(आदेश पारीत व्दारा - श्री शेखर पी. मुळे, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 16 फेब्रुवारी 2017)
1. सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये ही तक्रार कार उत्पादक कंपनी आणि स्थानिक विक्रेता यांचेविरुध्द व्हॅनमध्ये उत्पन्न झालेल्या निर्मीती दोष दुरुस्त न करुन दिल्यामुळे किंवा त्याऐवजी नवीन व्हॅन बदलवून बदलवून न दिल्यामुळे दाखल केली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे.
2. विरुध्दपक्ष क्र.1 ही सेवा ऑटामोटीव्ह नावाची स्थानिय मारुती वाहन विकणारी कंपनी असून, विरुध्दपक्ष क्र.2 ही मारुती उद्योग लिमिटेड नावाची मारुती वाहन निर्मीती करणारी कंपनी आहे. तक्रारकर्त्याने दिनांक 19.5.2006 ला विरुध्दपक्ष क्र.2 कडून निर्मीती चारचाकी व्हॅन विरुध्दपक्ष क्र.1 कडून खरेदी केली होती, तिचा नोंदणी क्रमांक MH 40/ A – 3417 असा आहे. त्या वाहनाला कधीही अपघात झाला नव्हता, परंतु त्याचे टायर एका बाजुने खराब होऊ लागले. जेंव्हा, तक्रारकर्त्याने व्हॅन पहिल्या मोफत सर्विसींगसाठी दिनांक 16.7.2006 ला विरुध्दपक्ष क्र.1 कडे आणले त्यावेळी त्याने टायरच्या खराबीची तक्रार केली होती. त्यावेळी त्यास व्हील अलॉयमेंट करण्याचा सल्ला देण्यात आला, परंतु व्हील अलॉयमेंट केल्यानंतरही टायरमधील खराबी दूर झाली नाही. दिनांक 27.2.2007 ला जेंव्हा वाहन विरुध्दपक्ष क्र.1 कडे नेण्यात आले त्यावेळी जॉबकार्ड मध्ये असे नमूद केले की, व्हॅनच्या चेसीसला डाव्या बाजुने भेग पडली होती. ज्याअर्थी व्हॅनला अपघात झाला नव्हता त्यावेळी तो निर्मीती दोष होता. तक्रारकर्त्याला विमा दावा करण्याचा सल्ला देण्यात आला, परंतु खराब झालेला भाग बदलवून किंवा नवीन व्हॅन बदलवून देण्याची विनंती मंजूर केली नाही. परंतु, तक्रारकर्ता विमा दावा करण्यास तयार झाला नाही, कारण तो एक निर्मीती दोष होता, म्हणून विरुध्दपक्षाला कायदेशिर नोटीस बजविण्यात आली व त्याव्दारे एकतर खराब झालेले चेसीस बदलवून द्यावे किंवा नवीन व्हॅन बदलवून द्यावी अशी मागणी करण्यात आली. त्यावर विरुध्दपक्षाने व्हॅनमध्ये निर्मीती दोष नाही असे खोटे उत्तर दिले. पुढे असे नमूद केले की, गॅस सिलेंडरच्या वजनामुळे चेसीसला भेग पडली असल्याची शक्यता आहे. वास्तविकपणे विरुध्दपक्ष क्र.2 आणि आर.टी.ओ. ने व्हॅनमध्ये LPG कीट बसविण्याची परवानगी दिली होती. विरुध्दपक्ष क्र.1 आता तक्रारकर्त्याकडून व्हॅनची दुरुस्ती करण्याऐवजी किंवा व्हॅन बदलवून देण्याऐवजी रुपये 150/- प्रती दिवसाप्रमाणे पार्कींग चार्जेस मागत आहे, विरुध्दपक्षाच्या सेवेती ही ञुटी आहे. म्हणून या तक्रारीव्दारा तक्रारकर्त्याने अशी विनंती केली आहे की, खराब झालेले चेसीस बदलवून द्यावे किंवा त्याऐवजी नवीन वाहन बदलवून त्याला देण्यात यावे. तसेच, दिनांक 28.3.2007 ते 19.6.2007 या काळाचे प्रती दिवस रुपये 1000/- प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, त्याशिवाय झालेलया ञासाबद्दल रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- मागितला आहे.
3. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्षाला मंचाची नोटीस बजावण्यात आली, त्यानुसार विरुध्दपक्ष क्र.1 मंचात उपस्थित झाले. विरुध्दपक्ष क्र.1 ने आपला लेखी जबाब निशाणी क्र.12 खाली दाखल केला व हे कबूल केले आहे की, तक्रारकर्त्याने त्यांचेकडून सदर व्हॅन विकत घेतले होते. परंतु, हे नाकबूल केले आहे की, पहिल्यांदा वाहन त्यांचेकडे आणल्यावर तक्रारकर्त्याने टायरमध्ये उत्पन्न झालेल्या खराबीची तक्रार केली होती आणि त्यावर त्याला व्हील अलॉयमेंट करण्यास सांगितले होते. तसेच, व्हील अलॉयमेंट करण्यात आले हे सुध्दा नाकबूल केले. दिनांक 16.7.2006 ला व्हील अलॉयमेंट आणि टायर रोटेशन करण्यात आले. व्हॅन काही किलोमीटर चालल्यानंतर पहिली फ्री सर्विसींगसाठी आणण्यात आले होते त्यावेळी काही शुल्लक दुरुस्तीसाठी व्हॅन आणण्यात आली. त्यासाठी Wheel Alignment and Balancing करण्यास तक्रारकर्त्यास सांगण्यात आले होते, परंतु तक्रारकर्त्याने तो सल्ला नाकारला होता. नंतर दिनांक 27.2.2007 ला व्हॅन चेसीसला भेग असल्याचे आढळून आले, परंतु तो निर्मीती दोष नव्हता. विरुध्दपक्ष क्र.1 ने हे सुध्दा नाकबूल केले आहे की, त्याने तक्रारकर्त्याला विमा दावा करण्यास सांगितले व तोपर्यंत दुरुस्ती करण्यास नकार दिला. तक्रारकर्त्याने त्याच्या व्हॅनमध्ये LPG कीट बसविली होती आणि सिलेंडरच्या जास्तीच्या वजनामुळे चेसीसला भेग पडली. LPG की विरुध्दपक्षाने बसविली नव्हती तर ती बाहेरुन बसविण्यात आली होती. व्हॅनची वॉरंटी 40,000 कि.मी. पर्यंत होती, परंतु ते वाहन 43,623 कि.मी. चालल्यानंतर म्हणजे वॉरंटी पिरेडनंतर विरुध्दपक्ष क्र.1 कडे आणण्यात आली होती. तक्रारकर्त्याला वाहन पार्कींग शुल्क देणे लागते. अशाप्रकारे तक्रारीतील मजकूर नामंजूर करुन ती खारीज करण्याची विनंती केली.
4. विरुध्दपक्ष क्र.2 ने आपला लेखी जबाब निशाणी क्र.14 खाली दाखल केला आणि काही प्राथमिक आक्षेप घेतले. त्यात असे नमूद केले की, तक्रारकर्ता हा त्याचा ग्राहक नसून त्याने ते वाहन व्यावसायीक वापरासाठी घेतले होते आणि म्हणून ग्राहक तक्रार चालण्या योग्य नाही. विरुध्दपक्ष क्र.2 च्या सेवेत कुठलिही कमतरता नाही किंवा त्याने कुठलिही अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब केला नाही. ती व्हॅन वॉरंटी मध्ये काही अटी व शर्तीनुसार होती, ज्यानुसार वॉरंटीची मुदत व्हॅन विकत घेतल्यापासून 24 महिने किंवा 40,000 कि.मी. यापैकी जे अगोदर घडेल अशी होती. त्यामुळे आता त्या व्हॅनची दुरुस्ती किंवा ती बदलवून देण्याचा प्रश्न येत नाही, कारण ती व्हॅन वॉरंटी पिरेडच्या बाहेर आहे. व्हॅनच्या चेसीसला भेग पडल्याचे दिनांक 27.2.2007 ला आढळून आले. ज्यावेळी ती 43,623 कि.मी. चालली होती. तो दोष निर्मीती दोष नव्हता तसेच त्याशिवाय वॉरंटी पिरेडच्या बाहेर होती त्यानुसार तक्रारकर्त्याला सुचीत करण्यात आले होते. तक्रारकर्ताने स्वतः व्हॅनची नीट काळजी घेण्यामध्ये निष्काळजीपणा दाखविला होता आणि ठरल्याप्रमाणे वेळोवेळी सर्विसींगसाठी व्हॅन आणली नाही. अशाप्रकारे, विरुध्दपक्ष क्र.2 ने त्याची जबाबदारी असल्याचे नाकबूल करुन व्हॅनमध्ये निर्मीती दोष असल्याचे नाकबूल केले आणि तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
5. दोन्ही पक्षाच्या वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला व अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजांचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
// निष्कर्ष //
6. ही तक्रार वाहनाच्या निर्मीती दोषाकरीता असल्यामुळे आणि विरुध्दपक्ष क्र.2 ने ही बाब नाकारल्यामुळे, याविषयी तज्ञांचा अहवाल मंचासमोर आणणे जरुरी होते. आमच्या समोर असे सांगण्यात आले की, तक्रारकर्त्याने तज्ञांचा अहवाल मिळण्यासासाठी अर्ज केला होता आणि मंचाने तो मंजूर सुध्दा केला होता. ज्यानुसार त्याला तज्ञा तर्फे तपासणी शुल्क रुपये 1500/- जमा करण्यास सांगण्यात आले होते, परंतु, तक्रारकर्त्याने ते शुल्क भरले नाही. व्हॅनची तज्ञांकडून तपासणी करण्यासाठी ‘’ ‘‘विश्वश्र्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगीक संस्थान’’ यांचेकडे कमिश्नर म्हणून देण्यात आले होते, ज्यासाठी रुपये 25,000/- शुल्क भरण्यास सांगण्यात आले. तक्रारकर्त्याच्या वकीलांनी युक्तीवादात असे सांगितले की, तक्रारकर्त्याला एवढी रक्कम भरणा करणे शक्य नव्हती आणि ग्राहक तक्रार कायद्याच्या कलम 13 (1)( c) नुसार मंचाने तज्ञाचा अहवाल प्राप्त करणे जरुरी असतो, परंतु मंचाने या तरतुदीचा वापर केला नाही व त्यामुळे तज्ञांचा अहवाल मिळवीता येऊ शकला नाही. या युक्तीवादाशी आम्हीं सहमत नाही, कारण वर उल्लेखीत सेक्शनमध्ये असे लिहिले आहे की, मंच तक्रारकर्त्याला तज्ञाचा अहवाल मिळविण्यासाठी आवश्यक असलेला शुल्क भरण्यास सांगू शकतो. त्यामुळे तक्रारकर्त्याचे वकीलांचा हा युक्तीवाद योग्य नाही की, तज्ञांचा अहवाल मंचाने तक्रारकर्त्याकडून कुठलेही शुल्क न आकारता प्राप्त करावे. याशिवाय, तक्रारकर्त्याला रुपये 25,000/- शुल्क भरणे त्याच्या क्षमते बाहेर नव्हते.
7. तक्रारीप्रमाणे त्याच्या व्हॅनमध्ये दोन दोष होते. 1) त्याच्या व्हॅनचे टायरर्स एका बाजुन खराब झाले होते, 2) म्हणजे त्याच्या व्हॅनच्या चेसीसला भेग पडली होती. वरील दोष व्हॅन विकत घेतल्यापासून एका वर्षाचे आत उत्पन्न झाले होता. परंतु ही सुध्दा वस्तुस्थिती आहे की, 9 महिण्याच्या काळात ती व्हॅन 43,623 कि.मी. चालली होती. एवढ्या कमी अवधीमध्ये व्हॅन बरीच चालली हे निर्विवादपणे दिसून येते आणि म्हणून विरुध्दपक्ष क्र.2 तर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, तक्रारकर्ता त्या वाहनाचा उपयोग व्यावसायीक कारणासाठी करीत होता आणि म्हणून ग्राहक तक्रार चालण्या योग्य नाही. परंतु, केवळ गाडी थोड्या अवधीमध्ये बरेच किलोमीटर चालली आहे म्हणून ती व्यावसायीक कारणासाठी वापरली जात होती असे गृहीत धरणे चुकीचे होईल. जॉबकार्ड जर पाहिले असता असे दिसून येते की, चेसीस च्या डाव्या बाजुने भेग पडली होती, परंतु टायर्समध्ये दोष उत्पन्न झाला होता असे जॉबकार्ड मध्ये नमूद नाही. त्याच्या व्हॅनचे जे मोफत सर्विसींग झाले ते जॉबकार्ड तक्रारकर्त्याने दाखल केले नाही. जे एक जॉबकार्ड त्याने दाखल केले आहे ते दिनांक 27.2.2007 चे असून त्यावेळी व्हॅनची फ्री सर्विसींग पिरेड अगोदरच संपलेले होते. विरुध्दपक्षाने त्या व्हॅनचा दुसरा आणि तिसरा फ्री सर्विसींगचे जॉबकार्ड दाखल केले आहे. दुस-या फ्री सर्विसींगमध्ये टायरमध्ये काही खराबी झाल्याचे कुठेही नोंद नाही, तसेच व्हील बॅलेनसींग आणि टायर रोटेशन केल्याचे नमूद केले आहे. तिस-या फ्री सर्विसींगमध्ये सुध्दा टायरमध्ये खराबीचा कुठेही उल्लेख नाही. तक्रारकर्त्यास Wheel Alignment and Balancing करण्याचा सल्ला दिला होता, पण तक्रारकर्त्याने तो नाकारला असे जॉबकार्डवर लिहिले आहे. त्यानंतर, पेड सर्विसींगच्यावेळी सुध्दा जॉबकार्डमध्ये व्हॅनच्या टायरमध्ये खराबी असल्याचे नमूद केलेले नाही. तक्रारकर्त्याच्या वकीलांनी असे सांगितले की, टायरमध्ये उत्पन्न झालेली खराबी विषयी विरुध्दपक्षाला सांगितले होते, परंतु जॉबकार्डमध्ये लिहिण्यात आले नाही. परंतु, हे आम्हांला विश्वासार्ह वाटत नाही, कारण जर खरच टायरमध्ये खराबी झाली होती तर विरुध्दपक्ष क्र.1 ला ते जॉबकार्डमध्ये नमूद करण्याचे कुठलेही कारण नव्हते. सर्वसाधारण अनुभव असा आहे की, गाडी सर्विसींगसाठी टाकल्या जाते त्यावेळी त्यातील छोट्यातील छोटा दोष सुध्दा जॉबकार्डमध्ये लिहिल्या जातो. तक्रारकर्त्याने टायरमधील खराबी दाखविण्यासाठी त्याचे फोटोग्रॉफ सुध्दा दाखल केलेले नाही. त्यामुळे, टायरमध्ये खराबीचा दोष उत्पन्न झाला होता याचे सकृतदर्शनी पुरावा तक्रारकर्त्याने दाखल न केलयामुळे केवळ त्याचे तक्रारीवरुन व मौखीक युक्तीवादावरुन टायरर्समध्ये दोष होता, असे ग्राह्य धरता येत नाही.
8. ज्याअर्थी, व्हॅनचे चेसीसमध्ये भेग पडली होती ही बाब नाकारलेली नाही, त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो की, तो निर्मीती दोष होता की व्हॅनची योग्य ती निगा न ठेवल्यामुळे उत्पन्न झालेला दोष होता. विरुध्दपक्ष क्र.2 ने त्याचे कारण असे सांगितले की, LPG कीट सिलेंडर व्हॅनमध्ये असल्यामुळे त्याचे वजनाने भेग पडल्याची शक्यता आहे. विरुध्दपक्ष क्र.2 च्या वकीलांनी असा युक्तीवाद केला आहे की, व्हॅनमधील दोष निर्मीती दोष आहे हे सिध्द करण्याची जबाबदारी तक्रारकर्त्याची आहे, जी त्याने पारपाडलेली नाही. त्यासाठी वकीलांनी “Maruti Udyog Limited –Vs.- Hasmukh Lakshmichand and Anr. III (2009) CPJ 229 (NC)”, या न्यायनिवाड्याचा आधार घेतला. याप्रकरणात विरुध्दपक्षाचे इंजिनियरला गाडीमध्ये उत्पन्न होत असलेला दोष दूर करता आला नव्हता. विरुध्दपक्षाचे असे म्हणणे होते की, गाडीला स्पर्श केल्यावर जो धक्का लागतो तो स्ट्रॅटीक ईलेक्ट्रीकमुळे होतो, जी सर्वसाधारण बाब आहे. त्याशिवाय तक्रारकर्त्याला गाडीची तपासणी करण्यासाठी तज्ञांचे हवाली करण्यास सांगितले होते, परंतु तक्रारकर्त्याने गाडी तज्ञांचे हवाली केली नाही. त्यामुळे गाडीमध्ये निर्मीती दोष होता की नाही हे सिध्द करण्यास तक्रारकर्ता स्वतः अपयशी ठरला, असे राष्ट्रीय आयोगाने ठरविले आहे आणि तज्ञाचे अहवालाशिवाय गाडीतील दोष हा निर्मीती दोष होता की तिचा वापर केल्यामुळे उत्पन्न झालेला दोष होता हे ठरविता येत नाही. “Classic Automobiles –Vs.- Lila Nand Mishra and Anr, I (2010) CPJ 235 (NC)”, याप्रकरणात असे म्हटले आहे की, केवळ गाडी सर्वीस स्टेशनमध्ये दुरुस्तीसाठी वारंवार नेल्या जात होती म्हणून गाडीमध्ये निर्मीती दोष होता असे ठरविता येत नाही. “Sukhvinder Singh –Vs.- Classic Automobiles and Anr, 2012 (4) CPR 609 (NC)”, याप्रकरणात सुध्दा वरीलप्रमाणे मत मांडलेले आहे. आणखी एका प्रकरणात “Santosh Devi –Vs.- Hyundai South Regional Office and Ors., III(2012) CPJ 529 (NC)”, याप्रकरणात गाडीमध्ये काळा धूर निघत असल्याबद्दलची तक्रार होती. त्याशिवाय गाडीचा पिकअप चांगला नव्हता त्यात इतरही दोष होते. पण हे सर्व निर्मीती दोष आहे म्हणून राष्ट्रीय आयोगाने स्विकारले नाही, कारण त्यावेळी गाडी तीन वर्षापेक्षा जास्त आणि 60,000 कि.मी. पेक्षा जास्त चालली होती. जर, त्या गाडीमध्ये दोष होते तर इतके वर्ष आणि इतके किलोमीटर ती गाडी ब्रेकडाऊन न होता चालणे शक्य नव्हती.
9. गाडीच्या वॉरंटीनुसार वॉरंटी गाडीचा जर अयोग्य वापर केला असेल किंवा गाडीची योग्य ती काळजी घेतली नसेलतर गाडीस वॉरंटी लागू होत नाही. व्हॅनची वॉरंटी व्हॅनच्या पहिल्या विक्रेत्याला विकल्यापासून 24 महिणे किंवा 40,000 कि.मी. यापैकी जे अगोदर घडेल तेवढ्यापुरते मर्यादीत होते. हे वादातीत नाही की, व्हॅनला भेग असल्याचे जेंव्हा आढळले त्यावेळी व्हॅन विकत घेतल्यापासून 24 महिण्याची मुदत पूर्ण व्हायची होती, परंतु व्हॅन 40,000 कि.मी. पेक्षा जास्त चालली होती, त्यामुळे व्हॅनची वॉरंटीची मुदत त्यादिवशी संपलेली होती.
10. ही तक्रार सन 2008 मध्ये दाखल केली आहे आणि व्हॅनमध्ये चेसीसला भेट आढळली ती सन 2007 मध्ये दिसून आली. यामागील 10 वर्षामध्ये तक्रारकर्त्याला व्हॅनची तज्ञांकडून तपासणीकरुन घेण्यासाठी कुठलाही प्रयत्न केला नाही. जरी त्यांनी तज्ञ अहवाल मिळण्यासाठी अर्ज केला होता तरी तज्ञांचे तपासणी शुल्क त्याने भरले नाही, त्यामुळे तज्ञांचा अहवाल नसल्यामुळे त्या व्हॅनला वॉरंटी संपल्यानंतर आणि 40,000 कि.मी. पेक्षा जास्त चालल्यानंतर चेसीसमध्ये जी भेग पडली ती केवळ निर्मीती दोषामुळे झाली असे म्हणता येणार नाही. वरील कारणास्तव ही तक्रार मंजूर करणे शक्य नाही. सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
(2) खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाही.
(3) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 16/2/2017