निकालपत्र
--------------------------------------------------------------------(1) मा.सदस्य,श्री.सी.एम.येशीराव – विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांना योग्य व तत्पर सेवा देण्यात कसुर केली म्हणून नुकसान भरपाई मिळण्याकरिता प्रस्तुत तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे
(2) तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी टाटा इंडिगो वाहन क्र.एम.एच.43/डी-2980, मेक- एल.एस. 2006, चेसीस नंबर 607144 जे.टी.झेड.पी.डी. 6894, इंजिन नंबर 475 आय.डी.टी.14, जे.टी.झेड.पी.डी.5676, 1405 सी.सी.डिझेल इंजिन, सप्टेंबर 2006 चे असलेले मॉडेल, कलम व्हेनेटाईन ब्ल्यु, कॅपीसीटी 4 अधिक 1 हे वाहन विरुध्दपक्ष यांच्याकडून दि.21-06-2010 रोजी रु.2,90,000/- एवढया किमतीस घेण्याचे ठरले. त्यानुसार सौदा पावती करण्यात आली. बयाणापोटी रु.10,000/- रोख व रु.1,50,000/- चा चेक देणा बँक शाखा-धुळे चा क्रमांक 678176 दि.26-06-2010 चा विरुध्दपक्ष यांना देण्यात आला. असे एकूण रु.1,60,000/- विरुध्दपक्ष यांना सौदा पावतीनुसार देण्यात आले आणि उर्वरीत रक्कम आठ दिवसात देण्याचे ठरले. सौदा पावती करतेवेळी विरुध्दपक्ष यांनी सदर वाहन तक्रारदारांचे ताब्यात दिले. तसेच वाहनाची एन.ओ.सी., वाहन ट्रान्सफर करुन देणे, तक्रारदाराच्या नावाने आर.टी.ओ. कार्यालयात नोंदवून देणे इ.बाबी करण्याचे मान्य केले आहे. या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर उर्वरीत रक्कम देण्याचे ठरले होते.
मात्र त्यानंतर आजपावेतो विरुध्दपक्ष यांनी सदर वाहन तक्रारदाराच्या नांवे करुन दिलेले नाही. उडवाउडवीची उत्तरे दिली. खोटी कारणे देऊन ट्रान्सफर करण्याचे टाळले. तक्रारीतील वाहन हे टुरीस्ट टॅक्सी या प्रकारचे वाहन होते ते खासगी वाहन या प्रकारची नोंदणी करुन देण्याचे विरुध्दपक्ष यांनी मान्य केले होते, मात्र तशी नोंदणी करुन दिली नाही. आवश्यक ती कागदपत्रे दिली नाहीत. म्हणून सदर वाहन तक्रारदार वापरु शकत नाहीत व त्याचा उपभोग घेऊ शकत नाहीत. योग्य ती कागदपत्रे नसल्यामुळे ते वाहन वापरणे म्हणजे कायद्याचा भंग करणे आहे. म्हणून ते वाहन तक्रारदाराकडे पडून आहे. या बाबत विरुध्दपक्ष यांना वारंवार विनंती करुनही त्यांनी दखल घेतली नाही. म्हणून दि.05-07-2011 रोजी तक्रारदाराने विरुध्दपक्ष यांना नोटिस पाठविली. परंतु नोटिस मिळूनही विरुध्दपक्ष यांनी पुर्तता केली नाही. म्हणून तक्रारदारांनी ही तक्रार दाखल केली आहे.
(3) तक्रारदारांनी, तक्रार अर्जात वर्णन केलेले वाहन, विरुध्दपक्ष यांनी खासगी वाहन वापरण्याच्या परवान्यासह तक्रारदारांच्या नांवे करुन दयावे तसेच मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रु,2,50,000/- एवढी भरपाई विरुध्दपक्ष यांनी द्यावी, तक्रारीचा खर्च रु.15,000/- मिळावा, बयाणा रक्कम रु.1,60,000/- वर दि.21-06-2010 पासून द.सा.द.शे.12 टक्के व्याज विरुध्दपक्ष यांचेकडून मिळावे अशी विनंती केली आहे.
(4) सदर तक्रार अर्जाचे कामी विरुध्दपक्ष यांना रजिष्टर्ड पोष्टाद्वारे नोटिस काढण्यात आली. परंतु सदर नोटिस विरुध्दपक्ष यांनी स्वीकारली नसल्यामुळे ती “ रिफयुज्ड ” अशा पोष्टाच्या शे-यासह या न्यायमंचात परत आली आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष यांना सदर नोटिसीचे ज्ञान झाले आहे असे समजण्यात येत आहे.
विरुध्दपक्ष हे या न्यायमंचाच्या नोटिसीचे ज्ञान होऊनही, सदर प्रकरणी नेमलेल्या सर्व तारखांना गैरहजर आहेत. तसेच त्यांनी स्वतः अथवा प्रतिनिधी मार्फत स्वतःच्या बचावार्थ काहीही म्हणणे सादर केले नाही. त्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश करण्यात आला आहे.
(5) तक्रारदार यांनी नि.नं.2 वरील त्यांच्या तक्रारीच्या समर्थनार्थ नि.नं.3 वर शपथपत्र, नि.नं.6/1 वर वकीलांची नोटिस, नि.नरं.6/2 ते 6/10 पर्यंत माहितीच्या अधिकारात मिळालेली कागदपत्रे व वाहनाचे रजिष्ट्रेशन सर्टिफीकेट दाखल केले आहे. तसेच नि.नं.6/11 वर रु.1,50,000/- दिल्याची पावती व नि.नं.6/12 ला सौदा पावती दाखल केली आहे.
(6) तक्रारदारांची तक्रार व दाखल कागदपत्रांवरुन आमच्यासमोर निष्कर्षासाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात व त्यांची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे विरुध्दपक्ष यांचे ग्राहक आहेत काय ? | ःहोय. |
(ब)तक्रारदार विरुध्दपक्ष यांचेकडून,तक्रारीतील वाहन त्यांचे नांवे नोंदणी करुन मिळण्यास, त्या बाबतची कागदपत्रे मिळण्यास, आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रासापोटी व नुकसानीचा खर्च मिळण्यास पात्र आहे काय ? | ःहोय. |
(क)आदेश काय ? | ःअंतिम आदेशानुसार |
विवेचन
(7) मुद्दा क्र. ‘‘अ’’ - तक्रारदारांनी विरुध्दपक्ष यांचेकडून टाटा इंडिगो हे वाहन विकत घेतलेले आहे. वाहन विकत घेतेवेळी रु.100/- च्या स्टँप पेपरवर सौदा पावती केली आहे. सौदा पावतीनुसार विरुध्दपक्षास रु.10,000/- रोख आणि रु.1,50,000/- चा देणा बँक शाखा धुळे यांचा चेक दिलेला आहे. सदर रकमेची पावती व सौदा पावती नि.नं.6/11 व 6/12 वर दाखल आहे. त्यानुसार तक्रारदार हे विरुध्दपक्षाचे ग्राहक आहेत असे या न्यायमंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(8) मुद्दा क्र. ‘‘ब’’ - तक्रारदारांनी विरुध्दपक्ष यांचेकडून टाटा इंडिगो वाहन क्र.एम.एच. 43/डी 2980, सप्टेंबर 2010 चे मॉडेल, रंग व्हेनेटाईन ब्ल्यु, कॅपीसीटी 4 अधिक 1 हे वाहन दि.21-06-2010 रोजी तक्रारदार व विरुध्दपक्ष यांच्यात झालेल्या सौदापावती नुसार बयाणा रक्कम रु.1,60,000/-, त्यात रु.10,000/- रोख व रु.1,50,000/- चा चेक क्र.678176 देणा बँक शाखा धुळे या नावाचा, असे विरुध्दपक्ष यांना दिलेले आहेत. सौदापावती करतेवेळी विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांच्या नांवे तक्रारीतील इंडिगो वाहन आर.टी.ओ. च्या कार्यालयातील कायदेशीर रित्या नोंदणी करुन ट्रान्सफर करुन देण्याचे कबूल केले होते. सौदापावती करतेवेळी हे वाहन टुरीस्ट वाहन होते ते खासगी वाहन म्हणून नोंदणी करुन देण्याचे मान्य केले होते. तसेच मुळ मालकाच्या नावावरुन सदर वाहन तक्रारदाराच्या नांवे आर.सी. बुकमध्ये नोंद करुन देण्याचीही जबाबदारी विरुध्दपक्ष यांची होती. मात्र सौदा झाल्याचा दि.21-06-2010 पासून ते दि.05-07-2011 पर्यंत विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांना कबूल केलेल्या अटी व शर्तींचे पालन केलेले नाही. सदरच्या टुरीस्ट वाहनाची खासगी वाहन अशी नोंदणी करुन दिलेली नाही, तक्रारदारांच्या नावाने आर.सी. बुकमध्ये नोंद करुन दिलेली नाही. त्यामुळे तक्रारदारांना सदर वाहन वापरता आले नाही व ते आजपावेतो त्यांच्याकडे पडून आहे आणि त्याचे नुकसान होत आहे. तसेच तक्रारदाराचे रु.1,60,000/- विरुध्दपक्षाकडे अडकून पडले आहेत. या बाबत तक्रारदारांनी विरुध्दपक्षाशी वारंवार संपर्क साधला. मात्र त्यानंतरही विरुध्दपक्षाने पुर्तता केली नसल्यामुळे तक्रारदाराने दि.05-07-2011 रोजी वकीला मार्फत नोटिस पाठविली. त्यानंतरही विरुध्दपक्षाने पुर्तता न केल्यामुळे तक्रारदाराने या न्यायमंचात तक्रार दाखल केली आहे.
(9) तक्रारदारांनी तक्रारीतील इंडिगो वाहन हे विरुध्दपक्षाने त्यांच्या नांवे कायदेशीर रित्या करुन द्यावे, खासगी वाहन म्हणून नोंदणी करुन द्यावे, आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.2,50,000/- विरुध्दपक्षाने द्यावे, तक्रारीचा खर्च रु.15,000/- व त्यावर द.सा.द.शे.18 टक्के व्याज तसेच बयाणा रक्कम रु.1,60,000/- वर दि.21-06-2010 पासून व्याज मिळावे अशी मागणी केली आहे.
(10) विरुध्दपक्षाने मंचाची नोटिस स्वीकारलेली नाही, नोटिसीचे ज्ञान होऊनही मंचात हजर नाही, कोणताही खुलासा दाखल केलेला नाही, तक्रारदारांच्या तक्रारीस व कथनास आव्हान दिलेले नाही. कथन नाकारलेले नाही.
(11) या उलट तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत शपथपत्र दाखल केले आहे. तसेच त्यांच्या कथनाच्या पुष्टार्थ नि.नं.6 वर 6/1 ते 6/12 हे महत्वाचा पुरावा म्हणून दस्तावेज व पत्रव्यवहार दाखल केला आहे. या सर्व दस्तऐवजाचे अवलोकन करता तक्रारदारांच्या तक्रारीतील कथन हे योग्य व खरे आहे. विरुध्दपक्षाने तक्रारदाराकडून इंडिगो गाडीच्या खरेदीपोटी बयाणा रक्कम देऊनही वाहन तक्रारदारांच्या नांवे करुन दिलेले नाही अशी तक्रार शाबीत केली आहे असे या न्यायमंचाचे मत आहे. विरुध्दपक्षाच्या कृतीमुळे तक्रारदाराचे निश्चितच आर्थिक नुकसान झाले आहे व त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला आहे ही बाबही स्पष्ट झालेली आहे. तसेच तक्रारदारांना यासाठी तक्रार दाखल करावी लागली आहे. या सर्व बाबी पाहता तक्रारदार हे विरुध्दपक्षाकडून तक्रारीतील वर्णन केलेले वाहन क्र.एम.एच.43/डी 2980 टाटा इंडिगो हे खासगी वाहन वापरण्याच्या परवान्यासह त्वरीत त्यांचे नांवे नोंदणी करुन मिळण्यास पात्र आहेत. किंवा तक्रारदारांनी विरुध्दपक्षास दिलेली बयाणापोटीची रक्कम रु.1,60,000/- व त्यावर द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज मिळण्यास पात्र आहेत असे आम्हास वाटते. विरुध्दपक्षाच्या अशा कृतीमुळे तक्रारदार निश्चितच शारीरिक, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- मिळण्यास पात्र आहेत असे आम्हास वाटते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(12) मुद्दा क्र. ‘‘क’’ – वरील विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
(अ) तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सदर निकालाच्या तारखेपासून पूढील तीस दिवसांचे आत, विरुध्दपक्ष यांनी.
(1) तक्रारीतील वाहन टाटा इंडिगो वाहन क्र.एम.एच.43/डी-2980 हे खासगी वाहन वापरण्याचे परवान्यासह तक्रारदाराच्या नावे कायदेशीर रित्या नोंदणी करुन द्यावे. आणि त्यानंतर सदर वाहनाच्या किमतीची उर्वरीत रक्कम तक्रारदाराने विरुध्दपक्षास द्यावी.
किंवा
(1) विरुध्दपक्षाने, तक्रारदाराकडून तक्रार अर्जात वर्णन केलेल्या वाहनाच्या किमतीपोटी घेतलेली बयाणा रक्कम, रु.1,60,000/- त्यावर दि.21-06-2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह तक्रारदारास द्यावी. आणि त्यानंतर सदर वाहन स्वतःचे ताब्यात घ्यावे.
(2)तक्रारदारास मानसिक, शारीरिक त्रासापोटी रक्कम 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) द्यावेत.
(3)उपरोक्त आदेश कलम 1 व 2 मध्ये नमूद केलेली रक्कम मुदतीत न दिल्यास त्यावर तक्रार दाखल तारखे पासून ते संपूर्ण रक्कम देईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज तक्रारदारास द्यावे.
धुळे
दिनांक – 03-02-2012.
(सी.एम.येशीराव) (डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.