जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १२१/२०११
तक्रार दाखल दिनांक – २२/०६/२०११
तक्रार निकाली दिनांक – २१/०७/२०१४
श्री रामलाल दगा ढोले
वय ४५ धंदा – ट्रॅक्टर मालक
राहणार – मोगलाई, भोईवाडा,
साक्रीरोड, धुळे .............. तक्रारदार
विरुध्द
शाखा व्यवस्थापक,
दि ओरिएंटल इंन्शुरन्स कंपनी लि.
भावसार शॉपिंग कॉम्प्लेक्स, गल्ली नं.५
म.न.पा. शाळा नं.9 समोर,
धुळ ता.जि.धुळे
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारातर्फे – अॅड.श्री.एस.जे. वैद्य)
(सामनेवालातर्फे – अॅड.सौ.एम.एम. पासेकर)
निकालपत्र
(दवाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
१. ट्रॅक्टरच्या अपघातानंतर सामनेवाले यांनी विमा दाव्याची रक्कम नाकारली या कारणावरून तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांनी या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी एम.एच.-१५/ बी.डब्लु.१४०५ क्रमांकाचे ट्रॅक्टर व ट्रॉली खरेदी केली होती. या वाहनाचा त्यांनी सामनेवाले यांच्याकडून विमा उतरविला होता. त्याचा पॉलीसी क्रमांक १८२४०१/४७/२०११/११४ असा आहे. दिनांक ०८/०७/२०१० रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास मोराणे फाट्याजवळ त्यांच्या वाहनाला मागून येणा-या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले. सामनेवाले यांनी अपघातग्रस्त ट्रॅक्टर व ट्रॉलीचा सर्व्हे केला. त्यानंतर तक्रारदार यांनी सदर वाहन दुरूस्तीसाठी पाठविले. वाहन दुरूस्तीचा खर्च रूपये ६०,०००/- इतका आला. तो खर्च मिळावा यासाठी तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे दावा दाखल केला. तथापि, तक्रारदार यांनी ट्रॅक्टरसाठी किसान पॅकेज पॉलीसी घेतली होती. प्रत्यक्षात वाहनाचा उपयोग विट भट्टीसाठी केला जात होता. या कारणावरून सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा विमा दावा फेटाळून लावला. सामनेवाले यांच्याकडून वाहन दुरूस्तीचा खर्च म्हणजे विमा दावा रक्कम रूपये ६०,०००/- मानसिक त्रासापोटी रूपये ३०,०००/- त्यावर १२ टक्के प्रमाणे व्याज मिळावे अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
३. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत विमा पॉलीसी, अपघाताची खबर, फिर्याद, घटनास्थळ पंचनामा, ट्रॅक्टर दुरूस्तीची बिले आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
४. सामनेवाले यांनी दाखल केलेल्या खुलाशात म्हटले आहे की, तक्रारदार यांची तक्रार खोटी आहे. तक्रारदार हे पॉलीसीनुसार ट्रॅक्टर शेतीकामासाठी न वापरता विटा वाहण्यासाठी वापरीत होते. यामुळे पॉलीसीच्या नियम व अटींचा भंग झाला आहे. याच कारणामुळे सामनेवाले हे तक्रारदार यांना कोणतीही भरपाई देण्यास जबाबदार नाही.
५. सामनेवाले यांनी खुलाशासोबत पोलिसांनी घेतलेला अर्जदाराचा जबाब, शोभाबाई ढोले यांचा जबाब, सोमनाथ ढोले यांचा जबाब, संजय ढोले यांचा जबाब, मा.राष्ट्रीय आयोगाच्या २०११ एन.सी.जे. ३६२ (एन.सी.) या तक्रारीतील आदेश आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
६. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले यांनी खुलाशासोबत दाखल केलेली कागदपत्रे आणि उभयपक्षाच्या विद्वान वकिलांचा युक्तिवाद यावरून आमच्यासमोर निष्कर्षासाठी पुढील मुददे उपस्थित होतात.
मुददे निष्कर्ष
- तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? होय
- सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात
त्रुटी केली आहे काय ? नाही
क. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
७. मुद्दा ‘अ’ - तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून त्यांच्या वाहनासाठी विमा पॉलीसी घेतली होती. तिचा क्र.१८२४०१/४७/२०११/११४ असा आहे. ही बाब सामनेवाले यांनी नाकारलेली नाही. तक्रारदार यांनी पॉलीसीची प्रतही दाखल केली आहे. यावरून तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. म्हणून मुददा ‘अ’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा ‘ब’ – तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून जी पॉलीसी घेतली होती ती किसान पॅकेज पॉलीसी या प्रकारची होती. अशी पॉलीसी केवळ शेतक-यांना ते शेतीसाठी वापरत असलेल्या वाहनांकरता दिली जाते असे सामनेवाले यांचे म्हणणे आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या युक्तिवादात म्हटले की, अपघातग्रस्त वाहनाचा उपयोग शेतीकामासाठीच केला जात होता. त्यामुळे विमा पॉलीसीच्या नियम व अटींचा आम्ही भंग केलेला नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांनी पोलिसांना दिलेला जबाब, तक्रारदार यांच्या पत्नी सौ.शोभाबाई रामलाल ढोले यांनी पोलिसांना दिलेला जबाब, तक्रारदार यांचा मुलगा सोमनाथ रामलाल ढोले यांनी पोलिसांना दिलेला जबाब आणि संजय भगवान ढोले यांनी पोलिसांना दिलेला जबाब दाखल केला आहे. या चारही जबाबांमध्ये तक्रारदार यांचा विटभट्टीचा व्यवसाय आहे आणि अपघात झाला त्यादिवशी अपघातग्रस्त वाहन विटभट्टीच्या कामासाठीच वापरले जात होते याचा उल्लेख आहे. सामनेवाले यांच्या वकिलांनी युक्तिवादात याच मुद्यावर जोर देवून तो प्रकर्षाने मांडला. तक्रारदार आणि सामनेवाले यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता तक्रारदार यांचे वाहन शेती कामाऐवजी विटभट्टीच्या कामासाठी वापरले जात होते हे दिसून येते. तक्रारदार हे सदर वाहन शेतीकामाऐवजी विटभट्टीच्या कामासाठी वापरत असल्याचे दिसत असल्याने त्यांच्याकडून त्यांनी घेतलेल्या किसान पॅकेज पॉलीसी या विमा पॉलीसीच्या नियम व अटींचा भंग झाला आहे असे आमचे मत बनले आहे. कोणतीही विमा पॉलीसी म्हणजे दोन पक्षातील करार असतो. त्या पॉलीसीच्या किंवा कराराच्या नियम व अटींचे पालन करणे ही दोन्ही पक्षांची जबाबदारी आणि कर्तव्य असते. सदर प्रकरणात तक्रारदार यांच्याकडून पॉलीसीच्या नियम व अटींचा भंग झाला असल्यास त्या पॉलीसीची रक्कम देण्याची जबाबदारी सामनेवाले यांच्याकडे जात नाही. त्यामुळे सदर प्रकरणात सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा दावा नाकारून नियमबाहय काम केलेले नाही किंवा कोणतीही चूक केलेली नाही असे आम्हाला वाटते. म्हणूनच मुद्दा क्र ‘ब’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
११. मुद्दा ‘क’ – वरील विवेचनाचा विचार करता सामनेवाले यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली नाही हे स्प्ष्टपणे दिसून येते. असे असतांना सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा विमा दावा मंजूर करणे किंवा त्यांना तो मंजूर करण्यासाठी आदेश देणे हे चुकीचे ठरेल असे आमचे स्पष्ट मत आहे. यामुळे तक्रारदार यांची तक्रार मंजूर करता येणार नाही या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. सबब आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत इतर कोणतेही आदेश नाहीत.
-
-
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.