तक्रारदारातर्फे : स्वतः
सामनेवालेतर्फे : वकील श्री. विलास एन. माळी
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. तक्रारदारांनी डफ्फोडिल क्लब या क्लबचे सदस्यत्व वर्ष 2000 मध्ये स्विकारले व त्यानंतर सदस्यत्व फी रुपये 1,35,000/- क्लबकडे जमा केली. त्यानंतर शैला क्लब अँण्ड रिझॉर्टस् प्रा. लि., सामनेवाले यांनी डफ्फोडिल क्लब त्यांच्या ताब्यात घेतला. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे वर्ष 2007 पासून सामनेवाले यांनी तक्रारदारांना सेवा पुरविणे बंद केले, याउलट सामनेवाले हे तक्रारदारांकडे जादा रकमेची मागणी करु लागले. त्यानंतर तक्रारदारांनी मूळची अनामत रक्कम रुपये 1,00,000/- परत मागितले जी सदस्यत्व करारनाम्याप्रमाणे 10 वर्षानंतर सामनेवाले यांना परत करावयाची होती. तक्रारदारांना सामनेवाले यांनी प्रतिसाद दिला नसल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे, व त्यामध्ये सदस्यत्व शूल्क, अनामत रक्कम सामनेवाले यांचेकडून वसूल होऊन मिळावे, तसेच नुकसानभरपाई वसूल व्हावी अशी दाद मागितली.
2. सामनेवाले क्रमांक 3 शैला क्लब अँण्ड रिझॉर्टस् प्रा. लि., यांनी आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये असे कथन केले आहे की, सामनेवाले क्रमांक 2 डफ्फोडिल क्लब यांचे कर्ज थकबाकी झाल्याने बँकेने तो क्लब ताब्यात घेतला व सामनेवाले क्रमांक 3 शैला क्लब अँण्ड रिझॉर्टस् प्रा. लि . यांनी डफ्फोडिल क्लब विकत घेतला. त्यानंतर सामनेवाले क्रमांक 3 यांनी क्लबच्या जागेमध्ये दुरुस्ती करण्याचे ठरविले व त्याकामी सदस्यांकडून जादा रकमेची मागणी केली. ज्या सदस्यांनी अनामत रक्कम परत मागितल्या त्यांना देण्यात आल्या, व तक्रारदारांची देखील अनामत रक्कम त्यांना परत देण्यात येर्इल असे फीर्यादीमध्ये कथन केले. याप्रकारे तक्रारदारांच्या सेवा सुविधा पुरविण्यात कसूर झाली या आरोपाला सामनेवाले यांनी नकार दिला.
3. दोन्ही बाजूंनी पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केला. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे व कागदपत्रे यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीच्या निकाल कामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सामनेवाले क्रमांक 3 यांनी तक्रारदार यांना अनामत रकमेच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली, ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय, सामनेवाले क्रमांक 3 |
2. | अंतीम आदेश ? | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
4. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत सदस्यत्व प्रमाणपत्राची प्रत दाखल केलेली आहे, त्यातील नोंदीवरुन असे दिसते की, ज्येष्ठ नागरिकांकरीता प्रवेश शूल्क रुपये 35,000/- व अनामत ठेव रुपये 1,00,000/- असे एकंदर रुपये 1,35,000/- होते. तक्रारदारांनी डफ्फोडिल क्लब म्हणजेच सामनेवाले क्रमांक 2 यांच्याकडे रुपये 1,35,000/- जमा केल्याचे कथन केलेले आहे. सदस्यत्वाच्या वरील तक्त्यातील नोंदींवरुन असे दिसून येते की, तक्रारदारांना सदस्यत्वाबद्दलची अनामत ठेव रुपये 1,00,000/- दहा वर्षांनी परत मिळणार होते. तक्रारदार यांनी सामनेवाले क्रमांक 2, डफ्फोडिल क्लब यांचेकडे रक्कम वर्ष 2000 मध्ये जमा केल्यामुळे अनामत रक्कम शूल्क रुपये 1,00,000/- तक्रारदार सामनेवाले यांचेकडून वर्ष 2010 मध्ये परत वसूल करण्यास पात्र होते.
5. सामनेवाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये, तसेच लेखी युक्तीवादामध्ये तक्रारदाराची अनामत रक्कम रुपये 1,00,000/- सामनेवाले परत करण्यास तयार आहेत असे कथन केल्याने त्याबद्दल वाद शिल्लक रहात नाही. तक्रारदार प्रवेश शूल्क रुपये 35,000/- हे परत वसूल करण्यास पात्र नाहीत. कारण सदस्यत्व करारनाम्यात तसा उल्लेख नाही. सामनेवाले यांनी जरी आपल्या कैफीयतीमध्ये तक्रारदारांना सदस्यत्व अनामत रक्कम रुपये 1,00,000/- परत करण्याची तयारी आहे असे कथन केलेले असले तरी देखील सामनेवाले यांनी रुपये 1,00,000/- तक्रारदारांना परत केलेले नाहीत. अथवा ते मंचाकडे जमा केलेले नाहीत. यावरुन अनामत ठेव परत करण्याच्या संदर्भात सामनेवाले क्रमांक 3 यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली असा निष्कर्ष काढावा लागतो.
5. तक्रारदारांचे सदस्यत्व शूल्क सामनेवाले क्रमांक 2 डफ्फोडिल क्लब यांचेकडे जुलै 2000 मध्ये जमा केले होते, व त्यातील शेवटचा हप्ता दिनांक 10/1/2001 रुपये 20,000/- धनादेशाद्वारे दिलेला आहे. म्हणजेच दहा वर्षाची मुदत दिनांक 10/1/2011 रोजी पूर्ण झाली. सबब तक्रारदार दिनांक 11/1/2011 पासून अनामत ठेव रक्कम रुपये 1,00,000/- यावर 9 टक्के व्याज मिळणेस पात्र आहेत, असे मंचाचे मत आहे.
6. सामनेवाले क्रमांक 1 हे अस्तित्वात नाहीत व त्यांना समन्स बजावण्यात आलेला नाही. सामनेवाले क्रमांक 2 डफ्फोडिल क्लब हे सामनेवाले क्रमांक 3, शैला क्लब अँण्ड रिझॉर्टस् मध्ये विलीन झालेला आहे सबब सामनेवाले क्रमांक 2 देखील अस्तित्वात नाही. सबब तक्रार सामनेवाले क्रमांक 1 व 2 च्या विरुध्द रद्द करण्यात येते तर सामनेवाले क्रमांक 3 च्या विरुध्द पुढीलप्रमाणे मंजूर करण्यात येते.
7. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 761/2009 सामनेवाले क्रमांक 3, शैला क्लब अँण्ड रिझॉर्टस् यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांच्या विरुध्द सदर तक्रार रद्द करण्यात येते.
3. सामनेवाले क्रमांक 3, शैला क्लब अँण्ड रिझॉर्टस् यांनी तक्रारदारांना अनामत रकमेच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली, असे जाहिर करण्यात येते.
4. सामनेवाले क्रमांक 3, शैला क्लब अँण्ड रिझॉर्टस् यांनी तक्रारदारांना अनामत रक्कम रुपये 1,00,000/- त्यावर 9 टक्के व्याज दिनांक 11/1/2011 पासून याप्रमाणे अदा करावी असा आदेश सामनेवाले क्रमांक 3 यांना आदेश देण्यात येतो.
5. खर्चाबद्दल आदेश नाही.
6. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 27/08/2013
( एस. आर. सानप ) ( ज. ल. देशपांडे )
सदस्य अध्यक्ष
एम.एम.टी./-