तक्रारदारातर्फे :- वकील- आर. व्ही. जाधव.
सामनेवालेतर्फे :- वकील- ए.पी. कुलकर्णी.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात की, तक्रारदार बीड येथील रहिवाशी असून शेती करुन आपली उपजिविका भागवतो.
तक्रारदाराची बहीण मिरा देवीदास वर्मा हिचा मृत्यु दि. 13/12/07 रोजी शारीरीक आजाराने झालेला आहे. या घटनेची माहिती तक्रारदाराने नगर परिषद, बीड यांना दिली. त्यांनी मृत्युची नोंद केली आहे व तक्रारदारांना मृत्युप्रमाणपत्र दिलेले आहे. मयत मिरा वर्मा यांनी शाखा नं. 983 बीड यांच्याकडून टेबल क्रं. 149-18-18 या योजने अंतर्गत जीवन आनंद पॉलिसी क्रं. 984702438 ही विमा पॉलिसी दि. 23/3/2007 रोजी काढलेली होती. सदरचा विमा हा रु. 1,00,000/- चा होता. बहिनीच्या मुत्युनंतर वरील विम्याचा मृत्यु लाभ मिळण्यासाठी दावा सामनेवालेकडे दाखल केला. परंतू सामनेवालेंनी तो दाखल करुन घेतला नाही, म्हणून तारीख 25/1/2010 रोजी वकिलामार्फत विमा दावा विलंब माफीच्या अर्जासह रजिस्टर पोष्टाने पाठवला. सदरचा दावा त्यांना मिळाला. सामनेवालेंनी विमापत्रातील नियम व अटीनुसार विमा दावा तक्रारदारांना विना तक्रार मंजूर करावयास पाहिजे होता परंतू तसे न करता दावा दाखल करुन घेतला नाही. सामनेवालेच्या प्राधिकरणाने विहीत केलेल्या अधिनियमानुसार कलम- 8 सबकॉज 2 नुसार संबंधीत दावा एक महिन्याच्या आत मंजूर अथवा नामंजूर करावयास पाहिजे होता. आजपर्यंत पोस्टाने पाठवलेला दावा प्रलंबित आहे, म्हणून सामनेवालेने निश्चितच सेवेत त्रुटी केलेली आहे. शारिरीक मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- दयावी, खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- ची मागणी तक्रारदार करीत आहे.
विनंती की, सामनेवालेने तक्रारदारास विमा रक्कम रु. 1,00,000/- 18 टक्के व्याजासह देण्याबाबत आदेश व्हावा. मानसिक त्रासापोटी रु. 5,000/-, खर्चापोटी रु. 2,000/- देण्याबाबत आदेश व्हावा.
सामनेवालेने त्यांचा खुलासा तारीख 10/6/2010 रोजी दाखल केला. त्यांचा खुलासा थोडक्यात की, तक्रारीतील सर्व आक्षेप सामनेवालेंनी नाकारलेले आहेत. वास्तविक सामनेवालेच्या कार्यालयात यासंदर्भात कोणीही आलेले नाही व त्यांनी मयत विमेदाराच्या मृत्युसंदर्भात सुचनाही केलेली नाही. कोणत्याही दावा रक्कमेची मागणी केलेली नाही. वकिलामार्फत तारीख 03/2/2010 ची नोटीस सामनेवालेंना मिळाल्यानंतर प्रथमत: असे समजले की, विमेदाराचा मृत्यु झालेला आहे. सदर नोटीसीस ता. 6/2/10 रोजी सामनेवालेने उत्तर दिलेले आहे. तक्रारदार किंवा विमेदाराच्या कोणत्याही कायदेशीर वारसाने दावा अर्ज या सामनेवालेच्या कार्यालयात दाखल केलेला नाही. त्यामुळे सामनेवालेच्या सेवेत कसूर नाही. तक्रारदारांना तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रार अपरिपक्व आहे.
तारीख 06/02/2010 चे उत्तर दावा, व कागदपत्रांची माहिती तक्रारदारांना दिलेली आहे, परंतू त्यानुसार कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
तक्रारदार ग्राहक या संज्ञेत येत नाही. या सामनेवालेच्या सेवेत कसूर नाही. तक्रार खोटी असल्यामुळे खर्चासह रद्द करण्यात यावी. सामनेवाले यांना खचाची रक्कम रु. 10,000/- देण्याबाबत आदेश व्हावा.
न्याय निर्णयासाठी मुददे उत्तरे
1. तक्रारदार ग्राहक आहे काय ? होय.
2. सामनेवालेने मयत विमेदार मिरा देवीदास वर्मा
यांच्या मृत्यु दाव्याची रक्कम न देवून दयावयाच्या
सेवेत कसूर केल्याची बाब तक्रारदाराने सिध्द केली
आहे काय ? नाही.
3. तक्रारदार दाद मिळण्यास पात्र आहे काय ? नाही.
4. अंतिम आदेश ? निकालाप्रमाणे.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवालेचा खुलासा, शपथपत्र, दाखल कागदपत्र यांचे सखोल वाचन केले. तक्रारदाराचे विद्वान अँड. आर. व्ही. जाधव व सामनेवालेचे विद्वान अँड. ए. पी. कुलकर्णी यांचा युक्तिवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता मिरा देविदास वर्मा यांनी सामनेवालेकडून टेबल क्रं. 149-18-18 या योजनेअंतर्गत जीवन आनंद पॉलिसी क्रं. 984702438 ही विमा पॉलिसी रक्कम रु. 1,00,000/- ची दि. 23/3/2007 रोजी काढलेली आहे. सदर विम्यास नॉमिनी म्हणून तक्रारदाराचे नांव आहे.
तारीख 13/12/2007 रोजी विमेदार मिरा वर्मा हिचा शारिरीक आजाराने मृत्यु झालेला आहे.
तक्रारदाराने विमा दावा रक्कम मिळण्यासाठी सामनेवालेकडे दावा दाखल करण्यास गेला असता त्यांनी सदरचा दावा दाखल करुन घेतला नाही, असा प्राथमिक आरोप तक्रारदाराचा आहे. म्हणून तक्रारदाराने ता. 25/1/2010 रोजी विलंब माफीच्या अर्जासह दावा पोस्टाने सामनेवालेकडे पाठवलेला आहे व सदरचा दावा सामनेवालेंना मिळालेला आहे. परंतू त्यांनी मृत्युच्या दाव्याची रक्कम दिलेली नाही, अशी तक्रारदाराची तक्रार आहे.
यासंदर्भात सामनेवालेने तक्रारदार हया ग्राहक या संज्ञेत येत नाही, अशी जोरदार हरकत घेतलेली आहे. तथापि विमा पत्रात तक्रारदाराचे नांव नॉमिनी म्हणून आहे, त्यामुळे तक्रारदार हया मयत मिरा वर्माची बहीण आहे. नॉमिनी असल्याकारणाने तक्रारदार ही सदर विमा रक्कमेची लाभार्थी आहे, त्यामुळे सामनेवालेची हरकत या ठिकाणी ग्राहय धरणे उचित होणार नाही, असे न्याय मंचाचे मत आहे.
तक्रारदार मयत विमेदार मिरा वर्माच्या मृत्यु नंतर कधी सामनेवालेकडे दावा दाखल करण्यास गेली होती, याबाबतचा कोणताही स्पष्ट उल्लेख तारखेसह तक्रारीत नाही. केवळ तक्रारदाराने सदरचा आक्षेप घेतलेला आहे. तसेच तक्रारदाराने वकिलामार्फत विलंब माफीसह ता. 25/01/2010 रोजी दावा अर्ज पाठवल्याचे तक्रारदार म्हणत असले तरी तक्रारीत दाखल असलेल्या तारीख 25/1/2010 चा वकिलाच्या सहीचा अर्ज पाहता त्यावर तक्रारदाराची सही नाही. तसेच सदर अर्जासोबत सामनेवालेचा छापील दावा अर्ज भरुन पाठवल्याबाबतची ठळक प्रत नाही. तसेच त्यासोबत कोणकोणती कागदपत्रे पाठवली त्याबाबतचा कोणताही तपशील सदर अर्जाचे स्थळ प्रतीवर नाही.
सामनेवालेंना सदरचा अर्ज मिळाल्यानंतर त्यांना प्रथमत: विमेदार मयत झाल्याबाबतची माहिती झाली व त्यांनी सदर अर्जास ता. 06/02/2010 चे उत्तर तारीख 3/3/2010 रोजी पोस्टाने पाठवलेले आहे व त्यात मृत्युचा दावा अर्ज व त्यासंबंधाने लागणा-या सर्व कागदपत्रांचा तपशील नमूद केलेला आहे व सदरचा दावा अर्ज व कागदपत्रे मिळाल्यानंतर दावा मंजूरीसाठी तपासणी केली जाते व प्रक्रिया सुरु होते, असे नमूद केलेले आहे. तथापि तक्रारदाराने सदर उतराप्रमाणे कार्यवाही न करता तक्रार दाखल केलेली आहे.
वरील परिस्थितीवरुन स्पष्ट होते की, तक्रारदाराने योग्य त-हेने सामनेवालेकडे विमा दावा रक्कमेची मागणी केलेली नाही, त्यामुळे सामनेवाले यांनी सदरची रक्कम न देवून दयावयाच्या सेवेत कसूर केल्याची बाब कोठेही स्पष्ट होत नाही. तथापि तक्रारदाराच्या वकिलाने युक्तिवादाच्या वेळी मुळ कागदपत्रे दावा अर्जासोबत मुळ कागदपत्रे पाठविण्याकरीता तक्रारीतील मुळ कागदपत्रे परत मिळण्याची मागणी केली त्यानुसार त्यांना सदरची कागदपत्रे देण्यात आलेली आहे. तसेच युक्तिवादात सामनेवालेंनी सांगितले की, तक्रारदाराने दावा दाखल केल्यास आम्ही सदरचा दावा स्विकारण्यास तयार आहोत.
तक्रारदाराने दावा अर्ज सामनेवालेकडे योग्य त्या नमुन्यात कागदपत्रासह दाखल केलेला नसल्यामुळे निश्चितपणे तक्रारदारांना तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. दावा अर्ज दाखल झाल्याशिवाय आणि तो नामंजूर झाल्याशिवाय तक्रारीस कारण निर्माण होत नाही. अशा परिस्थितीत तक्रारदाराची तक्रार निश्चितपणे अपरिपक्व अशी आहे. तथापि तक्रारदार हे सामनेवालेकडे दावा अर्ज योग्य त्या कागदपत्रासह दाखल करणार असल्याने सदरची तक्रार रदृ करणे उचित होईल, असे न्याय मंचाचे मत आहे. सबब, न्याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार रदृ करण्यात येत आहे.
2. तक्रारदारांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी सामनेवालेच्या कार्यालयात मयत विमेदार मिरा वर्मा च्या मृत्युच्या दाव्या संदर्भात दावा अर्ज विहीत नमुन्यात योग्य त्या कागदपत्रासह भरुन दाखल करावा.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(सौ. एम. एस. विश्वरुपे ) ( पी. बी. भट )
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, बीड.
चुनडे, लघुलेखक /-