तक्रारदारातर्फे – वकील – आर.डी.येवले,
सामनेवालेतर्फे – वकिल – आर.व्ही.देशपांडे/अभय व्यास.
।। निकालपत्र ।।
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार वरील ठिकाणचे रहिवाशी असुन ते काळया रंगाची हिरो होंडा कंपनीची पॅशन प्लस मोटार सायकल क्र.एम.एच.23-आर-9989 चे नोंदणीकृत मालक आहेत. सदर मोटार सायकलचा चेसीज नं.MBLHA10EL99F14046, इंजिन नं. HA10EB99F13808 असुन दीप एजन्सीज, बीड येथून रक्कम रु.42,000/- मध्ये खरेदी केली आहे.
तक्रारदाराने सदर वाहनाचा तारीख 30/6/2009 ते दि. 29/6/2010 या एक वर्ष कालावधीकरीता रक्कम रु. 1,049/- चा विमा घेतलेला आहे. सदर विमा कंपनीकडून सर्टिफिकेट नं. 3005/10170989/10335/000 हे तक्रारदारास देण्यात आलेले आहे.
तारीख 28/10/2009 रोजी रात्री 11.00 वाजताच्या सुमारास तक्रारदार व त्यांचे मेहुणे श्री खुशाल शामराव गलधर असे दोघे मिळून वरील वाहनावरुन त्यांचे मुळ गावाहून सराटे वडगांव येथून नगर ते बीड रोडने बीडकडे येत असतांना सौताडा शिवारात रोडचे बाजूस असणारे पाण्याचे टाकीजवळ सदरील मोटार सायकल रोडचे बाजूस उभे करुन थोडया अंतरावर लघुशंका करत असतांना कोणीतरी दोन अज्ञात चोरटयांनी अंधाराचा फायदा घेऊन सदरील मोटार सायकल चोरी करुन जामखेडच्या दिशेने घेऊन गेले. सदरील मोटार सायकलचे पेट्रोल टाकीचे कव्हरमध्ये नोकीया कंपनीचा एक रु. 5,000/- किंमतीचा मोबाईल फोन ठेवलेला होता. तो सुध्दा मोटार सायकल बरोबर चोरीस गेला.
तक्रारदाराने व त्याच्या मेहुण्याने पाहिले असता आरडा-ओरड केली. सदरील रोडने येणा-या जाणा-या वाहनांना मदतीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांचे मदतीस कोणीही आले नाही. तक्रारदार आणि त्याचे मेहुणे जवळ असलेल्या सौताडा या गावी चालत गेले व तेथील बसस्थानकावरील दुकानदार व हॉटेलवाले यांना झोपेतून उठवण्याचा व मदत मागण्याचा प्रयत्न केला परंतू कोणीही त्यांच्या मदतीस आले नाही.
अज्ञात दोन चोरटे सदरील मोटार सायकल जामखेडच्या दिशेने घेऊन गेल्यामुळे तक्रारदार व त्याचे मेहुणे रात्री पायी जामखेड येथे गेले व गाडीची शोधाशोध केली परंतू मोटार सायकल कोठेही आढळून आली नाही.
दोन दिवस शोध घेवून मोटार सायकल न सापल्याने तक्रारदाराने ता. 01/11/2009 रोजी पोलीस ठाणे पाटोदा येथे त्या अज्ञात चोरटया विरुध्द रितसर तक्रार दिली. त्याचा गुन्हा र. नं. 105/09 आहे. पोलीसांनी तपास केला. बरेच दिवस मोटार सायकलचा तपास करुनही ठावठिकाणा लागत नसल्याने पोलीसांनी गुन्हयाचा तपास थांबवून कलम-173 प्रमाणे तारीख 03/01/2010 रोजी संबंधित न्यायालयाकडे त्याबाबत अंतीम अहवाल दाखल करुन तक्रारदारांना त्याचे कार्यालयाकडील नमुन्यातील पत्राद्वारे त्याबाबत कळविले.
त्यानंतर तक्रारदाराने विमा नुकसान भरपाई मिळावी म्हणून सामनेवालेकडे आवश्यक कागदपत्रासह अर्ज दाखल केला. परंतू सामनेवालेने तक्रारदाराने मोटार सायकलची पुरेशी काळजी न घेतल्याने व इतर कारणे दर्शवून ता. 03/03/2010 रोजीचे पत्राद्वारे नुकसान भरपाई देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे तक्रारदारास शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास झाला तो खालील प्रमाणे.
अ) मोटार सायकलची रक्कम. रु. 50,000/-
ब) मानसिक त्रासापोटी. रु. 45,000/-
क) प्रस्तुत तक्रार अर्जाचा खर्च. रु. 5,000/-
---------------------------------------
एकूण रु. 1,00,000/-
विनंती की, तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम रु. 1,00,000/- योग्य व्याजासह सामनेवालेंनी तक्रारदारांना देण्याबाबत आदेश व्हावा.
सामनेवालेंनी त्यांचा खुलासा तारीख 29/06/2010 रोजी दाखल केला. तक्रारीतील सर्व आक्षेप सामनेवालेंनी नाकारलेले आहेत. तसेच नुकसान भरपाईची आकारणी सामनेवालेंनी नाकारलेली आहे. तक्रारदाराने वाहनाचा विमा टू व्हीलर पॅकेज पॉलीसी म्हणून घेतलेला होता. त्याचे विमापत्र क्रमांक 3005/10170989/10335/000 टू व्हीलर सर्टीफिकेट कम पॅकेज पॉलीसी शेडयुल तक्रारदाराला दिली होती. सदर विम्याचा कालावधी ता. 30/6/09 ते 29/6/2010 असा होता. सदर विमा पॉलीसी ही पॉलीसीच्या नियम व अटींना अनुसरुन होती. तक्रारदाराकडे घटनेच्या दिवशी वैध वाहन परवाना नव्हता.
मा. मंचाने जर तक्रारदाराने दिलेली फिर्याद बारकाईने पाहिली असता असे निदर्शनास येते की, तक्रारदाराने त्याचे फिर्यादीमध्ये असे लिहले होते की, तो व त्याचे मेहुणे सदरील वाहन रस्त्यावर ठेवून थोडया अंतरावर लघुशंकेसाठी गेले होते व तक्रारदाराने सदरील वाहनाची चाबी वाहनालाच लावली होती, हे स्पष्ट होते. त्यावरुन तक्रारदाराचा निष्काळजीपणा निदर्शनास येतो. वाहनाची काळजी न घेता वाहनाची चाबी वाहनाला लावून थोडया अंतरावर तक्रारदार लघुशंकेला गेले, त्यामुळे तक्रारदाराने सदरील वाहनाची योग्यरितीने काळजी घेतलेली नाही. वास्तविक वाहनाला लॉक करुन त्याची चाबी स्वत:कडे ठेवायला पाहिजे होती, परंतू तक्रारदाराने तसे न करुन वाहनाकडे दुर्लक्ष केले. थोडक्यात पॉलीसीच्या नियम व अटींचे उल्लंघन केले आहे. सामनेवालेंनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत कोणताही कसूर केलेला नाही. तक्रारदाराने जाणून-बुजून सामनेवालेंना त्रास देण्यासाठी तक्रार दाखल केलेली आहे, म्हणून सदरील तक्रार रद्द करण्यात यावी.
न्याय निर्णयासाठी मुद्दे उत्तरे
1. सामनेवालेंनी तक्रारदारांना चोरीस गेलेल्या
वाहनाच्या नुकसान भरपाईची रक्कम न
देवून दयावयाच्या सेवेत कसूर केल्याची
बाब तक्रारदाराने सिध्द केली काय ? नाही.
2. तक्रारदार दाद मिळण्यास पात्र आहे काय ? नाही.
3. अंतिम आदेश ? निकालाप्रमाणे.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद तसेच सामनेवालेंचा खुलासा, शपथपत्र, दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले. सामनेवालेचे विद्वान अँड. आर. व्ही. देशपांडे यांचा युक्तिवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदाराचे वाहनाचा नोंदणी क्रमांक व विमा या सामनेवालेंना मान्य आहे. तसेच सामनेवालेंनी तक्रारदाराचे वाहन चोरीस गेले असतांना त्याची नुकसान भरपाई दिलेली नाही, ही बाब देखील मान्य आहे.
सामनेवालेने तक्रारदाराचा दावा हा तक्रारदाराने पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत मोटार सायकलला चाबी ठेवून तक्रारदार लघु शंकेसाठी गेला या एका विधानावर नाकारलेला आहे व याच आशयाच्या न्याय निवाडयाचा आधार सामनेवालेंनी घेतलेला आहे.
मा. राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली.
रिव्हीजन पिटीशन नं. 2555/03,
न्यु इंडिया इंन्शुरन्स कं. लि. विरुध्द टी. व्ही. सारथी.
सदर न्याय निवाडयाचे सखोल वाचन केले असता सदरचा न्याय निवाडा हा सामनेवालेंच्या विधानाच्या समर्थनार्थ लागू होतो, असे न्याय मंचाचे मत आहे.
तक्रारदाराने त्यांचे म्हणण्याचे समर्थनार्थ खालील न्याय निवाडयाचा आधार घेतलेला आहे.
2010 (1) सीपीआर-99 मा. राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली.
नॅशनल इन्शुरन्स कं. लि. बलवंतसिंग
ग्राहक संरक्षण कायदा- 1986 कलम- 2 (1) (जी),
2(1)(0), 14(1) (डी), 15, 17 आणि 21 – विमा --
कारची चोरी – खाजगी कार टॅक्सी म्हणून वापरत होते –
चोरीच्या वेळी कार कोणत्या हेतुने चालवली जात होती
किंवा वापरली जात होती, याचा परस्पर संबंध नाही –
खाजगी कार चोरीच्या वेळी व्यापारी हेतुने वापरली जात
असेल तर त्यामुळे चोरीच्या कारणांशी मुळ अटींच्या
कारणांचा परस्पर संबंध येत नाही – मा. राज्य आयोगाने
योग्य त-हेने दावा नाकारला – अपील नामंजूर.
सदर न्याय निवाडयाचे सखोल वाचन केले असता सदरचा न्याय निवाडा हा तक्रारदाराच्या तक्रारीस लागू होत नाही, असे न्याय मंचाचे मत आहे. तक्रारीतील विधान व न्याय निवाडा हे दोन्ही वेगळे आहेत, असे न्याय मंच नम्रपणे नमूद करीत आहे.
तक्रारदाराने वाहनाची योग्य काळजी न घेतल्याने वाहन चोरीला गेलेले आहे, ही बाब वरील विधानावरुन स्पष्ट झालेली आहे व त्याच कारणाने सामनेवालेने तक्रारदाराचा दावा योग्यरितीने नाकारलेला आहे. त्यात तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत सामनेवालेने कसूर केल्याची बाब स्पष्ट होत नाही, असे न्याय मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारदारास चोरीस गेलेल्या वाहनाच्या संदर्भात नुकसान भरपाई देणे अगर तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे मानसिक त्रासाची रक्कम देणे उचित होणार नाही, असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब, न्याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
2. सामनेवालेंच्या खर्चाबाबत आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(सौ. एम. एस. विश्वरुपे ) ( पी. बी. भट )
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, बीड.
चुनडे, लघुलेखक :/-