श्री. मनोहर चिलबुले - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांकः 07/10/2014)
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण येणेप्रमाणे.
1. तक्रारकर्ता देवीदास कुमरे यांनी 16.01.2012 रोजी रु.3,51,500/- किंमत देऊन वि.प.क्र.1 सेवा ऑटोमोटिव्ह प्रा.लि. या वि.प.क्र. 2 मारुती सुझुकीच्या अधिकृत विक्रेत्याकडून मारुती EECO 7 STR ही कार विकत घेतली असून तिचा नोंदणी क्र. MH-31-DB-7464 आहे.
तक्रारकर्त्याने वरील वाहन दि.21.02.2012 रोजी वि.प.क्र. 1 कडे विनामुल्य सर्व्हिसिंग करिता दिले आणि तपासणी खर्च रु.182/- जमा केला. दि.06.04.2012 रोजी तक्रारकर्ता आपल्या वरील वाहनाने घराबाहेर पडला, परंतु वाहन सुरु झाले नाही म्हणून त्याने वि.प.क्र.1 शी संपर्क साधून मदतीला येण्याची व वाहन दुरुस्तीसाठी नेण्याची विनंती केली. त्याप्रमाणे वि.प.क्र. 1 ने घटनास्थळावरुन वाहन टोचन करुन त्यांच्या वर्कशॉपमध्ये नेले. त्यानंतर वि.प.क्र. 1 कडून तक्रारकर्त्यास कळविण्यांत आले कि, वरील वाहनातील ऑईल फिल्टर खराब झाल्याने संपूर्ण इंजीन ऑईल सांडले असावे. त्यासाठी वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्त्याकडून रु.1,985/- दुरुस्ती खर्च घेण्यांत आला.
दि.21.05.2012 रोजी तक्रारकर्ता वरील वाहनाने अमरावती रोड नागपूर येथून घरी जात असतांना वाहन रस्त्यावर बंद पडले आणि जाम झाले. त्यावेही वाहन 1,700 कि.मी. चाललेले होते. तक्रारकर्त्याने वि.प.क्र.1 शी संपर्क साधून घटनेची सुचना दिल्यावर त्यांच्याकडून आलेल्या यांत्रिकाने घटनास्थळावरुन वाहन टोचन करुन त्यांच्या वर्कशॉपमध्ये नेले. तपासणीअंती वि.प.क्र. 1 कडून तक्रारकर्त्यास कळविण्यांत आले कि, वरील वाहनातील रॉड बेअरिंग खराब झाल्यामुळे वाहन जाम झाले आहे व तक्रारकर्त्याला ते स्वखर्चाने दुरुस्त करावे लागेल. वाहन वारंटी पिरेडमध्ये असल्याने वि.प.क्र.1 ने त्यांच्या खर्चाने दुरुस्ती करुन देण्याची तक्रारकर्त्याने केलेली विनंती वि.प.ने मान्य केली नाही.
तक्रारकर्त्याने दि.24.05.2012 रोजी वि.प.क्र. 1 ला पत्र पाठवून कळविले की, त्याने खरेदी केलेले वाहन अजूनही वारंटी पिरेडमध्ये असल्याने सदर वाहनाची विनामुल्य दुरुस्ती करुन द्यावी. वि.प.ने ईमेलव्दारे सदर पत्रास उत्र देवून कळविले कि, दि.21.05.2012 पर्यंत वाहन 1,784 कि.मि. चालले आहे. तसेच दि.06.04.2012 रोजी ऑईल व ऑईल फिल्टर बदलल्यानंतर 505 कि.मि. चालले आहे. सदर वाहनातील संपूर्ण इंजिन ऑईल गळून गेल्यामुळे कनेक्टिंग रॉड बिअरिंग आणि बिअरिंग कोरडे झाल्यावरही वाहन चालल्यामुळे सिझ झाले. सदरचा दोष मॅन्युफॅक्चरिंग दोष नसल्यामुळे त्याची दुरुस्ती पैसे देवूनच करावी लागेल. दि.06.4.2012 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांनी वाहनातील इंजिन ऑईल आणि फिल्टर बदलविले तेंव्हाच वाहनाची पूर्ण तपासणी व दुरुस्ती करुन देणे आवश्यक होते. परंतु वि.प.क्र.1 ने वाहनाची पुर्ण तपासणी न करता व पूर्ण दुरुस्ती न करता सदोष वाहनाचा तक्रारकर्त्यास ताबा दिला त्यामुळे तक्रारकर्त्यास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. म्हणून वि.प.क्र. 1 व 2 हे सदर वाहनातील दोष वारंटी पिरेडमध्ये विनामुल्य काढून देण्यास अथवा सदोष वाहन बदलून बदलून दुसरे वाहन देण्यास बाध्य आहेत. परंतु वि.प.ने वाहनातील दोष विनामुल्य काढून देण्यास किंवा वाहन बदलून देण्यास नकार देवून सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे. म्हणून तक्रारकर्त्याने वि.प.क्र.1 व 2 विरुध्द खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
1. वि.प.ने तक्रारकर्त्याच्या वाहनातील दोष विनामुल्य काढून द्यावेत.
2. शारिरिक व मानसिक त्रासाबद्दल रु.1,00,000/- व नुकसान भरपाई देण्याचा वि.प. विरुध्द आदेश व्हावा.
3. तक्रारीचा खर्च रु.10,000/- देण्याचा वि.प.विरुध्द आदेश व्हावा.
तक्रारीतील कथनाचे पुष्टयर्थ तक्रारकर्त्याने यादीसोबत खालील दस्तऐवज दाखल केले आहेत.
1) बुकींग रसिद
2) वाहनाचे संपूर्ण पैसे दिल्याची रसिद.
3) वि.प.क्र. 1 ने दिलेले टॅक्स इनव्हाईस.
4) वि.प.क्र. 1 ने दिलेले डिलिव्हरी चालान.
5) आर.टी.ओ.कार्यालयाने दिलेले वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र.
6) वाहनाच्या प्रथम सर्विसिंगची पावती.
7) वि.प.क्र.1 ने वाहन दुरुस्त केल्याची पावती.
8) तक्रारकर्त्याचे वाहन दुरुस्त करुन देण्याबाबतचे पत्र.
9) वि.प.ला दिलेला ई-मेल.
10) वि.प.क्र. 1 व 2 ला वकिलांमार्फत पाठविलेला नोटीस.
11) वि.प.क्र. 1 व 2 ला वकिलांमार्फत पाठविलेला नोटीस
12) उपरोक्त नोटीस मिळाल्याची प्राप्ती रसिद.
2. वि.प.क्र. 1 व 2 ला तक्रारीची नोटीस प्राप्त झाल्यावर ते मंचासमक्ष हजर झाले आणि लेखी बयान दाखल करुन तक्रारीस सक्त विरोध केला. तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 कडून तक्रारीत नमुद केलेली कार खरेदी केल्याचे वि.प. नी कबूल केले आहे. परंत सदर कार ही सदोष आहे किंवा तिच्यात कोणताही निर्मितीदोष असल्याचे नाकबूल केले आहे.
वि.प.क्र. 1 ने आपल्या लेखीजबाबात नमुद केले आहे कि, दि.06.04.2012 रोजी तक्रारकर्त्याचे वाहन टो करुन वि.प.क्र. 1 च्या वर्कशॉपमध्ये आणले, तेंव्हा कुठल्यातरी अपघातामध्ये बाहेरुन मार लागल्याने ते क्षतीग्रस्त झाले होते दुरुस्तीची गरज होती. अपघात कसा घडला व त्यामुळे काय नुकसान झाले हे तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 ला न सांगता लपवून ठेवले. अपघातानंतर गाडी किती किलामिटर चालली हेदेखिल तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 ला सांगितले नाही. तपासणी नंतर वि.प.क्र. 1 यांनी तक्रारकर्त्यास सांगितले कि, गाडीला मोठया प्रमाणांत दुरुस्तीची आवश्यक्ता आहे. परंतु तक्रारकर्त्याने सांगितले कि, फक्त इंजिन ऑईल आणि फिल्टर बदलून द्या. त्याप्रमाणे दुरुस्ती करण्यांत आल्यावर तक्रारकर्ता संतुष्ट झाल्यावर वाहन परत घेवून गेले. दुरुस्तीमध्ये बदललेल्या ऑईल फिल्टरचे फोटो दुरुस्तीचे वेळी काढून ठेवले असून ते लेखी जबाबासोबत दाखल केले आहेत, कारण ग्राहकाला नादुरुस्त भागाचा विमा मागावयाचा असेल तर त्यासाठी असे फोटो आवश्यक असतात.
दि.21.05.2012 रोजी रविनगर, अमरावती रोड, नागपूर येथून तक्रारकर्त्याचे वाहन टो करुन वि.प.क्र. 1 ने आपल्या वर्कशॉपमध्ये आणले. दि.06.04.2012 रोजी सदर वाहन वि.प.क्र.1 च्या वर्कशॉपमध्ये आणले, तेंव्हा वि.प.क्र. 1 चा सल्ला न ऐकता व सर्व दुरुस्ती न करता फक्त किरकोळ दुरुस्ती केल्यामुळे तक्रारकर्त्याच्या गाडीचे रॉड बिअरिंग खराब झाले होते व त्यामुळे दुरुस्तीला जास्तीचा खर्च लागणार होता. वाहन वारंटी पिरेडमध्ये असल्यामुळे विनामुल्य दुरुस्ती करुन देण्याची विनंती तक्रारकर्त्याने केली होती, परंतु वाहनाच्या बिघडलेल्या भागात निर्मिती दोष असला तरच असा भाग वारंटी पिरेडमध्ये विनामुल्य बदलून दुरुस्ती करुन दिली जाते. तक्रारकर्त्याच्या वाहनात झालेला बिघाड हा कोणत्याही निर्मिती दोषामुळे झाला नव्हता तर अपघातामुळे झाला असल्याने वारंटीमध्ये क्षतिग्रस्त भाग बदलवून देणे अशक्य आहे. दि.21.05.2012 रोजी वाहन दुरुस्तीसाठी वर्कशॉपमध्ये आणले त्यावेळी काढण्यांत आलेले फोटो लेखी जबाबासोबत दाखल केले आहेत.
तक्रारकर्त्याने 25.05.2012 रोजी पाठविलेल्या पत्रास ईमेलव्दारे समर्पक उत्तर दिलेले आहे. वि.प.क्र. 1 ने दि.06.04.2012 रोजी वाहनाची पूर्ण तपासणी केली होती व आवश्यक असलेल्या दुरुस्तीची तक्रारकर्त्यास पूर्ण माहिती दिली होती, परंतु तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे किरकोळ दुरुस्ती करुन वाहन त्यांच्या सुपूर्द केले होते. तक्रारकर्त्याच्या दि.30.06.2012 च्या नोटीसला वि.प.क्र. 1 ने उत्तर पाठविले आहे. वि.प.ने सेवेत कोणताही त्रुटीपूर्ण व्यवहार अगर अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला नसल्याने तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
3. वि.प.क्र. 2 यांनी आपल्या लेखी जबाबात म्हटले आहे कि, तक्रारकर्त्याच्या वाहनातील दोष हा निर्मिती दोष नसून वाहन निष्काळजीपणामुळे हाताळल्यामुळे वाहन क्षतिग्रस्त झाल्यामुळे निर्माण झालेला दोष वारंटीच्या क्लॉज 4(d) & (e) प्रमाणे विनामुल्य दुरुस्तीस पात्र नाही. सदर प्रकरणांचा वि.प.विरुध्द दबाब आणून तक्रारकर्ता वारंटीमध्ये विनामुल्य उपलब्ध नसलेली दुरुस्ती विनामुल्य करुन घेण्याचा प्रयत्न करीत आहे. तक्रारकर्त्याने दि.06.04.2012 रोजी वारंटी अटी व शर्तीचा भंग केल्यामुळे वारंटी संपुष्टात आली आहे. वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्त्यास वारंटीच्या अटी व शर्तीबाहेरील दुरुस्ती विनामुल्य करुन देण्याचा कधीही करार केलेला नाही. वि.प.क्र. 2 ने वि.प.क्र. 1 यांना वाहन प्रिंन्सिपाल टु प्रिंसिपाल या तत्वावर विकले असल्याने व तक्रारकर्त्याने सदरचे वाहन वि.प.क्र. 1 कडून खरेदी केले असल्याने तक्रारकर्ता व वि.प.क्र. 2 यांच्यात ग्राहक व विक्रेता किंवा सेवादाता असा संबंध नसल्याने वि.प.क्र. 2 विरुध्द सदरची तक्रार चालू शकत नाही. वि.प.क्र. 2 ने वि.प.क्र. 1 मार्फत दिलेली निर्मिती दोषांबाबतची वारंटी ही वारंटीमध्ये नमुद अटी व शर्तीच्या अधीन असून विक्रीच्या कराराचा अविभाज्य भाग आहे. दि.21.01.2012 रोजी विनामुल्य सर्व्हिसिंग केली तेंव्हा तक्रारकर्त्याने वाहनात कोणताही दोष असल्याची तक्रार केली नव्हती किंवा सर्व्हिस इंजिनिअरला देखिल कोणताही निर्मिती दोष आढळून आला नव्हता आणि कोणत्याही तक्रारीशिवाय तक्रारकर्त्याने वाहन ताब्यात घेतले होते. जॉब स्लिप आणि जॉबकार्ड वि.प.ने दाखल केले आहे.
दि.06.04.2012 रोजी क्षतीग्रस्त वाहन 1279 कि.मी. चालले असतांना वि.प.क्र. 1 च्या वर्कशॉपमध्ये आणले असता वाहनाच्या खालच्या भागाला ऑईल सम्पवर अपघातामध्ये बाहेरुन मार लागून ते क्षतिग्रस्त झाल्याने इंजिन ऑईल फिल्टर क्षतीग्रस्त होवून संपूर्ण ऑईल वाहून गेल्याने इंजीन बंद झाल्याचे आढळून आले. वाहनास पोहचलेली सदर क्षती ही तक्रारकर्त्याच्या निष्काळजीपणामुळे वाहनाच्या अयोग्य वापरामुळे झाली असल्याने वारंटीच्या क्लॉज 4(e) वारंटीत समाविष्ट नाही. वाहनास अपघातात झालेल्या क्षतीबाबत निर्माण झालेल्या समस्येची पूर्ण जाणीव तक्रारकर्त्यास दिल्यावरही त्याने केवळ ऑईल फिल्टर बदलण्यास आणि ऑईल भरण्यास मान्यता दिली. तक्रारकर्त्याने इंजिनची पूर्ण तपासणी करुन किती क्षती पोचली आहे याची तपासणी करु दिली नाही, यामुळेच वाहनात दि.21.05.2012 रोजी वाहन 1784 कि.मि. चालले असतांना सिझ होवून समस्या निर्माण झाली. तज्ञ इंजिनिअरने वाहनाची संपूर्ण तपासणी केली असता ऑईल पूर्णतः गळून गेल्यामुळे कनेक्टींग रॉड बिगरिंग मध्ये बिघाड निर्माण झाल्याचे निष्पन्न झाले, यासाठी तक्रारकर्त्याचा निष्काळजीपणा पूर्णतः कारणीभूत आहे. बाहेरील कारणामुळे वाहनात बिघाड निर्माण झाल्यामुळे वारंटीच्या क्लॉज 4(e) प्रमाणे वारंटीत येत नाही. सदर क्लॉज खालील प्रमाणे आहे.
4(e) “the warranty shall not apply to any defects caused by misuse negligence, abnormal use or insufficient care.”
वाहनातील बिघाड पेड बेसिसवर दुरुस्तीसाठी सम्मती देण्यांस तक्रारकर्त्यास सांगण्यांत आले, परंतु त्याने त्यास नकार दिला आणि दुरुस्ती विनामुल्य करुन देण्याचा आग्रह धरला. तक्रारकर्त्यास वरीलप्रमाणे वाहन दुरुस्तीस मान्यता द्यावी किंवा वर्कशॉपमधून वाहन घेवून जावे, म्हणून वारंवार विनंती केली, परंतु त्याने त्यास नकार दिला. तक्रारकर्त्याचे वाहन वर्कशॉपमध्ये पडून असल्याने खराब होण्याची शक्यता आहे, म्हणून तक्रारकर्त्याने ते घेवून जावे किंवा पैसे देवून दुरुस्तीस परवानगी द्यावी असे निर्देश देण्याची विनंती केली आहे. वि.प.क्र. 2 कडून निर्मिती प्रत्येक वाहन विक्रीसाठी पाठविण्यापूर्वी संपूर्ण तपासणी करुन त्यांत कोणताही दोष नसल्याची खात्री करुन घेतली जाते व त्यानंतरच विक्री केले जाते. तक्रारकर्त्यास वि.प.क्र. 1 ने विकलेले वाहन देखिल संपूर्ण निर्दोष होते. त्यामुळे सदर वाहनात निर्मिती दोष असल्याचे आणि वि.प.क्र. 2 ने त्यांस सदोष सेवा दिल्याचे नाकबूल केले आहे. वाहनातील दोष हा तक्रारकर्त्याच्या निष्काळजीमुळे निर्माण झालेला असल्याने तो वारंटीमध्ये विनामुल्य दुरुस्त करुन देण्याची मागणी नाकारली असल्याचे म्हटले आहे. वि.प.क्र. 2 विरुध्द तक्रारीस कोणतेही कारण घडले नसल्याने त्यांचेविरुध्द तक्रारचालविण्याची मंचाला अधिकार कक्षा नसल्याचे म्हटले आहे. लेखीजबाबासोबत वि.प.क्र. 2 ने खालीलप्रमाणे दस्तावेज दाखल केले आहेत.
1) डिलरशिप एग्रीमेंट.
2) जॉब ऑर्डर कार्ड्स (क्र.5) बिलासोबत.
4. तक्रारकर्ता व वि.प. यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्यांत आले त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा खालीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्त्यांने विकत घेतलेल्या वाहनात तक्रारीत नमुद दोष
असल्याचे तक्रारकर्त्यांने सिध्द केले आहे काय ? नाही. 2) वि.प. नी तक्रारकर्तास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय? नाही.
3) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय? नाही.
4) आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
5. मुद्दा क्र. 1 व 2 बाबत - सदरच्या प्रकरणांत तक्रारीत नमुद वाहन तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 कडून विकत घेतले याबाबत वाद नाही. याबाबत तक्रारकर्त्याने दस्तऐवज यादीसोबत वाहन खरेदी बिल दाखल केले आहे व ते वि.प.ने नाकारलेले नाही.
तक्रारकर्त्याच्या अधिवक्त्यांचा युक्तीवाद असा की, दि.06.04.2012 रोजी तक्रारकर्ता आपल्या वरील वाहनाने घराबाहेर पडला, परंतु वाहन सुरु झाले नाही म्हणून त्याने वि.प.क्र.1 शी संपर्क साधून मदतीला येण्याची व वाहन दुरुस्तीसाठी नेण्याची विनंती केली. त्याप्रमाणे वि.प.क्र. 1 ने घटनास्थळावरुन वाहन टोचन करुन त्यांच्या वर्कशॉपमध्ये नेले ऑईल फिल्टर व ऑईल बदलवून वाहन तक्रारकर्त्यास परत केले. दि.21.05.2012 रोजी पुन्हा सदर वाहन रस्त्यावर बंद पडले आणि जाम झाले. ते घटनेची सुचना दिल्यावर वि.प.च्या यांत्रिकाने घटनास्थळावरुन वाहन टोचन करुन वर्कशॉपमध्ये नेले. तपासणीअंती वरील वाहनातील रॉड बेअरिंग खराब झाल्यामुळे वाहन जाम झाले आहे व तक्रारकर्त्याला ते स्वखर्चाने दुरुस्त करावे लागेल असे वि.प.क्र.1 ने सांगितले. तक्रारकर्त्याच्या वाहनातील दोष वाहन वारंटी पिरेडमध्ये निर्माण झाला असल्याने वि.प.क्र.1 ने त्यांच्या खर्चाने दुरुस्ती करुन देणे आवश्यक होते. परंतू वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्त्याची विनंती मान्य केली नाही ही वि.प.क्र. 1 व 2 यांनी ग्राहकाप्रती आचरलेली सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे व म्हणून तक्रारकर्ता वाहनातील बिघाड विनामुल्य दुरुस्त करुन मिळण्यास पात्र आहे.
त्यांचा पुढे युक्तीवाद असा की, दि.06.04.2012 रोजी वाहन वि.प.क्र. 1 कडे दुरुस्तीसाठी नेले, तेंव्हाच त्यांनी वाहनाची पूर्ण तपासणी करुन आवश्यक दुरुस्ती करणे जरुरी होते. परंतू त्यांनी वाहन पूर्णपणे दुरुस्त केले नाही म्हणून ते पुन्हा 21.05.2012 रोजी सीझ झाले आणि तक्रारकर्त्यास आर्थिक, शारिरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे तक्रारकर्ता मागणीप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. आपल्या युक्तीवादाच्या पुष्टयर्थ तक्रारकर्त्याचे अधिवक्त्याने खालील न्याय निर्णयाचा दाखला दिला आहे.
1) IV 2012 CPJ 87, Rajashtan State Commission, Jaipur
TEREX VECTRA PVT. LTD. VS. MEHARCHAND
सदरच्या प्रकरणात मा. राज्य आयोगाने असा अभिप्राय व्यक्त केला आहे की, जॉब कार्डमधील नोंदीप्रमाणे वाहनामध्ये गंभीर स्वरुपाचा दोष अस्तीत्वात होता आणि वाहन खरेदी केल्यापासून 7 महिन्याचे कालावधीत तीनवेळा वाहनाचे सुटे भाग बदलावे लागले होते. सदर वाहन योग्यरीत्या हाताळले नाही असा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्यामुळे वाहनात निर्मिती दोष ( inherent mechanical defect) असल्याचे सिध्द झाले आहे.
2) I 2014 CPJ 132 (NC)
TATA MOTORS VS. RAJESH TYAGI & ANR.
सदरच्या प्रकरणात वि.प.ने वाहनाच्या आतील भागात पाणी जमा होत असल्याची बाब मान्य केली होती. निर्माता कंपनी व विक्रेता यांनी विकलेले वाहन निर्दोष असल्याबाबत हमी दिली असल्याने ते वाहन दुरुस्त करुन त्यातील दोष दूर करण्याची जबाबदारी विक्रेता व निर्माता कंपनीची आहे. त्यामुळे निर्माता आणि विक्रेता यांनी सदर दोष दूर करुन वाहन निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र तक्रारकर्त्यास द्यावे असा आदेश मा. राष्ट्रीय आयोगाने दिलेला आहे.
3) IV 2003 CPJ 612 (NC)
Malwa Automobiles PVT. LTD, Tata Motors Vs. Sunanda Sangwan & anr.
सदर प्रकरणात मा. राष्ट्रीय आयोगाने असा अभिप्राय व्यक्त केला आहे की, उपलब्ध पुराव्यावरुन वाहन सदोष असल्याचे दिसून येते. जरी सदर दोष हा तांत्रिकदृष्टया निर्मिती दोष आहे किंवा नाही याबाबत दुमत होऊ शकत असले तरी ग्राहकास न्याय देण्याच्या दृष्टीने विक्रेत्याने सदोष वाहन बदलवून द्यावे किंवा वाहनाची किंमत परत करावी किंवा वाहनात पूर्णपणे दुरुस्ती करुन ते निर्दोष असल्याबाबत टेक्नीकल ऑथारीटीचे प्रमाणपत्र द्यावे असा आदेश दिला आहे.
4) IV 2012 CPJ 1 A (CN) (Chd)
Swami Automobiles Pvt. Ltd. Vs. Jagadishchandra & anr.
वाहनात असलेले दोष वारंवार दुरुस्ती करुनही कायम असणे ही सेवेतील न्यूनता असल्याचे म्हटले असून तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक त्रासाबाबत तक्रारकर्ता नुकसान भरपाईस पात्र असल्याचे म्हटले आहे.
5) III 2013 CPJ 520 (NC)
SAS Motors Ltd. Vs. Anant Haridas Choudhary
सदरच्या प्रकरणात तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केलेले वाहनातील दोषांबाबत जॉब कार्डमधील नोंदीवरुन पुष्टी होत असल्याने असे निर्मिती दोष सिध्द करण्यासाठी तज्ञांचा अहवाल अनिवार्य नाही असे मा. राष्ट्रीय आयोगाने म्हटले आहे.
6) IV 2013 CPJ 484 (NC)
Mahindra & Mahindra Ltd., Rudra Automobiles Ltd. & other Vs. Chandan Mondal & ors.
सदरच्या प्रकरणात जॉब कार्डवरील नोंदीवरुन वाहनात दोष असल्याचे पुरेशा प्रमाणात सिध्द होत असल्याने सदरचे दोष निर्मिती दोष आहेत किंवा नाही हे सिध्द करण्यासाठी काटेकोर तांत्रिक पुरावा अपेक्षित नसल्याचे म्हटले आहे आणि वि.प.ने वाहनातील दोष दूर करुन त्याबाबत तक्रारकर्त्यास टेक्नीकल ऑथारीटीकडून प्रमाणपत्र देण्याचा आदेश दिला आहे.
तक्रारकर्त्याचे अधिवक्त्यांनी युक्तीवादात प्रतिपादन केले की, सदरच्या प्रकरणात देखील तक्रारकर्त्याचे वाहन इंजिन ऑईल गळतीमुळे दोन वेळा बंद पडले. एकाच कारणासाठी वाहन वारंवार बंद पडते यावरुन वाहन सदोष असल्याचे सिध्द होते. वाहन वारंटी पीरेडमध्ये असल्याने सदर निर्मिती दोष विनामुल्य दूर करण्याची जबाबदारी विक्रेता आणि निर्माता यांची असतांना देखिल त्यांनी ती पार पाडलेली नाही म्हणून वरील न्यायनिर्णयांच्या आधारे तक्रारकर्त्याची मागणी मंजूर व्हावी.
6. याऊलट वरील युक्तिवादाचा प्रतिवाद करतांना वि.प.क्र. 1 व 2 च्या अधिवक्त्यांनी असे प्रतिपादन केले कि, सदरची तक्रार ही वि.प.क्र. 2 निर्मित आणि वि.प.क्र.1 यांनी तक्रारदारास विकलेल्या वाहनात दोष असल्यामुळे वाहनात बिघाड निर्माण होवून ते बंद पडले असल्याने वारंटी काळात वि.प.नी ते दोष विनामोबदला दुरुस्त करुन द्यावे यासाठी दाखल केली आहे. त्यामुळे दि.06.04.2012 आणि 21.05.2012 रोजी तक्रारकर्त्याच्या वाहनात निर्माण झालेला दोष हा निर्मिती दोष आहे किंवा तो तक्रारकर्त्याच्या वाहन निष्काळजीपणे हाताळण्यामुळे अथवा अपघातामुळे निर्माण झाला आहे याचा निर्णय करणे आवश्यक आहे.
त्यांचे म्हणणे असे कि, तक्रारकर्त्याने दि.19.01.2012 रोजी खरेदी केलेल्या वाहनाचा ताबा घेतल्यानंतर दि.21.02.2012 रोजी फ्री सर्विसिंगसाठी वाहन वि.प.क्र. 1 च्या कार्यशाळेत आणले होते व सदर वाहनाची फ्री सर्विसिंग करुन देण्यात आली. त्यावेळी वाहनात कोणताही दोष असल्याची तक्रार तक्रारकर्त्याने केली नव्हती. सदर सर्विसिंगबाबत जॉबकार्ड वि.प.क्र. 2 ने दस्तऐवज क्र. 2 (1) वर दाखल केले आहे. त्यानंतर तक्रारकर्त्याचे वाहन रस्त्यात बंद पडल्यामुळे 06.04.2012 रोजी टोचन करुन वि.प.क्र. 1 च्या कार्यशाळेत दुरुस्तीसाठी आणण्यात आले. सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनाला खालच्या बाजूने बाहेरील वस्तूचा आघात झाल्यामुळे वाहनाचा खालील भाग तसेच ऑईल फिल्टर क्षतिग्रस्त होऊन पूर्ण ऑईल गळून गेल्याने इंजिन बंद पडल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत जॉब कार्ड वि.प.क्र. 2 ने दस्तऐवज क्र. 2 (2) वर दाखल केले आहे आणि त्यात वाहनास झालेल्या क्षतिबाबतचा उल्लेख आहे. वि.प.ने तक्रारकर्त्यास वाहनाच्या क्षतिग्रस्ततेबाबतची पूर्ण जाणिव करुन दिली. परंतू तक्रारकर्त्याने आवश्यक असलेली पूर्ण दुरुस्ती करुन न घेता केवळ ऑईल फिल्टर बदलवून इंजिन ऑईल भरुन घेतले आणि त्याबाबत वि.प.क्र. 1 ने आकारलेला खर्च रु.1,985/- देऊन वाहन घेऊन गेला. त्याबाबत टॅक्स ईनव्हाईस दस्तऐवज क्र. 2(3) वर आहे. त्यानंतर दि.21.05.2012 रोजी सदर वाहन पुन्हा बंद पडल्याने टोचन करुन वि.प.क्र. 2 च्या कार्यशाळेत आणण्यात आले. वाहनाची तपासणी केल्यावर रॉड बिअरिंग खराब झाल्यामुळे इंजिन सीझ झाल्याचे दिसून आले. दि.06.04.2012 रोजी वाहन दुरुस्तीसाठी आणले तेंव्हा तक्रारकर्त्याच्या वाहनास खालून आघात झाल्यामुळे किंवा अपघातामुळे खालील बाजूने क्षती पोहोचली होती, परंतु आवश्यक असलेली पूर्ण दुरुस्ती तक्रारकर्त्याने करुन न घेतल्याचा परिणाम म्हणूनच इंजिन ऑईलची पूर्ण गळती होऊन सदर दोष निर्माण झाला होता. तक्रारकर्त्याच्या वाहनास झालेल्या अपघातामुळे खालील बाजूने क्षति पोहोचली असल्याने निर्माण झालेला दोष वाहनातील निर्मिती दोष नसून तो तक्रारकर्त्याने वाहन निष्काळजीपणे हाताळण्यामुळे किंवा अपघातामुळे निर्माण झालेला दोष असल्याने त्याची दुरुस्ती वारंटी मध्ये विनामुल्य करुन देता येत नाही म्हणून त्यासाठी तक्रारकर्त्यास दुरुस्ती खर्च द्यावा लागेल असे वि.प.क्र. 1 ने सांगितले. परंतू तक्रारकर्त्याने सदरची सशुल्क (Paid) दुरुस्ती करण्यास संमती दिली नाही त्यामुळे वि.प.क्र. 1 ने वाहन दुरुस्त केलेले नाही.
त्यांचा पुढे युक्तीवाद असा की, वारंटीच्या क्लॉज 4(e) मध्ये वारंटीच्या मर्यादा खालीलप्रमाणे नमुद केल्या आहेत.
4) Limitation: This warranty shall not apply to
(e) “the warranty shall not apply to any defects caused by misuse
negligence, abnormal use or insufficient care.”
.
सदरच्या प्रकरणांत तक्रारकर्त्याच्या निष्काळजीपणे वाहन चालविण्यामुळे अपघातात वाहनाचा खालील भाग क्षतिग्रस्त झाला तसेच ऑईल फिल्टरचे नुकसान झाले होते. तक्रारकर्त्याने केवळ ऑईल फिल्टर बदलवून घेतला, परंतू आवश्यक असलेली पूर्ण दुरुस्ती केली नाही, म्हणून परिणाम स्वरुप पुढील काळात ऑईल गळती होऊन इंजिन सीझ झाले. सदरचा दोष हा तक्रारकर्त्याच्या निष्काळजीपणे वाहन हाताळण्याचा परिणाम असल्याने त्याची दुरुस्ती वारंटीच्या क्लॉज 4 (e) प्रमाणे विनामुल्य होऊ शकत नाही. म्हणून तक्रारकर्त्याने विनामुल्य दुरुस्तीचा धरलेला हट्ट वि.प. पूर्ण करु शकलेला नाही. तक्रारकर्ता वरीलप्रमाणे विनामुल्य दुरुस्तीस पात्र नसल्याने वि.प.क्र. 1 ने आवश्यक दुरुस्तीसाठी लागणारा खर्च तक्रारकर्त्यास द्यावा लागेल असे सांगणे ही ग्राहकाप्रती सेवेतील त्रुटी किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब ठरत नाही. तक्रारकर्त्याचे वाहन कोणत्याही निर्मिती दोषामुळे सीझ झाले हे तक्रारकर्त्याने पुराव्यानीशी सिध्द केलेले नाही, म्हणून तक्रारकर्ता मागणीप्रमाणे विनामुल्य दुरुस्ती तसेच नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही.
वि.प.क्र. 2 च्या अधिवक्त्यांनी आपल्या युक्तिवादाचे पुष्टयर्थ खालील न्यायनिर्णयांचा दाखल दिला आहे.
1. III 2009CPJ 229 (NC)
Maruti Udyog Ltd. Vs. Hasmukh Lakshmichand & Anr.
सदरच्या प्रकरणांत मा. राष्ट्रीय आयोगाने म्हटले आहे कि, वाहनातील निर्मिती दोष तक्रारकर्त्याने सिध्द केला नसल्याने वाहन बदलून नवीन वाहन द्यावे किंवा वाहनाची किंमत परत करावी ही मागणी मान्य करता येणार नाही.
याच मुद्यावर वि.प.च्या अधिवक्त्यांनी खालील न्यायनिर्णय दाखल केले आहेत.
2. (2003)CPJ 244
(West Bengal State Con.Dispute Redressal Commission,Calcutta)
Keshab Ram Mahato Vs. Hero Honda Motors Ltd. & Anr.
3. IV(2006)CPJ 257 (NC)
R.Bhaskar Vs. D.N.Udani & Others
4. III (2003) CPJ 385 (Union Territory Con.Dis.Red.Commission,Chandigarh)
Ms. Anupriya Sethi Vs. CMPL MOTORS PVT.LTD. & ORS.
5. I(2010) CPJ (NC)
Classic Automobiles Vs. Lila Nand Mishra & Anr.
6. Santosh Devi Vs. Hyudai South Regional Office & Ors.
7. 2012(4)CPR (NC)
Sukhvinder Singh Vs. Classic Automobile & Anr.
आमच्या समोरील प्रकरणांत तक्रारकर्त्याने वाहन 19.01.2012 रोजी विकत घेतले. सदर वाहनाची तक्रारकर्त्याने दि.21.02.2012 रोजी फ्री सर्विसिंग करुन घेतली, त्यावेळी वाहनात कोणताही दोष असल्याची तक्रार तक्रारकर्त्याने केली नव्हती. सदर सर्विसिंगबाबत जॉबकार्ड वि.प.क्र. 2 ने दस्तऐवज क्र. 2 (1) वर दाखल केले आहे. त्यानंतर दि. दि.06.04.2012 रोजी वाहन रस्त्यात बंद पडल्यामुळे वि.प.क्र. 1 च्या कार्यशाळेत दुरुस्तीसाठी आणण्यात आले. सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनाला खालच्या बाजूने बाहेरील वस्तूचा आघात झाल्यामुळे वाहनाचा खालील भाग तसेच ऑईल फिल्टर क्षतिग्रस्त होऊन पूर्ण ऑईल गळून गेल्याने इंजिन बंद पडल्याचे निदर्शनास आले आणि ऑईल फिल्टर बदलून व ऑईल भरुन वाहन तक्रारकर्त्यास सुपुर्द करण्यांत आले. त्याबाबत जॉब कार्ड वि.प.क्र. 2 ने दस्तऐवज क्र. 2 (2) वर दाखल केले आहे आणि त्यात वाहनास झालेल्या क्षतिबाबतचा उल्लेख “Demanded Repairs - UNDERBODY DAMAGE-OIL FILTER DAMAGE-OIL LEAKAGE” असा आहे. यावरुन असे स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याच्या वाहनास खालून आघात झाल्यामुळे वाहनाचा खालचा भाग आणि ऑईल फिल्टर क्षतिग्रस्त झाला होता व परिणामस्वरुप ऑईलची गळती होऊन इंजिन बंद पडले होते. जाब कार्ड मधील वरील नोंदीचा विचार करता वाहन निर्मिती दोषामुळे नव्हे तर कशावर तरी आदळल्यामुळे किंवा अपघातामुळे खालील बाजूने क्षतिग्रस्त झाले असून त्याच्या परिणामस्वरुप ऑईल गळती होऊन बंद पडले होते. वाहन अशाप्रकारे बंद पडण्यास वाहनातील निर्मिती दोष कारणीभूत असल्याबाबत कोणताही पुरावा तक्रारकर्त्याने दाखल केला नाही.
वाहन क्षतिग्रस्त झाल्याच्या परिणामस्वरुप निर्माण झालेला दोष वारंटीमध्ये विनामुल्य दुरुस्त करुन मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे काय? हा या प्रकरर्णातील महत्वाचा मुद्दा आहे. वि.प.चे म्हणणे असे कि, सदरचा दोष हा तक्रारकर्त्याच्या निष्काळजीपणे वाहन हाताळण्याचा परिणाम असल्याने त्याची दुरुस्ती वारंटीच्या क्लॉज 4 (e) प्रमाणे विनामुल्य होऊ शकत नाही. सदर तरतुद खालीलप्रमाणे आहे.
(e) “the warranty shall not apply to any defects caused by misuse
negligence, abnormal use or insufficient care.”
वाहन क्षतीग्रस्त होण्यासाठी वाहन निष्काळजीपणे चालविणे किंवा अपघात असल्यामुळे त्यामुळे निर्माण झालेले दोष वरील तरतुदीप्रमाणे वाहन जरी वारंटी पिरेडमध्ये असले तरी विनामुल्य दुरुस्त करुन मिळण्यास तक्रारकर्ता पात्र ठरत नाही.
वरील प्रमाणे वाहन रस्त्यावर चालतांना खालून कशाचातरी आघात झाल्यामुळे किंवा अपघातामुळे क्षतीग्रस्त झाले असल्याने परिणाम स्वरुप करावी लागणारी दुरुस्ती वारंटी 4 (e) प्रमाणे विनामुल्य होऊ शकत नसल्याने तक्रारकर्ता विनामुल्य दुरुस्त करुन मिळण्यास पात्र नाही. म्हणून वि.प.क्र. 1 अशी दुरुस्ती विनामुल्य करुन न देता त्यासाठी दुरुस्ती खर्चाची मागणी करणे व खर्चास तक्रारकर्त्याने मान्यता न दिल्याने वाहनाची दुरुस्ती करुन न देणे ही सेवेतील न्युनता ठरत नाही. वि.प. क्र. 1 किंवा 2 यांनी सेवेत कोणताही न्युनतापूर्ण व्यवहार किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला नसल्याने तक्रारकर्ता तक्रारीत केलेली कोणतीही मागणी मंजूरीस पात्र नाही. म्हणून मुद्दा क्र. 1 ते 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश परित करीत आहे.
आदेश
1. तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 खालील तक्रार खारीज करण्यांत येते.
2. तक्रारकर्त्याने वाहन दुरुस्तीस सम्मती दिल्यावर वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्त्याच्या खर्चाने 15 दिवसांचे आंत वाहन दुरुस्त करुन पूर्णपणे दुरुस्त झाल्याच्या प्रमाणपत्रासह तक्रारकर्त्यास सुपुर्द करावे. वि.प.ने दुरुस्ती खर्चाशिवाय अन्य कोणत्याही खर्चाची किंवा पार्किंग चार्जेसची मागणी करु नये.
3. तक्रारीचा खर्च ज्याचा त्याने सहन करावा.
4. निर्णयाची प्रत उभयपक्षांना विनामुल्य पुरवावी.