ग्राहक तक्रार क्र. 286/2014
अर्ज दाखल तारीख : 05/12/2014
अर्ज निकाल तारीख: 06/11/2015
कालावधी: 0 वर्षे 11 महिने 01 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. श्री. काकासाहेब चांगदेव दुधे,
वय - 61, धंदा – शेती,
रा.मु.पो. भानसगांव, ता.जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. सेठी सिडस इंडिया प्रा. लि. खांडवा,
श्रीराम उदयोग कंम्पाऊन्ड, इंदोर रोड,
खांडवा - 450001.
2. प्रोप्रायटर, त्रिमुर्ती कृषि सेवा केंद्र,
भानसगांव, ता. जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. प्र. अध्यक्षा.
2) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.एस.एस. वाघमारे.
विरुध्द पक्षकारा विरुध्द एकतर्फो चौकशीचे आदेश पारीत.
न्यायनिर्णय
मा. प्र.अध्यक्षा श्रीमती विद्युलता जे.दलभंजन यांचे व्दारा:
1) अर्जदार श्री.काकासाहेब चांगदेव दुधे हे मौजे भानसगांव ता.जि. उस्मानाबाद येथील रहिवाशी आहेत. त्यांनी विप यांचे विरुध्द नुकसान भरपाईची तक्रार दाखल केलेली आहे.
2) अर्जदाराच्या तक्रारीची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे अर्जदाराचा व्यवसाय शेती हा आहे. त्यांना मौजे भानसगाव ता.जि. उस्मानाबाद येथे जमिन गट क्र. 60 मध्ये अर्जदाराचा स्वत:चा व कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात.
3) अर्जदाराने सन 2014 साली खरीप हंगामाची पेरणी होण्या आगोदर जमीनीची नांगरण व पाळया घालून उत्तम प्रकारे मेहनत मशागत केली होती.
4) अर्जदाराने विप क्र. 2 कडून सन 2014 सन 2014 चे खरीप हंगामासाठी सोयाबीन प्रकार जे.एस.335 लॉट क्र.170496 या जातीचे 4 बँग एकूण रक्कम रु.10,000/- दि.18/07/2014 रोजी पावती क्र. 57 अन्वये खरेदी घेऊन त्याची रितसर पावती अर्जदारास दिलेली आहे.
5) अर्जदाराने दि.21/07/2014 रोजी गट क्र.60 मध्ये सदर बियाणे हे पेरणी केली असता सदर बियाणे हे सडलेले व नासलेले असल्याने बियाणे उगवून आले नाही. सदोष असल्यामुळे बियाणे उगवले नाही. त्यानंतर दि.11/09/2014 रोजी सोयाबीन न उगवल्याबाबत पंचनामा करणेस अर्ज दिला त्यानंतर दि.31/07/2014 रोजी उपविभागीय कृषी अधिकारी कृषि अधिकारी पं.स. उस्मानाबाद तालूका कृषी अधिकारी उस्मानाबाद विद्यापीठ प्रतिनिधी कृषि महाविद्यालय उस्मानाबाद यांनी सोयाबीनचा पंचनामा करुन बियाणे सदोष असल्याने उगवून आले नाही असा अहवाल दिला. सोयाबीन न उगवून आल्याने उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद यांचेकडे नुकसान भरपाईची मागणी केली असता त्यांना बियाणे कायदा 1966 व रुल 1968 या तरतूदीचा आधार घेऊन नुकसान भरपाई देता येत नाही. मंचात रितसर तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला.
6) अर्जदाराने रसायनीक खताची रक्कम रु.7,000/- खर्च तसेच शेतातील मेहनत करण्यासाठी रु.10,000/- आणि सोयाबीन बी खरेदीसाठी रु.10,000/- बियाणाचे असे एकूण रु.27,000/- खर्च अर्जदारास आला. सोयाबीन प्रति बॅगला 60 क्विंटल उत्पन्न धरले तर प्रत्यकी क्विंटलचा आडतचा भाव रु.5,000/- असून 60 क्विंटचा रु.3,00,000/- तसेच झालेला खर्च रक्कम रु.210,000/- असे एकूण रु.3,27,000/- हे विप क्र. 1 व 2 देण्यास जबाबदार आहेत आणि सदरची रक्कम तक्रार दाखल केल्यापासून द.सा.द.शे.12 टक्के व्याज दराने द्यावी अशी विनंती अर्जदाराने केलेली आहे.
7) विप क्र. 1 व 2 यांना मंचातर्फे नोटीस बजाऊन प्रकरणात गैरहजर राहिल्याने मंचाने दि.08/07/2015 रोजी एकतर्फा चौकशीचा आदेश पारीत केला.
8) अर्जदाराने तक्रारीसोबत उपविभागीय कृषि अधिकारी उस्मानाबाद तपासणी अहवाल, अर्जदाराचा कृषि अधिकारी यांना अर्ज, बियाणे खरेदी पावती बियाणाचा लॉट क्र. 2 पावत्या नोटीस, इ. कागदपत्राचे सुक्ष्म अवलोकन केले, लेखी युक्तिवद वाचला आमचे विचारार्थ सदर प्रकरणात खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1) बियाणे उत्पादित कंपनीने अर्जदाराला
देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केली का? होय
2) अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे का ? अंशत: होय.
3) कोणाकडून ? विप क्र. 1 उत्पादित कंपनीकडून.
4) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
निष्कर्ष
मुद्दा क्र. 1 ते 3:
9) अर्जदाराने सोयाबिन विप क्र. 2 कडून खरेदी केले आणि ते उगवले नाही ही प्रमुख तक्रार आहे.
10) अर्जदाराने बियाणे पेरले व ते उगवून आले नाही याचा कृषि अधिकारी व समिती यांचा अहवाल अभिलेखावर दाखल केलेला आहे. सदर अहवालात बियाणे नासलेले होते नंतर शेतक-याने दुबार पेरणी केली. दुबार पेरणी केल्यामुळे पहिले पेरलेले बियाणे उगवण झालेले रोप तपासता आले नाही असा अहवाल दिला आहे. तसेच दि.11/09/2014 रोजी अर्जदाराच्या नावाने अध्यक्ष तथा उपविभागीय कृषि अधिकारी उस्मानाबाद यानी एक पत्र दिले आहे. त्या पत्रात असे नमूद केलेले आहे की बियाणे तक्रार निवारण समितीने तपासणी करुन निष्कर्ष काढला आहे की सदरचे बियाणे हे दोषयुक्त असल्याने बियाणाची उगवण झालेले नाही याचाच अर्थ बियाणे दोषयुक्त होते.
11) सदर बियाणे दोषयुक्त नव्हते याबाबत विप क्र. 1 व 2 हे मंचात हजर राहिलेले नाहीत किंवा अद्यापपर्यंत त्यांनी बियाणांबाबत त्यांचे काहीही म्हणणे दिलेले नाही किंवा बियाणे दोषयुक्त नाहीत याबद्दल कथन केलेले नाही.
12) अर्जदाराने रु.10,000/- चे बियाणे खरेदी केलेले आहे. रासायनीक खताचा रक्कम रु.7,000/- एवढा खर्च आला असे अर्जदाराचे म्हणणे आहे.
13) अर्जदाराचे 4 बँग सोयाबीनचा उत्पन्न 60 क्विंटल गृहीत धरलेले आहे व भाव 1 क्विंटलला रु.5,000/- मागितला आहे तसेच अर्जदाराला झालेला खर्च रु.2,10,000/- असे एकूण रु.3,27,000/- देण्यास जबाबदार आहेत असे म्हंटले आहे आणि तक्रार खर्चाचे रु.10,000/- शारीरिक त्रासाचा रु.5,000/- असे एकूण रु.3,87,000/- ची मागणी केलेली आहे.
14) आमच्या मते अर्जदाराचे निश्चितच नुकसान झालेले आहे. मशागत मेहनत, खत यासाठी मागितलेला जो खर्च आहे तो देऊ शकत नाही. कारण त्याबद्दल कसलाही कोणताही कागदोपत्री पुरावा अभिलेखावर दाखल नाही तसेच अर्जदाराने 3 एकर 20 गुंठे एवढया क्षेत्रात सोयाबीन पेरले आणि अर्जदार 1 बँग सोयाबिनचे बियाणे पेरले तर 15 क्विंटल सोयाबिनचे उत्पन्न हाते असे म्हणतात आमच्या मते 1 बँग पासून 8 क्विंटल सोयाबीन निघेल असा अंदाज ग्राहय धरणे योग्य होईल आणि 2014 चा सोयाबीन चा भाव रु.4300/- होता आमचे मत 4,000/- X 28 = 1,12,000/- एवढी नुकसान भरपाई मिळण्यास अर्जदार पात्र आहे म्हणुन मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 3: अर्जदाराने विप क्र. 2 कडून सोयाबीन बँग खेरदी केलेले होती पण विप क्र.2 हा डिलर आहे. उत्पादित कंपनी नाही त्यामुळे सदर प्रकरणात नुकसान भरपाईस विप क्र. 2 जबाबदार न धरता उत्पादित कंपनी विप क्र.1 यांनी नुकसान भरपाईस जबाबदार धरता येईल. त्यामुळे अर्जदार विप क्र. 1 कडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरतात. त्यामुळे खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2) विप क्र. 1 यांनी अर्जदारास सोयाबिन बियाणे उगवले नाही म्हणून व बियाणे सदोष आहे. म्हणून नुकसान भरपाई रु.1,12,000/- (एक लाख बारा हजार फक्त) दि.05/12/2014 पासून 9 टक्के व्याज दराने द्यावी.
3) विप क्र. 1 यांनी तक्रार खर्च, सेवेतील त्रुटी, व मानसिक त्रासापोटी अर्जदारास रक्कम रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त)
4) वरील नमूद आदेश तक्रारीचा आदेश पारीत दिनांकापासून 30 दिवसात द्यावा.
5) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत
मंचात अर्ज द्यावा.
6) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य प्र.अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
वरील प्रकरणातील मुद्याशी मी तत्वत: सहमत असून ऑपरेटीव्ह ऑर्डरमधील हिशोब व व इतर बाबींशी मी सहमत नाही म्हणून खालीलप्रमाणे वेगळे मत देत आहे.
नुकसान भरपाईचे विष्लेशन :
सोयाबीन उतारा हा भारी जमीनीमध्ये एकरी 10 पोती तर हलक्या जमीनीमध्ये 06 पोती असा येतो याचा अर्थ सरासरी कमीत कमी एकरी उत्पन्न 8 पोती अपेक्षित धरली व शासनाची किमान हमी मुल्य रु.2,500/- व बाजारभावातील सरासरी भाव रु.3,500/- मान्य केला असता प्रती क्विंटल रु.3,000/- हा भाव नुकसानीचे मुल्यांकन करतांना योग्य वाटतो. त्यामुळे एकरी उत्पन्न रु.24,000/- येते. यातून काढणीचा खर्च रु.3,000/- एकरी वजा केले तर निव्वळ उत्पन्न रु.21,000/- हा निश्चीतपणे शेतक-याला निव्वळ उत्पन्न अखेर मिळाले असते म्हणजेच तक यांना 1.6 हे. जमीनीतील चार बॅगचे उत्पन्न रु.84,000/- मिळणे आवश्यक होते. तथापि तक ने दुबार पेरणी केली असल्याने 50 टक्के उत्पन्न त्याला या पेरणीतून पुर्वीच मिळालेले असणार व 50 टक्केचे उत्पन्नात घट हे उशीरा पेरणी व दुबार पेरणीमुळे झाले आहे असे मान्य करत आहे ती रक्कम रु.42,000/- होते म्हणून एवढी रक्कम तक्रारदार मिळण्यास पात्र आहे.
आदेश
1) तक्रारदार यांची तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
2) विप क्र.1 व 2 यांनी रु.42,000/- (रुपये बेचाळीस हजार पाचशे फक्त) एकटयाने किंवा संयुक्तरित्या तक्रारदारास द्यावे.
वरील हिशोबातील रकमेव्यतरिक्त जर काही रक्कम विप ने तक ला यापुर्वी दिली असेल तर ती रक्कम या अंतीम देय रकमेतून वजा करुन उर्वरीत रक्कम तक स देय राहील.
3) विप क्र.1 व 2 यांनी एकट्याने किंवा संयुक्तिकरित्या रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) तक्रारीचा खर्च व मानसिक त्रासापोटी तक्रारदारास देण्यात यावी.
4) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी सदरबाबत मंचात अर्ज दयावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.मुकूंद.बी.सस्ते)
सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
1. सदर प्रकरण दि.05/08/2015 रोजी सुनावणीसाठी घेण्यात आले. त्या दिवशी मी गैरहजर असल्यामुळे प्रभारी अध्यक्ष श्रीमती दलभंजन व सदस्य श्री.सस्ते यांचे समोर प्रकरणाची सुनावणी झाली. त्यानंतर श्रीमती दलभंजन यांनी निकालपत्र लिहिले. मात्र श्री. सस्ते यांनी वेगळे निकालपत्र लिहिले आहे. ग्राहक संरक्षण कायदा कलम 14(2A) प्रोव्हिजो हे प्रकरण माझ्यासमोर ठेवण्यात आले आहे. कारण श्रीमती दलभंजन यांनी जी नुकसान भरपाई मंजूर केली त्यापेक्षा श्री. सस्ते यांनी कमी नुकसान भरपाई मंजूर केली आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणी दिलेली नुकसान भरपाई योग्य आहे हा माझे पुढील मुद्दा आहे.
2. हे लक्षात घेतले पाहिजे की सदर कामी सोयाबीन बीज उत्पादक तसेच विक्रेता हे हजर राहिलेले नाहीत व त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा चाललेले आहे. तक याने एकूण चार बॅग बियाणे विप क्र.2 कडून घेतले होते. तक ने आपल्या जमीनीचा सातबारा उतारा हजर केलेला नाही. तक्रार निवारण समीतीने पंचनामा केलेला आहे. त्यात पेरणी क्षेत्र एक हेक्टर 60 आर. म्हणजेच चार एकर दिलेले आहे. दुबार पेरणी केल्यामुळे पहिल्यांदा उगवलेले रोप तपासता आले नाही असे नमुद केलेले आहे. तक चे म्हणणेप्रमाणे दि.21/07/2014 रोजी पेरणी केली होती. मात्र बियाणे उगवले नाही. दि.11/09/2014 रोजी तक ने तक्रार दिली. उपविभागीय कृषी अधिकारी यांचे दिनांक दि.11/09/2014 चे पत्र असे दाखवते की तक ने दि.30/07/2014 रोजी तक्रार दिली होती. पंचनाम्यातसुध्दा असे नमुद करण्यात आलेले आहे. म्हणजेच पेरणी केल्यापासून नऊ दिवसातच तक ने तक्रार दिली होती. मात्र त्यांनतर एक महिना 11 दिवसाने पंचनामा करण्यात आला. दरम्यान तक ने दुबार पेरणी केली असे दिसून येत आहे. मात्र तक ने ही गोष्ट तक्रारीत नमूद केलेली नाही.
3. श्रीमती दलभंजन यांनी एका बँगपासून आठ क्विंटल उत्पन्न होते असे म्हंटले आहे. त्या मताशी श्री. सस्ते सहमत आहेत. म्हणजे उत्पन्न मिळाले असते तर 32 क्विंटल झाले असते यावर एकमत आहे. श्रीमती दलभंजन यांनी सोयाबीनचा त्यावेळचा भाव क्विंटलला रु.4,000/- धरल्यामुळे तसेच 3 एकर 20 गुंठयामध्ये पेरणी झाली असे धरल्यामुळे 28 क्विंटल सोयाबीनचे रु.1,12,000/- चे नुकसान झाले असे म्हंटले आहे. श्री. सस्ते यांनी दर प्रती क्विंटल रु.3,000/- भाव धरला आहे. तक ने बाजार भावाबद्दल पुरवा दिलेला नाही. श्री. सस्ते यांनी काढलेला निष्कर्ष योग्य वाटतो. श्री.सस्ते यांनी काढणीचा खर्च रु.3,000/- वजा करुन एकरी उत्पन्न रुपये 21,000/- धरले आहे. चार एकरचे उत्पन्न रु.84,000/- धरले आहे. दुबार पेरणीमुळे उत्पन्नातील घट 50 टक्के धरली आहे. त्यामुळे नुकसान रु.42,000/- धरले आहे. ते योग्य वाटते म्हणुन मी खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) विप क्र.1 व 2 यांनी तक याला भरपाई रु.42,000/- (रुपये बेचाळीस हजार फक्त) स्वतंत्रपणे अथवा संयुक्तपणे द्यावी.
2) विप क्र. 1 व 2 यांनी तक यांला या तक्रारीचा खर्च रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) द्यावा.
3) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत
मंचात अर्ज द्यावा.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.