निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 15/12/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 15/12/2011
तक्रार निकाल दिनांकः- 23/04/2013
कालावधी 01वर्ष 04 महिने 08 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
श्रीमती शकुंतला भ्र.त्रिंबक जाधव. अर्जदार
वय 60 वर्षे. धंदा.शेती. अड.एस.आर.घुगे.
रा.पेडगांववाडी ता.कळमनुरी जि.हिंगोली.
विरुध्द
शाखा व्यवस्थापक, गैरअर्जदार.
युनायटेड इंडिया इन्शुरंस कं.लि. अड.जी.एच.दोडीया.
दयावान कॉम्प्लेक्स,स्टेशन रोड, परभणी.ता.जि.परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.आर.एच.बिलोलीकर.सदस्य)
अर्जदार श्रीमती शकुंतला भ्र.त्रिंबक जाधव यांनी विमा कंपनीने ट्रॅक्टरचा विमा दावा नाकारुन सेवेत दिलेल्या त्रुटी बद्दल नुकसान भरपाईसाठी विमा कंपनी विरुध्द तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदाराची तक्रार व थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे,
अर्जदार ही ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. -38- बी/1351 व चेसीस नं.बी-3048452 चे मालक आहे. दिनांक 03/02/2011 रोजी सदरील ट्रॅक्टर पेडगांववाडीहून हिंगोलीकडे जात असताना समोरुन येणा-या ट्रकशी होणारी धडक टाळण्यासाठी रोडच्या बाजुला घेतांना झाडावर आदळून अपघात झाला.सदरील अपघाताची नोंद हिंगोली ग्रामीन पोलीस स्टेशन यांच्याकडे अपघात क्रमांक 06/2011 अशी आहे सदरील अपघाता बद्दल विमा कंपनीस कळवल्यावर विमा कंपनीने नुकसान बाबत सर्वे करण्यासाठी श्री.विलास चंदन यांची नियुक्ती केली.सर्व्हेअरने सर्व्हे रिपोर्ट कंपनीकडे सोपवला आहे. अर्जदाराच्या म्हणणे प्रमाणे रु.1,90,000/- चे नुकसान झालेले आहे अर्जदाराने गैरअर्जदाराकडे नुकसान भरपाईसाठीचा दावा सर्व संबंधीत कागदपत्रांसह दाखल केला.कंपनीने तो दिनांक 21/10/2011 रोजी “At the time of accidents authorized motor driving license not submitted so, we close the file as no claim” असे म्हणून Liability नाकारली आहे.
म्हणून अर्जदाराने मंचास अशी विनंती केली आहे की, गैरअर्जदाराकडून अर्जदारांस 1,90,000/- रुपये 18 टक्के व्याजाने नुकसान भरपाई देण्यास आदेशीत करावे व तसेच मानसिकत्रासापोटी रुपये 5,000/- तसेच दावा खर्चा पोटी रुपये 5000/- देण्याचे आदेशित करावे.
अर्जदाराने आपले शपथपत्र नि.क्रमांक 2 वर दाखल केलेले आहे.
गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीस पाठवली असता गैरअर्जदाराने त्याचे म्हणणे दाखल केले ते नि.क्रमांक 9 वर आहे.
गैरअर्जदाराचे थोडक्यांत म्हणणे असे की, अर्जदाराने सदरील ट्रॅक्टरचा गैरअर्जदार यांच्याकडे विमा उतरवला होता अपघात झाल्यावर विमा कंपनीने सर्व्हेअर नेमला होता त्याचा रिपोर्ट त्याने गैरअर्जदार विमा कंपनीकडे दाखल केलेला आहे.
गैरअर्जदार यांचे असे म्हणणे आहे की, अपघाताच्या वेळी ट्रॅक्टर चालवत असलेल्या ड्रायव्हरकडे LMV—Transport असा लायसेन्स होता.जेव्हा की तो LMV—Tractor असा पाहिजे. व त्यामुळे Policy च्या Terms & Condition चे Breach झालेले आहे व त्यामुळे गैरअर्जदार कंपनी विमा दावा देवु शकत नाही.
गैरअर्जदाराने आपले शपथपत्र नि.क्रमांक 10 वर दाखल केले आहे तसेच गैरअर्जदाराने नि.क्रमांक 12 वर दिलेल्या यादी प्रमाणे कागदपत्रे जोडली आहेंत ज्यात मुख्यत्वे विमा पॉलिसी,सर्व्हेअर रिपोर्ट सामील आहे.
अंतिम सुनावणीच्या वेळी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकला.
दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1 अपघाती ट्रॅक्टरचा विमा दावा नाकारुन गैरअर्जदाराने
अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 अर्जदार कोणता अनुतोष
मिळणेस पात्र आहे? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
सदरील प्रकरणात ट्रॅक्टरचा अपघात झाला व सदरील ट्रॅक्टरचा विमा गैरअर्जदाराने उतरवला होता हे गैरअर्जदारांस मान्य आहे. गैरअर्जदाराने सर्व्हेअर नेमून
ट्रॅक्टरच्या झालेल्या नुकसानीचा अहवालपण बनवलेला आहे व त्यांच्या अहवाला प्रमाणे 40,500/- रुपयांचे नुकसान झाले आहे.
गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अपघाताच्या वेळेस ट्रॅक्टर चालवणा-या ड्रायव्हरकडे LMV—Transport असा लायसेन्स होता. तो LMV Tractor असा पाहिजे होता व त्यामुळे पॉलिसीच्या Terms & Condition प्रमाणे Breach of Condition झाल्यामुळे विमा दावा मान्य करता येत नाही.
गैरअर्जदाराचे हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही, त्याचे कारण असे की, L.M.V. Light Motor Vehicle यांची व्याख्या M V Act.च्या See 2 (21) मध्ये केलेली आहे.जी पुढील प्रमाणे आहे.
“ Light motor vehicle ” means a transport vehicle or omnibus the gross vehicle weight of either of which or a motor car or tractor or road roller the unlading weight of any of which, does not exceed 7500 Kg. वरील व्याख्या बघता LMV हया Class of Vehicle मध्ये Tractor हे Include आहे. म्हणून वरील मुद्याचे होकारार्थी उत्तर देवुन मंच पुढील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1 गैरअर्जदाराने अर्जदारास रुपये 40,500/- (अक्षरी रु.चाळीसहजार पाचशे फक्त)
दिनांक 21/10/2011 पासून ते रक्कम देई पर्यंत 9 टक्के व्याजासह निकाल
कळाल्या पासून 30 दिवसांच्या आत द्यावे.
2 अर्जदाराला झालेल्या मानसिकत्रासापोटी रुपये 1,500/- द्यावेत.
3 दाव्याचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष