(आदेश पारीत व्दारा - श्री शेखर प्र. मुळे, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 04 जुलै, 2017)
1. तक्रारकर्त्याने ही तक्रार विरुध्दपक्ष सेंट्रल बँक ऑफ इंडिया, नागपूर यांचे विरुध्द त्याच्या खात्यातून कोणी अज्ञात इसमाने बनावट धनादेशाव्दारे रकमा काढून घेतल्या संबंधी दाखल केली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्त्याचा विरुध्दपक्ष बँकेत बचत खाते क्रमांक 1195463515 असून त्याला 20 धनादेशाचा एक चेक बुक देण्यात आला होता. ज्याचा सिरियल नंबर 673961 ते 673980 असा होता. तक्रारकर्त्याने त्यापैकी केवळ तीन धनादेश वापरलेले होते. त्याच्या खात्यात डिसेंबर 2011 मध्ये रुपये 85,000/- शिल्लक होते. दिनांक 23.12.2011 ला त्याच्या खात्यात रुपये 5,000/- जमा केली. त्यावेळी, त्याने खात्यातील शिलकी संबंधी विचारणा केले असता त्याला सांगण्यात आले की, त्याच्या खात्यात रुपये 5,104/- शिल्लक आहे, ते ऐकूण त्याला आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्यावेळी त्याच्या खात्यात एकूण रुपये 80,000/- असावयास हवे होते. बँकेच्या कर्मचा-यांनी सांगितले की, तक्रारकर्त्याने कदाचित रक्कम काढली असावी, परंतु, तक्रारकर्त्याने पैसे काढलेले नव्हते. दिनांक 24.12.2011 ला त्याने रुपये 4,000/- काढून त्याच्या खात्यातून धनादेशाव्दारे रक्कम काढू नये म्हणून Stop Payment करण्याचे निर्देश विरुध्दपक्ष बँकेला दिले. परंतु, त्यानंतरही सुध्दा त्याच्या खात्यातून पैसे काढण्यात आले होते. त्याने विरुध्दपक्ष बँकेला ब-याचदा सांगण्याचा प्रयत्न केला की, त्याने पैसे काढलेले नाही किंवा इतर कुणाला धनादेश सुध्दा दिले नाही, परंतु त्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याच्या खात्यातून एकंदर रुपये 82,700/- काढल्या गेली होती आणि प्रत्येकवेळी विरुध्दपक्ष बँकेचा वेग-वेगळ्या शाखातून धनादेशाव्दारे ते पैसे काढण्यात आले होते. याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली, परंतु कार्यवाही झाली नाही. सरते शेवटी ही तक्रार दाखल केली, ज्यामध्ये त्याने अशी विनंती केली आहे की, विरुध्दपक्ष बँकेला निर्देश देण्यात यावे की, त्याने त्याच्या खात्यातून धोखाधाडी करुन काढलेली रक्कम 82,700/- रुपये 18 % व्याजासह परत करावी. तसेच, तक्रारकर्त्यास झालेल्या त्रासापोटी रुपये 50,000/- आणि खर्चाबद्दल रुपये 10,000/- द्यावे.
3. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष यांना मंचाची नोटीस बजावण्यात आली, त्यानुसार विरुध्दपक्षांनी प्रकरणात हजर होऊन निशाणी क्र.10 खाली लेखी जबाब दाखल केला आणि तक्रारकर्त्याचे त्यांच्या बँकेत बचत खाते असल्याचे मान्य केले, तसेच त्याला चेक बुक देण्यात आले होते ही बाब सुध्दा कबूल केली. परंतु, माहिती अभावी ही बाब नाकबूल केली आहे की, तक्रारकर्त्याने केवळ तीन धनादेश वापरलेले होते आणि इतर धनादेश इतर कुणालाही दिले नव्हते. त्यांनी ही बाब सुध्दा नाकबूल केली आहे की, कोणी तिस-या इसमाने तक्रारकर्त्याच्या खात्यातून बनावट स्वाक्षरी करुन धनादेशाव्दारे त्याचे पैसे काढले आहे. धनादेशाव्दारे रक्कम देण्यापूर्वी पूर्णपणे खात्री करण्यात आली होती आणि म्हणून त्याच्या सेवेत कुठलिही कमतरता नव्हती. अशाप्रकारे तक्रार नामंजूर करुन तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
4. दोन्ही पक्षांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. दोन्ही पक्षानी अभिलेखावर दाखल केलेले दस्ताऐवज व लेखी युक्तीवादाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
// निष्कर्ष //
5. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात अशी आहे की, कोणी अज्ञात इसमाने त्याच्या खात्यातून बनावट धनादेशात तक्रारकर्त्याची खोटी स्वाक्षरी करुन पैसे काढले. त्याने असे स्पष्टपणे नमूद केले आहे की, जो चेकबुक त्याला देण्यात आला होता, त्याच्यातील धनादेश क्रमांक 673961 ते 673980 या नंबरचे होते आणि ज्या धनादेशाव्दारे त्याच्या खात्यातून रुपये 82,700/- वेळोवेळी काढण्यात आले ते धनादेश वेगळ्याच नंबरचे होते, जे त्याला कधीच देण्यात आले नव्हते.
6. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला आधार म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष बँकेकडून ‘माहिती अधिकार कायदा’ अंतर्गत त्याच्या खात्यातून झालेल्या व्यवहारासंबंधी तपशिल मागितला होता. त्याप्रमाणे विरुध्दपक्षाने त्याला हवी असलेली माहिती दिली, ज्याची प्रत अभिलेखावर दाखल केली आहे. ती माहिती वाचली असता हे दिसून येते की, ज्या धनादेशाव्दारे तक्रारकर्त्याच्या खात्यातून कोणी अज्ञात इसमाने रक्कम काढली होती त्या धनादेशाचा नंबर 277144 ते 277157 असे होते. एकूण 9 वेळा वेगवेगळ्या तारखांना त्या धनादेशाव्दारे रक्कम काढण्यात आली होती. आश्चर्याची बाब म्हणजे प्रत्येकवेळी विरुध्दपक्ष बँकेच्या वेग-वेगळ्या शाखेतून रक्कम काढण्यात आली होती आणि ती पण अगदी थोड्या दिवसांचे अंतराने काढण्यात आली होती. अशाप्रकारे एकूण रुपये 82,700/- खात्यातून काढण्यात आली होती, त्यामुळे ही बाब सिध्द होते की, तक्रारकर्त्याच्या खात्यातून धनादेशाव्दारे रुपये 82,700/- काढलेले होते.
7. आता प्रश्न असा उपस्थित होतो की, ते धनादेश तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष बँकेकडून देण्यात आले होते किंवा नाही, आणि त्यावरील स्वाक्षरी तक्रारकर्त्याची होती किंवा नाही. त्यापूर्वी हे नमूद करणे जरुरी आहे की, बँकेच्या पासबुक प्रमाणे तक्रारकर्त्याच्या खात्यात दिनांक 21.9.2011 ला रुपये 80,740/- शिल्लक होते. त्यानंतर, दिनांक 22.9.2011 ते 13.12.2011 या अवधीत रुपये 82,700/- काढण्यात आले आणि शिल्लक रुपये 5,104/- राहिले. तक्रारकर्त्याने वादातीत धनादेशाच्या प्रती दाखल केलेल्या असून त्यामधील त्याच्या कथित स्वाक्ष-या नाकबूल केलेल्या आहेत. त्याने त्याच्या अर्जावरुन ते वादातीत धनादेश ज्यावर त्याची वादातीत स्वाक्षरी आहे आणि त्याने दिलेल्या नमुना स्वाक्ष-या, हे सर्व दस्ताऐवज हस्ताक्षर तज्ञाकडे तपासणीसाठी आणि त्याच्या अहवालासाठी पाठविण्यात आला. हस्ताक्षर तज्ञाने तक्रारकर्त्याच्या नमुना स्वाक्षरी आणि वादातीत स्वाक्षरी यांची सायंटिफीकरित्या तपासणी केली आणि त्यानंतर त्यानी आपला अभिप्राय असा दिला आहे की, ‘‘ज्या व्यक्तीने नमूना हस्ताक्षर (Admitted Signature) दिला आहे त्या व्यक्तीने वादग्रस्त स्वाक्षरी (Questioned Signature) केलेल्या नाही.’’ हस्ताक्षर तज्ञाने आपला अभिप्राय संपूर्ण कारण मिमांसा सहीत दिला आहे. यावरुन असे म्हणायला हरकत नाही की, वादातीत धनादेश क्रमांक 277144 ते 277157 यावर असलेल्या तक्रारकर्त्याची कथित स्वाक्षरी त्याने केलेली नाही. म्हणजे त्या स्वाक्ष-या कोणीतरी खोट्या केलेल्या आहेत. हस्ताक्षर तज्ञाने आपला प्रतिज्ञापत्र साक्ष म्हणून दाखल केला आहे, जो विरुध्दपक्षाने कुठल्याही प्रकारे आव्हानीत केलेले नाही, किंवा हस्ताक्षर तज्ञाला उलटतपासणीकरीता बोलाविण्याची परवानगी मागितली नाही. अशाप्रकारे, विरुध्दपक्षाने एक प्रकारे हस्ताक्षर तज्ञाचा अभिप्राय आणि साक्ष अप्रत्यक्षरित्या मान्य केले आहे.
8. हस्ताक्षर तज्ञाचे अभिप्रायावरुन विरुध्दपक्षाने लेखी जबाबामध्ये ज्या काही बाबी सांगितल्या आहेत किंवा तक्रारीतील जो काही मजकुर नाकबूल केला आहे, तसेच जो काही युक्तीवाद केला आहे, त्याला फारसे महत्व उरत नाही. विरुध्दपक्षाने असे म्हटले आहे की, वादातीत धनादेश तक्रारकर्त्याला देण्यात आला होता आणि त्याने स्वतः त्या धनादेशाव्दारे त्याच्या खात्यातून रकमा काढल्या आहेत. परंतु, त्याला आधार म्हणून कुठलाही पुरावा दिलेला नाही. वादातीत धनादेशाच्या चेकबुक जरी तक्रारकर्त्याला दिलेला असेल तर त्याबद्दलचा Requisition form विरुध्दपक्षाला दाखल करता आला असता, तसेच प्रत्येकवेळी त्या धनादेशाव्दारे जी रक्कम काढण्यात आली ती तक्रारकर्त्याने काढलेली नसून दुस-या कुण्या इसमाचे नावाने काढलेली दिसून येते. तसेच, सर्व धनादेश थोड्या-थोड्या दिवसाचे फरकाने वेग-वेगळ्या शाखांमधून वटविण्यात आले होते. कुठलाही व्यक्ती आपल्या बचत खात्यामधून इतक्या थोड्या दिवसाचे फरकाने वेग-वेगळ्या शाखांमधून रक्कम काढणार नाही. तक्रारकर्ता हा व्यावसायीक नाही ज्याला थोड्या-थोड्या दिवसांनी रकमा काढण्याची गरज भासु शकते. त्याच्या खात्यातील उतारा-यावरुन हे दिसून येते की, पूर्वी अशा रकमा बचत खात्यातून वेळोवेळी काढल्या नव्हत्या. म्हणून आम्हांला याबाबत कुठलिही शंका नाही की, कोणी अज्ञात इसमाने त्याच्या बचत खात्यातून त्याची बनावट स्वाक्षरी करुन पैसे काढले आहे. त्यावेळी, तक्रारकर्त्याने याबाबत विरुध्दपक्षाला तक्रार केली तेंव्हा विरुध्दप्क्षाने त्याची सखोल चौकशी करुन वादातीत स्वाक्षरी हस्ताक्षर तज्ञाकडे पाठवून अहवाल प्राप्त करुन घ्यावयाचा होता. परंतु, तसे न करता त्यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारीकडे निव्वळ दुर्लक्ष केले, ही विरुध्दपक्षाच्या सेवेतील कमतरता ठरते. तसेच, धनादेश वटविण्यापूर्वी कुठलिही शहानिशा स्वाक्षरी बाबत केलेली दिसत नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याला झालेले आर्थिक नुकसान भरुन देण्याची जबाबदारी विरुध्दपक्षाची ठरते. सबब, ही तक्रार मंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला त्याचे खात्यातून काढण्यात आलेली रक्कम रुपये 82,700/- दिनांक 23.12.2011 पासून द.सा.द.शे. 9 % टक्के व्याजासह परत करावे.
(3) तसेच विरुध्दपक्षाला असे आदेशीत करण्यात येते की, तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारीरीक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 3,000/- द्यावे.
(4) विरुध्दपक्षाने आदेशाची पुर्तता निकालपत्राची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आत करावे.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 04/07/2017