तक्रारदारातर्फे – वकील – एन.एम.कुलकर्णी,
सामनेवाले 1 तर्फे – एकतर्फा आदेश
सामनेवाले 3 तर्फे – वकील – बी.बी.नामलगांवकर,
।। निकालपत्र ।।
( निकाल घोषितद्वारा सौ.एम.एस.विश्वरुपे – सदस्या )
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदारांनी मौजे.पिंप्री (बु) ता.परळी(वै), जि.बीड येथील रहिवासी असुन शेतीसोबत दुग्ध उत्पादनाचा जोडधंदा करुन आपली व आपल्या कुटुंबाची उपजीवीका करतात. ता.26.11.2008 रोजी तक्रारदारांनी एक जर्सी गाय वय 5 वर्षे रंग काळाबांडा, शिंगे लहान वर, शेपूट काळे, टॅग नं.92896 असा वर्णनाची गाय श्री.आप्पासाहेब माधव पेटारे रा. कोल्हार ता.राहता जि.अहमदनगर यांचेकडून रक्कम रु.30,000/- देवून विकत घेतली. सदरील गाय सामनेवाले नं.1 यांचेकडून कर्जाऊ रक्कम घेवून विकत घेण्यात आली असुन सदरील गायीचा खरेदीची मूळ दाखला, गायीचा टॅग व मालकी हक्कासंबंधीचे सर्व कागदपत्रे सामनेवाले नं.1 यांचेकडे ठेवली होती. त्यानंतर सदरील गायीचा विमा सामनेवाले नं.2 यांचेकडे उतरविण्यात आला होता.
दुर्दैवाने ता.30.8.2009 रोजी वरील नमुद केलेल्या गायीचे निधन झाले. डॉ.शिंदे बी.एल. यांनी सदरील गायीचा पंचनामा, पोष्टमार्टम करुन अहवाल दाखल केला आहे. सदरील अहवालानुसार सदरील गायीचा नैसर्गिक निधन झाले असुन मृत्यू बाबत गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीसमक्ष पंचनामा केला असून ग्रामसेवक, ग्रामपंचायत पिंप्री (बु) यांनी गायीच्या मृत्यू बाबत प्रमाणपत्र दिले आहे. तसेच सरपंच ग्रामपंचायत कार्यालयाय पिंप्री (बु) यांनी प्रमाणपत्र दिले आहे.
तक्रारदारांना सदरील गायीपासुन दिवसामध्ये दोन वेळेस प्रत्येकी 10 लिटर प्रमाणे एकुण 20 लिटर दुध मिळत होते. त्यानुसार दरमहा सरासरी 600 लिटर दुधाचे उत्पादन होत होते. गायीचे दुधास प्रतिलिटर 12.50 रुपये प्रमाणे एकुण 7,500/- रुपये प्रतिमहिना याप्रमाणे उत्पन्न सदर गायीचे दुधापासुन होत होते. सदरील गायीला खुराक म्हणुन पेंड व कडबा यापोटी रक्कम रु.100/- रोज इतका खर्च होत होता व त्यानुसार खर्च वजा जाता सदरील गायीपासुन रक्कम रु.4,500/- येवढे प्रतिमहा उत्पन्न मिळत होते. सदरील गायीचे मृत्यूमुळे तक्रारदाराचे आर्थीक नुकसान झालेले आहे.
सदर गायीच्या मृत्यूनंतर तक्रारदारानी सामनेवाले नं.1 बँकेकडे आवश्यक कागदपत्रासह गायीच्या मृत्यू बाबत नुकसान भरपाईची रक्कम मिळण्याकरीता मागणी केली होती. परंतु वारंवार प्रयत्न करुन देखील रक्कम न मिळाल्यामुळे सामनेवाले नं.2 यांचे प्रतिनिधी श्री.जे.एस.दौडीया, विकास अधिकारी, नाथनगर, परळी (वै) यांचेकडे संपर्क केला असता त्यांनी बँकेकडून पेपर मिळाले नसल्या बाबत समजले. सामनेवाले नं.1 यांनी क्लेम फॉर्म दि न्यू इंडिया इंश्युरन्स कंपनी लि. यांचेकडे पाठविण्यात आल्याचे सांगीतले. शेवटी तक्रारदारांनी ता.20.2.2010 रोजी सामनेवाले नं.1 बँकेकडे गायीचे विम्याच्या रक्कमे बाबत चौकशी केली असता शाखा व्यवस्थापक श्री.सोळंके यांनी गायीचा मृत्यूचा प्रस्ताव ता. 16.11.2009 रोजी सामनेवाले नं.2 यांचेकडे पाठविले असता सदरील प्रस्ताव टपालामध्ये गहाळ झालेला असल्याचे पत्र सामनेवाले नं.2 यांनी दिलेले असून त्याची एक प्रत तक्रारदारांना दिली. अशा प्रकारे तक्रारदारांचा गायीचे विमा पॉलीसीचे मुदतीत मृत्यू होवूनही व सर्व कागदपत्राची पूर्तता करुनही नुकसान भरपाई देण्यास सामनेवाले यांनी टाळाटाळ केली आहे. तक्रारदारांना शेवटी ता.23.6.2010 रोजी नोटीस पाठवून झालेल्या नुकसानी बाबतची मागणी सामनेवाले नं.1 व 2 यांचेकडे केली. परंतु अद्यापपर्यन्त तक्रारदारांना विम्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे तक्रारदारांना सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. तक्रारदारांची विनंती की, गायीचा मृत्यूमुळे झालेले नुकसान रु.30,000/-, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु.5,000/- असे एकुण रक्कम रु.45,000/- यावर द.सा.द.शे 18 टक्के दराने व्याजासह सामनेवाले यांचेकडून वसूल होवून मिळावेत.
सामनेवाले नं.1 यांना न्यायमंचाची नोटीस मिळूनही हजर झाले नाहीत अथवा ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार मुदतीत लेखी म्हणणे सादर केले नही. त्यामुळे सामनेवाले नं. 1 विरुध्द एकतर्फा प्रकरण चालविण्याचा निर्णय न्यामंचाने ता.10.11.2010 रोजी घेतला.
सामनेवाले नं.2 हे सदर प्रकरणात हजर झाले असुन त्यानी त्यांचा लेखी खुलासा ता.26.10.2010 रोजी न्याय मंचात दाखल केला आहे. सामनेवाले नं.2 यांचा लेखी खुलासा थोडक्यात असा की, तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केलेली विधाने नाकारलेली आहेत. सामनेवाले नं.2 विमा कंपनीस तक्रारदाराचे गायीचा विमा पॉलीसीची बाब मान्य असुन सदरची विमा पॉलीसी सामनेवाले नं.1 यांचे मार्फत घेतली असुन तक्रारदार व सामनेवाले नं.2 यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध आलेला नसल्याचे नमुद केले आहे. तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 बँकेकडे गायीचा मृत्यूचा दाखला, मृत्यू प्रमाणपत्र, पोस्टमार्टम रिपोर्ट दाखल केलेले असुन विमा कंपनीकडे सदरील कागदपत्रे मिळालली नाहीत. तक्रारदारांनी सदर कागदपत्रे सामनेवाले नं.2 यांचेकडे दाखल केले असते तर विमा कंपनी तर्फे इनव्हेस्टीगेटर यांनी सदर प्रकरणात चौकशी केली असती. सामनेवाले विमा कंपनीकडे तक्रारदारांची कोणतेही कागदपत्रे मिळालेली नसल्यामुळे तक्रारदाराना विम्याची रक्कम दिलेली नाही.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, शपथपत्र, पुराव्याचे शपथपत्र, सामनेवाले नं.2 यांचा खुलासा, शपथपत्र यांचे सखोल वाचन केले. तक्रारदाराचे विद्वान वकील एन.एम.कुलकर्णी , सामनेवाले नं.2 यांचे विद्वान वकील बी.बी.नामलगांवकर यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 बँकेकडून कर्ज घेवून सदर गाय विकत घेतली होती. सदरील गायीचा मुळ दाखला, टॅग क्र.92896 व इतर संधीत कागदपत्रे सामनेवाले नं.1 बॅंकेकडेच ठेवण्यात आली व त्यानुसार सामनेवाले नं.2 यांचेकडे गायीचा विमा उतरविण्यात आला होता. दुर्दैवाने ता.30.8.2009 रोजी गायीचा नैसर्गीक मृत्यू झाला. सदर गायीचा मृत्यू नंतर तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 यांचेकडे आवश्यक त्या कागदपत्रासह गायीच्या मृत्यू बाबत नुकसान भरपाईची रक्कम मिळण्या बाबत मागणी केली. सामनेवाले नं.1 यांनी गाईचा मृत्यूचा प्रस्ताव ता.16.11.2009 रोजी सामनेवाले नं.2 विमा कंपनीकडे पाठविले असता सदरील प्रस्ताव टपालामध्ये गहाळ झाला. सामनेवाले नं.2 विमा कंपनीकडे कागदपत्राची पूर्तता न झाल्यामुळे तक्रारदारांना गायीचा विमा पॉलीसीचे मुदतीत मृत्यू होवूनही अद्यापपर्यन्त विमा लाभ रक्कम मिळाली नाही, अशी तक्रारदाराची तक्रार आहे.
सामनेवाले नं.1 यांना न्यायमंचाची नोटीस मिळूनही हजर झाले नाहीत अथवा ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार मुदतीत लेखी म्हणणे सादर केले नही. म्हणून सामनेवाले नं. 1 विरुध्द एकतर्फा प्रकरण चालविण्याचा निर्णय न्यामंचाने ता.10.11.2010 रोजी घेतला.
सामनेवाले नं.2 विमा कंपनीचे खुलाशानुसार तक्रारदाराच्या गायीचा मृत्यू बाबत विमा प्रस्ताव व आवश्यक कागदपत्रे मिळाली नसल्यामुळे तक्रारदारांना विमा लाभ रक्कम दिली नाही. सामनेवाले नं.2 यांना तक्रारदारांच्या गायीची विमा पॉलीसी मान्य आहे.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता, सामनेवाले नं.2 विमा कंपनीने ता.28.6.2010 रोजी तक्रारदारांचे वकिलांना पाठविलेल्या नोटीसच्या उत्तरानुसार तक्रारदारांने गायीच्या मृत्यू संबंधीत सुचना त्यांचेकडे दिलेल्या नाहीत. अथवा योग्य त्या कागदपत्राची पूर्तता केली नाही. या कारणास्तव तक्रारदारांचा दाव्या संदर्भात कोणताही विचार करता येणार नाही, असे कळविले.
सामनेवाले बँकेने ता.20.2.2010 रोजी पाठविलेले पत्रानुसार तक्रारदाराचा विमा प्रस्ताव सामनेवाले नं.2 यांचेकडे पाठविण्यात आल्याचे दिसून येते. सदर प्रकरणात सामनेवाले नं.1 बँक हजर नाही, त्यामुळे सदर प्रस्ताव सामनेवाले नं.2 विमा कंपनीकडे प्राप्त झाला नसल्या बाबत खुलासा होत नाही. सामनेवाले नं.1 बँकेने सदर प्रकरणात हजर राहून या संदर्भात माहिती देणे बंधनकारक होते. तक्रारारांनी सदर गाय खरेदी करण्या करीता सामनेवाले नं.1 बँकेकडून कर्ज घेतले आहे. तसेच गायीचा मृत्यू झाल्यामुळे तक्रारदारांना गायीपासुन मिळणारे उत्पन्नही बंद झाले आहे. अशा परिस्थितीत तक्रारदारांना सदरील कर्जावरील व्याजाचा भरणा करावा लागत आहे. तक्रारदाराच्या गायीचा मृत्यू विमा पॉलीसीच्या मुदतीत होवूनही त्याचप्रमाणे तक्रारदारांनी संपूर्ण कागदपत्राची पूर्तता करुनही तक्रारदारांना विमा लाभ रक्कम मुदतीत मिळूशकली नाही त्यामुळे तक्रारदारांना आर्थीक व मानसिक त्रासास तोंड द्यावे लागले आहे. सामनेवाले नं.2 विमा कंपनीकडे तक्रारदारांचे गायीचा विमा प्रस्ताव प्राप्त न झाल्यामुळे सदरच्या प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही होवू शकली नाही. अशा परिस्थितीत सामनेवाले नं.2 विमा कंपनीची सेवेत कसूरीची बाब स्पष्ट होत नाही, असे न्यायमंचाचे मत आहे.
सामनेवाले बँकेने तक्रारदाराचा विमा प्रस्ताव आवयक त्या कागदपत्रासह सामनेवाले विमा कंपनीकडे पाठविणे बंधनकारक असुनही त्यांनी सदर प्रस्तावा बाबत काय कार्यवाही झाली या बाबत दुर्लक्ष केल्यामुळे तक्रारदारांचा कोणताही दोष नसताना विमा लाभ रककम मुदतीत मिळाली नाही. सदरची कृती सामनेवाले नं.1 यांची सेवेत कसूरीची असल्याची बाब स्पष्ट होते, असे न्यायमंचाचे मत आहे. सामनेवाले नं.1 यांनी सेवेत कसूरीची बाब स्पष्ट झाल्यामुळे तक्रारदारांनी तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे विमा लाभ रक्कम रु.30,000/- व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- तसेच तक्रारीचा खर्च रक्कम रु.2,000/- देणे उचित होईल, असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देण्यात येतो.
।। आ दे श ।।
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले नं.1 बँकेना आदेश देण्यात येतो की, तक्रारदाराची मयत जर्सी गाय टॅग नं.92896 ची विमा लाभ रक्कम रु.30,000/- ( अक्षरी रुपये तीस हजार फक्त ) आदेश मिळाल्यापासून एक महिन्याचे आत अदा करावेत.
3. सामनेवाले नं.1 बँकेना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- ( अक्षरी रुपये तीन हजार फक्त ) आदेश मिळाल्यापासुन एक महिन्याचे आत अदा करावेत.
4. सामनेवाले नं.1 बँकेना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना सदर तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु.2,000/- ( अक्षरी रुपये दोन हजार फक्त ) आदेश मिळाल्यापासुन एक महिन्याचे आत अदा करावेत.
5. सामनेवाले नं.1 बँकेना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना वरील आदेशातील रक्कम विहित मुदतीत अदा न केल्यास द.सा.द.शे 7 टक्के व्याज देण्यास सामनेवाले नं.1 जबाबदार राहतील.
6. तक्रारदारांची सामनेवाले नं.2 विरुध्दची तक्रार रद्द करण्यात येते.
7. ग्राहक सरंक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांला परत करावेत.
( सौ.एम.एस.विश्वरुपे ) ( पी.बी. भट )
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड जि.बीड