते की, रुपये 10,000/- ही रक्कम त्याच्या खात्यातून Debit झालेली आहे तसेच दिनांक 20-05-2015 रोजी तक्रारकर्ता यांना कळविले आहे.
12. विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्ता यांना वेळोवेळी मागितलेली संपूर्ण माहिती दिली. त्यामुळे, तक्रारकर्त्याचे म्हणणे विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांना दोषपूर्ण सेवा दिली हे नाकबूल आहे. उलट, तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 2 वर खोटे व बिनबुडाचे आरोप लावले आहेत, करिता सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती विदयमान मंचात केली. विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी निशाणी क्रमांक 22 प्रमाणे दस्तऐवज क्रमांक 1 ते 2 सादर केले.
13. तक्रारकर्ता यांनी निशाणी क्रमांक 23 प्रमाणे प्रतिउत्तर दाखल करुन विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांचा लेखी जवाब पूर्णपणे नाकबूल करुन त्यामधील मुळ तक्रार अर्जातील वकत्व्याचा पूर्ण उल्लेख केला. तक्रारकर्ता यांनी ए.टी.एम. मधून रुपये 10,000/- काढण्याची प्रक्रिया केली. परंतु, रक्कम न मिळाल्याने शेवटी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिलेला आहे, त्यामुळे विरुध्दपक्ष यांचे म्हणणे पुराव्याअभावी नाकबूल असून तक्रारकर्त्याची प्रार्थना मंजूर करावी.
14. वरीलप्रमाणे तक्रारकर्त्याचा मुळ अर्ज, सादर केलेले दस्तऐवज विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांचा लेखी जवाब, तक्रारकर्ता यांचे प्रतिउत्तर, विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांचा लेखी युक्तीवाद, यावरुन विदयमान मंचाने खालील मुदे विचारार्थ घेतले.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1) तक्रारकर्ता यांनी ए.टी.एम. मधून काढलेली रक्कम
रु. 10,000/- ही त्यांना प्राप्त झाली नाही, हे
सिध्द् झाले काय ? होय
2) विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी सेवेत त्रुटी केल्या
आहेत काय ? होय
3) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
:: का र णे व नि ष्क र्ष ::
15. मुद्दा क्रमांक 1 चा विचार करता, तक्रारकर्त्याचे दस्तऐवज क्रमांक 2/1 चे अवलोकन केले असता त्यांना मिळालेल्या मोबाईल संदेशावरुन त्यांना रुपये 10,000/- विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांच्या ए.टी.एम. मधून काढल्याचे दिसून येते. तसेच ईतर दस्तऐवज क्रमांक 2, 3, 4 व 5 चे अवलोकन केले असता तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांचेकडे केलेल्या वेळोवेळी केलेल्या तक्रारीप्रमाणे त्यांना दिनांक 11-05-2015 रोजी ए.टी.एम. मधून काढलेली रक्कम वास्तविक प्राप्त न होता त्यांच्या खात्यातून डेबिट झाल्याचे दिसून येते. तसेच तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे वेळोवेळी विनंती केली. परंतु विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी दिलेल्या उत्तराप्रमाणे दिनांक 11-05-2015 रोजी त्यांचा सी.सी.टी.व्ही. फुटेज खराब असल्यामुळे त्यांना सदर सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासता आले नाही. त्यामुळे, तक्रारकर्त्याने जरी व्यवहार केला तरी प्रत्यक्षात त्यांना ए.टी.एम. मधून रक्कम प्राप्त झाल्याचा कोणताही पुरावा विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी दिलेला नाही. त्याचप्रमाणे विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांना त्यांच्या तक्रारकर्त्याच्या अकाऊंट स्टेटमेंट प्रमाणे त्यांच्या खात्यातून रुपये 10,000/- वळती झाल्याचे निशाणी क्रमांक 22/1 प्रमाणे दिसून येते. परंतु, सदर रक्कम जरी तक्रारकर्त्याच्या खात्यातून वळती झाली तरी त्याचवेळी ती तक्रारकर्त्याला प्राप्त झाली, याविषयी विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी काहीही पुरावा सादर केला नाही. तसेच विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचे ए.टी.एम. मशीन मध्ये त्यावेळी सुरक्षा रक्षक उपलब्ध होता किंवा नाही. असल्यास, सदर रक्कम त्याचे समक्ष तक्रारकर्त्याला प्राप्त झाली या विषयी त्यांनी कुठलाही पुरावा सादर केला नाही. तसेच विरुध्दपक्ष यांचे सदर सी.सी.टी.व्ही. फुटेज बंद होते, ही एक प्रकारची सेवेत त्रुटी असून त्यामुळे साहजिकच ग्राहकाला मनःस्ताप होवू शकतो व सदर प्रकरणामध्ये झालेला आहे. सी.सी.टी.व्ही. कार्यान्वित ठेवण्याची जबाबदारी ही विरुध्दपक्ष यांच्या शाखाधिकारी यांची असते. सी.सी.टी.व्ही. जर कार्यान्वित असता तर तक्रारकर्त्याला रक्कम मिळाली किंवा नाही हे, त्यावरुन स्पष्ट झाले असते. सी.सी.टी.व्ही. योग्य स्थितीत कार्यान्वित न ठेवणे, हा विरुध्दपक्ष यांचा बेजबाबदारपणा ठरतो. तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रमांक 2 चा ग्राहक आहे. परंतु, त्यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 1 चे ए.टी.एम. मधून ही रक्कम काढलेली आहे. वास्तविक तक्रारकर्त्याला रुपये 10,000/- प्राप्त झाले असते तर सदर रक्कम तक्रारकर्त्याच्या खात्यामधून वळती झाल्यानंतर विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 1 कडे ती कमीशनसह केव्हा वळती केली याबद्दल काही तरी पुरावा देणे आवश्यक होते. परंतु, तसा पुरावा सादर करण्यासाठी विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी काहीही प्रयत्न केले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला ए.टी.एम. मधील रक्कम प्राप्त झालेली आहे, हे विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांचे म्हणणे विदयमान मंच स्विकारु शकत नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 ला होकारार्थी उत्तर देण्यात येते.
16. मुद्दा क्रमांक 2 चा विचार करता, विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी सी.सी.टी.व्ही. फुटेज व्यवस्थित न ठेवणे, तक्रारकर्त्याची तक्रार आल्यानंतर 07 दिवस वाट पहा व नंतर तक्रार नोंदविण्याचे आदेश देणे, बॅंकिंग लोकपाल कडे अर्ज सादर केलेला असतांना त्याची योग्य प्रकारे दखल ने घेणे, तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रमांक 1 चा ग्राहक नाही म्हणून सदर तक्रार विरुध्दपक्ष क्रमांक 2 वर ढकलणे व विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी सदर ए.टी.एम. विरुध्दपक्ष क्रमांक 1 याचे असल्यामुळे स्वतःची जबाबदारी विरुध्दपक्ष क्रमांक 1 वर ढकलणे, हया एक प्रकारच्या विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांच्या सेवेत प्रचंड त्रुटी आहेत, त्यामुळे, मुद्दा क्रमांक 2 ला पण होकारार्थी उत्तर देण्यात येते. व खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येत आहे.
अंतिम आदेश
1) तक्रारकर्त्याचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2) विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी रुपये 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार
फक्त) ही रक्कम तक्रारकर्ता यांच्या खात्यावर दर साल दर शेकडा 6
टक्के व्याज दराने दिनांक 11-05-2015 ते देय दिनांकापर्यंत जमा
करावी. विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना मानसिक,
शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी रुपये 5,000/-
(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) असे एकूण रुपये 10,000/- (अक्षरी
रुपये दहा हजार फक्त) तक्रारकर्ता यांना दयावे. व विरुध्दपक्ष क्रमांक
2 यांनी तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त)
तक्रारकर्ता यांना दयावा.
3) वरील आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 45 दिवसाचे आंत करावे. अन्यथा, नुकसान भरपाई रकमेवर दर साल दर शेकडा 10 टक्के व्याज देय राहील.
4) आदेशाची प्रत उभयपक्षांना विनामुल्य दयावी.